"लेखन आणि वाचन हे असे रवंथ आहेत ज्याची ढेकर परस्परांना येते."
बुचक्याळलात ना? ... आपलं ते... बुचकळ्यात पडलात ना? पडणारच! कारण असं वाक्य मीना प्रभु यांचं पुस्तक वाचल्यावर सुचतं. तुम्ही वाचलंय का? थांबा.. थांबा.. सग्गssळ्ळ सांगतो.
काय आहे की कोणत्याही लेखनात लेखकाच्या जीवनपटाचा हिस्सा मोठा असतो. त्यातून प्रवासवर्णन म्हंटलं की आधी तो जिकिरीचा प्रवास करायचा, करता करता छायाचित्रं, नोंदीही करत ती जिकिर वाढवायची.. आणि मग परतल्यावर सगळं संगतवार लावायचं, गाळलेल्या जागा स्मरणशक्तीने भरायच्या.. हा एक प्रकारचा रवंथच नाही का? असा रवंथ करून प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं की त्या प्रवासानुभूतीची ढेकर वाचकाला येते. वाचन हा तर खराखुरा रवंथ. विज्ञानयुगात पुरावा द्यावाच लागेल. एक काम करा. मोठयाने वाचा. दात दाताला, जीभ टाळूला, ओठ ओठाला लागतात आणि आवंढा गिळला जातोय की नाही? म्हणजे शब्द चावून झाला की रवंथ! आणि हा करून वाचकाने दाद दिली की समाधानाची ढेकर लेखकला येईलच. आता 'बुचकळ्यात' ऐवजी 'बुचक्याळलात' का झालं ते मात्र शेवटी कळेल तुम्हाला.
तर व्यंकटेश माडगूळकरांबरोबर वाघाच्या मागावर जाऊन परत आलो आणि माझं २५ पुस्तकांचं ग्रंथालय उघडलं. त्यात 'वाट तिबेटची' पुस्तक समोर आलं. ३३५ पृष्ठांचा ठासून भरलेला ऐवज पाहून ते ठेवून देणार तेवढ्यात त्याच्या मुखपृष्ठावरची तिबेटी आज्जी म्हणाली, "भारतीय बनावटीचा सांप्रत माणूस म्हणून यापुढच्या आयुष्यासाठी दोनच पर्याय देते. सैनिक होणार का वाचक?" मी म्हणालो,"काय कमाल करता आज्जी, मी आणि सैनिक, ते ही यापुढे? तरुण केलात तर ठीक.
अन्यथा वाचकच होऊ शकेन." तर म्हणतात कशा, "गुमान उचल ते पुस्तक. भारतीयांच्या या पिढीला तोच पर्याय आहे. नाहीतर तिबेटला जाण्याच्या संधीला कायमचा मुकशील."
पुस्तक: वाट तिबेटची
लेखिका: मीना प्रभु
प्रकाशक: पुरंदरे प्रकाशन
तिसरी आवृत्ती: जून २०१४
ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतली बंगळूरमधली पेटी
स्थलकाळातली वाट इंग्लंडमधून सुरू होते आणि हवाई, होनुलुलू, चीन मार्गे तिबेटला पोहोचते. पोहोचते ती थेट 'देवदुंघा' वा 'पवित्राचल' वा 'चामोलुंग्मा' म्हणजेच माऊंट एवरेस्टच्या बेस कॅम्प पर्यन्त. पण लेखन सुरू होतं ते सहलीचा विचार डोक्यात आल्यापासून. मूळ उद्दीष्ट आहे जपान, चीन, तिबेट मधून दिसणारं खग्रास सूर्यग्रहण पहाणे. त्याची तयारी, विसा, बर्फातले बूट शोधणं, पोशाख, पर्यटन संस्था शोधणे, निवडीचे निकष- जसे सहलीचा आराखडा, मूल्य वगैरे, या सगळ्याचं साद्यंत वर्णन लेखिका करते. यात जुने आणि आकार हरवलेले जोड परत वापरात कसे आणावे याचं प्रशिक्षणही आपल्याला मिळतं. सूर्यग्रहणसारख्या वैश्विक कुतूहलाची घटना पाहायची असेल तर किती आधीपासून तयारी करावी लागते ते कळतं. कोणी दाखवतो म्हणत असेल तरी त्याला कोणते प्रश्न विचारावे, खात्री कशी करावी ते ही कळतं.
'वाट तिबेटची' असं पुस्तकाचं नाव ठेवून चीनमधून पाहिलेल्या सूर्यग्रहणाची हकीकत आणि ती सांगायची म्हणून त्याआधी कित्येक वर्ष भारतातून, जर्मनीतून पाहिलेल्या २ सूर्यग्राहणांची अगदी पाठपोट हकीकत सांगितली असेल तर ते मीना प्रभुंनी लिहीलंय. 'तिबेटकडे जातांना वाटेत जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्ल्याबद्दलचा लघुपट बघायला गेले, तो फारच थरारक होता' एवढंच न सांगता लघुपटसाठी सोडणारा तिकीट तपासनीस कसा समजूतदार होता, त्याचं वागणं, बोलणं, मग लघुपट, त्याची पूर्ण कथा, मला तो कसा वाटला, अमेरिकन जनतेला तो कसा वाटत असेल, नंतर त्याबद्दल कोणाशी बोलून तो हल्ला जपानने केला नव्हताच तर अमेरिकेला युद्धात आणायचं म्हणून इंग्लंडनेच केला होता ही समांतर कथा कशी काढून घेतली' हे सगळं लिहीलं असेल तर ते मीना प्रभुंनी.
हवाईबेटांच्या प्रवासाचं वर्णन करतांना तिथले रहिवासी कुठून आले, पहिल्या राजापासून ते शेवटच्यापर्यन्त राजे, त्यांची कुळं, कर्तुत्व, संपत चाललेली मूळ संस्कृती, तिथले रिती रिवाज, खाणं, वाटाडे, निसर्ग, हॉटेल्स या सगळ्याबद्दल 'वाट तिबेटची' या नावाने लिहीलं असेल तर ते... बेटावर गेलात म्हणून मग बेट कसं तयार होतं, तिथे मोजक्याच प्रजाती असतात, मानवाने बाहेरून परदेशी प्रजाती आणून तिथल्या मूळ प्रजाती कशा नाहीशा केल्या, समुद्रात वादळ कसं येतं, समुद्रातली अन्नसाखळी, रासायनिक घटकांचा एकमेकांवर परिणाम, जोडीला मग तिथलं भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र,समाजशास्त्र हे सगळं ज्ञानामृत 'वाट तिबेटची' या नावाने वाचकांना पाजणार्या कोण असतील तर..
चीनचं वर्णनही विस्तृत आहे. भाषा आणि खासकरून लीपि येत नसेल अशा देशांमध्ये एकट्या-दुकट्या प्रवाशाची कशी भंबेरी उडते ते अगदी हुबेहूब वर्णन यात आहे. यात निश्चितच लेखिकेची फजिती वगैरे नाही आहे, तर वाचकाला हा धडा आहे. प्रवासी मनःस्थिती छानच शब्दबद्ध झाली आहे.
चीन-तिबेट आगगाडीचं प्रवासाचं वर्णनही परिपूर्ण आहे. सलग ५०-६० तास एकाच गाडीतून अतिउंच जागेकडे प्रवास करतांना मन कसे खेळ खेळतं ते लेखिकेच्या कासोट्याचा बटवा त्यातल्या भरपूर रकमेच्या पौंडांसह हरवला असं वाटतं त्या प्रसंगातून स्पष्ट होतं. तिबेटचं, २०० व्या पृष्ठानंतर सुरू झालेलं वर्णन, तिथली प्रजा, रस्ते, रहदारी, जनजीवन,सरोवरं, शिखरं, हवामान, भाषा, रिती, धर्म, पंथ, धर्मगुरू, मंदिरं, विहार, चीन आणि त्यांचं रस्साकश्शीचं नातं हे वर्णनही अप्रतिम आहे.
देव, धर्म, आत्मा वगैरेवर फक्त प्रवसातल्या अनुभवाचं वर्णन न करता किंवा त्याच्याशी समरस न होता लेखिका आपली त्याबद्दलची मतं मांडते आणि कुठेतरी गफलत होतेसं वाटतं. एका पुस्तकविक्रेतीला लेखिका निक्षून सांगते, "तुमचं देवादिकांचं काही सांगणार असशील तर मी जाते, माझा त्यावर विश्वास नाही." पण पुस्तकभर लेखिकेने मंत्र, ओव्या, संतवचनं दिलेली आहेत. हिंदू धर्म, चालीरीती इतकच नाही तर अन्य धर्मांच्याही देहविसर्जनासारख्या चालीरीती लेखिकेला चांगल्याच माहिती आहेत. ही माहिती त्याबद्दल कोणाशी चर्चा केल्याशिवाय अथवा वाचल्याशिवाय किंवा आचरण केल्याशिवाय आणि त्या विषयाची आवड असल्याशिवाय आत्मसात होणं शक्य नाही. माणसाचे खाजगी आणि सार्वजनिक बुरखे वेगळे असतात आणि सार्वजनिक जीवनात ते ओळखता येतात असं माझं मत झालय. हे कोणा एका व्यक्तिबद्दल नाही. मी धरून सगळ्यांना हे लागू होतं.
एकीकडे आत्मा वगैरे ही मिथ्या कल्पना आहे असं म्हणत दुसरीकडे लेखिका, "पार्थिव शरीरातून निसटून, केवळ साक्षीभूत होऊन मी सारं दुरून पहाते आहे" असं, हिमालय पहातांना, आपल्या परमोच्च दृष्टीसुखाचं वर्णन करते. आत्मा भ्रामक आहे तर ही 'निसटलेली ती' कोण मग? का आक्षेप फक्त 'आत्मा' या शब्दाला आहे, संकल्पानेला नाही? हिमालय पाहिल्यावर लेखिकेच्या मनात येतं, "स्वर्ग इथून फक्त दोन बोटं असेल." देवाला थोतांड समजणार्यांना स्वर्गाचं अस्तित्व कसंकाय मान्य आहे? दलाईलामा सर्वज्ञानी आहेत तर त्यांचेही गुरु कसे असू शकतात, सर्व विश्वाचा पालक असलेल्या देवाच्या स्वतःच्या दालनाला बाहेर अन्य द्वारपाल का लागतात?, अशी वस्तुनिष्ठ टवाळी लेखिका करते तेव्हा 'स्वतः लेखिका असतांना इतरांची पुस्तकं लेखिका का वाचते' किंवा 'देवाधर्मावरा विश्वासच नाही तर तासन्तास मंदिरं बघण्यात काय हशील'.. असे प्रतिप्रश्न सुसंबद्ध ठरतील का असा विचार डोकावतो. श्रद्धेने लोटांगणं घालत प्रदक्षिणा घालणारे श्रद्धाळू आणि निसरड्या जमीनिमुळे पडण्याची शक्यता ह्याचा मेळ घालून लेखिका टोमणा मारते, "एकूण देवही तसलाच." श्रद्धास्थानी जाऊन त्याला टोमणे मारणं कितपत योग्य आहे? मग पुढे एकदा एका वाटाड्याने लेखिकेची फजिती केल्यावर सोबतीचे जर्मन प्रवासी हसतात. तो प्रसंग म्हणजे, 'एकूण तसल्याच असलेल्या' देवाने टवाळीची परतफेड केल्यासारखा वाटतो.
एका ठिकाणी 'फ्रांसमधलं स्टूटगार्ट' असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे लेखिका दलाईलामांच्या भारतात निघून येण्याची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी करते. त्यात लेखिका म्हणते, "महाराजांना तरी किमान एका देशात जायचं होतं, कापायचं अंतर कमी होतं." काय, हसता का रडता आहात? भारतात वास्तव्य असलेल्या मराठी माणसाच्या रोमारोमात महाराज आहेत. अनवधाननेही, तेव्हा देश नव्हता आणि होत्या असलेल्या अनेक सीमा ओलांडून राजे आले, हे लेखिका कसं विसरली? लामांची कृती सहज शक्य नव्हतीच पण राजांच्या बाबत संदर्भ तपासून हे वाक्य दुरुस्त करायला हवं. तिसरीकडे वाक्य आहे, "इंग्रज एवढे पुढारलेले असून, त्यांचं बस्तान इतकी वर्ष घट्ट बसूनही आम्ही त्यांना हाकलून देण्यात यशस्वी झालो, तसे तिबेटीही चिन्यांना हाकलून देण्यात यशस्वी होतील." आशावाद म्हणून ठीक आहे पण ही तुलना तरी होऊ शकते का? इंग्लंड केवढा देश, कुठे आहे, चीन केवढा, तो तिबेटला व्यापून शेकडो पट पसरला आहे. लोकसंख्येचं परिमाण.. कसला तरी पोस आहे का या तुलनेला?
आता आपण 'बुचक्याळलात' या मी लिहीलेल्या शब्दाच्या उगमाकडे जाऊ. मी मराठीमध्ये खूप पारंगत आहे असं नाही. पण ४० वर्षांपेक्षा अधिक काळ घरीदारी आणि फोनी आणि लिखाणी माय-मराठीच वसते आहे. यादरम्यान मी कधीही ऐकली नाहीत अशी विशेषणं, क्रियापदं पुस्तकभर माझा पिच्छा पुरवत होती. उदाहरणादाखल ही यादी बघा: राजकीय झकाझक, लोकांना लुंगाडतात, खौगोलिक गणित, चेंबलेलं अंग, हातोहात गदळली, सपीट वाळू, चुबकणारे पाय, करवादले, कुचमत कबूल, ..., ... असे ३९ शब्द जे मी याआधी ऐकले, वाचलेले नाहीत. या चुका आहेत असं मी म्हणणार नाही... कारण मुद्रण चुकांचा वेगळा गट आहेच. उदाहरणार्थ नवरानवरी ऐवजी नवरामवरी अशा पद्धतीचे अनेक मुद्रणदोष कळून येतात. लेखिकेचे खास शब्द आणि मुद्रणदोष यांची भागीदारी नव्हे तर जुगलबंदी शेवटपर्यंत चालू रहाते. तो एक वेगळा प्रवास घडतो. त्यामुळे तिबेटच्या वाटेवर लेखिका आपलं बोट अधूनमधून सोडून जाते आणि परत पकडतांना आपल्याला धाप लागते.
प्रवासात येणार्या अडचणी, मानसिक ओढाताण, आरोग्य या सगळ्याचा सांगोपांग विचार कसा करावा त्याचं मार्गदर्शन म्हणून हे पुस्तक जरूर वाचा, अवांतर बाबींकडे दुर्लक्ष करून. काही लिखाण तर्कसंगत वाटलं नाही तर सोडून द्या आणि म्हणा, 'अहम मणिपद्मेहम' 'जय अवलोकितेश्वर'!