शनिवार, २९ जानेवारी, २०२२

संतसाहित्य निर्देशिण्या केशवकुमारांची विभूति

   कोल्हापूरमधून प्रकाशित पुस्तक बंगळुरमधे हातात मिळणं दुर्मिळच. 'संत आणि साहित्य' हे पुस्तक तसं मोठं नाही. चिक्कार समास सोडलेली आणि भरपूर मोकळ्या जागा असलेली १६० पृष्ठे. पण विषय गहन आहे. तो वाचून मनात उठणार्‍या तरंगांनी कागदावरचीच नाही तर अंतःकरणातलीही सगळी जागा व्यापू शकते.

पुस्तक: संत आणि साहित्य
लेखक: आचार्य अत्रे
प्रकाशक: सौ. पूनम राहुल मेहता, पार्श्व पब्लिकेशन्स, कोल्हापूर
तृतीय आवृत्ति: १९९३
ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली बंगळूरमधली पेटी   


   पहिले बारा लेख 'तुकाराम' च्या साप्ताहिक अंकांमधून घेतले आहेत. ते अगदी लहान लहान पण अधिक वाचनीय आहेत. तर पुढचे सगळे लेख 'नवयुग' मधून घेतले आहेत. आचार्य अत्रेंनी बहुतांश संत साहित्यच नव्हे तर वेद, उपनिषदे, गीता, गीतेवरच्या विविध भाषांमधल्या टीका हे ही वाचलेलं आहे आणि मग हे लिखाण केलंय. केशवकुमार म्हणजेच आचार्य अत्रे हे माझ्या जन्माच्या बर्‍याच आधी निवर्तले. ते नाटककार, वक्ता दशसहस्रेषु, महाराष्ट्र एकीकरण समितिचे कार्यकर्ते/ नेते, संपादक होते. त्यांचंही साहित्य शाळेच्या धड्यांमद्धे होतं असेल. विनोदी साहित्यिक म्हणून त्यांची विशेष ओळख आमच्या पिढीला आहे. ते इंग्लंडमध्ये शिकले. या पृष्ठभूमीवर संतसाहित्य या तशा गंभीर आणि मातीतल्या विषयावर त्यांचं पुस्तक सामोरं आल्यावर कुतूहल वाटलं.

   अंत्रेंना स्वतःला गाडगेबाबा आणि विनोबा भावेंचा सहवास लाभला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे लिखाण. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' आल्या. देव आणि धर्म कर्मकांडात अडकलेले होते, त्यामुळे नाडला जाणार्‍या समाजाचा त्यांनी उद्धार केला. आजही त्यांचं मार्गदर्शन उपयोगी आहे. जर आपण वाचलं, ऐकलं तर. आपल्याला त्याची जाणीव करून देणारे हे लेख आहेत. जणू 'संतसाहित्य निर्देशिण्या केशवकुमारांची विभूति' आली आहे. आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत. याला अनेक कारणं आहेत. एक मुख्य कारण म्हणजे आपला जन्म संतपरंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे. माझ्या पिढीपासून पुढे किती लोकांनी किमान एक संतसाहित्य वाचलं आहे माहिती नाही. पण शाळा, आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्र वगैरे माध्यमातून लहानपणी ते आपल्यात झिरपलेलं आहे हे नक्की.

   विविध कर्म करायला आपण भिन्न भिन्न साहित्य वापरतो. अत्रेंनी केलेलं वर्णन वाचून मला असं वाटलं की, समाजोद्धार करायला संतांनी शब्द हेच साहित्य वापरलं. म्हणून संत हे खरे साहित्यिक! अत्रे म्हणतात की 'आता एखादं उत्तम काव्य रचूया' असं म्हणून संतांनी रचलं नाही. समाजाचा उद्धार हे उद्दीष्ट ठेवून, लिखाण हे त्यासाठीचं साधन म्हणून वापरलं. म्हणून त्यांच्या रचना उच्च प्रतीच्या झाल्या. संतांचे गोडवे गाता गाता अत्रेही अनेक मार्मिक विधानं करतात. 'देवावर ज्याचा विश्वास नाही, त्याच्या मनात श्रेष्ठकानिष्ठतेचे विचार येतात.' किंवा 'पुरुषार्थशक्ति जिथे कुंठित होते तिथे भक्तीची गरज निर्माण होते. ईश्वराच्या इच्छेला अनुकूल अशी आपली इच्छा बनवणे म्हणजे आस्तिकता.' हे सामान्य वाचकासाठी अत्रेंनी घातलेलं अंजन असेल तरी ते अत्रेंच्या संतसाहित्याच्या चिंतंनातून निघालेलं नवनीत आहे हा इथे खरा मुद्दा आहे.

   'वैयक्तिक दुःख्खे चमत्काराने दूर होऊ शकतात असे ज्यांना वाटते त्यांना सामाजिक दुःख्खे त्याच चमत्काराने दूर व्हावी असे वाटत नाही.' यातून समजायचे त्याने ते समजून घ्यावे. बालपणीची गम्मत म्हणून एक आठवण सांगतो. माझ्या लहानपणी मोठी माणसे सांगत, रामनाम उच्चारत कोणतीही कामना केली की ती पूर्ण होते, फक्त मनापासून नामस्मरण केले पाहिजे. मग भारताचा क्रिकेटची उत्कंठावर्धक सामना चालू असतांना आपण हरतो आहोत असे वाटू लागले की मी श्रीराम जयराम जयजयरामचा धोशा सुरू करायचो. आपल्याला अनुकूल चौकार वा बळी मिळाला की उपयोग होतो आहे असं ठरवायचो आणि प्रतिकूल परिणाम आला तर आपण मनापासून केलं नाही अशी समजूत घालून घ्यायचो! ... कर्मावाचून साधना व्यर्थ आहे हे अत्रे ठासून सांगतात.

