अनिल अवचट शरीराने आणि मनाने जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्या वाचकांनाही नेले. आज ते ईहलोक सोडून गेले. कुठे गेला आहात अनिलजी?
नोव्हेंबर 2020 मध्ये मी त्यांचं 'अमेरिका' हे पुस्तक वाचून तेव्हाच लिहून ठेवलेला जरासा त्रोटक असा पुस्तक परिचय आज आपल्या सुपूर्द करतो. त्यायोगे त्यांना आळवूया.
लेखक: अनिल अवचट
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
प्रथम आवृत्ति: ऑगस्ट १९९२
वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना, बंगळुरू पेटी ४
डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, बासरीवादक, ओरीगामी'कार' (किंवा जादूगार मधलं 'गार' लावलं तरी चालेल), स्ट्रिंग गेम्सपटू, कायमचे विद्यार्थी असे बहुविध आयाम असलेले अनिल अवचट यांनि लिहिलेलं हे उत्कृष्ठ प्रवासवर्णन. हे आयाम सांगावे लागत नाहीत, ते पुस्तकातल्या वर्णनाच्या ओघात समजत जातात.
अनिलजी यात आपल्याला त्यांनी पाहिलेली अमेरिका फिरवून आणतात. अमेरिका पहायची इच्छा असणार्यांनीच नव्हे तर जे तिथे सहल काढून आलेत किंवा तिथे राहिलेत त्यांनीही हे पुस्तक जरूर वाचावं. सशक्त जाणिवा असलेली व्यक्ति प्रवास कसा करते हे यातून समजतं. निसर्ग, वातावरण, मानवी भौतिक प्रगति हे सगळेच प्रवासी अनुभवतात. लेखकला त्या जोडीने तिथला समाज, संस्कृति, सामाजिक जडण, समस्या यांचं आकलन आपसूक होत रहातं आणि निर्व्याजपणे लेखक तो खजिना आपल्यासमोर रिता करतो.
हे वर्णन १९९१ चं. तेंव्हा अमेरिकेत टीव्ही संस्कृति चिघळलेली होती, संगणक रुळत होते. पण मोबाइल, ऑनलाइन हे त्या जमान्यात नव्हतं. तरीही अमेरिकेचं हे वर्णन अप्रासंगिक किंवा जुनं वाटत नाही. याचं एक कारण हे की आपण प्रगतिच्या नावाखाली त्यांची नक्कल करतो आहोत आणि आपसूकच त्यात कैक वर्षांचा 'लॅग' आहे. त्यामुळे १९९१ च्या तिथल्या समस्या या आपण नुकत्याच अनुभवून झाल्या आहेत किंवा अनुभवतो आहोत. तेंव्हा वाचून अचंबा वाटला असता अशा बाबी, परिणाम, निष्कर्ष हे आता आपल्यात 'हे बाकी खरं' अशी भावना निर्माण करून जातात. यात अमेरिकेतल्या निसर्गापासून ते तिथली सुबत्ता, मानव निर्मित प्रगति, त्यातून बदलती संस्कृति, त्यातले बारकावे, भारतीय, रेड इंडियन्स, मेक्सिकन्स, कसिनो, ग्रँड कनाइन अशी सगळी वर्णनं आहेत. अगदी चक्षुर्वैही सत्यम, थेट आणि कसलाही मुलामा किंवा साहित्यिक अभिनिवेश विरहीत.
सामाजिक जाणिवा असल्या की प्रवास आणि परप्रांतातलं वास्तव्य हे रटाळ म्हणजे बोअरिंग वगैरे तर होत नाहीच उलट वेळ अपुरा ठरतो, नवं शिकता येतं. माणूस म्हणून अधिक प्रगल्भता येते. मग सभोवतालालाही आपण हवे हवे वाटू लागतो आणि त्यातून नवीन ओळखी, नवीन विषय, नव्या जाणिवा तयार होत जातात. हे धडे या पुस्तकात आपल्याला पानोपानी मिळतात.
बरेचसे उत्कृष्ठ लेखणीबहाद्दर हे त्याहीपेक्षा पटाईत वाचक असतात हा माझा समज अनिलजी आणखी पक्का करतात. त्यांनी उल्लेख केलेली पुस्तकं आणि चित्रपट वाचायचे, बघायचे ठरवले तर २०२० च्या स्थानबद्धतेसारखं आणखी १ वर्ष सहज सरेल. अनिलजी हे पत्रकारही आहेत. व्यावसायिक पत्रकारितेला त्यांचा विरोध होता किंवा आहे. पत्रकारांनी स्वतः तटस्थ राहून परिस्थिति, प्रसंगांचं वर्णन कसं करावं यासाठी हा उत्कृष्ठ वस्तूपाठ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा