सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेपाळी पहारेकरी दावासिंग देणार. जातांना भाभी माझ्यासमोरच दावासिंगला सांगून गेल्या.
... अरे पण हे काय! शकूभाभी सहकुटुंब परत आल्या
की...लगेच मावळतीला?! काहीतरी
गडबड आहे. दावासिंगने दूर फाटकाजवळ गाडीला सलाम ठोकला तेव्हापासून मी कान टवकारले.
गाडीमागे धावतधावत थेट वाहनतळात गेलो. दामूअण्णा वेगळ्याच मूडमध्ये होते. लॉकलॉक
असं बरंच काहीतरी म्हणाले. ते आले तरीही संध्याकाळचं जेवण दावासिंगनेच दिलं. कबूल
केलंय ना त्याने. उपहारगृहातलं जेवण आणलंय. खावं आणि झोपावं हे बरं. इथे
प्रवेशद्वारासमोर फार गरम आहे. त्यापेक्षा तळघरात जातो. छान थंड वाटतं तिथे.
कमाल आहे बुवा. सगळ्या रखवालदारांनी तोंडावर कापड, पट्ट्या बांधल्या आहेत. एकमेकांमध्ये अंतर ठेवून रहाताहेत. कोणत्याही वस्तूला स्पर्श करत नाहीयेत. फाटक तर बंद करून ठेवलंय. आता त्यांच्या गाड्या येणार-जाणार कशा? गाड्या? त्याही कुठे दिसत नाहीयेत. काय झालंय काही कळत नाहीये. सुरेश मुकादमाने मला अगदी लहान असतांना बांधकामाच्या सामानाची रखवाली करायला विमाननगरमधून आकुर्डीमधल्या या गृहसंकुलाच्या कुंपणात आणला. तेव्हापासून मी माणसांना असं कधीच बघितलं नाहीये. त्याआधीही.
हुश्श! नित्यकर्म आटोपली. कोपर्यावरच्या
कचराकुंडीत थोडं खायलाही मिळालं. ही वेळ मला बरी पडते. कुंपणाबाहेरचे माझे भाऊबंद
अजून झोपलेले असतात. त्यामुळे वाद होत नाही. आज फारच सुनसान आहे सगळीकडे. एकसुद्धा
माणूस रस्त्यावर नाही. दावासिंग कामावर आला की सांगेल काहीतरी. तोपर्यंत जरा
बाहेरून चक्कर मारली. गृहसंकुलातल्या पायवाटेवरूनही उलटी-सुलटी चक्कर मारली.
नेहेमी या वेळेला फिरायला येणारे तात्या, पाटील, सलमान, जोशी, चेतन, आज्जी, चौधरी, मनाली... कोणीही आलेले नाहीत. यापेक्षा लवकर फिरून
जणार्यांचे वासही आज येत नाहीयेत. सावल्या पडायला लागल्या तरी व्यायामशाळा उघडली
नाही. हास्यकट्टा भरला नाही.
....कोवळ्या उन्हात पडावं थोडं. आज वाहनं नाहीत त्यामुळे
कुठेही बसलं तरी चालेल.
"मोती.. ए मोती"
हा तर दावासिंगचा आवाज. दबल्यासारखा
येतोय. कुठे आहे बरं? ए-ब्लॉक..
नाही. बी-ब्लॉक.. नाही. इथे वाहनतळात?! यानेही नाकतोंड बांधलं आहे. आणि आज सावल्या
पायांखाली यायच्या आताच खायला देतोय? तेही दूर ऊभा राहून. अच्छा. असं आहे तर. दावासिंग
म्हणतोय की माझ्यापासून दूर राहायला सांगितलं आहे सगळ्यांना. नेहेमीच्या वेळी
जेवतांना त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल. म्हणून मला आधी दिलंय त्याने. माझं काय चुकलं असेल? निज अपराधे दृष्टी
उफराटी... मी काल त्या झोमाटोवाल्यावर ओरडलो म्हणून?
... २ सूर्यचंद्र झाले. परशाची लुना घेऊन वेगळाच माणूस
येतोय. आता सामान वाढलं आहे. दोन लुनांवर दोन माणसं येतात. पण मला हाकलतात. मी
त्यांच्याजवळ जातो, शेपटी
हलवतो. भुकेने कुई-कुई होतं. ते निष्ठुर आहेत. आज एकाने बाटली फेकून मारली. मजवरी
नच संतापी म्हणत कळवळलो. हंss.. आता परशा परत जयगुरुदेवदत्त म्हणत उभा राहीपर्यंत
कचराकुंडीतला नाश्ता करावा लागणार... सावल्या छोट्या झाल्या. अजून दावासिंग कसा
आला नाही? येतोय
वाटतं.. हा कोलाहल कसला? इतके सगळे
जण? दावासिंगला
रागावताहेत. काही दिवस मला बाहेर हाकलून दे सांगताहेत. माझं आडमार्गी पाऊल पडलं
असेल तर सांभाळून घ्या म्हणावं... दावासिंगपण धीराचा आहे. मला कुरवाळत, मी कोणाच्याही
जवळजवळ करणार नाही असं सांगून ही वेळ निभावून नेली त्याने. बाहेर बेकरी, उपहारगृह सगळं बंद
आहे. दावासिंगने मावळतीलाही डब्यातलंच दिलं. म्हणजे तो आज जेवलाच नाही बहुधा.
... काल पूर्ण उपास करून दावासिंग गेला तो आज उगवलाच
नाही. किती प्रेमाने कुरवाळलंन काल. कुंपणाबाहेरून नाश्ता करून आलो आणि मग मी
उपाशीच आहे. हा राजवीर का येतोय इकडे? दावासिंगचा सहकारी आहे. वीजेरीचा तीव्र झोत डोळ्यात
टाकतोय. गेला. ... आला परत. त्याच्याबरोबर दबक्या पावलांनी शकूभाभीही येताहेत. मी
उपाशी असल्याबद्दल बोलताहेत. मला द्यायला आत्ता भाभींकडे काही नाही. उद्यापासून
देते म्हणाल्या. दावासिंगला दवाखान्यात भरती केलाय म्हणे.
... काल, परवा तिन्ही
वेळांना भाभींनी खायला दिलं. पोट भरलं आहे. पण परशा आणि दावासिंगची आठवण येते. कुठे
गेले असतील? आणि का? सावल्या अंगाखाली
आल्या तरी भाभी अजून आल्या नाहीत या तळघरातल्या वाहनतळात. आता शिस्त मोडावी
लागणार. मी इथेच थांबायचं असं दावासिंगने निक्षून सांगितलं होतं. तरीही वर जाऊन
पाहूया, भाभी
सदनिकेच्या सज्जामध्ये उभ्या दिसल्या तर... काय आश्चर्य आहे. त्यांचं घर कडेकोट
बंद केलंय. दारं, खिडक्या, झरोकेही बंद
केलेत. दाराच्या बाजूला काहीतरी पाटी लावली आहे. कानोसा घेतला. आत नक्की माणसं
आहेत. मी भुकेने विव्हळलो. तरीही कोणी बाहेर येत नाही. नित्य कळवळणारी मनं कळवळत
नाहीयेत. अनाकलनीय आहे. चला चला. मी जिन्याने दुसर्या मजल्यावर आलो हे अन्य
लोकांना कळायच्या आत खाली जायला हवं.
... आता ३ सूर्यचंद्र झाले. मी पूर्ण उपाशी आहे. जीभ
लपापते आहे, कान खाली
पडलेत, डोळ्यांमधून
पाणी वाहातंय, कातडीला
सूज आली आहे, केस राठ
होऊन झडताहेत, शेपटी जड
झालीये.
... माणसं बाहेर येत नाहीत. अन्न फेकण्याचं प्रमाण कमी
झालंय. कुंपणाबाहेरच्या कचराकुंडीतही काही खायला मिळत नाही. काल मी पाहून ठेवलंय.
माणसं झोपायच्या वेळेआधी समोरची बेकरी अर्धवट उघडते. तेव्हा माझे कुंपणाबाहेरचे
भाऊबंद तिथे जमतात. मलाही त्यांच्यात जायलाच हवं. ... कुई कुई कुई... तुंबळ भांडण
झालं. नुसता चावून ओरबाडून काढला सगळ्यांनी मला. मी कुंपणाच्या आत रहाणारा ना.
इथेच रस्त्यावर पडून रहावं लागणार वाटतं. आता कोणाचा करू धावा?
... डॉक्टर मलमपट्टी करताहेत. माझा सर्वथा हितकर्ता
दावासिंग आलाय वाटतं. बरं झालं. आता परत तळघरात पडून रहायचं.
... मलमपट्टीनंतर एकूण ४ सूर्यचंद्र झाले.
उगवती-मावळतीला काही माणसं फेर्या मारायला येऊ लागली आहेत. पण माझ्याजवळ कोणी येत
नाहीये. मी जवळ गेलो तर हाड-हाड करताहेत. हाड-हुडची मला सवय आहे. पण आता कोणीच जवळ
करत नाहीये. खूप एकटं-एकटं वाटतंय. हा कोणाचा आवाज येतोय? ही तर 'मनी', शकूभाभींची मांजर.
त्यांच्या घरातच असते. मग आवाज कुंपणाकडून कसा येतोय? जाऊन बघायला हवं.
अगदी मागच्या भिंतीवर बसलीये. काय म्हणतेय?... अरेरेरे, करुण कहाणी आहे. दामूअण्णा, शकूभाभी आणि
घरातले सहाही मनुष्य सदस्य करोना का कशाने आजारी पडले आहेत म्हणे. डॉक्टरांचं पथक
आलं होतं. त्यांनी सांगितलं, अशा प्राण्यांमुळे धोका आणखी वाढेल. म्हणून तिला
घराबाहेर काढलं म्हणे. काय करेल बरं आता ती? असो. तो तिचा प्रश्न आहे. ती फार चंचल आहे.
माझ्यासारखी शिस्तीची नाही. कोणाच्या खिडकीतून आत जाईल आणि चोरीने पोट भरेल.
...पण..पण..म्हणजे मागच्या पूर्णचंद्रापासून परशा गायब
झाला. कायमचाच. त्याने जाण्याआधी मला हात लावला होता. आणि.. आणि.. दावासिंग. तो ही
मला कुरवाळल्यावरच आजारी झाला होता. भाभीसुद्धा. अरेरे, म्हणजे सगळे
माझ्यामुळे...? माझी
रोगप्रतिकारशक्ति दावासिंग,
अण्णा, भाभींना मिळो.
आजारी झाले तरी कोणी त्राता सगळ्यांना जीवन देवो.