   मी गीता अनेकदा वाचली आहे. आत्तापर्यंत गीता रणांगणीच प्रथम सांगितली गेली किंवा महर्षि व्यासांनी तशी रचना केली आहे असं मला वाटायचं. हे पुस्तक वाचून मला उपनिषदांमध्ये गीतेचं बीज आहे हे प्रथमच कळलं. गीतेवरच्या साहित्याची गोडी असणार्‍यांसाठी मी या पुस्तकातली गीतेवर मराठी लिखाण केलेल्या लेखकांची यादी इथे देतो: सोनोपंत दांडेकर, य. गो. जोशी, रा.शं. वाळिंबे, श्रीकृष्णदास लोहिया, तुकडोजी महाराज, संतोजी महाराज, गजेंद्रगडकर, नेऊरगावकर, न. र. फाटक, इतिहासाचार्य राजवाडे, एत्यादि. ज्ञानेश्वरी, गीता रहस्य आणि गीताई हे तर प्रसिद्धच.

   गाडगेबाबांनी केवळ स्वच्छतेचा आणि साध्या रहाणीचा पुरस्कार केला नाही तर साक्षरता, अहिंसा आणि शाकाहाराचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर आजच्या काळात असते तर ते थोर पर्यावरणवादी ठरले असते. काही वाक्य वाचून मला सांप्रत काळात ती सिद्ध होताहेत की काय असं वाटतं. गाडगेबाबा म्हणत, "बैलाच्या श्रमावार आणि गाईच्या दुधावर शेतकरी जगतो. गाईला आणि बैलाला कसायाला विकाल तर तोंडात तापतं डांबर पडेल." आज एका अर्थाने हे खरं झालय का हो? यांत्रिकीकरण झालं. शेतकर्‍याची मुलं शेती सोडू लागली. जी राहिली त्यातली आत्महत्या करू लागली. यंत्र ने-आण करायला डांबरचे रस्ते बांधावे लागले. त्यासाठी शेतीची जमीन अधिग्रहीत झाली. एका अर्थाने तापलेलं डांबर तोंडात पडतंय. समाजाची प्रगति होतेय पण निसर्गाच्या विरुद्ध आणि खड्ड्याच्या दिशेने. हेच गाडगेबाबांनी पाहून ठेवलं होतं असावं का? मी स्वतः शेतकरी नसल्याने हा माझा निष्कर्श नाही तर गहन चिंतनाचा विषय आहे. 

   विनोबा भावे म्हणाले, "पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे म्हणून माशाला दुधात टाकले तर तो तिथे जगेल का?" खरोखर किती साधासा दृष्टांत आहे. पैशात अन्य कामाचं मूल्य जास्त आहे म्हणून ते करू लागणं योग्य नाही, बहुधा जमणारही नाही. आमच्यावेळची पालक-पिढी मुलांनी मोठेपणी काय व्हावं याची खूप चिंता करत. डॉक्टर आणि इंजीनियर झालं तर आर्थिक उन्नती होती म्हणून बरेच जण रेट्याने तिकडे ढकलले गेले. शाळेपासूनच टेक्निकल विषय निवडून अभियंते झालेले फार कमी. आज ह्या सगळ्यांना ते करताहेत त्या कामात सूख आहे का? ते मनापासून त्यांचं काम करतात का आता दुधात पडले म्हणून हात-पाय मारताहेत आणि पन्नाशी-साठीतच जीव गुदमरतो आहे? त्या अनुषंगाने ही तेव्हाची पाल्य-पिढीआता पालक या भूमिकेत चिंता करत बसत नाही. आपल्या शिक्षणाने आपल्याला पैसा कमवायला शिकवलं, तो आपण कमवू, पाल्याच्या शिक्षणात ओतू. तो/ ती मोठा होऊन काय होईल, आपल्याला विचारेल, ओळखेल की नाही यात गुंतायचं नाही. त्याचं आयुष्य त्याची जबाबदारी! आता सांगा हाच का कर्मयोगाचा यथार्थ?

   गाडगेबाबा आणखी म्हणाले, "जगात सूर्य एक आहे, आभाळ एक आहे, जमीन, पाणी, वायु एक-एक आहेत. मग धर्म का हो दहा?" आपल्याला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले होते, "there is one Sun, one world, one grid, one Narendra Modi." याविधानाआधीच्या त्यांच्या आपसातल्या चर्चेत मोदींनी गाडगेबाबांचं वाक्य तर त्यांना ऐकवलं नसेल? भाषणांमध्ये कानडी संत बसवप्पांपासून पासून गुरु गोविंदसिंगांपर्यंत अनेकांचे दाखले लीलया देणार्‍या मोदींच्याबाबत हे अगदीच अशक्य नाही.

   गृत्सपदऋषींनी कापसापासून कापड बनवण्याचा आणि २ ते १० पाढ्यांचा शोध लावला अशी नवी रोमांचक माहितीही या पुस्तकातून मला मिळाली. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे, 'पक्वान्नांची गोडी शब्दांनी काय वर्णन करावी, ती चाखूनच पाहिली पाहिजेत.' आपण हे पुस्तक स्वतः वाचा. विनोबा भावे म्हणाले,"जे समाजाला शुद्ध करते आणि समाजाचे कल्याण करते ते साहित्य." अत्रेंचं हे साहित्य नक्की वाचावं आणि चिंतन, मनन करावं!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिश्यते || ॐ शांतिः शांतिः शांतिः |

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

अनिल अवचट यांची अमेरिका

अनिल अवचट शरीराने आणि मनाने जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या वाचकांनाही नेले.  आज ते ईहलोक सोडून गेले.  कुठे गेला आहात अनिलजी?

नोव्हेंबर 2020 मध्ये मी त्यांचं 'अमेरिका' हे पुस्तक वाचून तेव्हाच लिहून ठेवलेला जरासा त्रोटक असा पुस्तक परिचय आज आपल्या सुपूर्द करतो. त्यायोगे त्यांना आळवूया. 

पुस्तक: अमेरिका

लेखक: अनिल अवचट

प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन

प्रथम आवृत्ति: ऑगस्ट १९९२

वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना, बंगळुरू पेटी ४



   डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, बासरीवादक, ओरीगामी'कार' (किंवा जादूगार मधलं 'गार' लावलं तरी चालेल), स्ट्रिंग गेम्सपटू, कायमचे विद्यार्थी असे बहुविध आयाम असलेले अनिल अवचट यांनि लिहिलेलं हे उत्कृष्ठ प्रवासवर्णन. हे आयाम सांगावे लागत नाहीत, ते पुस्तकातल्या वर्णनाच्या ओघात समजत जातात. 

   अनिलजी यात आपल्याला त्यांनी पाहिलेली अमेरिका फिरवून आणतात. अमेरिका पहायची इच्छा असणार्‍यांनीच नव्हे तर जे तिथे सहल काढून आलेत किंवा तिथे राहिलेत त्यांनीही हे पुस्तक जरूर वाचावं. सशक्त जाणिवा असलेली व्यक्ति प्रवास कसा करते हे यातून समजतं. निसर्ग, वातावरण, मानवी भौतिक प्रगति हे सगळेच प्रवासी अनुभवतात. लेखकला त्या जोडीने तिथला समाज, संस्कृति, सामाजिक जडण, समस्या यांचं आकलन आपसूक होत रहातं आणि निर्व्याजपणे लेखक तो खजिना आपल्यासमोर रिता करतो. 

   हे वर्णन १९९१ चं. तेंव्हा अमेरिकेत टीव्ही संस्कृति चिघळलेली होती, संगणक रुळत होते. पण मोबाइल, ऑनलाइन हे त्या जमान्यात नव्हतं. तरीही अमेरिकेचं हे वर्णन अप्रासंगिक किंवा जुनं वाटत नाही. याचं एक कारण हे की आपण प्रगतिच्या नावाखाली त्यांची नक्कल करतो आहोत आणि आपसूकच त्यात कैक वर्षांचा 'लॅग' आहे. त्यामुळे १९९१ च्या तिथल्या समस्या या आपण नुकत्याच अनुभवून झाल्या आहेत किंवा अनुभवतो आहोत. तेंव्हा वाचून अचंबा वाटला असता अशा बाबी, परिणाम, निष्कर्ष हे आता आपल्यात 'हे बाकी खरं' अशी भावना निर्माण करून जातात. यात अमेरिकेतल्या निसर्गापासून ते तिथली सुबत्ता, मानव निर्मित प्रगति, त्यातून बदलती संस्कृति, त्यातले बारकावे, भारतीय, रेड इंडियन्स, मेक्सिकन्स, कसिनो, ग्रँड कनाइन अशी सगळी वर्णनं आहेत. अगदी चक्षुर्वैही सत्यम, थेट आणि कसलाही मुलामा किंवा साहित्यिक अभिनिवेश विरहीत.

   सामाजिक जाणिवा असल्या की प्रवास आणि परप्रांतातलं वास्तव्य हे रटाळ म्हणजे बोअरिंग वगैरे तर होत नाहीच उलट वेळ अपुरा ठरतो, नवं शिकता येतं. माणूस म्हणून अधिक प्रगल्भता येते. मग सभोवतालालाही आपण हवे हवे वाटू लागतो आणि त्यातून नवीन ओळखी, नवीन विषय, नव्या जाणिवा तयार होत जातात. हे धडे या पुस्तकात आपल्याला पानोपानी मिळतात. 

   बरेचसे उत्कृष्ठ लेखणीबहाद्दर हे त्याहीपेक्षा पटाईत वाचक असतात हा माझा समज अनिलजी आणखी पक्का करतात. त्यांनी उल्लेख केलेली पुस्तकं आणि चित्रपट वाचायचे, बघायचे ठरवले तर २०२० च्या स्थानबद्धतेसारखं आणखी १ वर्ष सहज सरेल. अनिलजी हे पत्रकारही आहेत. व्यावसायिक पत्रकारितेला त्यांचा विरोध होता किंवा आहे. पत्रकारांनी स्वतः तटस्थ राहून परिस्थिति, प्रसंगांचं वर्णन कसं करावं यासाठी हा उत्कृष्ठ वस्तूपाठ आहे.

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

मीना प्रभुंबरोबर तिबेटच्या वाटेवर

 "लेखन आणि वाचन हे असे रवंथ आहेत ज्याची ढेकर परस्परांना येते." 

 बुचक्याळलात ना? ... आपलं ते... बुचकळ्यात पडलात ना? पडणारच! कारण असं वाक्य मीना प्रभु यांचं पुस्तक वाचल्यावर सुचतं. तुम्ही वाचलंय का? थांबा.. थांबा.. सग्गssळ्ळ सांगतो.


  काय आहे की कोणत्याही लेखनात लेखकाच्या जीवनपटाचा हिस्सा मोठा असतो. त्यातून प्रवासवर्णन म्हंटलं की आधी तो जिकिरीचा प्रवास करायचा, करता करता छायाचित्रं, नोंदीही करत ती जिकिर वाढवायची.. आणि मग परतल्यावर सगळं संगतवार लावायचं, गाळलेल्या जागा स्मरणशक्तीने भरायच्या.. हा एक प्रकारचा रवंथच नाही का? असा रवंथ करून प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं की त्या प्रवासानुभूतीची ढेकर वाचकाला येते. वाचन हा तर खराखुरा रवंथ. विज्ञानयुगात पुरावा द्यावाच लागेल. एक काम करा. मोठयाने वाचा. दात दाताला, जीभ टाळूला, ओठ ओठाला लागतात आणि आवंढा गिळला जातोय की नाही? म्हणजे शब्द चावून झाला की रवंथ! आणि हा करून वाचकाने दाद दिली की समाधानाची ढेकर लेखकला येईलच. आता 'बुचकळ्यात' ऐवजी 'बुचक्याळलात' का झालं ते मात्र शेवटी कळेल तुम्हाला.


  तर व्यंकटेश माडगूळकरांबरोबर वाघाच्या मागावर जाऊन परत आलो आणि माझं २५ पुस्तकांचं ग्रंथालय उघडलं. त्यात 'वाट तिबेटची' पुस्तक समोर आलं. ३३५ पृष्ठांचा ठासून भरलेला ऐवज पाहून ते ठेवून देणार तेवढ्यात त्याच्या मुखपृष्ठावरची तिबेटी आज्जी म्हणाली, "भारतीय बनावटीचा सांप्रत माणूस म्हणून यापुढच्या आयुष्यासाठी दोनच पर्याय देते. सैनिक होणार का वाचक?" मी म्हणालो,"काय कमाल करता आज्जी, मी आणि सैनिक, ते ही यापुढे? तरुण केलात तर ठीक.

  अन्यथा वाचकच होऊ शकेन." तर म्हणतात कशा, "गुमान उचल ते पुस्तक. भारतीयांच्या या पिढीला तोच पर्याय आहे. नाहीतर तिबेटला जाण्याच्या संधीला कायमचा मुकशील."


पुस्तक: वाट तिबेटची

लेखिका: मीना प्रभु

प्रकाशक: पुरंदरे प्रकाशन

तिसरी आवृत्ती: जून २०१४

ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतली बंगळूरमधली पेटी


  स्थलकाळातली वाट इंग्लंडमधून सुरू होते आणि हवाई, होनुलुलू, चीन मार्गे तिबेटला पोहोचते. पोहोचते ती थेट 'देवदुंघा' वा 'पवित्राचल' वा 'चामोलुंग्मा' म्हणजेच माऊंट एवरेस्टच्या बेस कॅम्प पर्यन्त. पण लेखन सुरू होतं ते सहलीचा विचार डोक्यात आल्यापासून. मूळ उद्दीष्ट आहे जपान, चीन, तिबेट मधून दिसणारं खग्रास सूर्यग्रहण पहाणे. त्याची तयारी, विसा, बर्फातले बूट शोधणं, पोशाख, पर्यटन संस्था शोधणे, निवडीचे निकष- जसे सहलीचा आराखडा, मूल्य वगैरे, या सगळ्याचं साद्यंत वर्णन लेखिका करते. यात जुने आणि आकार हरवलेले जोड परत वापरात कसे आणावे याचं प्रशिक्षणही आपल्याला मिळतं. सूर्यग्रहणसारख्या वैश्विक कुतूहलाची घटना पाहायची असेल तर किती आधीपासून तयारी करावी लागते ते कळतं. कोणी दाखवतो म्हणत असेल तरी त्याला कोणते प्रश्न विचारावे, खात्री कशी करावी ते ही कळतं. 

  'वाट तिबेटची' असं पुस्तकाचं नाव ठेवून चीनमधून पाहिलेल्या सूर्यग्रहणाची हकीकत आणि ती सांगायची म्हणून त्याआधी कित्येक वर्ष भारतातून, जर्मनीतून पाहिलेल्या २ सूर्यग्राहणांची अगदी पाठपोट हकीकत सांगितली असेल तर ते मीना प्रभुंनी लिहीलंय. 'तिबेटकडे जातांना वाटेत जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्ल्याबद्दलचा लघुपट बघायला गेले, तो फारच थरारक होता' एवढंच न सांगता लघुपटसाठी सोडणारा तिकीट तपासनीस कसा समजूतदार होता, त्याचं वागणं, बोलणं, मग लघुपट, त्याची पूर्ण कथा, मला तो कसा वाटला, अमेरिकन जनतेला तो कसा वाटत असेल, नंतर त्याबद्दल कोणाशी बोलून तो हल्ला जपानने केला नव्हताच तर अमेरिकेला युद्धात आणायचं म्हणून इंग्लंडनेच केला होता ही समांतर कथा कशी काढून घेतली' हे सगळं लिहीलं असेल तर ते मीना प्रभुंनी.


  हवाईबेटांच्या प्रवासाचं वर्णन करतांना तिथले रहिवासी कुठून आले, पहिल्या राजापासून ते शेवटच्यापर्यन्त राजे, त्यांची कुळं, कर्तुत्व, संपत चाललेली मूळ संस्कृती, तिथले रिती रिवाज, खाणं, वाटाडे, निसर्ग, हॉटेल्स या सगळ्याबद्दल 'वाट तिबेटची' या नावाने लिहीलं असेल तर ते... बेटावर गेलात म्हणून मग बेट कसं तयार होतं, तिथे मोजक्याच प्रजाती असतात, मानवाने बाहेरून परदेशी प्रजाती आणून तिथल्या मूळ प्रजाती कशा नाहीशा केल्या, समुद्रात वादळ कसं येतं, समुद्रातली अन्नसाखळी, रासायनिक घटकांचा एकमेकांवर परिणाम, जोडीला मग तिथलं भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र,समाजशास्त्र हे सगळं ज्ञानामृत 'वाट तिबेटची' या नावाने वाचकांना पाजणार्‍या कोण असतील तर..


  चीनचं वर्णनही विस्तृत आहे. भाषा आणि खासकरून लीपि येत नसेल अशा देशांमध्ये एकट्या-दुकट्या प्रवाशाची कशी भंबेरी उडते ते अगदी हुबेहूब वर्णन यात आहे. यात निश्चितच लेखिकेची फजिती वगैरे नाही आहे, तर वाचकाला हा धडा आहे. प्रवासी मनःस्थिती छानच शब्दबद्ध झाली आहे.

  चीन-तिबेट आगगाडीचं प्रवासाचं वर्णनही परिपूर्ण आहे. सलग ५०-६० तास एकाच गाडीतून अतिउंच जागेकडे प्रवास करतांना मन कसे खेळ खेळतं ते लेखिकेच्या कासोट्याचा बटवा त्यातल्या भरपूर रकमेच्या पौंडांसह हरवला असं वाटतं त्या प्रसंगातून स्पष्ट होतं. तिबेटचं, २०० व्या पृष्ठानंतर सुरू झालेलं वर्णन, तिथली प्रजा, रस्ते, रहदारी, जनजीवन,सरोवरं, शिखरं, हवामान, भाषा, रिती, धर्म, पंथ, धर्मगुरू, मंदिरं, विहार, चीन आणि त्यांचं रस्साकश्शीचं नातं हे वर्णनही अप्रतिम आहे. 


  देव, धर्म, आत्मा वगैरेवर फक्त प्रवसातल्या अनुभवाचं वर्णन न करता किंवा त्याच्याशी समरस न होता लेखिका आपली त्याबद्दलची मतं मांडते आणि कुठेतरी गफलत होतेसं वाटतं. एका पुस्तकविक्रेतीला लेखिका निक्षून सांगते, "तुमचं देवादिकांचं काही सांगणार असशील तर मी जाते, माझा त्यावर विश्वास नाही." पण पुस्तकभर लेखिकेने मंत्र, ओव्या, संतवचनं दिलेली आहेत. हिंदू धर्म, चालीरीती इतकच नाही तर अन्य धर्मांच्याही देहविसर्जनासारख्या चालीरीती लेखिकेला चांगल्याच माहिती आहेत. ही माहिती त्याबद्दल कोणाशी चर्चा केल्याशिवाय अथवा वाचल्याशिवाय किंवा आचरण केल्याशिवाय आणि त्या विषयाची आवड असल्याशिवाय आत्मसात होणं शक्य नाही. माणसाचे खाजगी आणि सार्वजनिक बुरखे वेगळे असतात आणि सार्वजनिक जीवनात ते ओळखता येतात असं माझं मत झालय. हे कोणा एका व्यक्तिबद्दल नाही. मी धरून सगळ्यांना हे लागू होतं. 


  एकीकडे आत्मा वगैरे ही मिथ्या कल्पना आहे असं म्हणत दुसरीकडे लेखिका, "पार्थिव शरीरातून निसटून, केवळ साक्षीभूत होऊन मी सारं दुरून पहाते आहे" असं, हिमालय पहातांना, आपल्या परमोच्च दृष्टीसुखाचं वर्णन करते. आत्मा भ्रामक आहे तर ही 'निसटलेली ती' कोण मग? का आक्षेप फक्त 'आत्मा' या शब्दाला आहे, संकल्पानेला नाही? हिमालय पाहिल्यावर लेखिकेच्या मनात येतं, "स्वर्ग इथून फक्त दोन बोटं असेल." देवाला थोतांड समजणार्‍यांना स्वर्गाचं अस्तित्व कसंकाय मान्य आहे? दलाईलामा सर्वज्ञानी आहेत तर त्यांचेही गुरु कसे असू शकतात, सर्व विश्वाचा पालक असलेल्या देवाच्या स्वतःच्या दालनाला बाहेर अन्य द्वारपाल का लागतात?, अशी वस्तुनिष्ठ टवाळी लेखिका करते तेव्हा 'स्वतः लेखिका असतांना इतरांची पुस्तकं लेखिका का वाचते' किंवा 'देवाधर्मावरा विश्वासच नाही तर तासन्तास मंदिरं बघण्यात काय हशील'..  असे प्रतिप्रश्न सुसंबद्ध ठरतील का असा विचार डोकावतो. श्रद्धेने लोटांगणं घालत प्रदक्षिणा घालणारे श्रद्धाळू आणि निसरड्या जमीनिमुळे पडण्याची शक्यता ह्याचा मेळ घालून लेखिका टोमणा मारते, "एकूण देवही तसलाच." श्रद्धास्थानी जाऊन त्याला टोमणे मारणं कितपत योग्य आहे? मग पुढे एकदा एका वाटाड्याने लेखिकेची फजिती केल्यावर सोबतीचे जर्मन प्रवासी हसतात. तो प्रसंग म्हणजे, 'एकूण तसल्याच असलेल्या' देवाने टवाळीची परतफेड केल्यासारखा वाटतो.


  एका ठिकाणी 'फ्रांसमधलं स्टूटगार्ट' असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे लेखिका दलाईलामांच्या भारतात निघून येण्याची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी करते. त्यात लेखिका म्हणते, "महाराजांना तरी किमान एका देशात जायचं होतं, कापायचं अंतर कमी होतं." काय, हसता का रडता आहात? भारतात वास्तव्य असलेल्या मराठी माणसाच्या रोमारोमात महाराज आहेत. अनवधाननेही, तेव्हा देश नव्हता आणि होत्या असलेल्या अनेक सीमा ओलांडून राजे आले, हे लेखिका कसं विसरली? लामांची कृती सहज शक्य नव्हतीच पण राजांच्या बाबत संदर्भ तपासून हे वाक्य दुरुस्त करायला हवं. तिसरीकडे वाक्य आहे, "इंग्रज एवढे पुढारलेले असून, त्यांचं बस्तान इतकी वर्ष घट्ट बसूनही आम्ही त्यांना हाकलून देण्यात यशस्वी झालो, तसे तिबेटीही चिन्यांना हाकलून देण्यात यशस्वी होतील." आशावाद म्हणून ठीक आहे पण ही तुलना तरी होऊ शकते का? इंग्लंड केवढा देश, कुठे आहे, चीन केवढा, तो तिबेटला व्यापून शेकडो पट पसरला आहे. लोकसंख्येचं परिमाण.. कसला तरी पोस आहे का या तुलनेला? 


  आता आपण 'बुचक्याळलात' या मी लिहीलेल्या शब्दाच्या उगमाकडे जाऊ. मी मराठीमध्ये खूप पारंगत आहे असं नाही. पण ४० वर्षांपेक्षा अधिक काळ घरीदारी आणि फोनी आणि लिखाणी माय-मराठीच वसते आहे. यादरम्यान मी कधीही ऐकली नाहीत अशी विशेषणं, क्रियापदं पुस्तकभर माझा पिच्छा पुरवत होती. उदाहरणादाखल ही यादी बघा: राजकीय झकाझक, लोकांना लुंगाडतात, खौगोलिक गणित, चेंबलेलं अंग, हातोहात गदळली, सपीट वाळू, चुबकणारे पाय, करवादले, कुचमत कबूल, ..., ... असे ३९ शब्द जे मी याआधी ऐकले, वाचलेले नाहीत. या चुका आहेत असं मी म्हणणार नाही... कारण मुद्रण चुकांचा वेगळा गट आहेच. उदाहरणार्थ नवरानवरी ऐवजी नवरामवरी अशा पद्धतीचे अनेक मुद्रणदोष कळून येतात. लेखिकेचे खास शब्द आणि मुद्रणदोष यांची भागीदारी नव्हे तर जुगलबंदी शेवटपर्यंत चालू रहाते. तो एक वेगळा प्रवास घडतो. त्यामुळे तिबेटच्या वाटेवर लेखिका आपलं बोट अधूनमधून सोडून जाते आणि परत पकडतांना आपल्याला धाप लागते. 


  प्रवासात येणार्‍या अडचणी, मानसिक ओढाताण, आरोग्य या सगळ्याचा सांगोपांग विचार कसा करावा त्याचं मार्गदर्शन म्हणून हे पुस्तक जरूर वाचा, अवांतर बाबींकडे दुर्लक्ष करून. काही लिखाण तर्कसंगत वाटलं नाही तर सोडून द्या आणि म्हणा, 'अहम मणिपद्मेहम' 'जय अवलोकितेश्वर'!  

