"मान-अपमान, होकार-नकार तर सुरूच रहातात, धुंदी आहे ती धावण्यात...."
हे वाक्य भारतातल्या एकाच एक कुठल्या शहराशी जोडाल? बरोब्बर! तीच ती जिवाची ....!
तिथे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणार्या आणि स्वतःची धावपट्टी तिथे आखू शकलेल्यांच्या जीवनाचं सार या अशा वाक्यांमध्ये एकवटतं.
लेखक: प्रवीण दवणे
प्रकाशिका: सुप्रिया शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन
प्रथमावृत्ती: २०१३
ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी योजना, बंगळूर पेटी ५.
एकांत म्हणजे शांत, स्वस्थ. पण मुंबईतला माणूस एकांतातही धावण्यासंदर्भातच विचार करतो. एकांतातही त्याला धावणं भावतं, तेच महत्वाचं वाटतं... आणि मग तो उठतो आणि... आणि नव्या जोमाने धावायला लागतो! कारण त्याला जो "आराम नको, विराम हवा" असतो, तो संपलेला असतो. निःसंशयपणे अवतरणातली वाक्यं प्रवीण दवणे यांची आहेत. ते त्यांचं जीवनगाणं आहे. पण हे प्रवीणजींचंच नाही, ज्या चित्रपटसृष्टीने त्यांना हे गाणं शिकवलं असं ते म्हणतात- तिचंही नाही, हे मुंबईचं वर्णन आहे. शांताराम नांदगावकरांनी हेच म्हंटलं आहे. आठवतो तुम्हाला सुनील गावस्करचा आवाज?
"या दुनियेमद्धे थांबायला वेssळ कोणाsला?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा,
हुकला तो संपला..."
दोन वेगळ्या पिढ्यांमधल्या बंबईय्या गीतकारांच्या रचनांमधेही थांबायला वेळ नाही! इथला माणूस या शहाराशी एवढा एकरूप आहे.
'मला कळत नाही' असं म्हणून कोणी बोलायला लागलं की आपसूक इतर लोक पुढचं एकाग्रतेने ऐकतात. वाचकाची नस पकडण्यात दवणे पटाईत आहेत. प्रवीणजी एकांताच्या डोहाची सुरुवात "कुठून सुरुवात करावी हे कळत नाही" या वाक्याने करतात आणि वाचक वाचतच राहतो.. कदाचित तो सुरुवात शोधत असतो, दवणेंची.. कदाचित सोबतीने स्वतःची.
लेखकाच्या नातेवाईकांचं पुस्तकात फार वर्णन नाही. अर्धांगीनीचा उल्लेखही नाही. पण 'सरकारी नोकरीतल्या प्रामाणिक वडिलांचा' उल्लेख ओघा-ओघात येतो आणि माझ्यासारख्या अनेक वाचकांना लेखकाची जातकुळी आपलीच वाटू लागते. वारशाने आलेला प्रामाणिकपणा लेखणीत उतरला आहे. ट्रांझिस्टर, त्याची विविध बटणं आणि विशेष म्हणजे तो त्याचा ठराविक किलोहर्ट्सला आणावा लागणारा काटा. तो नेमका तिथे येईनासा झाला की मग आतला बॅंड, चक्र हाताने फिरवायचं. ही आपलीच मध्यमवर्गीय... किंवा मध्यमस्वर्गीय मजा. ती दवणेंनीही घेतलीये! म्हणजे ह्यांची आणि आपली सुरुवात सारखीच. ते 'कुठून .. कुठे ... ! आणखी कुठे?' पोहोचले तिथे का पोहोचले ह्यासाठी प्रवास जाणून घेणं महत्वाचं. प्रवासात आराम नको विराम हवा. प्रवास म्हणजे धावणं. धुंदी आहे ती धावण्यात...!
दवणेंच्या लिखाणात अंतर्मुखता आहे. खरोखरीच मनाच्या खोल डोहातला स्वयंसंवाद त्यांनी खुला केला आहे. स्वयंसंवाद प्रत्येकजण करतो. पण उघडपणे नाही. या उघड लिखाणात मन गुंतून पडतं. मनाला दिलासा मिळतो.
त्यांना लागलेली, 'ठेच : पहिल्या पावलाची' ही सुद्धा अनेकांनी आपआपल्या क्षेत्रात अनुभवली असेल. प्रवीणजींनी लिहिलेलं पहिलंच गाणं शांता शेळकेंसाठी आग्रह धरत उषा मंगेशकरांनी नाकारणं. त्यांनी स्वीकारलं तर तो चित्रपटच प्रदर्शित न होणं. गंगाधर गाडगीळ यांच्याशी पहिल्या भेटीचा अनुभव. वसंत कानिटकरांची केवळ एक भेट मिळवायला झालेला त्रास. राजदत्त यांच्याबरोबरचं काम व्यावहारिक अडचणीने थांबणं. दादा कोंडकेंनी स्वतःहोऊन काम देणं पण त्यांना ते न रुचणं. सचिन पिळगावकरांनी घेतलेली परिक्षा. बापरे! काय रोमांचक हा प्रवास! एवढं सगळं वाचल्यावर एक पोकळी जाणवते. या पार्श्वभूमीवर स्वतः प्रस्थापित झाल्यानंतर प्रवीणजी त्यांच्या कनिष्ठांशी, नवागतांशी कसे वागले?... ते यात आलेलं नाही. पण अशी तुलना त्यांच्या अंतरी आली नाही.
केवळ 'निर्मितीच्या नियंत्या' श्रीगणेशावर दवणेंनी हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. काही डझन चित्रपटांची गितंही लिहिली आहेत. त्यांच्याच गीतांमधले काही शब्द बदलले, काही
ओळींचा क्रम बदलला, यमकं वेगळी जुळवली तर आणखी हजारभर कविता, गाणी ते नव्याने खपवू शकतील. नव्हे नव्हे अन्य कोणी कोणी हे आधीच केलंही असेल. पण तरीही दवणेंना कधी कधी नवं काहीच सुचत नाही. त्यांचा अंतरीचा डोह ढवळून निघतो. ते कासावीस होतात.. आणि.. आणि ते प्रिय प्रतिभेस..' पत्र लिहितात. ती त्यांची प्रेयसी आहे, बहुधा सातव्या वर्षापासून. ती त्यांची देवताही आहे. ते तिला सोडून जाऊ नको म्हणून विनवतात आणि ती त्यांच्याकडे थांबते. पुन्हा पुन्हा, कायमची.
त्यांना लागलेल्या ठेचांचं वर्णन वाचून तुम्हाला वाटेल की कठीण प्रसंगांमधे प्रस्थापित व्यक्तीसमोर किंवा परिस्थितीसमोर ते कायम नमतं घेत असतात. तर तसं नाही याचा खुलासा त्यांनी 'संगीत गुरुकुल' मधे केला आहे. "प्रवाहपतीत झालो नाही पण प्रवाही राहिलो. ज्या प्रकारात संकोचास्पद तडजोड करायला लागते ते प्रकार विनम्र चातुर्याने, वळणाने कधी आडवळणाने, क्वचित आक्रमक धीटपणे, कधी शिताफीने टाळले." आणि हे फक्त त्यांचं मत किंवा स्वतःचं करून घेतलेलं समाधान नाही. पुढे ते निःसंशयपणे ते 'प्रतिभावान' आहेत हे मान्य करतात. प्रतिभा असल्यामुळेच आपण आपण आहोत याची जाणीव दाखवतात. जी व्यक्ति एवढ्या आत्मविश्वासाने भरलेली आहे तिने कुठे हार मानली असं म्हणता येणार नाही. तो एक धावण्याच्या धुंदीतला विराम म्हणता येईल.
मनाचा भुंगा का एकाच विचारावर बसतो, तो का स्वतःचा संघर्ष जागवतो? दवणेंच्या डोहात मग बहिणाबाईंच्या राधा-मिरांचं बिंब उमटतं. एखाद्या रचनेचं रसग्रहण, विश्लेषण, विवेचन कसं करावं याचे - राधा-मीरा, गीतरामायणातील विरहायण, प्रेमकवितांचा नक्षत्रोत्सव, कवितेतला श्रीरंग- हे लेख उत्कृष्ठ नमुने आहेत. मी केलेलं विश्लेषण लोकांनी वाचावं म्हणून किंवा हे वाचून लोकांनी ते वाचावं या हेतूने हे लिहिलेलं नाही. हे खरोखरच चोखलेलं आहे.
अख्ख्या वाचल्या तर सामान्य वाचकाला काही कविता, 'अरे ही काय कविता म्हणायची?' असं वाटू शकेल. पण या कविता अशा वाचायच्या नसतातच. कधी दोन कडवी, कधी दोन ओळी, कधी तर चारच शब्द घेऊन कवीची नस पकडावी लागते. मग कविता उलगडते.
म्हणजेच कवीही लिहितांना पूर्ण कवितेचा विचार करत नसतोच. एक-एक विचार, एक-एक कल्पना, एक-एक अनुभव महत्वाचा. त्याला शब्दात पकडायचं. मग तो विचार त्यात मावत नाही आणि आणि रचना पुढे सरकते. हा प्रवास एवढ्या बारकाईने कदाचित त्या कवी, लेखकालाही जाणवत नसेल. कारण आपलाच प्रवास आपण पाहणार कसा? वाचकाने तो पहायचा असतो. हे असं काहीतरी घडत असणार असं मला दवणेंच्या विवेचनावरुन जाणवलं. आपण काव्यनिर्मिती करू शकतो असं वाटू लागलेल्यांनी भरपूर काव्य वाचावं, त्याचं रसग्रहण करावं हा धडाही या लेखांमधून मिळतो.
हे अर्थातच अन्य काव्यप्रकारांबद्दल आहे, दवणेंच्या लाडक्या चित्रपटगितांबद्दल नाही. कारण, "अडीच तासात अनेक व्यक्तिरेखांचं संपूर्ण जीवन उभं करणारं हे क्षेत्रं आहे. त्यातलं तीन मिनिटांचं गाणं जीवनगाणं शिकवून जातं." तिथं गती पाहिजे. पाच-दहा विद्वान लोकांसमक्ष, येण्याजाण्याच्या लोकल्सच्या मधल्या मिनिटांमधे गाणी तयार झाली पाहिजेत. अगदीच नाही तर, "शेवटची लोकल चुकली तरी चालते, पण पहिली पकडता आली"च पाहिजे.
"स्वतःचा सूर शोधण्याचे दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, फक्त ते आयुष्यात आलेत हे समजलं पाहिजे. या दिवसांमधे जो गाफिल राहिला त्याचं आयुष्य पुढे रीतंच रहातं." म्हणून, लोक हो, काही रितेपण जाणवत असेल तर होश्शियार व्हा! काय सांगावं सूर सापडण्याचे दिवस अजून यायचे असतील किंवा आता परत येतील.
काही 'लागलेल्या ठेचा' आणि अन्य काही उल्लेख वेगवेगळ्या लेखांमधे परतून येतात. यावरून त्यांचा दवणेंच्या आयुष्यावरचा, माणूस म्हणून घडण्यामधला दूरगामी परिणाम दिसून येतो. चित्तवृत्ती स्थीर असतांना लिहीलेल्या आठवणींचीही 'एकांताच्या डोहा'त अशी आवर्तनं होतात. मग त्या 'चिरंतन' एकांती जातांना तर सगळ्या जीवनपाटाची कित्येकदा उजळणी होत असणार, ती ही फक्त काही क्षणांमधे... नक्कीच! त्यातून समाधान मिळवायचं असेल, चेहेर्यावर दवणेंसारखं हसू तेव्हाही फुलायला हवं असेल तर... तर? तर...
"मान-अपमान, होकार-नकार तर सुरूच रहातात. धुंदी आहे ती धावण्यात.... "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा