शनिवार, १४ मे, २०२२

मोबाइल न वापरणार्‍या माणसाचा परिचय

पुस्तक: मोबाईल न वापरणारा माणूस

लेखक: अविनाश चिंचवडकर

प्रकाशक: मधुश्री प्रकाशन, पुणे.

प्रथमावृत्ती: २०१७



टवटवीत मुखपृष्ठ आणि त्यावर एक छानसं व्यंगचित्रं. हे पाहूनच मन प्रसन्न होतं. श्री. अविनाश चिंचवडकर हे चेहेर्‍यावरून अतिशय गंभीर व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांचं हसरं छायाचित्रं शोधायसाठी मला त्यांचं पुस्तक बाजूला ठेऊन मोहीम काढावी लागेल. पण वाचकाच्या चेहेर्‍यावर स्मित आणायचा प्रयत्न ते सातत्याने करत असतात.

विनोदाचं विश्लेषण असा विचार जरी मनात आला तरी सुंदर गुबगुबीत फुग्याला बंदुकीची गोळी मारल्यासारखं वाटतं. म्हणून हे विश्लेषण नाही तर परिचय आहे. साधारण १२०० ते २००० शब्दांमधे बद्ध २३ व्यंगकथांचा हा संग्रह आहे. फेसबूक, व्हाट्सअॅप युगातल्या असल्या तरी कोव्हिडपर्वाच्या आधीच्या आहेत.

जगतांना आजूबाजूच्या घडामोडींमुळे आपल्या मनात अनेक विकार उत्पन्न होतात. त्यावर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपण त्वरित व्यक्त झालो तर विरूद्ध विकारनिर्मिती होते. म्हणजे भयंकर आजारावर लस टोचल्याने, आजाराने नाही तरी लसीने ताप यावा तसं होऊ शकतं. पण त्या मूळ परस्थितीवर विनोदनिर्मिती केली तर ती मात्रा बेमालूम लागू पडते. 'मोबाइल न वापरणारा माणूस' ही ती मात्रा आहे. 

या संग्रहातल्या याच नावाच्या कथेचं उदाहरण घेऊ. २०११-१२ पर्यन्त माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे मला व्हाट्सप माहिती नव्हतं. एकदा पुण्यात बसमध्ये माझ्या शेजारच्या तरुणाने 'व्हाट्सप' उल्लेख केला तेव्हा दुसार्‍याचं उत्तर 'ऑल ओके' असं येईल असं वाटलं. पण पुढे काहीतरी वेगळंच संभाषण झालं. मी पृच्छा केल्यावर तो म्हणाला की ते अॅप असतं. अॅप म्हणजे काय तेही मला अर्थातच कोडं होतं. अशा रीतीने अविनाशजींचा 'मोबाईल न वापरणारा माणूस' मी काही काळ जगलो आहे. आणखी जगलो असतो तर काय झालं असतं त्याचं हे अतिशयोक्तीपर वर्णन मजेशीर आहे. मी २०११ चा जपानचा भूकंप प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यानंतर काही महीने अधूनमधून मला भूकंपाचे भास व्हायचे. त्यामुळे 'बंडूनाना भूकंपाच्या तावडीत' यामधला भूकंप खरा नाही हे आधीच कळलं असलं तरी मी कुतुहलाने वाचलं. कारण 'भास' हा धागा जुळला. असेच प्रत्येक कथेत कुठेना कुठे वाचकाचे धागे जुळतात. 

एखाद्या परिस्थितीला सामोरे जातांना आपण केकेलं आकलन आणि काही कालावधीनंतर त्यातून जन्मलेली विसंगती दाखवायला विनोदी साहित्य हे उत्तम माध्यम आहे. मोबाइल किंवा सॉफ्टवेअर 'अपडेट' होत होत शेवटी त्यातल्या सुरुवातीच्या गाभ्याचं नाव तेवढं उरतं पण गाभा कुठेतरी विरून जातो आणि आत्ता आहे ते प्रमाण मानून आपण पुढची व्हर्जन आणतो. समाजही काहीसा असाच पुढे जातो पण त्यात जाणारा कालावधी आपल्या आयुष्याला पुरून उरत असल्यामुळे आपल्याला ते तेवढ्या सहजपणे जाणवत नाही. प्रभू रामचंद्र आणि बेन कीङ्ग्स्ले यांच्यावरच्या कथा समाज कसा वहावत जातो ते दर्शवतात.    

विनोदाच्या अनेक जातकुळी आहेत. आचार्य अत्रे, पुल देशपांडे, वपु काळे. प्रत्येकाचा विनोद निरनिराळी अनुभूति देतो. दमा मिरासदारांचं साहित्य मी लहानपणी खूप आवडीने वाचायचो. अविनाशजींच्या शैलीने मला कणेकर, दिलीप प्रभावळकर यांची आठवण आली. हलक्याफुलक्या कथा आहेत. यात गर्भितार्थ नाही किंवा असला तरी त्याकडे सहज दुर्लक्ष करता येतं. साठे, दुर्वास, दामले या या कथानकांमधल्या नकारात्मक व्यक्तिरेखा आहेत. पण ते फक्त त्यांना तशी विशेषणं दिली आहेत म्हणून वाटतं. बाकी तेसुद्धा सामान्यपणाच्या परिघातच वावरतात! बंडूनाना हे अविनाशजींच्या साहित्यातून निर्माण झालेलं  एक नायक 'ब्रॅंडनेम' आहे. नाना, त्यांचं चौकोनी कुटुंब आणि इरसाल शेजारी, सहकारी यांच्यामध्ये अविनाशजींनी आणखी गुंतवणूक करून त्यांना स्वतंत्र पुस्तक मालिकेद्वारे स्वतंत्र ओळख द्यावी असं वाटतं. बंडूनानांचं आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनशी साम्य वाटतं. विजू खोटे, शरद तळवलकर हे चेहेरे बंडूनानांच्या भूमिकेत एकदम डोळ्यासमोर येतात. यंत्र अभियंता अविनाशजींचा विनोद बाष्कळपणा आणि बाटबटीतपणाच्या सिक्ससिग्मा सीमारेषा कधीही गाठत नाही. श्रीकृश्न ढोरे यांची व्यंगचित्रंही कथाभागाला पूरक आहेत. 

अविनाशजींनी 'दिवस घरी हे राहायचे' हा विडंबनगीतसंग्रहही लिहिलेला आहे. ते तंत्र्शुद्ध गझला रचतात. आणि विपुल वाचनही करतात. महानगरांपासून दूर एका तशा अपरिचीत गावातून येऊन, अभियंता होऊन, परप्रांतात दोन दशकं वास्तव्य करत, देशविदेशात प्रवास करत, 'कॉर्पोरेट वर्ल्ड' मधल्या शिड्या अविनाशजींनी दमदारपणे चढल्या. त्यांच्याप्रमाणेच आपआपल्या क्षेत्रात अग्रेसर होतांना तुमच्यातला 'कॉमन मॅन' तुम्ही विसरला तर नाहीत ना? तुम्ही तो कसा जतन केला आहे?

२ टिप्पण्या:

Avinash म्हणाले...

खूप धन्यवाद

अनामित म्हणाले...

Good summary 👍

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...