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

'कर्नल बहाद्दूर' बरोबर वाघाच्या मागावर

 पुस्तकं तेवढे योगायोग. 

दोन दिवस दोन पुस्तकं उपक्रम पार पडला आणि त्यातून तिसर्‍याने माझ्यासमोर उडी मारली. शिकार करण्यामुळे कर्नल बहाद्दूर असं नाव पडलेले व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे निसर्गप्रेमी मारुती चितमपल्लींचे स्नेही कसे झाले या जिज्ञासेने मी त्यांचं पुस्तक वाचलं. 'वाघाच्या मागावर' हे माडगूळकरांचं आत्मचरित्र खचितच नाही. पण मला हवं ते उत्तर यातल्या एका वाक्यावरून मिळालं.

तिसरं पुस्तक: वाघाच्या मागावर 

लेखक: व्यंकटेश माडगूळकर 

प्रकाशकः सविता सु. जोशी, उत्कर्ष प्रकाशन 

आवृत्त्या: 1997, 2008

मुखपृष्ठ: रविमुकूल 

वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली बंगलोरमधली पेटी

आडनावात असलेल्या गावातच जन्मलेले माडगूळकर, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक, शाळा न शिकता उत्तम गुणांनी सातवी म्हणजे तेव्हाची शालांत परिक्षा उत्तीर्ण, चौदा वर्षांच्या विद्यार्थी वयात शाळेत नियमित शिक्षक, पुस्तकं वाचून इंग्लिश भाषा शिकलेले, उत्कृष्ट रेखाचित्रकार, पुरस्कार विजेते आणि तरीही वाचकप्रिय लेखक, हळवे शिकारी, चित्रपट पटकथा लेखक, आकाशवाणीच्या प्रादेशिक भाषा विभागाचे कर्मचारी, साहित्य संमेलन अध्यक्ष.... ही एकाच माणसाची ओळख आहे. ते व्यंकटेश माडगूळकर. त्या काळात पोटाची आणि वंशाची भ्रांत नव्हती, माणूस सामाजिक प्राणी होता म्हणून अशी बहुआयामी व्यक्तिमत्त्वं होती.

पहिलं प्रकरण हे पुस्तकाच्या नावाचंच मुख्य आणि सर्वात मोठं प्रकरण. अननुभवी असल्यामुळे शिकार करतांना आलेलं अपयश किंवा फजित्या हाच विषय आहे. अंत अतिशय करूण आहे. ज्या वाघिणीला मारायचे प्रयत्न चाललेले असतात तिच्या आवाजाने आकृष्ट होऊन जंगलाबाहेर आलेले तोरणे वाघ शिकारीत बाई जातात. वाचून लेखकाइतकीच आपल्यालाही हळहळ वाटते.

बेभरवशी जीवनामुळे भटक्या लोकांशी सौदा केल्यावर त्यांनी बिऱ्हाड हलवल्यामुळे दोन पशुपक्षांचे जीव नाहक गेले हे फासेपारधी लेखात आलंय. गोविंदा कातकरी बिनधास्त रानडुकराच्या कादळीत घुसतो. ते डुक्कर अंगावर आल्यावर वर उडी मारून कादळीच्या झाडावेलींनी तयार झालेल्या छपरावर आडवा होऊन वराहमुसंडी चकवतो. चितळाची शिकार केलेल्या मगरीला गोळी घालून माणसं ती शिकार मिळवतात. माजलेल्या डुकराला मारण्याची बतावणी करून पिसोरा हरणाला मारायला खेडूत लोक शिकार्याला बोलावतात. ही सगळी वर्णनं थक्क करून जातात. दोन चितळांच्या झुंजीचं वर्णन नदाल-फेडरर झुंजीसारखंच उत्कंठावर्धक आहे. जवळजवळ जिंकलेल्या कळपप्रमुखाला एक बघ्या शिकारी गोळी मारतो हे वाचून मानवी हस्तक्षेपाचा संताप येतो. व्याघ्री हे प्रकरण तर अतिशय रहस्यमय गूढकथा आहे. जंगलात वाट चुकली आहात का कधी? काय गत होते ते या पुस्तकात वाचा, थरकाप उडेल. ऑस्ट्रेलियात वाटाड्यांना भेटायची जागा न सापडल्यामुळे लेखकाची कांगारूंची शिकार करण्याची संधी हुकते हे वाचून दिलासा मिळतो. 

पाखरांवर लेखकाचं विशेष प्रेम होतं. पण ते नैसर्गिक होतं का 'एका पाखरासाठी दीड रुपयाची बंदुकीची गोळी वाया का घालवायची' हा व्यवहार त्यामागे होता हे नक्की कळत नाही. राजस्थान म्हंटलं की डोळ्यासमोर निर्जन वाळवंट येतं. पण हा प्रदेश पशुपक्षी निसर्गसंपदेत भारतात अग्रणी आहे हे त्यावरचं प्रकरण वाचून समजतं. कोकण अभिमानानींनी तळकोकण प्रकरण जरूर पूर्ण वाचावं. 

या सगळ्यात सहज शिकारी माडगूळकर निसर्गप्रेमी चितमपल्लींचे स्नेही कसे झाले ते कळत नाही म्हणता? बरोबरच आहे, ते मी सांगितलंच नाहीये अजून. अहो, माडगूळकरांनी शिकार केली 1952 ते 1970 दरम्यान. वयापरत्वे असावं असा आपला माझा कयास... त्यांच्या हळव्या मनाने त्यांच्यातल्या शिकार्यावर मात केली आणि ते ही बंदूक खाली ठेवून निसग्रमित्र झाले. हे त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात लिहिलंय आणि सवयीनुसार मी शेवटचं पृष्ठ सर्वात आधी वाचल्यामुळे फार तात्कळावं लागलं नाही!

त्यांची आणि चितमपल्लींची भेट त्यानंतरची असावी! 


मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

बोनस योगायोग जुळवणारं दुसरं पुस्तक

 मंडळी, 

तुम्ही या तीन लेखांच्या मालेच्या प्रारंभी 'अखेर' या सुहास शिरवळकर लिखित रहस्यकथेचा परिचय करून घेतलात. त्यात मी दोन दिवसात दोन पुस्तकं वाचायची ठरल्यामुळे 'जिस देश मे गंगा बेहती है' संदर्भात काय योगायोग झाला ते सांगितलंच आहे. आता हा योगायोग घडवून आणणार्या दुसर्या पुस्तकाची ओळख करून घेऊ या.

दुसरं पुस्तकः चैत्रपालवी 

लेखकः मारुती चितमपल्ली 

प्रकाशकः मकरंद कुलकर्णी, साहित्य प्रसार केंद्र

क्रमाने आवृत्त्या: 2004, 2006, 2010

रेखाचित्रं: अनिल उळपेकर

वाचनालयः कुसुमाग्रज प्ग्रंरतिष्थठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतली बंगलोरची पेटी  

'मला असलेल्या छंदांमुळे माझं जीवन समृद्ध झालं. विद्या प्राप्त करून घ्यायसाठी शाॅर्टकट नाही. पाहिलं आणि अनुभवलं पाहिजे' हे मी म्हणत नाहीये. हे चितमपल्लींनी सुरुवातीलाच लिहिलंय. ते वाचून मी माझ्या वाचन या छंदाबाबतीत फुशारलो आणि मांड ठोकून वाचत सुटलो. 

वाचनाबाबतही हे किती खरं आहे. माझ्या पिढीला गोष्टी सांगायला आज्जी आजोबा मिळाले. आम्ही सर्व बाललीला करत ऐकायचो. ते हातवारे करून, आवाज बदलून गोष्ट रंगवायचे. अश्शी, की ऐकणार्याच्या डोळ्यासमोर चित्रं तयार व्हायचं. मला वाचता यायला लागल्यावर वाचतांनाही ही चित्रं तयार होऊ लागली आणि वाचनाचा छंद कधी कंटाळवाणा झाला नाही. माझ्या पिढीपासून पुढे ज्यांच्याकडे दूरचित्रवाणीसंच होता त्यांना कार्टून दिसू लागली. कार्टून म्हणजे गोष्टींबरोबर आयती चित्रं. मुलांची मनं, वाचून चित्रांचं सृजन करेनासी झाली. आजची पिढी वाचत नाही याला दृकश्राव्य माध्यमं हे प्रमुख कारण असावं असं माझं मत आहे.

लेखकाचा व्यासंग प्रत्येक परिच्छेदातून झिरपतो. सर्व वेद आणि पुराणं वाचलेला आणि त्यासाठी संस्कृतपासून इंग्लिश पर्यंत भाषा शिकवणी घेऊन शिकलेला माणूस तसाही विरळाच. एवढं करून वनविद्या, अवकाश निरिक्षण, पक्षीनिरीक्षण, पशुनिरिक्षण विद्यांमधे पारंगत होत देश पालथा घातलेला हा माणूस. अभिभावकांनी ठेवलेलं मारुती हे नाव त्यांनी सार्थ केलं यात मला शंका नाही.

मारुती चितमपल्लींचं हे सोळाव्वं पुस्तक. हे त्यांनीच लिहिलं म्हणून कळलं. अन्यथा लिखाणाला अभिनिवेशाच्या दाढीमिशा नाहीत. भाषा जड नाहीये. संस्कृत सुभाषितं, इंग्लिश पोएम, ज्ञानेश्वरी, लोकगीत, मनुस्मृती, कबीर दोहे, अभिधान चिंतामणी कोश, मंगलाष्टकं, तुकाराम गाथा, लीळाचरित्र, शालेय कविता, बहिणाबाई एवढ्या सगळ्याचे संदर्भ या 111 पृष्ठांमधे आहेत. हे संदर्भ वापरून पशुपक्षी, जंगलं यांचं विलक्षण वर्णन केलंय.

मारुतीरावांच्या वडिलांना शिंदीचं व्यसन होतं. त्यासाठी शिंदीच्या जंगलात जातांना ते लहानग्या मारुतीला बरोबर न्यायचे. पण पोरानं ते व्यसन न धरता जंगल निरीक्षणाची सवय लावून घेतली. यातच सगळं आलं. 

'वारा वाहू लागला की ढोल्या आणि छिद्रांमधून बासरी, विणा वाजू लागतात.' हे वाचून ते चित्र मनःचक्षुंनी चितारलं की मनात वीणा वाजू लागते. त्याबरोबरच हा ही बोध होतो की जंगलात प्रत्येक आवाजाला घाबरायचं नसतं. कानोसा घेऊन आधी आवाज कसला तो विचार करायचा. 

घनवर पक्षी तळ्यात रहातात तर टीटवी जमिनीवर घर करते, नील प्राण्याच्या मादीला नीलगाय तर नराला नीलघोडा म्हणतात, घुबडाला उलुक तर पृथ्वीला गंधवती म्हणतात असे असंख्य ज्ञानकण पुस्तकभर विखुरले आहेत. कोणत्याही निसर्गप्रेमीने हे पुस्तक वाचूनच सोडावं.

लिखाणाच्या ओघात चितमपल्लींकडून काही बाबींबद्दल खेद व्यक्त झाला आहे. निसर्ग अनुभवायला जाणारी भारतीय आणि परदेशी माणसं यांच्या वर्तणुकीतला फरक, वनअधिकारी म्हणवणार्यांनासुद्धा जंगली पशू पहाण्यासाठी दबा धरून बसतांना निरव असावं याचं भान नसणं, अनिर्बंध जंगलतोड आणि शिकार, इत्यादि. खरोखरच खेदकारक आहे हे सगळं.

या सगळ्यापलिकडे 'चाळीस वर्षांची भाकरी आणि एक दिवसाची भाजी' हा मेनू काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा आणि मग भूक लागली की 'बनात' जाऊन खाऊन या!

हे पुस्तक चितमपल्लींनी मित्रवर्य व्यंकटेश माडगूळकर यांना अर्पण केलंय. ते शिकारी होते असं मी वाचलं होतं. या शिकार्याची अशा पर्यावरणप्रेमी माणसाशी कशी काय गट्टी जमली बुवा? हा प्रश्न पडला. मग मला आठवलं की माझ्याकडच्या 25 पुस्तकांमधे व्यंकटेशजींचंही एक पुस्तक आहे. त्यात काही सुगावा लागतोय का बघुया म्हंटलं.... सुगावाही लागला आणि 3 दिवसांमधे 3 पुस्तकं वाचूनही झाली. त्या 'वाघाच्या मागावर' या पुस्तकाचा परिचय पुढच्या भागात!

रविवार, ९ जानेवारी, २०२२

दोन पुस्तकांवर योगायोग बोनस

  'जिस देश मे गंगा बेहती है' हा साधारण 1960 मधला चित्रपट तुम्हाला माहिती आहे का? किंवा त्यातलं भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं 'ओ बसंती पवन'? ... काही वडीलधारे म्हणतील, 'माहितीय का?? अरे पारायणं केलीयेत, गाणी अजून तोंडपाठ आहेत!' कोणी ताई-दादा म्हणतील, 'पाहिलाय पण आता नीटसा आठवत नाही. चल बघूया.' माझं सांगू का आता? आयुष्यात 25-30 चित्रपट पाहिलेल्या मला हे नावही तसं अपरिचित होतं. पण आता मी हे नाव कधीच विसरणार नाही. कारण?? योगायोग! 

 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' किंवा 'कावळा बसायला ..' या एतद्देशीय म्हणी, वाक्प्रचार तसे नकारात्मक आहेत. योगायोग योगायोग म्हणत अंधश्रद्धेकडे जाऊ नये म्हणून तशा केल्या असतील कदाचित. पण हे बघा- तुमच्याकडे  एकाहून एक सरस 25 मराठी पुस्तकं 8,9 महिने आहेत. तुम्ही ती हुंगलीही नाहीत. एक दिवस तुम्ही ठरवता की आता मी 2 दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीत यातली 2 पुस्तकं वाचून काढणारच! पुस्तकांवरून नजर फिरवत आवडता प्रकार म्हणून एक रहस्यकथा आणि दुसरं निसर्गवर्णन असेल असं आधी न वाचलेल्या लेखकाचं, कुतुहलाने म्हणून अशी दोन पुस्तकं निवडता. दोन भिन्न विषय. अतिशय भिन्न जीवन जगलेले दोन लेखक, भिन्न साहित्यप्रकार, एक वास्तव तर दुसरं काल्पनिक ... आणि या दोनही पुस्तकांमधे 'जिस देश मे गंगा बहती है' चा उल्लेख! सांगा विसराल का तुम्ही हा चित्रपट? या योगायोगाला साजेशी म्हण.. माझं वाचन कमी असल्यामुळे असेल.. मला मराठीली नाही. पण एक सायमन व्हॅन बाॅय (Simon Van Booy) चा एक चपखल आंग्ल quote आहे, "Coincidence means you are on the right path!"

पहिलं पुस्तक: अखेर
लेखकः सुहास शिरवळकर 
प्रथम आवृत्ती: उल्लेख नाही. नवीन आवृत्ती: 2012
प्रकाशक: संजय काकडे, अमोल प्रकाशन 
वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली पेटी 

रहस्यकथेची ओळख करून देणं जोखमीचं काम आहे. रहस्य फुटायला नको! रहस्यकथांमधेही प्रकार असतात. काही कथा वाचकावरच प्रचंड दबाव टाकतात, वाचक कथा संपल्याशिवाय सामान्य वागू शकत नाही. हा एक प्रकार. एखादा गुप्तहेर असतो. कथेतला गुन्हेगार खलनायक असतो, पण त्याचा विरोधक हा नायक नसतो. गुप्तहेर हाच वाचकाचा नायक असतो. त्यामुळे सगळा दबाव त्याच्यावर ढकलून वाचक चवीने वाचतो. फाफे किंवा शेरलॉक वगैरे. हा वेगळा प्रकार. किंवा देशासाठी वगैरे काम करणारे गुप्तहेर, पोलीस ह्यांच्या कथा. निसर्गातल्या गूढ कथा आणि असे आणखी प्रकारही सांगता येतील.

 बर्याचशा कथांमधे घटना घडून गेलेली असते व तपास करायचा असतो. 'अखेर' मधे घटना घडलेली नाही तर ती उलगडते आहे. सुरवाती सुरवातीला ही एक हलकीफुलकी कथा वाटू शकते. 'छेः.. असा कसा कोण शब्दात येईल' 'असं कधी घडतं का, उगाच काहीतरी' असं वाटू शकतं. पण नायकाचा भाबडेपणा आणि दुसर्या व्यक्तीचं मजेदार वर्णन गुंतवून ठेवतं. नायक कोण याची पुसट कल्पना येते पण नक्की कळत नाही. खल चमूबद्दल तर संभ्रम रहातोच. दुसरं मुख्य पात्रं, मुख्य स्री पात्रं की भाबडं मन खल आहे ... आणि गोंधळ वाढवायला थेट गुंड असलेली पात्रं उभी केली आहेत. कथेपेक्षा चित्रपट पटकथा म्हणून लिहिल्यासारखंच लिहिलंय असं वाटतं इतके प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. मी आयुष्यात एकही डेली सोप किंवा वेब सिरीज पूर्ण पाहिलेली नाही. इतर लोक पहात असतांना जे पहावं लागलं त्यातून जी कट-कारस्थानं दिसतात ... त्या तुलनेत तर हे मिळमिळीत म्हणावं लागेल. एकंदर अनुभव ठीक ठीक. आपण आपल्याच माणसाबद्दल किती वाईट विचार करत असतो आणि त्या विचाराला अनुमोदन देणार्या परक्या माणसाबरोबर वहावत जाऊ शकतो, हे यात दाखवलंय. मनातलं ओठावर आलं तर जीवन पालटतं म्हणून उच्चार जपून करावा!

 वाचायला सोयिस्कर, सुटसुटीत व्हावं म्हणून लांबी थोडकी ठेवतो व चितमपल्ली लिखित दुसर्या पुस्तकाचा परिचय पुढील भागात क्रमशः देतो. तोपर्यंत हवं तर इथं असलेले सुगावे हेरून त्या पुस्तकाचं नाव काय असेल ते रहस्य उकला आणि मला कळवा! 

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...