मंडळी,
तुम्ही या तीन लेखांच्या मालेच्या प्रारंभी 'अखेर' या सुहास शिरवळकर लिखित रहस्यकथेचा परिचय करून घेतलात. त्यात मी दोन दिवसात दोन पुस्तकं वाचायची ठरल्यामुळे 'जिस देश मे गंगा बेहती है' संदर्भात काय योगायोग झाला ते सांगितलंच आहे. आता हा योगायोग घडवून आणणार्या दुसर्या पुस्तकाची ओळख करून घेऊ या.
लेखकः मारुती चितमपल्ली
प्रकाशकः मकरंद कुलकर्णी, साहित्य प्रसार केंद्र
क्रमाने आवृत्त्या: 2004, 2006, 2010
रेखाचित्रं: अनिल उळपेकर
वाचनालयः कुसुमाग्रज प्ग्रंरतिष्थठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतली बंगलोरची पेटी
'मला असलेल्या छंदांमुळे माझं जीवन समृद्ध झालं. विद्या प्राप्त करून घ्यायसाठी शाॅर्टकट नाही. पाहिलं आणि अनुभवलं पाहिजे' हे मी म्हणत नाहीये. हे चितमपल्लींनी सुरुवातीलाच लिहिलंय. ते वाचून मी माझ्या वाचन या छंदाबाबतीत फुशारलो आणि मांड ठोकून वाचत सुटलो.
वाचनाबाबतही हे किती खरं आहे. माझ्या पिढीला गोष्टी सांगायला आज्जी आजोबा मिळाले. आम्ही सर्व बाललीला करत ऐकायचो. ते हातवारे करून, आवाज बदलून गोष्ट रंगवायचे. अश्शी, की ऐकणार्याच्या डोळ्यासमोर चित्रं तयार व्हायचं. मला वाचता यायला लागल्यावर वाचतांनाही ही चित्रं तयार होऊ लागली आणि वाचनाचा छंद कधी कंटाळवाणा झाला नाही. माझ्या पिढीपासून पुढे ज्यांच्याकडे दूरचित्रवाणीसंच होता त्यांना कार्टून दिसू लागली. कार्टून म्हणजे गोष्टींबरोबर आयती चित्रं. मुलांची मनं, वाचून चित्रांचं सृजन करेनासी झाली. आजची पिढी वाचत नाही याला दृकश्राव्य माध्यमं हे प्रमुख कारण असावं असं माझं मत आहे.
लेखकाचा व्यासंग प्रत्येक परिच्छेदातून झिरपतो. सर्व वेद आणि पुराणं वाचलेला आणि त्यासाठी संस्कृतपासून इंग्लिश पर्यंत भाषा शिकवणी घेऊन शिकलेला माणूस तसाही विरळाच. एवढं करून वनविद्या, अवकाश निरिक्षण, पक्षीनिरीक्षण, पशुनिरिक्षण विद्यांमधे पारंगत होत देश पालथा घातलेला हा माणूस. अभिभावकांनी ठेवलेलं मारुती हे नाव त्यांनी सार्थ केलं यात मला शंका नाही.
मारुती चितमपल्लींचं हे सोळाव्वं पुस्तक. हे त्यांनीच लिहिलं म्हणून कळलं. अन्यथा लिखाणाला अभिनिवेशाच्या दाढीमिशा नाहीत. भाषा जड नाहीये. संस्कृत सुभाषितं, इंग्लिश पोएम, ज्ञानेश्वरी, लोकगीत, मनुस्मृती, कबीर दोहे, अभिधान चिंतामणी कोश, मंगलाष्टकं, तुकाराम गाथा, लीळाचरित्र, शालेय कविता, बहिणाबाई एवढ्या सगळ्याचे संदर्भ या 111 पृष्ठांमधे आहेत. हे संदर्भ वापरून पशुपक्षी, जंगलं यांचं विलक्षण वर्णन केलंय.
मारुतीरावांच्या वडिलांना शिंदीचं व्यसन होतं. त्यासाठी शिंदीच्या जंगलात जातांना ते लहानग्या मारुतीला बरोबर न्यायचे. पण पोरानं ते व्यसन न धरता जंगल निरीक्षणाची सवय लावून घेतली. यातच सगळं आलं.
'वारा वाहू लागला की ढोल्या आणि छिद्रांमधून बासरी, विणा वाजू लागतात.' हे वाचून ते चित्र मनःचक्षुंनी चितारलं की मनात वीणा वाजू लागते. त्याबरोबरच हा ही बोध होतो की जंगलात प्रत्येक आवाजाला घाबरायचं नसतं. कानोसा घेऊन आधी आवाज कसला तो विचार करायचा.
घनवर पक्षी तळ्यात रहातात तर टीटवी जमिनीवर घर करते, नील प्राण्याच्या मादीला नीलगाय तर नराला नीलघोडा म्हणतात, घुबडाला उलुक तर पृथ्वीला गंधवती म्हणतात असे असंख्य ज्ञानकण पुस्तकभर विखुरले आहेत. कोणत्याही निसर्गप्रेमीने हे पुस्तक वाचूनच सोडावं.
लिखाणाच्या ओघात चितमपल्लींकडून काही बाबींबद्दल खेद व्यक्त झाला आहे. निसर्ग अनुभवायला जाणारी भारतीय आणि परदेशी माणसं यांच्या वर्तणुकीतला फरक, वनअधिकारी म्हणवणार्यांनासुद्धा जंगली पशू पहाण्यासाठी दबा धरून बसतांना निरव असावं याचं भान नसणं, अनिर्बंध जंगलतोड आणि शिकार, इत्यादि. खरोखरच खेदकारक आहे हे सगळं.
या सगळ्यापलिकडे 'चाळीस वर्षांची भाकरी आणि एक दिवसाची भाजी' हा मेनू काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा आणि मग भूक लागली की 'बनात' जाऊन खाऊन या!
हे पुस्तक चितमपल्लींनी मित्रवर्य व्यंकटेश माडगूळकर यांना अर्पण केलंय. ते शिकारी होते असं मी वाचलं होतं. या शिकार्याची अशा पर्यावरणप्रेमी माणसाशी कशी काय गट्टी जमली बुवा? हा प्रश्न पडला. मग मला आठवलं की माझ्याकडच्या 25 पुस्तकांमधे व्यंकटेशजींचंही एक पुस्तक आहे. त्यात काही सुगावा लागतोय का बघुया म्हंटलं.... सुगावाही लागला आणि 3 दिवसांमधे 3 पुस्तकं वाचूनही झाली. त्या 'वाघाच्या मागावर' या पुस्तकाचा परिचय पुढच्या भागात!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा