शनिवार, २९ जानेवारी, २०२२

संतसाहित्य निर्देशिण्या केशवकुमारांची विभूति

   कोल्हापूरमधून प्रकाशित पुस्तक बंगळुरमधे हातात मिळणं दुर्मिळच. 'संत आणि साहित्य' हे पुस्तक तसं मोठं नाही. चिक्कार समास सोडलेली आणि भरपूर मोकळ्या जागा असलेली १६० पृष्ठे. पण विषय गहन आहे. तो वाचून मनात उठणार्‍या तरंगांनी कागदावरचीच नाही तर अंतःकरणातलीही सगळी जागा व्यापू शकते.

पुस्तक: संत आणि साहित्य
लेखक: आचार्य अत्रे
प्रकाशक: सौ. पूनम राहुल मेहता, पार्श्व पब्लिकेशन्स, कोल्हापूर
तृतीय आवृत्ति: १९९३
ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली बंगळूरमधली पेटी   


   पहिले बारा लेख 'तुकाराम' च्या साप्ताहिक अंकांमधून घेतले आहेत. ते अगदी लहान लहान पण अधिक वाचनीय आहेत. तर पुढचे सगळे लेख 'नवयुग' मधून घेतले आहेत. आचार्य अत्रेंनी बहुतांश संत साहित्यच नव्हे तर वेद, उपनिषदे, गीता, गीतेवरच्या विविध भाषांमधल्या टीका हे ही वाचलेलं आहे आणि मग हे लिखाण केलंय. केशवकुमार म्हणजेच आचार्य अत्रे हे माझ्या जन्माच्या बर्‍याच आधी निवर्तले. ते नाटककार, वक्ता दशसहस्रेषु, महाराष्ट्र एकीकरण समितिचे कार्यकर्ते/ नेते, संपादक होते. त्यांचंही साहित्य शाळेच्या धड्यांमद्धे होतं असेल. विनोदी साहित्यिक म्हणून त्यांची विशेष ओळख आमच्या पिढीला आहे. ते इंग्लंडमध्ये शिकले. या पृष्ठभूमीवर संतसाहित्य या तशा गंभीर आणि मातीतल्या विषयावर त्यांचं पुस्तक सामोरं आल्यावर कुतूहल वाटलं.

   अंत्रेंना स्वतःला गाडगेबाबा आणि विनोबा भावेंचा सहवास लाभला आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे लिखाण. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' आल्या. देव आणि धर्म कर्मकांडात अडकलेले होते, त्यामुळे नाडला जाणार्‍या समाजाचा त्यांनी उद्धार केला. आजही त्यांचं मार्गदर्शन उपयोगी आहे. जर आपण वाचलं, ऐकलं तर. आपल्याला त्याची जाणीव करून देणारे हे लेख आहेत. जणू 'संतसाहित्य निर्देशिण्या केशवकुमारांची विभूति' आली आहे. आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत. याला अनेक कारणं आहेत. एक मुख्य कारण म्हणजे आपला जन्म संतपरंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या मातीत झाला आहे. माझ्या पिढीपासून पुढे किती लोकांनी किमान एक संतसाहित्य वाचलं आहे माहिती नाही. पण शाळा, आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्र वगैरे माध्यमातून लहानपणी ते आपल्यात झिरपलेलं आहे हे नक्की.

   विविध कर्म करायला आपण भिन्न भिन्न साहित्य वापरतो. अत्रेंनी केलेलं वर्णन वाचून मला असं वाटलं की, समाजोद्धार करायला संतांनी शब्द हेच साहित्य वापरलं. म्हणून संत हे खरे साहित्यिक! अत्रे म्हणतात की 'आता एखादं उत्तम काव्य रचूया' असं म्हणून संतांनी रचलं नाही. समाजाचा उद्धार हे उद्दीष्ट ठेवून, लिखाण हे त्यासाठीचं साधन म्हणून वापरलं. म्हणून त्यांच्या रचना उच्च प्रतीच्या झाल्या. संतांचे गोडवे गाता गाता अत्रेही अनेक मार्मिक विधानं करतात. 'देवावर ज्याचा विश्वास नाही, त्याच्या मनात श्रेष्ठकानिष्ठतेचे विचार येतात.' किंवा 'पुरुषार्थशक्ति जिथे कुंठित होते तिथे भक्तीची गरज निर्माण होते. ईश्वराच्या इच्छेला अनुकूल अशी आपली इच्छा बनवणे म्हणजे आस्तिकता.' हे सामान्य वाचकासाठी अत्रेंनी घातलेलं अंजन असेल तरी ते अत्रेंच्या संतसाहित्याच्या चिंतंनातून निघालेलं नवनीत आहे हा इथे खरा मुद्दा आहे.

   'वैयक्तिक दुःख्खे चमत्काराने दूर होऊ शकतात असे ज्यांना वाटते त्यांना सामाजिक दुःख्खे त्याच चमत्काराने दूर व्हावी असे वाटत नाही.' यातून समजायचे त्याने ते समजून घ्यावे. बालपणीची गम्मत म्हणून एक आठवण सांगतो. माझ्या लहानपणी मोठी माणसे सांगत, रामनाम उच्चारत कोणतीही कामना केली की ती पूर्ण होते, फक्त मनापासून नामस्मरण केले पाहिजे. मग भारताचा क्रिकेटची उत्कंठावर्धक सामना चालू असतांना आपण हरतो आहोत असे वाटू लागले की मी श्रीराम जयराम जयजयरामचा धोशा सुरू करायचो. आपल्याला अनुकूल चौकार वा बळी मिळाला की उपयोग होतो आहे असं ठरवायचो आणि प्रतिकूल परिणाम आला तर आपण मनापासून केलं नाही अशी समजूत घालून घ्यायचो! ... कर्मावाचून साधना व्यर्थ आहे हे अत्रे ठासून सांगतात.

   मी गीता अनेकदा वाचली आहे. आत्तापर्यंत गीता रणांगणीच प्रथम सांगितली गेली किंवा महर्षि व्यासांनी तशी रचना केली आहे असं मला वाटायचं. हे पुस्तक वाचून मला उपनिषदांमध्ये गीतेचं बीज आहे हे प्रथमच कळलं. गीतेवरच्या साहित्याची गोडी असणार्‍यांसाठी मी या पुस्तकातली गीतेवर मराठी लिखाण केलेल्या लेखकांची यादी इथे देतो: सोनोपंत दांडेकर, य. गो. जोशी, रा.शं. वाळिंबे, श्रीकृष्णदास लोहिया, तुकडोजी महाराज, संतोजी महाराज, गजेंद्रगडकर, नेऊरगावकर, न. र. फाटक, इतिहासाचार्य राजवाडे, एत्यादि. ज्ञानेश्वरी, गीता रहस्य आणि गीताई हे तर प्रसिद्धच.

   गाडगेबाबांनी केवळ स्वच्छतेचा आणि साध्या रहाणीचा पुरस्कार केला नाही तर साक्षरता, अहिंसा आणि शाकाहाराचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर आजच्या काळात असते तर ते थोर पर्यावरणवादी ठरले असते. काही वाक्य वाचून मला सांप्रत काळात ती सिद्ध होताहेत की काय असं वाटतं. गाडगेबाबा म्हणत, "बैलाच्या श्रमावार आणि गाईच्या दुधावर शेतकरी जगतो. गाईला आणि बैलाला कसायाला विकाल तर तोंडात तापतं डांबर पडेल." आज एका अर्थाने हे खरं झालय का हो? यांत्रिकीकरण झालं. शेतकर्‍याची मुलं शेती सोडू लागली. जी राहिली त्यातली आत्महत्या करू लागली. यंत्र ने-आण करायला डांबरचे रस्ते बांधावे लागले. त्यासाठी शेतीची जमीन अधिग्रहीत झाली. एका अर्थाने तापलेलं डांबर तोंडात पडतंय. समाजाची प्रगति होतेय पण निसर्गाच्या विरुद्ध आणि खड्ड्याच्या दिशेने. हेच गाडगेबाबांनी पाहून ठेवलं होतं असावं का? मी स्वतः शेतकरी नसल्याने हा माझा निष्कर्श नाही तर गहन चिंतनाचा विषय आहे. 

   विनोबा भावे म्हणाले, "पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे म्हणून माशाला दुधात टाकले तर तो तिथे जगेल का?" खरोखर किती साधासा दृष्टांत आहे. पैशात अन्य कामाचं मूल्य जास्त आहे म्हणून ते करू लागणं योग्य नाही, बहुधा जमणारही नाही. आमच्यावेळची पालक-पिढी मुलांनी मोठेपणी काय व्हावं याची खूप चिंता करत. डॉक्टर आणि इंजीनियर झालं तर आर्थिक उन्नती होती म्हणून बरेच जण रेट्याने तिकडे ढकलले गेले. शाळेपासूनच टेक्निकल विषय निवडून अभियंते झालेले फार कमी. आज ह्या सगळ्यांना ते करताहेत त्या कामात सूख आहे का? ते मनापासून त्यांचं काम करतात का आता दुधात पडले म्हणून हात-पाय मारताहेत आणि पन्नाशी-साठीतच जीव गुदमरतो आहे? त्या अनुषंगाने ही तेव्हाची पाल्य-पिढीआता पालक या भूमिकेत चिंता करत बसत नाही. आपल्या शिक्षणाने आपल्याला पैसा कमवायला शिकवलं, तो आपण कमवू, पाल्याच्या शिक्षणात ओतू. तो/ ती मोठा होऊन काय होईल, आपल्याला विचारेल, ओळखेल की नाही यात गुंतायचं नाही. त्याचं आयुष्य त्याची जबाबदारी! आता सांगा हाच का कर्मयोगाचा यथार्थ?

   गाडगेबाबा आणखी म्हणाले, "जगात सूर्य एक आहे, आभाळ एक आहे, जमीन, पाणी, वायु एक-एक आहेत. मग धर्म का हो दहा?" आपल्याला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले होते, "there is one Sun, one world, one grid, one Narendra Modi." याविधानाआधीच्या त्यांच्या आपसातल्या चर्चेत मोदींनी गाडगेबाबांचं वाक्य तर त्यांना ऐकवलं नसेल? भाषणांमध्ये कानडी संत बसवप्पांपासून पासून गुरु गोविंदसिंगांपर्यंत अनेकांचे दाखले लीलया देणार्‍या मोदींच्याबाबत हे अगदीच अशक्य नाही.

   गृत्सपदऋषींनी कापसापासून कापड बनवण्याचा आणि २ ते १० पाढ्यांचा शोध लावला अशी नवी रोमांचक माहितीही या पुस्तकातून मला मिळाली. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे, 'पक्वान्नांची गोडी शब्दांनी काय वर्णन करावी, ती चाखूनच पाहिली पाहिजेत.' आपण हे पुस्तक स्वतः वाचा. विनोबा भावे म्हणाले,"जे समाजाला शुद्ध करते आणि समाजाचे कल्याण करते ते साहित्य." अत्रेंचं हे साहित्य नक्की वाचावं आणि चिंतन, मनन करावं!

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिश्यते || ॐ शांतिः शांतिः शांतिः |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...