झालं.....
हळू हळू बाईंचं नवं घर वास्तुशांतीसाठी माणसांनी नुसतं फुलून गेलं. प्रत्येक जण घराच्या निरनिराळ्या खुब्या पाहून बाईंचं कौतुक करत होता. कारण ह्यामागची कल्पकता बाईंचीच, यावर दुमत नव्हतं.
कौतुक केलं म्हणजे चहा हवाच! चहा म्हंटला की बिस्किटं..
.. वास्तुशांत होती १९८४ च्या मे महिन्यात पहिल्या शनिवारी.
घर खान्देशात तर नातेवाईक नाशिक, पुणे, मिरज, रत्नागिरी, बडोदा, कलकत्ता असे विखुरलेले. परराज्यातून येणार्या दोनही वन्सा अनेक वर्षांनी आणि इतक्या दुरून सहकुटुंब येणार म्हणून अम्मळ काही आठवडे मुक्कामच होता त्यांचा. इतरही पाव्हणे रावणे नाही म्हंटलं तरी ३-४ दिवस राहणारच, शिवाय गाववाले येणार पूजेच्या दिवशी.
बाई तर नोकरीवाल्या! सकाळचा नाश्ता वगैरे त्या असाही कधी बनवत नसत.
मग सरासरी १५-२० माणसांचा नाश्ता तो ही १-२ आठवडे हे तर अशक्य. शिवाय पुरुष माणसांना तलफ आली की चहा बनवायचा तो वेगळा. सगळ्या बाया मिळून २ वेळेचं जेवण आणि हव्या तेवढ्या वेळा चहा बनवतील.
नाश्ता म्हणून मात्र बिस्किटं खायची ती ही तिन्ही त्रिकाळ हवी तेव्हा, असं ठरलं.
मग काय 'स्वाद भरे शक्ति भरे' चे ५ मोठे पत्र्याचे डब्बे भरून बिस्किटं मागवली गेली, घाऊक खरेदी. हे मोठे चौकोनी डब्बे नंतर तांदूळ, धान्य आदिची बेगमी करायला उपयोगी पडणारच होते!
होता होता ३ डब्बे संपले. चौथ्या डब्याचं झाकण बाईंच्या धाकट्याने उघडलं आणि एक एक पुडा काढून दादाकडे देऊ लागला.
"दादाs, हे बघ काय.." तो एकदम आश्चर्याने चित्कारला.
"आताs काय,पुड्यांसारखा पुडा आहे. उगीचच त्याचा टाक-टुक आवाज करत बसू नको. काका, मामा सगळे खोळंबलेत. दे लवकर पुडे इकडे." म्हणत, कर्तव्यतत्पर दादा पुडे हिसकवायला आला तसं धाकट्याने शिताफीने हातातला पुडा तसाच आत सोडून त्याच्या खालच्या थरातला पुडा काढून दिला. देता देता त्याला हे कळलं की आधीच्या पुड्यात त्याला जी गम्मत लक्षात आली होती ती या पुड्यात नव्हती. हा सर्वसाधारण पुडा होता. मग तो दादाला खालच्याच थरातले पुडे देत राहिला. संध्याकाळी आई ऑफिसमधून येईपर्यन्त त्याने कोणालाही बिस्किटांच्या डब्ब्याकडे फिरकूही दिलं नाही. पाहुणेही,
'कामसू आहे हो मुलगा' म्हणत राहिले.
बाई आल्यावर मात्र धाकट्याचा हा विचित्र कामसूपणा त्यांच्या डोळ्यातून सुटला नाहीच. धाकट्यालाही जे हवय ते झालय हे कळलं होतं.
"आई, आsई..."
तो दबक्या आवाजात आईचं लक्षं वेधून घेत होता. पण त्या तशा संध्याकाळच्या घाईच्या वेळात शेवटी त्याला २ धपाटे तेवढे मिळाले.
संध्याकाळची जेवणं उरकल्यावर पाव्हण्यांचं बाहेरच्या दालनात साहित्य सम्मेलन भरलं होतं. मामा सांगत होता,
"बघाs, याला म्हणतात काव्य.. काय दत्तोपंत! मुठ्ठी ऊसकी खाली हर बार नही होती, कोशिश करने वालो की....."
".....कभी हार नही होती! मग काय तर... हरिवंशराय. बाप आहेत बाप" इति धाकट्या-थोरल्याचे बाप.
वाह वाह, मजा आ गया, सगळेच म्हणू लागले.
आता या कोणाचं लक्ष नाही बघून, हिरमुसलेल्या धाकट्याला परत खुलवण्यासाठी झोपायआधी आईने शेवटी सवड काढलीच. धाकट्याकडे मोहरा वळवला,
"काय, सोनुली काय सांगतेय केव्हाचं? सांगून टाक बरं एकदा.. आणि मग मात्र चल झोपायला, लग्गेच हं!."
लगेच आधी कळी खुलली.
"आईs, हे बघ नाs, कसे पुडे आहेत हे."
धाकट्याने एक पुडा काढून उभा धरला आणि वरुन बोटाने दाबला. पुड्याचं वेस्टन चक्क थोडं आत लपकलं. बाईंचीही जिज्ञासा जागी झाली. बाईंनी पुडे ट्यूबलाइटकडे धरून निरखले. पॅकबंद पुड्यात १ बिस्किट कमी होतं. असा पूर्ण १ थर म्हणजे ६ पुडे असेच होते. बाईंनी ते पुडे बाजूला काढून ठेवले. धाकट्याला अर्थातच या निरीक्षणाबद्दल शाब्बासकी मिळाली. दादावर कुरघोडीमुळे आनंद मावेना झाला.
वास्तुशांत यथासांग झाली. सोहळा झाला, गप्पा, पत्त्यांचे डाव, बुद्धिबळचे पट, कॅरमचे बोर्ड सगळी धामधूम झाली. पाहुण्यांना स्टँड, स्टेशन पर्यन्त पोहोचावण्याच्या चकरा झाल्या. 'सासूबाई आणि मामंजिंसकट पुढच्या सुट्ट्यांमद्धे आता तुम्ही यायचं हं' अशी आमंत्रणं झाली.
मग बाईंना जरा उसंत मिळाली. त्यांनी ते पुडे बाहेरून तपासले. बाहेरून सगळं आलबेल होतं. त्यांनी एक पुडा काळजीपूर्वक उघडला. एक-एक तुकडा, एक एक बिस्किट धरून बाहेर काढलं. काही बिस्किटं आर्द्र होती, थोडी मिळमिळीत होती. नाकाशी धरल्यावर कसलासा वासही येत होता. सोहळा तर पार पडला होता. काही चांगले पुडे अजून शिल्लक होते. मग आता हे सहा पुडे फेकून द्यायचे का? काय फरक पडेल?
पण आपल्या रक्त-घामाने कामावलेल्या दमड्यांच्या बदल्यात ही पाणी प्यायलेली, वास मारणारी बिस्किटं आपण गपचूप मान्य करायची?
नाही.
प्रयत्न करायला काय हरकत आहे?
झालं. दोन्ही मुलं पिशवीतून ६ पुडे घेऊन दुकानदाराकडे.
"जाओ, भागो. उठके चले आते है. हमको बहुत काम है".
संध्याकाळी कार्यालयातून येता येता बाई दुकानात हजर.
"आप भी न भाभीजी, २०० मधल्या ६ पुड्यांमधून २०-२२ बिस्किटं गेली ना? मेहमान १ दिन जादा रुके समझो और भूल जाओ."
बाईंनी बाजू मांडायचा प्रयत्न केला. तक्रारीची धमकी देऊन बघितली. पण दुकानदार निर्ढावलेला होता.
"डब्बे तो पॅक थे. तो हमारी गलती कैसे. आपके बच्चेने पानी डाला रहेगा, याss पानी किसीसे गिरा रहेगा."
काही मार्ग दिसेना. आता खरोखर आपण हा पोरकटपणा करतोय असं आपल्याच मनाला पटवून हे सोडून द्यायची वेळ आली. कोणीही हेच केलं असतं.
पुढे पडलेलं पाऊल मागे घेणं हे बाईंच्या स्वभावात नव्हतं. बाई पुडे न्याहाळत होत्या. त्यावर कंपनीच्या एका विभागाचा पत्ता होता.
सोडता सोडता एक शेवटचा प्रयत्न.
२ ओशट बिस्किटं आणि काही कोरडे तुकडे कचकड्यात बांधून टपाली पुडकं करून, बरोबर विस्ताराने पत्र लिहून, थेट पुडक्यांवरच्या विभागीय पत्त्यावर पाठवूनच त्यांनी श्वास घेतला.
नेहेमीचा दुकानदार सुद्धा जिथे आपल्याला दमदाटी करतो तिथे अशा मोठ्ठ्या कंपनीकडून अपेक्षा नव्हतीच. उलट आपण वरुन आणिक पार्सलचा खर्च केला. तरीही २-३ आठवडे धुगधुगी होती. मग रोजच्या धबडग्यात हे कुठच्याकुठे निसटून गेलं.
२-३ महिन्यांनी नेहेमीप्रमाणे टपालवाला आला. आज चक्क टपाली धनादेश आला होता. टपाल अर्थातच दुपारी येतं आणि त्यावेळी बाई कार्यालयात. सासुबाईंनी धनादेशाची रक्कम स्वीकारली.
संध्याकाळी बाईंना प्रश्न पडला, हा इतक्या तुटपुंज्या रकमेचा धनादेश कसला? यात तर एका वेळेसची चहा बिस्किटंही होणार नाहीत.. ३ दिवसांनी आलेल्या छापील आंतर्देशिय पत्राने याचा खुलासा केला.
बिस्किट कंपनीच्या विभागीय विक्री व्यवस्थापकाने पत्र लिहिलं होतं.
ग्राहक म्हणून झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी होतीच शिवाय अंतर्गत दफ्तरदिरंगाईमुळे पार्सल उशिरा लक्षात आल्याबद्दलही दिलगिरी होती.
तो धनादेश बिस्किटांची भरपाई करायसाठी नव्हताच! तर बाईंना ते पार्सल पाठवायला लागलेलं शुल्क होतं ते.
तथापि उत्पादन तिथि आणि संच क्रमांक म्हणजे बॅच नंबर अभावी कंपनीला यावर काही कृती करता येत नाही, तरी बाईंनी हा तपशील कळवावा असं सुचवलं होतं. ही कदाचित पळवाट होती का?..
पण बाईंचा आनंद गगनात मावेना झाला, २ कारणांनी. एकतर एव्हढी मोठी कंपनी एका ग्राहकासमोर झुकली होती. आणि दुसरं कारण तर, बाईंच्या छोट्या छोट्या सवयींचा विजय दर्शवणारं होतं.
आधीचं पार्सल पाठवल्यावर सगळा खराब माल अर्थातच फेकून दिलेला होता. पण ही सल कायम सलत रहावी यासाठी त्या पुडक्यांची वेस्टनं मात्र बाईंनी फेकली नव्हती. त्याच्या घड्या घालून घड्यांमद्धे रबरबॅंड अडकवून बाईंनी ती 'पाकसिद्धी' 'आहार हेच औषध' 'चिकित्सा प्रभाकर' अशा पुस्तकांमधे खुणेसाठी घालून ठेवली होती!
मग पटापट त्या घड्या उलगडून त्यातली बॅच नंबरची बाजू फाडून ती वेस्टनं एका लिफाफ्यात घालून कंपनीकडे पाठवण्यात आली. त्याचबरोबर या प्रकारणाची दखल घेतल्याबद्दल आभारही व्यक्त केलेले होते.
आता काय घडतं याची उत्सुकता होतीच.
आणखी २-३ रटाळ महिन्यांनी एका रविवारी एका घाऊक विक्रेत्याची वितरणवाहिनी म्हणजे van फाटकासमोर उभी राहिली. २ माणसं 'स्वाद भरे शक्ति भरे' लिहिलेला बिस्किटांचा डब्बा घेऊन आत आली. बाईंना काय होतय याचा अजून पत्ता नव्हता.
"बाई डब्बा पॅकबंद आहे ना ते तपासून सांगा."
बाईंनी सुचनेप्रमाणे केलं. मग बाईंसमोरच डब्बा उघडण्यात आला.
आतला १-१ पुडा काढून त्याच्या मुसक्या आवळलेल्या असल्याचं, ते पुडे पूर्ण भरलेले, कोरडे असल्याचं बाईंना दाखवून मग सगळे पुडे परत डब्ब्यात रचण्यात आले आणि झाकण लावून मग कंपनीचा एक लिफाफा बाईंना देवून, डब्बा आणि लिफाफा मिळाल्याबद्दल बाईंची स्वाक्षरी घेऊन ते लोक निघून गेले.
कंपनीने बाईंना बिस्किटांची आणि मनस्तापाची भरपाई म्हणून अख्खा डब्बा भरून बिस्किटं दिली होती! तसंच बाईंच्या दुकानदारलाही सक्त ताकीद दिलेली होती, त्याची प्रतही बाईंना दिलेली..
प्रकल्पामध्ये, भाजून कुरकुरीत झालेली बिस्किटं एका स्वयंचलित वाहकपट्टया conveyor वरुन एका वजनमापक तबकडी weighing disc वर जाऊन पुड्याच्या उघड्या वेष्टनावर पडत आणि पुडा बांधला जाई.
बिस्किटांवर योग्य प्रक्रिया झाली असेल तर त्या ठरलेल्या वजनात बरोब्बर १२ बिस्किटं बसत.
कंपनीत अंतर्गत चौकशी झाली होती.
त्यात कळलं की बाईंना मिळालेली बिस्किटं उत्पादन प्रकल्पाच्या शड्मासिक देखभालीनंतरच्या लगेचच्या उत्पादन संचातली होती.
त्यावेळेसारखी परिस्थिति निर्माण केल्यावर दिसलं की देखभालीनंतर वाहकपट्टा ज्यावरून फिरतो ती चरखि म्हणजे pulley सुरूवातीला नीट फिरत नसे.
तिच्यातून नव्याने फवारलेल्या वंगण तेलाचे काही तुषार वाहकपट्ट्यावर उडत. ते, काही बिस्किटांना खालून लागत आणि मग वंगण पिऊन बिस्किटं फुगत. अर्थातच या लठ्ठपणामुळे या 'वंगणबेवड्या' बिस्किटांचं वजन वाढे आणि पुड्यात एखादं बिस्किट कमी घसरे!
अगदि काही क्षणातच ते यंत्र योग्य तसं पळू लागलं की वंगण उडत नसे. अंतिम दर्जा तपासणीत बिस्किटांना खालून आलेला ओषटपणा थप्पिमद्धे सापडत नसे.
या वंगणाचाच वास बाईंना आला, पण कसला ते कळलं नव्हतं!
आजच्या काळात आपण म्हणू की, कंपनीच्या बाजूने ही भरपाई योग्य आणि आवश्यक होती. पण त्या काळात एव्हढ्या मोठ्या कंपनीला संपर्क करायचा ही कल्पनासुद्धा लहान गावांमध्ये कोणी करत नसे. वंगण लागलेली बिस्किटं खाऊन कोणाला तब्येतीच्या तक्रारी येणं आणि ते बिस्किटांमुळे होतय हे कळणं दुरापास्त होतं. तसं झालं असतं तर मात्र कंपनीला केवढ्याला पडलं असतं, हो की नाही?
बाईंनी डब्बा स्वीकारला.
या स्वदेशी कंपनीबद्दल त्यांच्या मनात अपार आदर निर्माण झाला.
पण ही भरपाई बाईंसाठी निश्चितच जास्त होती.
बाईंच्या थोरल्या मुलाचा वर्गबंधु नन्नवरे चहा-बिस्किटांची टपरी चालवे. वडील बेवडे, आई घरकामं करणारी. त्याच्यावर पुरवठादार दुकानदाराची उसनवारी होती.
बाईंनी त्या दुकानदाराला डब्बा देऊन परस्पर नन्नवरेची उधारी उतरवली.
'हठ से....भरे स्वाद भरे शक्ति, बाईजी' असं या बाईंच्या चिकाटीचं वर्णन करता येईल, नाही का?