https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=s6Zp7kPdVBk
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे ||
विंदांच्या या पंक्ति आपल्या समाजाला दिशादर्शक आहेत. बहुतांश क्षेत्रात आज भरभरून देणारे दाते आहेत पण योग्य ते स्वीकारायची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. कोणी खरंच निरपेक्षपणे देऊ शकतं यावर आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे.
होतकरू भारतीय मुलामुलींना हॉकीचं प्रशिक्षण द्यायचं स्वप्नं घेऊन पार जर्मनीहून आंद्रिया गढ हिम्मतगढला आलीये, २०१३ मध्ये. ती यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. आजपर्यंत करते आहे. हॉकि स्टीक्स देते आहे, मुलांना पळवते आहे, सिंथेटिक टर्फचे ढीग जमवते आहे, पालकांना पटवते आहे, शाळेला विश्वासात घेते आहे, एवढंच नव्हे तर स्वखर्चाने यूरोप टूरही करवून आणते आहे. ती झेप घेतेय, मुलांनाही उंच नेतेय पण ७ वर्षात जमिनीवर टर्फ अंथरायला तिला जमलेलं नाही... पटतंय का? त्याचीच ही गोष्ट.
या लघुपट निर्मात्याच्या अचूक शब्दात:
ही फिल्म वेड्या, स्वप्नाळू, काहीतरी ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे काम करणाऱ्या आंद्रिया सारख्या निस्पृह लोकांची गोष्ट आहे. या स्वप्नांच्या जगातील प्रवास खूपच अद्भुत असतो आणि ही स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी किंमतही मोजावी लागते.. या सगळ्या नाट्यमय प्रवासाची साधी सोपी गोष्ट म्हणजे स्टिक टू ड्रीम्स ही माझी पहिली फिल्म.
निर्माता चिन्मय अनिरुद्ध भावेने facebook वर लघुपटाची पूर्वपीठिका आणि सारांश दिलेलाआहे. https://chinmaye.com/2020/10/24/mblogsticktodreams/?fbclid=IwAR3l3AB-jaWZdcTGnuqLSFjMR1iBVM3CsS_c_Hm70vVlY6aZ2oSvMrKDtH0
हा पाऊण तासाचा लघुपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत छान गुंतवून ठेवतो. समाज म्हणून आपण काय आहोत याची झलक या छोट्या मांडणीत कळते. कुठल्याही जागतिक स्पर्धेत जिंकायचं नव्हे फक्त टिकायचं असेल तरीही आपल्याला खडबडून जागं होण्याची गरज आहे.
क्रीडाक्षेत्राशी संबंधित पूर्ण लांबीचे चित्रपट बनले आहेत. व्यावसायिक फायदा हा महत्वाचा घटक असल्याने अश्या चित्रपटांद्वारे त्यात अभिनीत नायक नायिकेचं larger than life उदात्तीकरण विकलं जातं आणि तेच लक्षात रहातं. मिल्खा, सचिन, धोनी, पंगा अशी लाटच अलीकडे आली. यातून व्यवस्थेवर प्रश्न उभे केले गेले जे रास्तच आहेत. पण या चित्रपटांना पटकथा आहे. चिन्मयचा लघुपट या विषयाला या चाकोरीतून बाहेर काढतो आणि 45 मिनिटं वास्तवात तरंगत ठेवतो. या लघुपटात पात्रं नाहीत तर खरेच नायक-खलनायक आहेत. भारत आणि युरोपमधलं चित्रिकरण आहे. संगीत आहे. नाटय आहे. कथा आहे. अचंबा आहे. परिणामकारकता आहे. चिन्मयने जवळ जवळ एकहाती सगळं निभावलंय आणि ते ही निर्मितीमुल्याशी तडजोड न करता.
लघुपट स्वतः कथेच्या निष्कर्शावर भाष्य करत नाही. आहे ती परिस्थिति समोर ठेवून निष्कर्श काढायला प्रेक्षकला वाव देतो. हा या प्रस्तुतीचा माझ्या दृष्टीने सर्वात जमेच्या तीन आयामांपैकी एक आहे. खलतेला मुद्दाम बटबटीत केलेलं नाही. त्यांनाही त्यांची बाजू मांडायची संधि दिलेली आहे. खरं तर लघुपट कोण खल ते ठरवत नाही, तो कदाचित खल नसेलही. पण पडून राहिलेल्या बेशकिमती टर्फला तो किंवा त्याची वृत्ती करणीभूत आहे. दुसरा आयाम अर्थातच कथा. तिसरा आयाम म्हणजे चित्रण. फारच छान. अधिक काही लिहिण्यापेक्षा एवढंच सार्थ ठरेल की लघुपट आपल्याला, आपल्या जागी आणून कोणी दाखवतय असं न वाटता, आपणच तो तिथे तिथे जाऊन पहातोय असं वाटतं!
आपलं क्रीडामंत्रालय निधी देतं पण कार्यान्वयनाची जबाबदारी किंवा माहिती घेत नाही, त्याच्या विनियोगातल्या अडचणी दूर करत नाही. खासदार, जिल्हाधिकारी परवानग्या देतात पण कार्यालयात बसल्या बसल्या. परवानगीचा अर्थ असाही नाही का की तुमच्या उद्दिष्टात काही अडचणी आल्या तर किमान माझ्या अधिकारक्षेत्रात येणार्या अडचणी मी दूर करेन? खासदाराने एखाद्या जागेवर एखाद्या योजनेला 'हो' म्हणण्याआधी आमदार, सरपंच, स्थानिक नेते यांना विश्वासात घ्यायला नको का? नीतिगत पंगुपणा (policy paralysis) तून आपण थोडे बाहेर आलो आहोत, आता थोट्या कार्यान्वयनातून (implementation paralysis) लवकर बाहेर यायला हवं.
या लघुपटात एक शेतकरी सरपंच आलाय. त्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं वैभव दृग्गोचर आहे. शेतकरी आंदोलनं होतात तेंव्हा माध्यमांमधे गरीब बिचार्या शेतकर्याचा प्रतिनिधी म्हणून एक धोतर बंडीवाला शेतकरी दोराला लटकलेला दाखवून हळहळ, उन्माद पसरवण्याचा प्रयत्न होतो. त्या जोडीला यातल्या या शेतकर्याचं छायाचित्रही ठेवायला हवं. म्हणजे जनतेला पीडित शेतकरी आणि आंदोलक शेतकरी यातला फरक समजता येईल.
स्टिक टू ड्रीम्स म्हणजे ध्येयाला चिकटून रहा. हे चिन्मय आंद्रियाच्या, तिच्या भारतीय मुलांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतोय. स्टिक टू ड्रीम्स म्हणजे जगज्जेते बनायच्या स्वप्नासाठी आंद्रिय देत असलेली हॉकि स्टिक. स्टिक टू ड्रीम्स मधलं ड्रीम म्हणजे हॉकी बॉल आपल्या खेळाडूंच्या स्टिकला स्टिक होईल, गोल होईपर्यंत ते परमोच्च क्षण. याहीपुढे जाऊन या लघुपटातून अन्यही संदेश आहेत. सबळ स्त्रि म्हणजे काय? सबळ स्त्री असते आंद्रियासारखी. स्वतःचा व्यवसाय करणारी. स्वप्नं बघणारी. स्वप्नासाठी परक्या देशात जाऊन तिथल्या नव्या पिढीला पंख देणारी, पण आपण जर्मन असणं न विसरणारी. अर्धांग व्यवस्थेसमोर हार न मानणारी. तिच्या कथा दिशा देतील. अंद्रियाला घडवणारी प्रगती घडते आहे. त्या वाटेवर जातांना त्या प्रगतीला पोषक व्यवस्थाही घडवावी लागेल. (भारतात सबळ स्त्रिया नाहीतच असा अर्थ नाही. लघुपटाच्या अनुषंगाने लिहिलं हे आहे.)
अजून काही वर्षं तरी, अशा आंद्रियाच अशा कथांच्या नायिका ठरत रहाणार. जरी यातली मुलं आपल्या देशाची नायक-नायिका होतील तरी 'घेणार्याने घेत जावे' हे रूजल्याचं कळेल. अशा आंद्रिया आपल्या देशातून निर्माण होतील आणि एखाद दुसर्या आठवड्यात टर्फ पसरू शकतील, त्या दिवशी हा लघुपटही सार्थक होईल. '.... एक दिवस देणार्याचे हात घ्यावे' च लागतील !!
४ टिप्पण्या:
बघायला हवा लघुपट, लेखनाने उत्सुकता चाळवली आहे.
Mast
लघुपट👌👍
लघुपटाचे सुंदर विश्लेषण👌👍
टिप्पणी पोस्ट करा