'जिस देश मे गंगा बेहती है' हा साधारण 1960 मधला चित्रपट तुम्हाला माहिती आहे का? किंवा त्यातलं भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं 'ओ बसंती पवन'? ... काही वडीलधारे म्हणतील, 'माहितीय का?? अरे पारायणं केलीयेत, गाणी अजून तोंडपाठ आहेत!' कोणी ताई-दादा म्हणतील, 'पाहिलाय पण आता नीटसा आठवत नाही. चल बघूया.' माझं सांगू का आता? आयुष्यात 25-30 चित्रपट पाहिलेल्या मला हे नावही तसं अपरिचित होतं. पण आता मी हे नाव कधीच विसरणार नाही. कारण?? योगायोग!
'प्रथमग्रासे मक्षिकापातः' किंवा 'कावळा बसायला ..' या एतद्देशीय म्हणी, वाक्प्रचार तसे नकारात्मक आहेत. योगायोग योगायोग म्हणत अंधश्रद्धेकडे जाऊ नये म्हणून तशा केल्या असतील कदाचित. पण हे बघा- तुमच्याकडे एकाहून एक सरस 25 मराठी पुस्तकं 8,9 महिने आहेत. तुम्ही ती हुंगलीही नाहीत. एक दिवस तुम्ही ठरवता की आता मी 2 दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीत यातली 2 पुस्तकं वाचून काढणारच! पुस्तकांवरून नजर फिरवत आवडता प्रकार म्हणून एक रहस्यकथा आणि दुसरं निसर्गवर्णन असेल असं आधी न वाचलेल्या लेखकाचं, कुतुहलाने म्हणून अशी दोन पुस्तकं निवडता. दोन भिन्न विषय. अतिशय भिन्न जीवन जगलेले दोन लेखक, भिन्न साहित्यप्रकार, एक वास्तव तर दुसरं काल्पनिक ... आणि या दोनही पुस्तकांमधे 'जिस देश मे गंगा बहती है' चा उल्लेख! सांगा विसराल का तुम्ही हा चित्रपट? या योगायोगाला साजेशी म्हण.. माझं वाचन कमी असल्यामुळे असेल.. मला मराठीली नाही. पण एक सायमन व्हॅन बाॅय (Simon Van Booy) चा एक चपखल आंग्ल quote आहे, "Coincidence means you are on the right path!"
रहस्यकथेची ओळख करून देणं जोखमीचं काम आहे. रहस्य फुटायला नको! रहस्यकथांमधेही प्रकार असतात. काही कथा वाचकावरच प्रचंड दबाव टाकतात, वाचक कथा संपल्याशिवाय सामान्य वागू शकत नाही. हा एक प्रकार. एखादा गुप्तहेर असतो. कथेतला गुन्हेगार खलनायक असतो, पण त्याचा विरोधक हा नायक नसतो. गुप्तहेर हाच वाचकाचा नायक असतो. त्यामुळे सगळा दबाव त्याच्यावर ढकलून वाचक चवीने वाचतो. फाफे किंवा शेरलॉक वगैरे. हा वेगळा प्रकार. किंवा देशासाठी वगैरे काम करणारे गुप्तहेर, पोलीस ह्यांच्या कथा. निसर्गातल्या गूढ कथा आणि असे आणखी प्रकारही सांगता येतील.
बर्याचशा कथांमधे घटना घडून गेलेली असते व तपास करायचा असतो. 'अखेर' मधे घटना घडलेली नाही तर ती उलगडते आहे. सुरवाती सुरवातीला ही एक हलकीफुलकी कथा वाटू शकते. 'छेः.. असा कसा कोण शब्दात येईल' 'असं कधी घडतं का, उगाच काहीतरी' असं वाटू शकतं. पण नायकाचा भाबडेपणा आणि दुसर्या व्यक्तीचं मजेदार वर्णन गुंतवून ठेवतं. नायक कोण याची पुसट कल्पना येते पण नक्की कळत नाही. खल चमूबद्दल तर संभ्रम रहातोच. दुसरं मुख्य पात्रं, मुख्य स्री पात्रं की भाबडं मन खल आहे ... आणि गोंधळ वाढवायला थेट गुंड असलेली पात्रं उभी केली आहेत. कथेपेक्षा चित्रपट पटकथा म्हणून लिहिल्यासारखंच लिहिलंय असं वाटतं इतके प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. मी आयुष्यात एकही डेली सोप किंवा वेब सिरीज पूर्ण पाहिलेली नाही. इतर लोक पहात असतांना जे पहावं लागलं त्यातून जी कट-कारस्थानं दिसतात ... त्या तुलनेत तर हे मिळमिळीत म्हणावं लागेल. एकंदर अनुभव ठीक ठीक. आपण आपल्याच माणसाबद्दल किती वाईट विचार करत असतो आणि त्या विचाराला अनुमोदन देणार्या परक्या माणसाबरोबर वहावत जाऊ शकतो, हे यात दाखवलंय. मनातलं ओठावर आलं तर जीवन पालटतं म्हणून उच्चार जपून करावा!
वाचायला सोयिस्कर, सुटसुटीत व्हावं म्हणून लांबी थोडकी ठेवतो व चितमपल्ली लिखित दुसर्या पुस्तकाचा परिचय पुढील भागात क्रमशः देतो. तोपर्यंत हवं तर इथं असलेले सुगावे हेरून त्या पुस्तकाचं नाव काय असेल ते रहस्य उकला आणि मला कळवा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा