पुस्तकं तेवढे योगायोग.
दोन दिवस दोन पुस्तकं उपक्रम पार पडला आणि त्यातून तिसर्याने माझ्यासमोर उडी मारली. शिकार करण्यामुळे कर्नल बहाद्दूर असं नाव पडलेले व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे निसर्गप्रेमी मारुती चितमपल्लींचे स्नेही कसे झाले या जिज्ञासेने मी त्यांचं पुस्तक वाचलं. 'वाघाच्या मागावर' हे माडगूळकरांचं आत्मचरित्र खचितच नाही. पण मला हवं ते उत्तर यातल्या एका वाक्यावरून मिळालं.
तिसरं पुस्तक: वाघाच्या मागावरलेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशकः सविता सु. जोशी, उत्कर्ष प्रकाशन
आवृत्त्या: 1997, 2008
मुखपृष्ठ: रविमुकूल
वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली बंगलोरमधली पेटी
आडनावात असलेल्या गावातच जन्मलेले माडगूळकर, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक, शाळा न शिकता उत्तम गुणांनी सातवी म्हणजे तेव्हाची शालांत परिक्षा उत्तीर्ण, चौदा वर्षांच्या विद्यार्थी वयात शाळेत नियमित शिक्षक, पुस्तकं वाचून इंग्लिश भाषा शिकलेले, उत्कृष्ट रेखाचित्रकार, पुरस्कार विजेते आणि तरीही वाचकप्रिय लेखक, हळवे शिकारी, चित्रपट पटकथा लेखक, आकाशवाणीच्या प्रादेशिक भाषा विभागाचे कर्मचारी, साहित्य संमेलन अध्यक्ष.... ही एकाच माणसाची ओळख आहे. ते व्यंकटेश माडगूळकर. त्या काळात पोटाची आणि वंशाची भ्रांत नव्हती, माणूस सामाजिक प्राणी होता म्हणून अशी बहुआयामी व्यक्तिमत्त्वं होती.
पहिलं प्रकरण हे पुस्तकाच्या नावाचंच मुख्य आणि सर्वात मोठं प्रकरण. अननुभवी असल्यामुळे शिकार करतांना आलेलं अपयश किंवा फजित्या हाच विषय आहे. अंत अतिशय करूण आहे. ज्या वाघिणीला मारायचे प्रयत्न चाललेले असतात तिच्या आवाजाने आकृष्ट होऊन जंगलाबाहेर आलेले तोरणे वाघ शिकारीत बाई जातात. वाचून लेखकाइतकीच आपल्यालाही हळहळ वाटते.
बेभरवशी जीवनामुळे भटक्या लोकांशी सौदा केल्यावर त्यांनी बिऱ्हाड हलवल्यामुळे दोन पशुपक्षांचे जीव नाहक गेले हे फासेपारधी लेखात आलंय. गोविंदा कातकरी बिनधास्त रानडुकराच्या कादळीत घुसतो. ते डुक्कर अंगावर आल्यावर वर उडी मारून कादळीच्या झाडावेलींनी तयार झालेल्या छपरावर आडवा होऊन वराहमुसंडी चकवतो. चितळाची शिकार केलेल्या मगरीला गोळी घालून माणसं ती शिकार मिळवतात. माजलेल्या डुकराला मारण्याची बतावणी करून पिसोरा हरणाला मारायला खेडूत लोक शिकार्याला बोलावतात. ही सगळी वर्णनं थक्क करून जातात. दोन चितळांच्या झुंजीचं वर्णन नदाल-फेडरर झुंजीसारखंच उत्कंठावर्धक आहे. जवळजवळ जिंकलेल्या कळपप्रमुखाला एक बघ्या शिकारी गोळी मारतो हे वाचून मानवी हस्तक्षेपाचा संताप येतो. व्याघ्री हे प्रकरण तर अतिशय रहस्यमय गूढकथा आहे. जंगलात वाट चुकली आहात का कधी? काय गत होते ते या पुस्तकात वाचा, थरकाप उडेल. ऑस्ट्रेलियात वाटाड्यांना भेटायची जागा न सापडल्यामुळे लेखकाची कांगारूंची शिकार करण्याची संधी हुकते हे वाचून दिलासा मिळतो.
पाखरांवर लेखकाचं विशेष प्रेम होतं. पण ते नैसर्गिक होतं का 'एका पाखरासाठी दीड रुपयाची बंदुकीची गोळी वाया का घालवायची' हा व्यवहार त्यामागे होता हे नक्की कळत नाही. राजस्थान म्हंटलं की डोळ्यासमोर निर्जन वाळवंट येतं. पण हा प्रदेश पशुपक्षी निसर्गसंपदेत भारतात अग्रणी आहे हे त्यावरचं प्रकरण वाचून समजतं. कोकण अभिमानानींनी तळकोकण प्रकरण जरूर पूर्ण वाचावं.
या सगळ्यात सहज शिकारी माडगूळकर निसर्गप्रेमी चितमपल्लींचे स्नेही कसे झाले ते कळत नाही म्हणता? बरोबरच आहे, ते मी सांगितलंच नाहीये अजून. अहो, माडगूळकरांनी शिकार केली 1952 ते 1970 दरम्यान. वयापरत्वे असावं असा आपला माझा कयास... त्यांच्या हळव्या मनाने त्यांच्यातल्या शिकार्यावर मात केली आणि ते ही बंदूक खाली ठेवून निसग्रमित्र झाले. हे त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात लिहिलंय आणि सवयीनुसार मी शेवटचं पृष्ठ सर्वात आधी वाचल्यामुळे फार तात्कळावं लागलं नाही!
त्यांची आणि चितमपल्लींची भेट त्यानंतरची असावी!
1 टिप्पणी:
वाघाच्या मार्गावर असलेला व्यक्ती निसर्ग प्रेमी कसा होतोनक्कीच वाचायला आवडेल👌👍
टिप्पणी पोस्ट करा