शुक्रवार, २३ जुलै, २०२१

साहित्य परिचय: बकुळीची फुले

पुस्तक: बकुळीची फुले

लेखिका: प्रतिभा करमरकर

प्रकाशक: श्रीलेखा करमरकर (shrilekha.k@gmail.com)


बकुळीच्या फुलांचं छायाचित्र आणि त्याबाजूला धवल अक्षरात असलेल्या पुस्तकाच्या नावामुळे टवटवीत झालेल्या मुखपृष्ठाने पुस्तक हातात घेतल्या घेतल्या प्रसन्न वाटतं. 

मुख्यत्वे कोल्हापूर आणि नारिशक्ती च्या दुहेरी वेणीवर रूळलेला २५ लेख, श्रुतिका, मुलाखाती, गप्पा आणि गोष्टींचा हा बहारदार गजरा.. कालनिरपेक्ष राहून साहित्य, माहिती, ज्ञान म्हणून हे सगळंच लिखाण चिरंतन टवटवीत आहे, हे प्रत्येक सुज्ञ वाचक ठासून सांगेल!

एकिकडे सकाळी फिरायला गेल्यावर आपल्या सगळ्यांना निदर्शनाला येतं ते सगळं लेखिका 'मॉर्निंग वाॅक' मधे अचूक शब्दात मांडते आणि उत्कृष्ट निरीक्षण वाचकाचा मनोवेध घेतं. .... तर दुसरीकडे अवघे पाऊणशे वयोमानाची 'जगावेगळी सुपरआजी ...' थेट बंगी जंपिंग करून, एकाच वर्षात उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पर्यटन करून आपला उत्साह वाढवते.

एकिकडे 'पालखी ज्ञानेशाची, दिंडी आयटीची' या शब्ददिंडीतून वारकऱ्यांचा निरलस भाव, जिद्द, नियोजनबद्ध दिंडी, उच्च शिक्षित तसंच परदेशी वारकऱ्यांचा सहभाग वाचकाला प्रवृत्त करतात. आजपर्यन्त वारी केलेल्या कोणाकडूनही मी वारीबद्दल वावगं काही ऐकलेलं नाही. .... तर दुसरीकडे बघता बघता नजर मालवलेली असूनही केवळ श्रुतीने सिनेमा एंजॉय करू शकणारी मदुराईतली डाॅक्टर व्ही. ऊषा ही 'एक हट्टी मुलगी' आणि 'ऋणानुबंधाच्या.. गाठी' मधला हात-पाय निकामी असलेला, मद्रासच्या स्पास्टिक सोसायटीचा हुशार विद्यार्थी राजीव राजन आणि त्याची जन्मांध शिक्षिका दीप्ती, धडधाकट वाचकाच्या नैराश्याला निवृत्त करतात.

एकिकडे '... महामंत्र गायत्रीचा' मधून आपण वझे गुरुजींबरोबर माॅरिशसला काॅन्फरन्ससाठी धावती भेट देऊन येतो. जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांच्या पारिषदेतही तर्कशुद्धपणे व्याख्यान देऊन वझे गुरुजी गायत्रीमंत्राच्या वैद्यकीय उपयोगाबद्दल कुतूहल, सकारात्मक प्रतिसाद निर्माण करू शकले. यातून आधुनिक विज्ञानात भली थोरली पोकळी आहे आणि ती त्यांनाही अवगत, मान्य आहे हेच सिद्ध होतं; .....तर दुसरीकडे 'राजा की आ गयी बारात' मधून थेट जपानच्या राजा-राणीच्या लग्नाला हजेरी लावून त्यामागची सूरस कहाणी आपण जाणून घेतो. 

एकिकडे 'श्री लक्ष्मीचा वरदहस्त' वाचत लक्ष्मीस्तवन करता करता दुसरीकडे '.. लढा सार्वजनिक स्वच्छतेचा' मधून 'एक्सनोरा' या संक्षिप्त शब्दाचा विस्तार उलगडतो. नारीशक्तिच्या जयघोषात कोल्हापूरच्या धाग्याला धरून भालजी पेंढारकर, अध्यात्माच्या सुत्राला धरून पांडुरंग शास्त्री यांच्या जोडीला एकच पुरुष लेखिकेच्या भावविश्वात तग धरून स्वतंत्र लेखाचा मानकरी झाला आहे. ते म्हणजे मद्रासचे एक्सनोराचे संस्थापक एम बी निर्मल. ह्याकडे व्यक्तिमहात्म्य म्हणून न बघता स्वच्छतेचं महत्व किती आहे, या, विषयाच्या भिंगातून त्याकडे बघितलं पाहिजे.

एकिकडे 'अतिथि देवो भव' मधल्या पाहुण्यांच्या नकोशा सवयी आपल्यातल्याही  यजमानाला उद्वेग आणतात. पाहुणे आणि यजमान हे विषय पुलंनी आणि अन्यही लेखकांनी हाताळले आहेत. रौद्ररस किंवा संताप व्यक्त होतांना आवेशात एखादा वावगा शब्दही लेखणीतून उतरणं अगदी स्वाभाविक आहे. हे शब्दही भाषेचं लेणं आहेतच. तरीही ते लिखित स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचू नयेत ही जबाबदारी लेखक आणि प्रकाशक यांनी संयुक्तपणे उचलली पाहिजे, नाही का? तसंच मुद्रणदोषही मोक्याच्या ठिकाणी रसभंग करतात. ते पुढील आवृत्तीत टाळायला हवेत.  .... तर दुसरीकडे 'जन पळभर म्हणतील' मधली सांत्वनकर्ती मंडळी उद्वेगाच्या आगीत तेल ओततात. आपण भारतीय आधी भावनिक स्थैर्याला महत्व देतो. त्या कालावधीत विचारलेले वस्तुनिष्ठ प्रश्नही असंबद्ध ठरतात म्हणून ते, व्यक्तिचा काळ येऊन गेला तरी प्रश्नाची वेळ आलेली नाही, हे समजून टाळलेले बरे!

एकिकडे लेखिकेची लेखणी धरून खगोल शास्त्रात उंच भरारी घेणार्या जयंत नारळीकरांना आपण त्यांच्या घरातच गाठतो. डॉ. मंगला जयंत नारळीकर हे तसं सामान्यांना परिचित नाव. त्यांचा साधेपणा, कलासक्तपणा, कसब, शिक्षण आणि मुख्य म्हणजे काटेकोरपणा लेखिकेने व्यवस्थित विषद केला आहे. मोजक्या शब्दात मांडणी करण्यासंदर्भात यात आलेला 'अमुक तमुक रस्ता कसा आहे? या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणूस कसं देतो' हा भाग मला तेवढासा पटला किंवा रुचला नाही. उत्सवमूर्तिचं असामान्यत्व सिद्ध करायला सामान्यांशी तुलना कुचकामी ठरते. शिवाय या अशा व्यक्तिमत्वांबद्दल वाचतांना वाचकाने स्वतःला सामान्य गृहीत धरलेलं असतं.  .... तर दुसरीकडे प्रभा कुलकर्णी या कर्तबगार उद्योजिकेच्या आयुष्याची, कारखान्यांची फेरी घडते. 

एकिकडे लेखिका, बेबी शकुंतला आणि मदनमोहन लोहियांमार्फत आपल्याला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओतल्या वातावरणाची मोहक सफर घडवून आणतात. भालजींचं कौशल्य, खंबीरपणा, शिस्त, विवेक आणि सचोटीचं चित्रिकरण करतात, .... तर दुसरीकडे लेफ्ट. जन. थोरातांच्या भार्या लीलाताईंबरोबर आपण ध्येयनिष्ठ लष्करी संसाराचा रोमांचक फेरफटका मारून येतो. नवरा सैन्यात व्यस्त असतांना देशभर डझनावारी अनोळखी ठिकाणी राहून या  डॉक्टरिणबाईंनी गोर-गरिबांची केलेली सेवा अतुलनीय आहे. 

आशयगर्भ लेखन लेखकाला आणि वाचकाला विजयी करतं. १९९२ आधी लिहिलेलं, '... थोरात यांची ही जोडीने चाललेली वाटचाल अशीच दीर्घकाळ चालू राहो,... ' या वाक्याने सांगता झालेलं लिखाण प्रवाही असल्यानं त्याच प्रवाहात "हो हो, १००%!" असं वाचकाच्या मनात लेखिकेशी अनुमोदन उमटवतं. प्रवाह सोडून माहितीजाळात पृथक्करण केलं की, लेफ्ट. जन. थोरात १९९२ साली निवर्तल्याचं कळतं. तरीही वाचक जिंकतो, कारण तो आता भावनिक तरंगासोबतच काळसापेक्ष माहितीनं समृद्ध झालेला असतो. मग तो वाचक प्रत्येक लेखाचा असाच मागोवा घेतो आणि माहितीच्या कक्षा विस्तारत रहातात. चित भी मेरी पट भी मेरी असाच हा प्रकार आहे. त्यामुळे लिखाण कालपरत्वे कोमेजत नाही हेच खरं!

एकिकडे 'असे दागिने सुरेख बाई' मधून आपण धातूच्या दागिन्यांच्या दुनियेत जातो. या नररत्नांनी ठासून भरलेल्या पुस्तकाची सुरुवात दागिन्यांच्या यादीने होते हा योगायोग की प्रकाशकाची योजना असावी? या लेखातली दागिन्यांची यादी संपतच नाहीये असं वाटतं. दक्षिण भारतापासून ते राजस्थानपर्यन्तच्या दागिन्यांचा मागोवा यात आहे. बरेच प्रसिद्ध लोक दागिने घडवायला पुण्या-मुंबईतून कोल्हापूरला येतात (.. आणि लेखिकेला गवसतात?!)  हे कळतं. साजाच्या मध्यभागी असलेल्या पदकावर पूर्वी कृष्ण असायचा तो आता लाल खडा असतो, हे कळल्यावर हा बदल कधी आणि का झाला असेल असा प्रश्न अभावितपणे येतो, जो लेखिकेने सोडवलेला नाही. ... तर दुसरीकडे 'अभी तो मै जवान हू' मधून शरीर हा दागिना कसा कोरा करकरीत ठेवायचा याचं विवेचन लेखिकेकडून होतं. नव्वदच्या दशकापासून कोट्टाकलच्या वैद्यशाळेच्या आश्रमात देशी विदेशी साधक कायाकल्प करायला येतात. तरी तो आश्रम, त्याचं महात्म्य आजच्या 'सबकुछ व्हायरलच्या' जमान्यातही तसं दबलेलंच आहे.

'वधुपरिक्षा - काल आणि आज' मधून उलटलेल्या काळाबरोबर वधुपरिक्षेचे पालटलेले संदर्भ साक्षात स्वर्गातल्या देवतांच्या संवादातून आपलं मनोरंजन करतात. .... तर दुसरीकडे लग्न ठरल्यावर घडणार्या जत्थ्याच्या परंपरेचं साद्यंत वर्णन 'लगीन ठरलं ...' मधून समोर येतं. आपल्या समाजाच्या अशा घड्या पूर्णपणे मिटल्या आहेत. एकेकाळी याच घड्या आपलं अर्थकारण चालवत आणि समाज एकसंधही ठेवत असत.

एकिकडे 'प्रकाशाची वाट' चालत पितृछत्र हरवलेली हमजा हट्टाने एकट्या तिच्या आईकडून कन्यादान करून घेत असतांना आपल्याला तिच्या लग्नमंडपात नेते, .... तर दुसरीकडे 'चुकतंय कुठं?' मधून लेखिका, पालकांचे पालक स्वतःच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांबाबत ते चुकत असतील तर त्या मधल्या पीढीला समजावून सांगून ताळ्यावर आणू शकतात ते कसं, हे संगतवार मांडते. प्रबोधनपर संवाद कसे लिहावेत याचा हा या पुस्तकातला पहिला उत्कृष्ठ नमुना आहे. आकाशवाणीसाठी लिहीलेल्या श्रुतिका फारच खुमासदार झाल्या आहेत. काल्पनिक पात्रांच्या संवादामुळे विषयावर थेट आणि गंभीर हल्ला न होताही तो व्यवस्थित गळी उतरतो. हे संवाद लिहिण्याचं लेखिकेचं कसब निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.

एकिकडे 'ज्योतीने तेजाची आरती' ला हजर राहून स्वाध्याय परिवाराची ओळख होते. पांडुरंग शास्त्री आठवलेंवर भावपूर्ण लिहिलं आहे. तरीही तो कुठेही प्रोपागंडा वाटत नाही, ही त्या लिखाणाची खुबी किंवा लेखिकेने सांभाळलेला संयम आहे. .... तर दुसरीकडे 'ग्राहक चळवळ कशासाठी? कोणासाठी?' मधून ग्राहक एव राजा हे समजून घेता येतं. विधीची पदवी घेऊन ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी दशकभर काम पाहिलं आहे. एकेकाळी मी ही ग्राहक चळवळीत आईच्या हाताखाली सक्रिय होतो. आता विक्री-विनिमय पद्धति सेवेच्या व्याख्या बदलल्या आहेत. या परस्थितीत कोपर्यावरचा दुकानदार देशोधडीला लागेल असं दिसतय. दुर्दैवाने आपल्याकडे गुन्हेगारी, फसवेगिरीची क्षेत्रं आधी फोफावतात आणि मग व्यवस्थेला त्यांचा पाठलाग करता करता धाप लागते. लुच्चा विक्रेता कचाट्यात सापडून, ग्राहक 'राजाचा' मुकुट चढवतच होता, एव्हढ्यात ऑनलाइन प्रकार आला. नेहेमीप्रमाणे या क्षेत्राला मुक्त कुरण मिळालं आणि आता बहुतेकांनी तुंबड्या भरल्यावर त्यासंबंधी कायदे येताहेत. आता कायदे येणार, मग जागृती होणार.. समाज म्हणून आपण, आपले नेते कायम बॅकफूटवरच रहातो आणि नवनवे फिरकीपटू चेंडू हातभर फिरवतात आणि आपला त्रिफळा उडवतात.

एकिकडे समारोप होतांना 'झुंज एका धरणाशी' देण्यासाठी मेधा पाटकरांबरोबर दर्याखोर्यांमधे ठाण मांडून बसावसं वाटतं. मेधा पाटकरांचा एक मुद्दा माझ्या लहानपणापासून आमच्या कुटुंबात सर्वमान्य होता, आहे. तो म्हणजे, मोठमोठी धरणं हे जलसंधारणाचं योग्य साधन नाही. छोटे छोटे बांध, पाणी अडवून जिरवणं, लागवडीखालील क्षेत्र  वाढवणं हे उपाय पर्यावरणपूरक आहेत. अलीकडे महाराष्ट्र सरकार, पाणी फाऊंडेशन वगैरे एकत्र येऊन जलयुक्त शिवार राबवतात. यावर मेधाताईंचं काय म्हणणं आहे? ते मला माहिती नाही कारण तो विषय त्यातल्या राजकरणामुळे माझ्या कक्षेबाहेर राहिला. माझं एकूण वाचन कितीही तुटपुंजं असलं तरी आपल्या पौराणिक कथांमध्ये विमानाच्या सुद्धा संकल्पना आहेत हे मी वाचलंय, ऐकलंय. पण अवाढव्य धरणाचा उल्लेख मला तरी आढळत नाही. भारतीय पुराणकथांमधून न गवसणारा  कुठलाही आधुनिक आविष्कार किंवा निर्माण पर्‍यावरणपूरक किंवा दीर्घकालीन उन्नतीकारक असण्याबद्दल मला कायम शंका येत राहील! ....तर दुसरीकडे, धरणाशी ठाण मांडण्याआधी लेखिकेने आपल्याला, ' जिकडे पहावे तिकडे बर्फ आणि मी एकाकी असह्य' हे अनुभवलेल्या बच्छेंद्री पाल सोबत थेट एव्हरेस्टवर पोहोचवून आणलेलं असतं. 

एकिकडे लेखिका माजी न्यायाधीश असल्याने मी माझी मिमांसा 'माय लॉर्ड' म्हणत, शपथेवर, जसं वाटलं तसं सादर केलीये. .... तर दुसरीकडे यात 'एकिकडे..दुसरीकडे' असं 'कंपेअर एंड कॉन्ट्रास्ट' तंत्र वापरलंय. लेखिका मुंबईत जन्मलेल्या असल्या तरी कोल्हापूरने त्यांचं मन व्यापलेलं आहे. शहरी असल्या तरी गावरानाची ओढ आहे. अतिउच्च शिक्षित असल्या तरी रूढी परंपरांना फाटा दिलेला नाही. पुस्तकातलं लिखाण एकांगी, एकरंगी नाही. तसंच लेखिकेकडे याचा अजूनही भरपूर साठा आहे. यापुढचं संकलन अन्य बहुरंगी साधनाच्या, प्रतिमेच्या नावाने करता येईल. बुंधा लेखिकेच्या अंगणात असला तरी फुलांचा सडा आम्हा वाचकांच्या अंगणात पडतोय. अन् यापुढचा बहर शेकड्याने सडा पाडो.. 

शनिवार, ५ जून, २०२१

साहित्य परिचय: कल्चर शॉक जर्मनी

पुस्तक: कल्चर शॉक जर्मनी

लेखिका: सौ. वैशाली करमरकर

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

प्रथम आवृत्ती: १४ जुलै २०१५


शॉकिंग पुस्तक! 

'पुस्तकात शॉक बसण्यासारखं काय आहे?' 

Malorie Blackman म्हणते, "Reading is an excercise in empathy; an excercise in walking in someone else's shoes for a while. वाचन ही, सह अनुभूतीची, काही क्षण दुसर्‍याच्या सपाता अडकवून चालण्यासारखी कसरत आहे. " मी हे पुस्तक वाचल्यावर माझ्या प्रवाससाधनांनी माझी अनुभवशिदोरी लेखिकेला दिली की काय अशी उलटी शंका घ्यायला जागा आहे!


अहो, म्हणजे, या सन २०१५ च्या पुस्तकातले जर्मनीतले किंवा जर्मनांबद्दलचे मासलेवाईक प्रसंग माझ्या २०१६ पासूनच्या जर्मन भेटींमधुनच घेतलेssत! आणि मी तर लेखिकेला २०२० पर्यन्त ओळखतही नव्हतो की मला त्यांचं नाव माहिती नव्हतं का त्यांना माझं..  असो. गमतीचा भाग सोडला तर हे नक्की की आपल्याकडे निष्णात वैद्य जसा फक्त चेहरा पाहून किंवा नाडी तपासून आपल्याला काय होतंय ते तोच सांगतो तसंच लेखिका भारतीय व्यक्ति जर्मनीत गेल्यावर कोणते प्रसंग घडतात, घडतील हे तंतोतंत सांगतात. आणि मग त्या, त्या प्रसंगांची पार्श्वभूमी सविस्तर उलगडून दाखवतात.


अमेरिकन लेखिका झुमा लाहीरी म्हणतात, "Thats the thing about books! They let you travel without moving your feet. पुस्तकं तुम्हाला बूडही न हलवता जगाची सफर घडवून आणतात." हे विधान स्थलसफरीबद्दल आहे पण माझ्यामते ते स्थल-कालालाही लागू होतं आणि त्याचा प्रत्यय म्हणजे हे पुस्तक.


पुस्तकात सांस्कृतिक झटक्याच्या उदाहरणादाखल दिलेल्या प्रसंगांमधला घरमालकाचा अनुभवआणि 'मीटिंग हेच शंका निरसनाचं ठिकाण असतं' हे अनुभव मला एकदा नाही प्रत्येक वेळेला आलेले आहेत. एखाद्या प्रकल्पाबद्दल एक मीटिंग उरकल्यावर परत काही बोलायचं तर आपण परत मीटिंग बोलवावी किंवा पुढच्या पूर्वनियोजित मीटिंग पर्यन्त थांबावं ही त्यांची अपेक्षा आणि शिस्त असते. त्यापुढे जाऊन मात्र मी हे अनुभवलं आहे की आपण काम करत राहिलो आणि प्रकल्पाचे आधारस्तंभ झालो तर जर्मन लोक खिलाडूपडे अशा नियमांना थोडी मुरड घालतात आणि कॉफीब्रेक हा एक उत्तम मुहूर्त असतो. Fußball किंवा सॉक्कं म्हणजे फूटबॉल या खेळातून ही वृत्ती आली असावी. एकदा का तुम्ही संघभावनेने खेळता आहात हे जाणवलं की मग शीळ घालताच शॉर्टपासेस, लॉन्गपासेस मिळू लागतात. 


तर केकच्या तुकड्याच्या अनुभवाचा मला बसलेला झटका असा की, असाच एक अनुभव माझ्या एका जर्मन वरिष्ठांनी ३५-४० वर्षांपूर्वी, त्यांच्या लहानपणी Akademisches Austauschprogramm विद्यार्थी अदलाबदल योजनेअंतर्गत त्यांच्या घरात  रहायला असलेल्या भारतीय तरुणाबद्दल मला कथन केला होता आणि तो त्यांच्या दृष्टीकोनातून बरं! म्हणजे त्या भारतीय विद्यार्थ्याने केकचा तुकडा अव्हेरून किंवा नापसंतीने घेऊन कशी विचित्र वागणूक दर्शवली अस्सा!


या पुस्तकातून आपल्याला जर्मनीची संस्कृति म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि मानसशास्त्र अतिशय रसाळ आणि रंजक भाषेत समजतं. यामुळे जर्मनीत येणार्‍या वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण अनुभवांसाठी मानसिक मशागत होईलच. त्याबरोबरच त्या अनुभवाची पाळंमुळं नवागताला उकरून पहावी लागणार नाहीत. उलट काही प्रसंगांमधे आपल्याला हवा तसा प्रभावफुलोरा यायसाठी त्या प्रसंगातल्या व्यक्तींना, आपल्या प्रतिसादांना कसं खुलवायचं हे आधीच कळून त्या प्रसंगात स्वतःचा आब सांभाळून निभावून नेता येईल. अनुभवांमधे वैचित्र्य न वाटता वैविध्य दिसेल. सर माल्कम ब्रॅडबरी म्हणतात, "Culture is a way of coping with the world by defining it in detail. संस्कृति म्हणजे आसमंताला फुरसतीत तपशीलवार जाणून त्याच्याशी जुळवून घ्यायची रीत आहे" जर्मन संस्कृतीची in-detail definition,तपशीलवार जाण या पुस्तकातून येते. 


ghetto या शब्दाची माझ्या शब्दकोशात या पुस्तकातून भर पडली आहे आणि तो माझ्या मनात अगदी घट्ट रुतून बसला आहे म्हणा ना! भारतातल्या जिव्हाळ्याच्या 'घट्ट' नात्यांवरूनच तर हा शब्द इजिप्शियनमधे उगम पावला नाही ना अशी मला एक शंका आहे. 


युरोपियन टोळीजीवनापासून ते आजच्या तिथल्या छोट्या छोट्या भूभागांना आपापले स्वतंत्र देश म्हणत एकत्र नांदणार्‍या समुदायांपर्यंत (हो, समाज म्हणायला मी अजून धजत नाही) सगळा प्रवास या पुस्तकात आहे. आताच्या जर्मनीतले लोक,

 त्यांच्या सवयी, पद्धती, रहाणी, आवडी-निवडी, पोटपूजा, (अ)पेयपान, चिन्हं, प्रतिकं, ध्वज, राष्ट्रगान अशी सगळी जंत्री त्यांच्यात येत राहिलेल्या स्थित्यंतरांसह इथे शब्दबद्ध आहे. तिथले शासनसमार्थित सांस्कृतिक clubs हे समुदायपुरुषाचा प्राणवायू असावेत असं भासतं. तसंच आपणा भारतीयांनाही ते वरदान ठरू शकतात. नागरी सुट्ट्यांच्या दिवशी दुकानं बंद असण्यामागचं समाजशास्त्र इथे उलगडतं. 


Wer rastet, der rostet. म्हणजे ठेवलं की गंज चढतो किंवा थांबला तो संपला. या जर्मन म्हणीप्रमाणेच ते लोक वागतात हे ठसतं. जर्मनीतलं स्त्रीयांचं स्थान काय आणि ते का हे समजतं. मग त्यांचा एत्तद्देशीयींच्या तुलनेतला ताठर स्वभाव हा ताठा नसून दुसर्‍या महायुद्धानंतरच्या खंबीर जर्मनीचा तो ताठ कणा आहे हे कळतं. सकळ देशबांधव एकदिलाने 'यशाकडे अखंड झेप घेऊ' लागले तर रक्तबंबाळ, भुकेकंगाल अवस्थेतून जगात श्रीमंतीचा तोरा मिरवण्यापपर्यन्त वाटचाल करता येते हे जर्मनी आणि जपान ह्या दोन्हीही देशांनी दाखवून दिलं आहे.


'विद्या मित्रम प्रवासेशु'. जर्मनीला निघण्याआधी किंवा अन्य ठिकाणी राहून जर्मन व्यक्तीशी संपर्क होण्याची चाहूल लागली आणि ह्या पुस्तकातून विद्यार्जन केलेलं असलं तर झटका बसणार नाही. जर्मन संस्कृतिची ऊर्जा रोमारोमात प्रवाहीत होत जाईल. जर्मनमधे म्हणतात, 'Aus Schaden wird man klug', 'अपयश व्यक्तिला चलाख बनवतं किंवा अपयश ही यशाची पहिली पायरी असते'. हे पुस्तक वाचून जर्मनीप्रवेशानंतरची ही अडखळ टाळता येऊ शकते. तिथे किंवा त्यांच्यात विरघळून जायचं असेल तर वागावं, बोलावं, रहावं कसं, ते आधी वाचावं. जर्मनीला प्रस्थान करणार्‍यांनी तर वाचावंच, जर्मनी अनुभवलेल्यांनीपण पुनःप्रत्ययाने तोषावं. चोखंदळ वाचकांनी प्रवाही आणि माहितीपूर्ण साहित्य म्हणून वाचावं. 


Diane Duane म्हणते, "reading one book is like eating one potato chip". राजहंस प्रकाशनाची कल्चरल शॉक ही एक मालिका आहे. त्यात जपान आणि अरबस्तानवरही त्या त्या माहीतगार लेखकांची पुस्तकं आहेत. ती वाचायची जिज्ञासाही या पुस्तकातून निर्माण झाली आहे.

शुक्रवार, २१ मे, २०२१

बारकू, इभूना आणि मुलाखत

'बारकू' खांदेशी होता. हुशार, पण अभ्यासाशी काही संबंध नाही. त्याची पुस्तकं नव्यासारखी कोरी रहात म्हणून आदल्या इयत्तेतले अनेक जण परिक्षा संपली की ती पुढच्या इयत्तेची पुस्तकं फुकटात मिळवायला बारकूकडे यायचे! 

बारकू शाळेत लक्ष देऊन ऐके, त्या जोरावर उत्तीर्ण होणं हे काही त्याला आव्हान नव्हतं. एकदा का घरी आला की मात्र पुस्तकं वह्या कधीही दप्तरातून बाहेर निघत नसत. वाचायला घेतलं की त्याला झोप येई. गृहपाठाचाही पत्ता नसे. आकडे मात्र त्याचे जीवलग दोस्त होते. त्यामुळे गणित त्याला फार शिकवावं लागत नसे आणि त्यामुळे ते पुस्तकही उघडायचा प्रश्नच नव्हता.

त्या दिवशी बारकू पुण्याच्या गरवारे प्रशालेत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या काही शिक्षकांसमोर बसला होता. मुलाखत द्यायला!  राज्यस्तरीय टॅलेंट सर्चची लेखी परीक्षा पार करून तो या टप्प्यात आला होता. लेखी परीक्षा दिल्यावर या खांदेश्याने हेरलं होतं की अशा परीक्षांमध्ये कठीण म्हणून असणारे प्रश्न ताईच्या इयत्तेत अभ्यासक्रमाचा भाग होते. मग मुलाखतीतही असंच पुढच्या इयत्तेतले प्रश्न विचारात असतील तर? 


या विचाराने त्याने मुलाखतीआधी ताईची पुस्तकं वाचून जायचं ठरवलं होतं. पण कसचं काय. सवयी अशा सुटतात होय! पुण्याला जायचं सामान भरायची वेळ आली तरी आळसाच्या वेताळाने या खांदेशी विक्रमाची पाठुंगुळी सोडली नव्हती. शेवटी त्याने फक्त अनुक्रमणिका वाचून घेतल्या! त्यातल्या त्यात नागरिकशास्त्रातल्या शेवटच्या प्रकरणाबद्दल त्याला त्याच्या वेगळ्या नावामुळे कुतूहल वाटलं म्हणून शेवटचं पान उघडून त्याने तेव्हढी तृष्णा शमवली होती.


गणिताच्या बाकावर बसलेल्या परीक्षकांना त्याने पार गुंडाळून ठेवलं. शेवटचा प्रश्नार्थक शब्द सुरू व्हायच्या आतच उत्तर देणं ही तर त्याची खासियत होती. याच सवयीचा वापर करून एका चाणाक्ष परीक्षक बाईंनी आयत्या वेळी शेवटचे शब्द 'किती तास लागले?' ऐवजी 'किती तास उरले?' असे फिरवले आणि त्या खांदेश्याला त्या वयात आवश्यक असा सबुरीचा पाठ दिला आणि पाठही थोपटली. 

इतर विषयातलं आपलं पितळ माहीत असल्याने त्याने गणिताची उत्तरं बाजूच्या बाकांनाही ऐकू जातील अशा बावन्नकशि खणखणीत आवाजात दिली होती आणि प्रतिमाप्रतिष्ठापना करून ठेवली होती. 


बाहेर गडद मळभ दाटून आल्यानं भर दुपारी शाळेच्या दालनात सगळे दिवे लावावे लागले होते. बारकूला पुढच्या बाकावर इभूनाला सामोरं जायचं होतं. 

"पंडितजी कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले ते कोणतं वर्ष होतं?" 

सनावळ्यांना तर बारकूच्या मेंदूने कायम चलेजाव केलेलं होतं. १९४६ मध्ये त्याच्या आजोबांचे सावद्याचे मित्र बापू वंजारी स्वातंत्र्यसैनिक म्हणून पकडले गेले. त्याची गोष्ट आजोबा रंगवून सांगत. ती मात्र त्याला स्मृतीत होती. इतिहासाच्या पुस्तकात सावदा, पारोळा, नशिराबाद, मुक्ताईनगर इथल्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल काही असतं तर बारकूने पैकीच्या पैकी गुण आणले असते.

"... बरं ते राहू दे, पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांचं मृत्यू वर्ष?" 

बारकू बोटाने फळीवरच्या कागदाचा कोपरा नखाने दुमडायचा चाळा करत तिकडेच खाली बघू लागला. बाई गुणपुस्तिकेत आणखी एक फुली मारायला सरसावल्या तसं बारकू अजिजीने म्हणला,

" मॅडम, इंदिराजी १९८४ साली गेल्या आणि राजीव गांधी १९९१ साली." 

बारकूच्या जन्मानंतर झालेले इंदिराजी, राजीवजींचे मृत्यू त्याच्या जीवनाचा भाग असल्याने त्याला ते लक्षात ठेवावे लागले नव्हते.  

"हे अगदी बरोबर आहे. पण हे मुलाखतीतल्या प्रश्नाचं उत्तर नाही त्यामुळे मला फुली मारावी लागेल." 

"ब्रह्मदेश भारताच्या कुठे आहे?"

"पश्चिमेला.."

चाचरत बारकू म्हणाला. बाईंनी फळीवरच्या नकाशाकडे अंगुलीनिर्देश करत तो पूर्वेला असल्याचं दर्शवलं आणि आणखी एक फुली मारली. 'भू जर गोल आहे तर पश्चिमेकडूनही तो लागेलच की' बारकू मनात म्हणाला. भुसावळहून पाचोर्‍याला जाणारी बस पूर्वेकडल्या फलाटावर लागते हे त्याला माहिती होतं.

बाई आता फार काही विचारणार नव्हत्याच. बाजूला बसलेल्या 'ना.शा.' च्या गुरुजींकडे त्यांनी कटाक्ष टाकला.


"लांबच्या गावातून मजल मारलीस इथवर, वा वा, अभिनंदन!" 

मिशीखालून कुठूनतरी आवाज आला. मिशीने विस्फारून हास्य दाखवलं. बारकू काही बोलला नाही. 

"टी व्ही पहातोस ना? काय पहातोस टी व्ही वर?" 

गुरुजींनी खरं तर त्याच्यावरचा ताण कमी करायला हे विचारलं होतं, पण भाऊ परीक्षेच्या कोमात असल्याने त्याचा ताण आणखी वाढला. 'आता टीव्हीचा ना.शा. शी काय संबंध...'  तो परत काही बोलला नाही.


"बर, बर. शाळेत संगणक आले आहेत का?" 

परत तेच. गुरुजी विषय विसरले बहुधा.. 

"हो हो, आलेत की सर. माझा फास्ट फ्रेंड आहे पक्या, त्याचे वडील परवाच भांडले शाळेत, संगणक ठेवलेल्या खोलीचं दार सारखं उघडं रहातं आणि वातानुकूलन रहात नाही म्हणून..." 

माहितीचा जणू कडा कोसळला. 

"ठीक, ठीक. विषय सोडू नको. ही नागरिकशास्त्राची तोंडी परीक्षा आहे. काय? लहान लहान शहरात कॉम्प्यूटर, म्हणजे देशाची प्रगति होते आहे. हो ना? ही सगळी प्रगति कशामुळे झाली सांग बघू?" 

त्याच्या आधीच्या उत्तरावरून बारकू अलिकडच्या काळासंबंधी तयारी करून आलाय असं वाटून, त्याला याबद्दल विचारलं तर त्याला एखादा गुण देता येईल या विचाराने त्यांनी प्रश्न टाकला. बारकू 'भारत सरकारने विज्ञान-तंत्रज्ञानाचं देशाच्या विकाससाठीचं महत्व ओळखून तसं धोरण ठरवलं म्हणून शाळाशाळांमद्धे संगणक आले' असं काहीतरी उत्तर देईल अशी त्यांची अपेक्षा होती. अगदी 'माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या दूरदृष्टिमुळे' असं सांगितलं तरी त्याला गुण देण्याची त्यांची तयारी होती.


पण हे सांगायएव्हढी प्रगल्भता किंवा घोकमपट्टी त्याच्याकडे नव्हती. तो कधी भुवईच्यावर तर्जनीने खाजवत होता तर कधी कानाच्या पाळिमागे करंगळीने. बोटंही लुळी पडल्यागत वाटत होती. कधी एकदा हे सगळं संपतं आणि आपण परत गावी जातोय असं त्याला झालंय असं त्याच्या देहबोलीवरून वाटत होतं. आता बाहेर एक वावटळ येऊन झाडांची वाळलेली पानं इतस्ततः भरकटत होती आणि रिपरिप सुरू होत होती.

 

बाईंच्या चेहेर्यावर मिश्किल भाव होते. गुरुजीही त्याच्याकडे निरखून बघत होते. बाई काहीतरी समारोपाचं बोलणार एवढ्यात त्यांना बारकूच्या देहबोलीतला फरक जाणवून त्या थबकल्या. बारकूच्या डोळ्यात चमक आली. हाताच्या पंजांमध्ये बळ आलं. फळीवर उजव्या हाताने आत्मविश्वासपूर्वक, जणू, एक  प्रहार करत बारकू उत्तरला, 

"पंचवार्षिक योजना.. हो नक्कीच! पंचवार्षिक योजनांमुळे भारताची प्रगति झाली." 

त्याला अचानक 'ते' आठवलं होतं, 'ते'. ते ताईच्या पुस्तकातलं शेवटचं पान! शेवटचा परिच्छेद म्हणाना. 'भारताच्या पंचवार्षिक योजना, १९५१ ते १९६६..' बारकूच्या उत्तराचा आवाका, संगणकापुरत्या संदर्भाला व्यापून उरणारा असला, तरीही 'देशाची प्रगति' या संदर्भाला तो आवाका यथायोग्य होता आणि भाऊच्या इयत्तेतल्या मुलाने हे उत्तर देणं अपेक्षित नव्हतच. 

"पंचवार्षिक योजनांमुळेच... नाही म्हणजे.. त्यामुळेच, त्यामुळेच प्रगति झाली." 

जास्त बोलावं की नाही या विचाराने तो थोडा गांगरला. कारण 'पंचवार्षिक योजना' या दोन शब्दांमध्येच त्याला असलेला वाचनाचा पाठिंबा संपला होता. दोघेही परीक्षक आता मरगळ झटकून ताठ बसले होते. बाई तर एकदम आशावादी वाटू लागल्या होत्या. 

"बोल की, बोल ना. त्या योजनांमुळे प्रगति कशी झाली ते सांगत होतास ना?" 

त्यांचा सकारात्मक प्रतिसाद जाणवून बारकूचा धीर चेपला. बारकूच्या अंगभूत चलाखीने त्याचा ताबा घेतला. 

"माझे बाबा सांगतात की जानेवारी ते मे दरम्यान ते माझ्या पुढच्या इयत्तेत काय काय घ्यावं लागणार त्याची यादी करतात आणि पैसे साठवतात. तरीही माझी एखादी सहल चुकतेच म्हणा. पण आपल्या सरकारने तर पुढे काय करायचं ते पाच वर्ष आधीच, १९५१ मधे ठरवलं आणि दर पाच वर्षांनी ते ठरवत राहिले, १९६६ पर्यन्त. त्यासाठी पैसेही बाजूला ठेवले त्यांनी. म्हणूनच आपल्या देशाची प्रगति झाली." 

१९५१ ते १९६६ असं वाचलेलं अस्सं बाहेर आलं!   

"अरे पण शाळेमध्ये संगणक तर अलीकडे आले ना, १९९० नंतर?" 

गुरुजींनी त्याला शब्दात पकडायचा यत्न केला. 

"सर, पण १९६६ मधेच सरकारला पंचवार्षिक योजनांचे फायदे कळाले होते त्यामुळे तशाच प्रकारच्या योजनेअंतर्गत संगणकावर खर्च झाला असणार." 

पुरेशा वाचनाअभावी बारकू जर-तर मध्ये शिरला असला तरी तर्कही बिनचूक होता आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढवलेल्या पंचवार्षिक निधीतूनच संगणकक्रांति साद घालत होती ही वस्तुस्थितीही तर्काला पूरक होती. त्यामुळे दोन्हीही परीक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गणिताच्या बाकावरुन वारंवार येणार्‍या टाळ्यांमद्धे इभूनाच्या बाकाकडून आलेल्या टाळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.


बारकूने खिडकीतून बाहेर बघितलं. आता रिपरिप संपून मळभही सरलं होतं आणि बाहेरचं प्रांगण लख्ख प्रकाशात निथळत होतं. बाई विचारत्या झाल्या, 

"ठीक आहे, आपण मान्य करू. पण तुझ्या गावातल्या घरापुढे पक्का रस्ता आहे का?" 

"नाही मॅडम. आता बांधणार आहेत" 

"मग, १९६६ मध्ये नियोजनाचं महत्व कळल्यामुळे भारताने ९०च्या दशकात संगणक आणले; पण रस्ते मात्र बांधले नाहीत, याबद्दल काय तर्क आहे तुझा?" 


बाईंनी हा जाता जाता टाकलेला गुगली होता, परीक्षेचा प्रश्न नव्हता. बाहेर बघणार्‍या बारकूची बुब्बुळं परत दवबिंदुसारखी टपोरी झाली. "रस्ता पक्का आता करणार आहेत म्हणजे सरकारने १९६६ मध्ये नाही तरी ८० च्या दशकात तरी रस्त्याचं नियोजन केलं असणारच मॅडम. पण दिल्लीहून पाठवलेले पैसे पोहोचले नसतील कदाचित..." 

बोलता बोलता आपल्याच विधानात काहीतरी पोकळी असल्याचं त्याला जाणवलं. 

"म्हणजे, आधी पैसे यायला उशीर झाला असेल. माझे बाबा ट्रेझरीमध्ये आहेत ना, त्यामुळे किती वेळ लागतो ते मला माहिती आहे... त्यानंतर कदाचित सामान रस्त्यात अडकून पडलं असेल. मालवाहू ट्रकची समस्या असेल.. आपलं हवामान बेभरवशी, कदाचित बरीच खडी वगैरे वादळात, पावसात वाहून गेली असेल..... मजूर लोकांना उन्हातान्हात काम करायला त्रास होत असेल.......... डांबर तयार करणारी यंत्र पुरेशी नसतील .... ...."


प्रसिद्ध वैज्ञानिक वसंत गोवारीकर यांच्या हातून पदक आणि प्रमाणपत्र स्वीकारेस्तोवर- सबुरीचा सल्ला, पुस्तकाचं एक पृष्ठ वाचलं तर त्या पृष्ठाने आपल्याला थेट राज्य गुणवत्ता यादीत आणून बसवलं अशी समजूत आणि पंचवार्षिक नियोजन घरासमोर रस्त्यावर का दिसत नाही हा प्रश्न, हे बारकूच्या मनात खोलवर रूजले होते!

 

बारकू आज काय करतोय याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण जर तो असेल तर कदाचित या मुलाखतीनंतरपासून त्याने भरपूर वाचन केलं असेल. कदाचित बारकू उच्चविद्याविभूषित असेल. कदाचित भारतीय प्रशासकीय सेवेत असेल. कदाचित बारकू आता नियोजन आणि अंमलबजावणी यातली दरी मिटवायचा प्रयत्न करत असेल..

शुक्रवार, ७ मे, २०२१

वंगणबेवडी बिस्किटं

झालं..... 

हळू हळू बाईंचं नवं घर  वास्तुशांतीसाठी माणसांनी नुसतं फुलून गेलं. प्रत्येक जण घराच्या निरनिराळ्या खुब्या पाहून बाईंचं कौतुक करत होता. कारण ह्यामागची कल्पकता बाईंचीच, यावर दुमत नव्हतं. 

कौतुक केलं म्हणजे चहा हवाच! चहा म्हंटला की बिस्किटं.. 


.. वास्तुशांत होती १९८४ च्या मे महिन्यात पहिल्या शनिवारी. 

घर खान्देशात तर नातेवाईक नाशिक, पुणे, मिरज, रत्नागिरी, बडोदा, कलकत्ता असे विखुरलेले. परराज्यातून येणार्‍या दोनही वन्सा अनेक वर्षांनी आणि इतक्या दुरून सहकुटुंब येणार म्हणून अम्मळ काही आठवडे मुक्कामच होता त्यांचा. इतरही पाव्हणे रावणे नाही म्हंटलं तरी ३-४ दिवस राहणारच, शिवाय गाववाले येणार पूजेच्या दिवशी. 

बाई तर नोकरीवाल्या! सकाळचा नाश्ता वगैरे त्या असाही कधी बनवत नसत. 

मग सरासरी १५-२० माणसांचा नाश्ता तो ही १-२ आठवडे हे तर अशक्य. शिवाय पुरुष माणसांना तलफ आली की चहा बनवायचा तो वेगळा. सगळ्या बाया मिळून २ वेळेचं जेवण आणि हव्या तेवढ्या वेळा चहा बनवतील. 

नाश्ता म्हणून मात्र बिस्किटं खायची ती ही तिन्ही त्रिकाळ हवी तेव्हा, असं ठरलं. 


मग काय 'स्वाद भरे शक्ति भरे' चे ५ मोठे पत्र्याचे डब्बे भरून बिस्किटं मागवली गेली, घाऊक खरेदी. हे मोठे चौकोनी डब्बे नंतर तांदूळ, धान्य आदिची बेगमी करायला उपयोगी पडणारच होते!


होता होता ३ डब्बे संपले. चौथ्या डब्याचं झाकण बाईंच्या धाकट्याने उघडलं आणि एक एक पुडा काढून दादाकडे देऊ लागला. 

"दादाs, हे बघ काय.." तो एकदम आश्चर्याने चित्कारला. 

"आताs काय,पुड्यांसारखा पुडा आहे. उगीचच त्याचा टाक-टुक आवाज करत बसू नको. काका, मामा सगळे खोळंबलेत. दे लवकर पुडे इकडे." म्हणत, कर्तव्यतत्पर दादा पुडे हिसकवायला आला तसं धाकट्याने शिताफीने हातातला पुडा तसाच आत सोडून त्याच्या खालच्या थरातला पुडा काढून दिला. देता देता त्याला हे कळलं की आधीच्या पुड्यात त्याला जी गम्मत लक्षात आली होती ती या पुड्यात नव्हती. हा सर्वसाधारण पुडा होता. मग तो दादाला खालच्याच थरातले पुडे देत राहिला. संध्याकाळी आई ऑफिसमधून येईपर्यन्त त्याने कोणालाही बिस्किटांच्या डब्ब्याकडे फिरकूही दिलं नाही. पाहुणेही, 

'कामसू आहे हो मुलगा' म्हणत राहिले. 

बाई आल्यावर मात्र धाकट्याचा हा विचित्र कामसूपणा त्यांच्या डोळ्यातून सुटला नाहीच. धाकट्यालाही जे हवय ते झालय हे कळलं होतं. 

"आई, आsई..."

तो दबक्या आवाजात आईचं लक्षं वेधून घेत होता. पण त्या तशा संध्याकाळच्या घाईच्या वेळात शेवटी त्याला २ धपाटे तेवढे मिळाले. 


संध्याकाळची जेवणं उरकल्यावर पाव्हण्यांचं बाहेरच्या दालनात साहित्य सम्मेलन भरलं होतं. मामा सांगत होता, 

"बघाs, याला म्हणतात काव्य.. काय दत्तोपंत! मुठ्ठी ऊसकी खाली हर बार नही होती, कोशिश करने वालो की....."  

".....कभी हार नही होती! मग काय तर... हरिवंशराय. बाप आहेत बाप" इति धाकट्या-थोरल्याचे बाप. 

वाह वाह, मजा आ गया, सगळेच म्हणू लागले. 


आता या कोणाचं लक्ष नाही बघून, हिरमुसलेल्या धाकट्याला परत खुलवण्यासाठी झोपायआधी आईने शेवटी सवड काढलीच. धाकट्याकडे मोहरा वळवला,

"काय, सोनुली काय सांगतेय केव्हाचं? सांगून टाक बरं एकदा.. आणि मग मात्र चल झोपायला, लग्गेच हं!." 

लगेच आधी कळी खुलली. 

"आईs, हे बघ नाs, कसे पुडे आहेत हे."

धाकट्याने एक पुडा काढून उभा धरला आणि वरुन बोटाने दाबला. पुड्याचं वेस्टन चक्क थोडं आत लपकलं. बाईंचीही जिज्ञासा जागी झाली. बाईंनी पुडे ट्यूबलाइटकडे धरून निरखले. पॅकबंद पुड्यात १ बिस्किट कमी होतं. असा पूर्ण १ थर म्हणजे ६ पुडे असेच होते. बाईंनी ते पुडे बाजूला काढून ठेवले. धाकट्याला अर्थातच या निरीक्षणाबद्दल शाब्बासकी मिळाली. दादावर कुरघोडीमुळे आनंद मावेना झाला. 


वास्तुशांत यथासांग झाली. सोहळा झाला, गप्पा, पत्त्यांचे डाव, बुद्धिबळचे पट, कॅरमचे बोर्ड सगळी धामधूम झाली. पाहुण्यांना स्टँड, स्टेशन पर्यन्त पोहोचावण्याच्या चकरा झाल्या. 'सासूबाई आणि मामंजिंसकट पुढच्या सुट्ट्यांमद्धे आता तुम्ही यायचं हं' अशी आमंत्रणं झाली.


मग बाईंना जरा उसंत मिळाली. त्यांनी ते पुडे बाहेरून तपासले. बाहेरून सगळं आलबेल होतं. त्यांनी एक पुडा काळजीपूर्वक उघडला. एक-एक तुकडा, एक एक बिस्किट धरून बाहेर काढलं. काही बिस्किटं आर्द्र होती, थोडी मिळमिळीत होती. नाकाशी धरल्यावर कसलासा वासही येत होता. सोहळा तर पार पडला होता. काही चांगले पुडे अजून शिल्लक होते. मग आता हे सहा पुडे फेकून द्यायचे का? काय फरक पडेल? 

पण आपल्या रक्त-घामाने कामावलेल्या दमड्यांच्या बदल्यात ही पाणी प्यायलेली, वास मारणारी बिस्किटं आपण गपचूप मान्य करायची? 

नाही. 

प्रयत्न करायला काय हरकत आहे?

झालं. दोन्ही मुलं पिशवीतून ६ पुडे घेऊन दुकानदाराकडे. 

"जाओ, भागो. उठके चले आते है. हमको बहुत काम है". 


संध्याकाळी कार्यालयातून येता येता बाई दुकानात हजर. 

"आप भी न भाभीजी, २०० मधल्या ६ पुड्यांमधून २०-२२ बिस्किटं गेली ना? मेहमान १ दिन जादा रुके समझो और भूल जाओ." 

बाईंनी बाजू मांडायचा प्रयत्न केला. तक्रारीची धमकी देऊन बघितली. पण दुकानदार निर्ढावलेला होता. 

"डब्बे तो पॅक थे. तो हमारी गलती कैसे. आपके बच्चेने पानी डाला रहेगा, याss पानी किसीसे गिरा रहेगा."

काही मार्ग दिसेना. आता खरोखर आपण हा पोरकटपणा करतोय असं आपल्याच मनाला पटवून हे सोडून द्यायची वेळ आली. कोणीही हेच केलं असतं. 


पुढे पडलेलं पाऊल मागे घेणं हे बाईंच्या स्वभावात नव्हतं. बाई पुडे न्याहाळत होत्या. त्यावर कंपनीच्या एका विभागाचा पत्ता होता. 

सोडता सोडता एक शेवटचा प्रयत्न. 

२ ओशट बिस्किटं आणि काही कोरडे तुकडे कचकड्यात बांधून टपाली पुडकं करून, बरोबर विस्ताराने पत्र लिहून, थेट पुडक्यांवरच्या विभागीय पत्त्यावर पाठवूनच त्यांनी श्वास घेतला. 

नेहेमीचा दुकानदार सुद्धा जिथे आपल्याला दमदाटी करतो तिथे अशा मोठ्ठ्या कंपनीकडून अपेक्षा नव्हतीच. उलट आपण वरुन आणिक पार्सलचा खर्च केला. तरीही २-३ आठवडे धुगधुगी होती. मग रोजच्या धबडग्यात हे कुठच्याकुठे निसटून गेलं.


२-३ महिन्यांनी नेहेमीप्रमाणे टपालवाला आला. आज चक्क टपाली धनादेश आला होता. टपाल अर्थातच दुपारी येतं आणि त्यावेळी बाई कार्यालयात. सासुबाईंनी धनादेशाची रक्कम स्वीकारली. 

संध्याकाळी बाईंना प्रश्न पडला, हा इतक्या तुटपुंज्या रकमेचा धनादेश कसला? यात तर एका वेळेसची चहा बिस्किटंही होणार नाहीत.. ३ दिवसांनी आलेल्या छापील आंतर्देशिय पत्राने याचा खुलासा केला. 

बिस्किट कंपनीच्या विभागीय विक्री व्यवस्थापकाने पत्र लिहिलं होतं. 

ग्राहक म्हणून झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी होतीच शिवाय अंतर्गत दफ्तरदिरंगाईमुळे पार्सल उशिरा लक्षात आल्याबद्दलही दिलगिरी होती. 

तो धनादेश बिस्किटांची भरपाई करायसाठी नव्हताच! तर बाईंना ते पार्सल पाठवायला लागलेलं शुल्क होतं ते. 

तथापि उत्पादन तिथि आणि संच क्रमांक म्हणजे बॅच नंबर अभावी कंपनीला यावर काही कृती करता येत नाही, तरी बाईंनी हा तपशील कळवावा असं सुचवलं होतं. ही कदाचित पळवाट होती का?.. 


पण बाईंचा आनंद गगनात मावेना झाला, २ कारणांनी. एकतर एव्हढी मोठी कंपनी एका ग्राहकासमोर झुकली होती. आणि दुसरं कारण तर, बाईंच्या छोट्या  छोट्या सवयींचा विजय दर्शवणारं होतं. 

आधीचं पार्सल पाठवल्यावर सगळा खराब माल अर्थातच फेकून दिलेला होता. पण ही सल कायम सलत रहावी यासाठी त्या पुडक्यांची वेस्टनं मात्र बाईंनी फेकली नव्हती. त्याच्या घड्या घालून घड्यांमद्धे रबरबॅंड अडकवून बाईंनी ती 'पाकसिद्धी' 'आहार हेच औषध' 'चिकित्सा प्रभाकर' अशा पुस्तकांमधे खुणेसाठी घालून ठेवली होती!


मग पटापट त्या घड्या उलगडून त्यातली बॅच नंबरची बाजू फाडून ती वेस्टनं एका लिफाफ्यात घालून कंपनीकडे पाठवण्यात आली. त्याचबरोबर या प्रकारणाची दखल घेतल्याबद्दल आभारही व्यक्त केलेले होते. 

आता काय घडतं याची उत्सुकता होतीच. 

आणखी २-३ रटाळ महिन्यांनी एका रविवारी एका घाऊक विक्रेत्याची वितरणवाहिनी म्हणजे van फाटकासमोर उभी राहिली. २ माणसं 'स्वाद भरे शक्ति भरे' लिहिलेला बिस्किटांचा डब्बा घेऊन आत आली. बाईंना काय होतय याचा अजून पत्ता नव्हता. 

"बाई डब्बा पॅकबंद आहे ना ते तपासून सांगा." 

बाईंनी सुचनेप्रमाणे केलं. मग बाईंसमोरच डब्बा उघडण्यात आला. 

आतला १-१ पुडा काढून त्याच्या मुसक्या आवळलेल्या असल्याचं, ते पुडे पूर्ण भरलेले, कोरडे असल्याचं बाईंना दाखवून मग सगळे पुडे परत डब्ब्यात रचण्यात आले आणि झाकण लावून मग कंपनीचा एक लिफाफा बाईंना देवून, डब्बा आणि लिफाफा मिळाल्याबद्दल बाईंची स्वाक्षरी घेऊन ते लोक निघून गेले. 

कंपनीने बाईंना बिस्किटांची आणि मनस्तापाची भरपाई म्हणून अख्खा डब्बा भरून बिस्किटं दिली होती! तसंच बाईंच्या दुकानदारलाही सक्त ताकीद दिलेली होती, त्याची प्रतही बाईंना दिलेली..


प्रकल्पामध्ये, भाजून कुरकुरीत झालेली बिस्किटं एका स्वयंचलित वाहकपट्टया conveyor वरुन एका वजनमापक तबकडी weighing disc वर जाऊन पुड्याच्या उघड्या वेष्टनावर पडत आणि पुडा बांधला जाई. 

बिस्किटांवर योग्य प्रक्रिया झाली असेल तर त्या ठरलेल्या वजनात बरोब्बर १२ बिस्किटं बसत. 

कंपनीत अंतर्गत चौकशी झाली होती. 

त्यात कळलं की बाईंना मिळालेली बिस्किटं उत्पादन प्रकल्पाच्या शड्मासिक देखभालीनंतरच्या लगेचच्या उत्पादन संचातली होती. 

त्यावेळेसारखी परिस्थिति निर्माण केल्यावर दिसलं की देखभालीनंतर वाहकपट्टा ज्यावरून फिरतो ती चरखि म्हणजे pulley सुरूवातीला नीट फिरत नसे. 

तिच्यातून नव्याने फवारलेल्या वंगण तेलाचे काही तुषार वाहकपट्ट्यावर उडत. ते, काही बिस्किटांना खालून लागत आणि मग वंगण पिऊन बिस्किटं फुगत. अर्थातच या लठ्ठपणामुळे या 'वंगणबेवड्या' बिस्किटांचं वजन वाढे आणि पुड्यात एखादं बिस्किट कमी घसरे! 

अगदि काही क्षणातच ते यंत्र योग्य तसं पळू लागलं की वंगण उडत नसे. अंतिम दर्जा तपासणीत बिस्किटांना खालून आलेला ओषटपणा थप्पिमद्धे सापडत नसे. 

या वंगणाचाच वास बाईंना आला, पण कसला ते कळलं नव्हतं!



आजच्या काळात आपण म्हणू की, कंपनीच्या बाजूने ही भरपाई योग्य आणि आवश्यक होती. पण त्या काळात एव्हढ्या मोठ्या कंपनीला संपर्क करायचा ही कल्पनासुद्धा लहान गावांमध्ये कोणी करत नसे. वंगण लागलेली बिस्किटं खाऊन कोणाला तब्येतीच्या तक्रारी येणं आणि ते बिस्किटांमुळे होतय हे कळणं दुरापास्त होतं. तसं झालं असतं तर मात्र कंपनीला केवढ्याला पडलं असतं, हो की नाही?  

 

बाईंनी डब्बा स्वीकारला. 

या स्वदेशी कंपनीबद्दल त्यांच्या मनात अपार आदर निर्माण झाला. 

पण ही भरपाई बाईंसाठी निश्चितच जास्त होती. 

बाईंच्या थोरल्या मुलाचा वर्गबंधु नन्नवरे चहा-बिस्किटांची टपरी चालवे. वडील बेवडे, आई घरकामं करणारी. त्याच्यावर पुरवठादार दुकानदाराची उसनवारी होती. 

बाईंनी त्या दुकानदाराला डब्बा देऊन परस्पर नन्नवरेची उधारी उतरवली. 


'हठ से....भरे स्वाद भरे शक्ति, बाईजी' असं या बाईंच्या चिकाटीचं वर्णन करता येईल, नाही का?    

रविवार, २५ एप्रिल, २०२१

फक्त तुमचंच दूध नासतंय

पिशवीतलं दूध लहान शहरांपर्यंत, गावांपर्यंत पोहोचलं होतं-नव्हतं तेव्हाची ही गोष्ट. काठोकाठ भरलेलं आणि तरीही न सांडणारं दूध म्हणजे जादूटोणा वाटायचा तेव्हा. 


अशाच एका छान छान उबदार शहरातल्या आदर्शनगर मध्ये एक छोटंसं घर होतं. पति-पत्नि दोघांनी सरकारी नोकरी करून पै पै साठवून, कर्ज काढून बांधलेलं. कर्ज असल्यानं कुठल्याही प्रकारे पैसा वाया गेला तर झळ बसायची. अगदी त्या गावातल्या उष्म्यासारखी, दाहक. त्यामुळे कुठलीही खरेदी करताना ती खरंच आवश्यक आहे का हे आधी ठरवून मगच केली जायची. तसंच दिलेल्या पैशाचं पूर्ण मोल मिळालं नाही असं लक्षात आलं तर पत्नि बाई विक्रेत्या'कडे' आणि त्याने नाही ऐकलं तर विक्रेत्या'ची' तक्रार करायच्या आणि फसवणुकीचे पैसे परत मिळवायच्या. त्यामुळे आदर्श नगरात सगळ्या घरांशी सलोख्याचे संबंध असूनही त्यांना तक्रारवाली बाई अशी उपाधि मिळाली होती. त्या बाईंदेखतही तसं म्हंटलं तरी त्या प्रसन्न हसत, त्यामुळे लोकांनी तसं म्हंटल्यामुळे द्वेष, आकस वगैरे निर्माण होत नसे.


आदर्श नगर त्या काळी गावाबाहेर गणलं जायचं. वस्ती तुरळक होती. गवळी, दूधवाले भय्ये सकाळी पाच साडेपाच पासून येत. तक्रारवाल्या बाईंनी हट्टाने मराठी गवळी लावला होता, तो खाडे फार करी. त्याच्याकडल्या दूधावर साय अगदि पातळ जमे. तो पाणी मिसळतो अशी शंका होती. पण नुसत्या शंकेमुळे दूधवाला बदलायचा, त्याच्या पोटावर पाय द्यायचा हे बाईंच्या मानी स्वभावात बसत नव्हतं. एकदा बाईंच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात त्या आणि त्यांची मैत्रीण पावडे यांच्यात या विषयावर चर्चा चालली होती. नेहेमीची बायकांची असते तशी. पण आज त्यांच्या साहेबांचा मूड काही ठीक नव्हता. 


"ओ बाई, हे ऑफिस आहे. तुमचं गोस्सिप बाहेर करा. काम किती पडलंय. मागच्या सोमवारच्या ३ मसुदयात सुधारणा सांगितल्या होत्या, त्या झाल्या असतील टाइप, तर द्या मला, सही करून सभापतींना पाठवून देतो." 


यावर दोन्ही बाया गप्प झाल्या. थोड्या वेळाने वातावरणाचा ताप उतरला असं वाटून वरिष्ठ लिपिक शेख म्हणाले, 

"साब, मॅडम काम बाकी रखती  क्या? सोमवारच्या दुरुस्त्या बाईंनी बुधवारीच केल्या आणि तुम्ही सही करून पाठवल्या पण.. सभापति साब को"    

"बर बर. तू महाबळ बाईंची कड नको घ्यायला. शुक्रवारी किती वेळ बाहेर जातोस त्यावर लक्ष आहे माझं. इकडे तिकडे जास्त नाक खुपसलं तर मेमो काढीन." सगळे गप्प झाले.

संध्याकाळी बाई जायला निघाल्या तशी साहेब थोडे ओशाळून म्हणाले, 

"बाई तुमचं काम अगदी चोख आहे. सकाळी सकाळी घरगुती विषय ऐकला आणि एकदम बोललो. मी मीटिंगला वगैरे गेलो की जमवत जा तुमचं गुर्हाळ." 

बाई दोन क्षण थांबून शेख आणि पावडे कडे बघत सूचक हसून दारापर्यन्त गेल्या. मागून साहेबांचा आवाज कानी आला, 

".. आणि एवढीच खात्री असेल पाणी मिसळल्याची तर बदलून टाका दूधवाला किंवा अन्न-औषध प्रशासन, वजन माप खात्याकडे तक्रार करा..."


'आता साहेबांना कोण समजावून सांगणार की परवानाधारक विक्रेत्याची तक्रार केली तर कार्यवाही होते. गवळ्याकडे का परवाना आहे? आणि विनापरवाना विक्रीसाठी अडकवून त्याला आयुष्यातून उठवायचा का?'


पण फक्त ११ वी शिकलेल्या बाई होत्या हुशार. त्यांनी साहेबांच्या बोलण्यातला धागा पकडून वजन-माप कार्यालयाला पत्र लिहिलंच. काय लिहिलं? तर दूधातली भेसळ कशी ओळखावी याचा तपशील मागवला. प्रत: ग्राहक पंचायत, असं लिहायलाही  बाई विसरल्या नाहीत. खात्याने तपशीलवार उत्तर पाठवलं. यात दुधाची तुलनात्मक घनता किंवा दाटपणा तपासण्यासाठी लॅक्टोमिटर आणि तो वापरायची पद्धतही होती. 

मिटरची ४० रुपये ही किम्मत बाईंना जड होती. पण प्रयोगशील स्वभावाच्या जिज्ञासू बाईंनी ती दिली. आठवड्यातून ४ वेळा तरी मिटर दुधात खोल बुडत असे. गवळ्याशी बोललं तर तो उर्मटपणे म्हणाला, "बाई तुम्हाला बाकी दूधवाले आहेत आणि मला बाकी गिर्हाईक."  ठरलं. गवळी काढून दूधवाला भैय्या लावला. गवळी म्हणजे ज्याच्या स्वतःच्या गाई असतात तो आणि दूधवाला म्हणजे जो अनेक गाय वाल्यांकडून दूध गोळा करून विकतो तो. 


हसमुख यादव. नावाप्रमाणे हसमुख. दूध बर्यापैकी दाट होतं. शिवाय त्याचा आदर्श नगर आणि आसपास बर्‍याच घरी रतीब होता. खाडे फारच कमी. गावी गेला की त्याचाच कोणीतरी नातलग का गाववाला बदली म्हणून येई.


७-८ महिने अगदि निःशंक गेले. एक दिवस दूध घेवून तापवतांना ते थडथडून 'लागल्या'वर बाईंनी दिनदर्शीकेची पानं उलटून पाहिली. हो, बाई प्रत्येक अतिरिक्त व्यय तारखेने नोंदवून ठेवत. दूध नासलं की उशिरा येणर्‍या अन्य दूधवाल्याकडून अतिरिक्त पैसे भरून दूध घ्यावं लागे आणि नोंद होई. बाईंना लक्षात आलं गेल्या दोन महिन्यांमधे ५-६ वेळेला दूध नासलं. दुसर्‍याच सकाळी हसमुखला पृच्छा झाली. "ताई, तुमच्या भांड्याला काहीतरी लागलं असेल. साबुन या और कुछ." यावर लगेच तावातावाने बाई काही बोलल्या नाहीत. त्या धिराच्या, धोरणी होत्या. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी हसमुखलाच रोज आधी पातेलं नजरेने, हाताने तपासून मग दूध ओतायला सांगितलं. तरी २ आठवड्यात परत एकदा दूध नासलंच. आता मात्र बाईंचा आवाज करारी होता. हसमुख उत्तरला. "ताई, सुभह सुभह इतना समझ मे नाही आया रहेगा. काही असल्याबगैर दूध लागेलच कसं ताई?" बाईंना काय बोलावं कळेना. हसमुख म्हणाला, "ये एरिया मे ४० घरांमध्ये माझा रतीब आहे. कोणाचीच तक्रार नाही." त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. 


स्वतःसाठी श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसलेल्या दिनचर्येत, मेंदूच्या एका कोपर्‍यात बाई दूध का नासतंय याचा विचार करत होत्याच. एक दिवस ऑफिससाठी बस थांब्यावर जात असतांना स्टेटबँक कॉलनी मधल्या पटेलबाई नेहेमीप्रमाणे रस्त्यातल्या सामायिक चौकात वाट पहात उभ्या नव्हत्या. २ मिनिट वाट पाहून तक्रारवाल्या बाई पुढे चालू लागल्या, नाहीतर बस चुकली असती. १००-१५० पावलं  पुढे गेल्या तोच पटेल बाई थोड्या पळतच मागून आल्या. मग झप-झप चालत दोघींनी बस पकडली. "आज सकाळी दूधच फाटलं. मग नवं दूध, नवर्‍याचा संताप.... सगळ्यात वेळ गेला. तुला वाट पहायला लागली आणि घालमेल झाली असेल उगाच"


नंतर एका दिवशी विषय निघल्यावर तक्रारवाल्या बाईंनी सहज म्हणून विचारलं, 

"कोणत्या दूधवाल्या कडून घेतेस दूध?" 

"लल्लन म्हणून आहे, बिहारी" 

हा तर हसमुखचा पुतण्या, कधी कधी बदली म्हणून दूध घालायला येणारा.. पटेल बाई पुढे म्हणाल्या, 

"भांड्याला राख रहाते, मग फाटतं दूध. सखू नीट घासत नाही ना.." 

"माफ कर, पण खरच का राखेने फाटतं दूध? तू स्वतः पाहिलीस का राख राहिलेली त्या भांड्याला?" 

"नाही.. नाही पण.. पण लल्लन म्हणाला म्हणजे असेलच तसं. तो म्हणाला फक्त तुमच्याकडलंच नासलं.."


तक्रारवाल्या बाईच्या डोक्यातून हे काही जाई ना. दोघे दूधवाले एकमेकांशी संबंधित, दोघांकडलं दूध नासतंय आणि दोघे सांगतात भांड्याला साबण किंवा राख राहिली असेल किंवा आदल्या दिवशीच्या विराजणाचं पातेलं असेल. खूप विचार करून बाई चमकल्या! 'फक्त तुमच्याकडलं नासलं!' हेच वाक्य महत्वाचं. यामुळे आपण भ्रमित होतोय का?


आता बाईंना स्वस्थ बसवेना. पुढे अगदी योजनाबद्धपणे रोज गोड गोड बोलून, 'आता कोणाकडे देणार दूध', 'आधी कोणाकडे दिलं' वगैरे रोज एखादा चौकशीपर प्रश्न विचारून बाईंनी हसमुखच्या आणि लल्लनच्या काही गिर्हाईकांची नावं काढून घेतली. नोंदी झाल्या. आसपासचेच लोक असल्याने आणि वस्ती तुरळक असल्याने तशी नावाने माहितीतलीच लोकं होती. शिवाय बाईच्या अंगणात होळीसाठी एक मैल असणार्‍या पार इच्छादेवी पर्यन्तचा अख्खा शेजार जमा होई त्यामुळे तुटपुंज्या का होई ना, ओळखी होत्या.


मग तो दिवस उगवला. लॅक्टोमिटरने आलेल्या दुधाची घनता खर्‍या दुधाची असावी त्यापेक्षा जास्त दाखवली आणि ते दूध नासलं. बाईंची खात्री झाली की भेसळ होती. योगायोगाने तो रविवार होता. बाईंच्या बागेत शेवग्याच्या झाडांना चांगल्या ८०- ९० शेंगा लोंबत होत्या. बाईंच्या मुलांना कामगिरी आली. मोठ्या झालेल्या शेंगा बांबुला लावलेल्या आकोड्याने पाडून त्याचे ५-७ शेंगांचे गठ्ठे करण्यात आले. हे आता शेजारी पाजारी भेट द्यायचे होते. त्या त्या घरच्या रहिवाश्याच्या नावाच्या चिठ्ठ्या गठ्ठा बांधलेल्या रबरबॅंड मधे सरकवलेल्या होत्या. त्यात काही तारांकित होत्या. त्या घरी शेंगा देतांना एक प्रश्न विचारायचा होता. 


या घरांमधे शेंगा देतांना विचारायचं होतं, "आईने विचारलंय, तुम्ही दूध कोणाकडून घेता?" अपेक्षित उत्तर आलं की विचारायचं, "आज दूध नासलं होतं का?" नंतर का विचारलं ते सांगायचं आणि तिथून सटकायचं. 

बाईंचा हा प्रयोग फारच यशस्वी झाला. हसमुखच्या ९ मधल्या ७ गिर्हाईकांकडलं दूध नासलं होतं. एका घरचे गावाहून उशिरा आले होते म्हणून दूध घेतलं नव्हतं. तर आणखी एका बाईने, 'तुम्हाला कशाला हव्या चांभार चौकशा' असा पवित्रा घेतला. म्हणजे जवळपास सगळ्यांकडलं दूध नासलं होतं!


आता रोज जाता येता एका दिवशी एक याप्रमाणे या सगळ्या शेजाऱ्यांना, दुधाबाबत काय होतंय आणि पुढे काय करायचं ते सांगितलं. सहकार्य कराल तर आपण ह्यातून एकत्र मार्ग काढू असं ठरलं. 


पुढच्या वेळी दूध नासलं तेव्हा योजना अमलात आली. ठरलेल्या क्रमाने तक्रारवाल्या बाईंच्या मुलाने वाणी काकूंकडे, त्यांच्या मुलाने भोरटक्के आजींकडे, त्यांनी वाढेंकडे, त्यांच्या मुलीने चौधरींकडे 'आज आमच्याकडे दूध नासलं' ही बातमी पोहोचवली. दुसर्या दिवशी प्रत्येक घरातून दूधवाल्याला विनामूल्य बदली दूध मागण्यात आलं. त्याने '५० मे सिर्फ आपका प्रॉब्लम है' असं सांगितल्यावर प्रत्येक घरातून त्याला इतर एका घरातही दूध नासल्याचं माहिती असल्याचं सांगण्यात आलं. 


दूधवाल्याने ओळखायचं ते ओळखलं. हे संघटन तक्रारवाल्या बाईच उभारू शकतात हे त्याने सहजच ओळखलं. मग त्याने, 

"अगले माह से और कोई दूधवाला देख लेना, मुझसे नही होगा. आपको दूध डालने से मेरा बहुत नुकसान हो रहा है." 

असा सूर काढला. बाई काही बोलल्या नाहीत. आता त्यांच्या 8-10 शेजारणी, बाई म्हणतील ते करायला तयार होत्या. हसमुखला पुढच्या आठवड्यात सगळ्यांकडून उलटी धमकी गेली, 

'आम्ही पुढच्या महिन्यापासून वेगळा रतीब लावणार आहे.' 

एवढं गिर्हाईक एकदम हातचं जाणं हसमुखला परवडणार नव्हतं. 

तो एका रविवारी दुपारी तक्रारवाल्या बाईंकडे आला. गयावया करू लागला. एका डेअरी कडून कधी कधी मोठी ठोक मागणी येते त्यामुळे याच्याकडलं दूध पुरत नाही. मग तो किरकोळ गिर्हाइकांच्या दुधात काहीतरी गोलमाल करत असे, हे त्याने मान्य केलं. कारणं सांगू लागला. गरिबी, मोठं कुटुंब, गावाकडे कर्ज, तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे. बाई तशा कनवाळू होत्या. दूधवाल्याचं नुकसान, बदला वगैरे हे आपलं उद्दिष्ट नाही हे त्यांना माहिती होतं. 


त्याच ८-१० घरांची मदत घेऊन बाईंनी हसमुखच्या मुलांची पुस्तकं आणि गणवेश याची सोय लावली. म्हणजे यांच्यातल्या 3 घरांमधली एक इयत्ता पुढे असलेली मुलं आदल्या इयत्तेची पुस्तकं आणि अंगाला न होणारे गणवेश हसमुखच्या मुलांना देणार होते. तसंच त्यांना शाळेला जायला बिनाभाडे तत्वावर आणि परतबोलीवर सायकलीही उपलब्ध करून देण्यात आल्या. हसमुखला बाईंचे आभार कसे मानावे ते कळेना.


पुढे बाईंना एखाद्या किराणावाल्याने किंवा अन्य दुकानदाराने, 'ताई, इतक्या गिर्हाईकांमधून तुमच्याच पोहयात  पोरकिडे निघाले' असं काही सांगितलं किंवा अगदि विद्युत मंडळानेही 'चुकीच्या मिटर रीडिंगची तक्रार फक्त तुमचीच आहे' असं काही सांगितलं की बाई ऐटीने म्हणत "ही मिल्कमन स्ट्रॅटेजी मला चांगलीच माहिती आहे. विचारू का इतर गिर्हाइकांना?" समोरच्या व्यक्तिने मान तुकवून, आणखी काही शहानिशा अथवा वाद न होता, फक्त या प्रश्नावरच, बाईंना अपेक्षित परिणाम घडल्याचेही प्रसंगही आले....


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

साहित्य परिचय- बोर्डरूम

 पुस्तक: बोर्डरूम, व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर     

लेखक: अच्युत गोडबोले, अतुल कहाते

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

मुद्रक: रोहन एंटरप्राईसेस

आवृत्त्या, पहिली: २००२, अकरावी: २०१०, अठरावी: २०१६ 


व्यवस्थापकीय तत्वांची सुरुवात या पुस्तकाय अभावितपणे होते ती पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत लेखकद्वयितले ज्येष्ठ लेखक स्वतः दुर्दम्य आशावाद बाळगून आहेत असं लिहितात, तिथूनच. तो कशाबद्दल आणि त्याची पृष्ठभूमी हा विषय वेगळा आणि त्याची मला पुरेशी कल्पनाही नसावी. तथापि,  बोर्डरूममध्ये आसनस्थ व्हायसाठी किंवा झाल्यावर व्यवस्थापकांकडे काय काय असावं लागतं, काय काय करावं लागतं, त्यांनी विचार कसे सर्वांगीण करावेत, उद्योग घड्याळाच्या काट्यावर सुरळीत चालायचा तर व्यवस्थापकाच्या वैयक्तिक दिवसाचा काटा कसा फिरतो, कार्यवाटप करतांना काय काळजी घ्यावी, कुठली नीती वापरावी हे सगळं आत्मसात करायसाठी या पुस्तकाचं प्रास्ताविक, (तेव्हाच्या-) उद्याचं आर्थिक जग आणि बेचैन करणारे प्रश्न ही प्रकरणं वाचावीत. माझ्या दृष्टीने नवख्या किंवा मध्यम पातळीवर असलेल्या व्यक्तिला हे प्रास्ताविक, प्रकरणं समजली तरी सर्वोच्च व्यवस्थापन कक्षापर्यन्तचा मार्ग समजेल आणि योग्य वेळी आठवत राहिली तर तो मार्ग सुकरही होईल. कारण हा माणूस नोकरशाहितून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारची म्हणजे 'मेरावाला टाइप' च्या माणसांची या पुस्तकात तुरळकच वर्णनं आहेत. व्यवस्थापनासंदर्भात असलेल्या पुस्तकातून वाचकाला जे अपेक्षित आहे ते प्रास्ताविकातून छानच मिळतंआणि लेखकांना जे द्यायचंय तो पुस्तकाचा मुख्य मसुदा आहे.

 

मी माझ्या आयुष्याची जवळजवळ निम्मी वर्षं अभियंता म्हणून कार्यरत आहे. व्यवस्थापन हा विषय जवळचा, अनुभवातला आहे. तरीही अच्युत गोडबोले आणि अतुल कहातें सारख्या दिग्गजांच्या पुस्तकावर मी या भूमिकेतून काही लिहावं एवढी माझी व्यावसायिक कुवत आणि आवाका नाही. त्यांनी या लिखाणातून जे संदेश पोहोचवले आहेत त्यांचं आकलन किंवा ग्रहण करून त्याप्रमाणे कार्यान्वय अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या पुस्तकातल्या काही नायकांनी यशस्वीपणे वपरलंय असं  एक व्यवस्थापकीय तत्व म्हणजे 'ग्राहक केंद्रस्थानी असतो'. लेखक-वाचक या नात्यात मी ग्राहक म्हणून केंद्रस्थानी येतो आणि त्या भूमिकेतून पुस्तकाबद्दल व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगतो.


खरं सांगायचं तर ह्या पुस्तकात व्यवस्थापकीय तत्व किंवा वैशिष्ट्य याची यादी, व्याख्या किंवा तत्सम खल केला असेल असं समजून मी हे समोर घेतलं. त्यानंतर श्रीगणेशा करण्याआधी किमान ५ दिवस असं काहीतरी बोजड वाचायसाठीच्या म्हणून मानसिक तयारीत गेले. पण हे पुस्तक त्या वहिवाटेने जात नाही. कोणाची अपेक्षा असं फास्टफूड या पुस्तकातून पुढ्यात येण्याची असेल तर तसं होणार नाही. अगदि रंजकपणे केलेलं विविध यशस्वी उद्योजकांचा उदय, झळाळी आणि काहींचा अस्त तसच मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेली व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कर्तुत्वाला इंधन ठरलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू याचं वर्णन या पुस्तकात आहे. 


गेली काही वर्षं रोजगार कमी होण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरतात. यात कोणता पक्ष- हे दुय्यम आहे, पक्षाची सरकारी का विरोधी ही भूमिका, तो पक्ष या मुद्द्याला कसं हाताळणार हे ठरवते. निरपेक्षपणे विचार केला तर लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण हे दोन्हीही तीव्रतेने वृद्धिंगत होताहेत. हयांचं प्रमाण खरं तर व्यस्त हवं. हे दोन्हीही वाढत असतील तेंव्हा व्यवसायाच्या संधि कमी झाल्या तरच गणित सुटेल. तसंच ते सुटतय. यात सरकारचा दोष सकृतदर्शनी नाही. कारण ते लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण यातली वाढ थोपवू शकत नाहीत. रोजगार म्हणजे केवळ नोकरी आणि मजुरी नाही तर व्यवसाय हा सुद्धा रोजगार आहे. व्यवसायाच्या संधि वाढवल्या तरी ते रोजगार मिळवून दिल्यासारखंच आहे. गेल्या ५-६ वर्षात सरकारने हे मान्य करून जनतेला पटवायचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी उद्युक्त करणार्‍या अनेक योजना, उपयुक्त ठरणार्‍या सोयी, सुविधा, सवलती याची अक्षरशः रास उभी केली आहे. हे पुस्तक सध्या कर्मचारी असलेल्या किंवा कर्मचारी होणं हेच ध्येय अशी कल्पना उरी बाळगलेल्या पण उद्योजक मालक होण्याची कुवत असलेल्यांना तो विचार करायला प्रेरित करतं.


ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की आपल्यासमोर शाश्वत उद्दीष्ट ठेवलं की उपजत स्वभावगुण त्या दिशेने प्रवण होतात. यामुळे उद्दीष्टसिद्धता तर होतेच पण ती होता होता या उपजत गुणांनाही पैलू पडतात आणि वृद्धी होत जाते. रॉबर्ट ओवेनचा अंतस्थ हेतु कामगारांची पिळवणूक थांबवणं हा होता. मग विक्री कसब, आत्मविश्वास, बेरकीपणा, नीतीमत्ता, विश्लेषणकौशल्य या गुणांनी त्या शिकाऊ कामगारात- आधी व्यवस्थपक, मग उद्योजक अशी स्थित्यंतरं घडवली. तो यशस्वी झाला. हेंरी फोर्डकडून स्वप्न बघणं आणि बघितली म्हणून ती साध्य होणं, अपार संपत्तीचा फक्त सहेतुक वापर, परिपूर्णता येईपर्यंत संयम बाळगणं, कामाचे तास कमी करून वेतनवृद्धी निर्णय (त्या काळी), यामुळे त्याने काय साध्य केलं ते आपण जाणतोच. 


IBM चा संस्थापक वॉटसन हा पूर्वी त्याच्या नियोक्त्यासाठी पैशाच्या व्यवहारांची देखभाल करे आणि त्यातूनच मग आक्रमक माहिती तंत्र वापरुन त्याने IBM ची आधारशीला ठेवली. विक्रेत्याला (salesman) महत्व, मूल्यांवर श्रद्धा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत आदरभावाचं इतरांनी केलेलं संगोपन यामुळे ही आधारशीला भक्कम ठरली. केवळ रणनीतीत फेरफार करून आधी आपटलेली तीच वस्तु त्याच माणसांकरवी लोकप्रिय करता येते हे 'ली आयकोका' ने दाखवलं. फोर्डने कर्मचारी हाताळण्यात केलेल्या चुका आणि त्यामुळे त्याला मोजावी लागलेली किंमत. लोकांच्या गुणांचं त्यांच्या देशबांधवांनाच (किंवा उद्योगाला) सोयर नसेल तर अन्य देश (स्पर्धक उद्योग) त्या लोकांचा वापर करून मूळच्या त्यांच्या देशावर मात होऊ शकते हे डेमिंग आणि ज्यूरनचं उदाहरण दाखवून देतं. उत्पादन मानक ठरवणं आणि कसोशीने पाळणं, सुटसुटीतपणा ही तत्व वापरुन मॅकदोनल्ड्सचं साम्राज्य उभं आहे. तसंच ग्राहकाला आवडणारी एखादी धंदेवाईक खुबी आपल्या उत्पादनात असेल तर ती गुपित म्हणून जतन केली की स्पर्धेत तग लागतो, ह्याचं मॅकदोनल्ड्स हे मासलेवाईक किंवा मसालेवाईक उदाहरण. याहीपुढे कोक, नाइके, फेडेक्स, इंटेल, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम, डाऊ, एस अँड पि, ओर्‍याकल, ई-बे, अमेझोन, पेपाल, नोकिया या सगळ्यांचं आणि आणखीही उद्योगांचं वर्णन या पुस्तकात आहे. ते बोजड नाही, रंजक आहे.


दोनशेच्या आसपास परदेश वार्‍या केलेल्या, काही उद्योगांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहिलेल्या वरिष्ठ लेखकाचं वाचन विस्तृत आहे हे संदर्भ यादी स्पष्ट करते. हजारो माणसं आणि हजारो कोटी रुपये हाताळणारा हा एक माणूस उरलेल्या वेळातही व्यवस्थापनाची किंवा त्या दृष्टिकोनातून एवढी पुस्तकं वाचतो. हा ध्यास शिकण्यासारखा आहे.


येन केन प्रकारेण पैसा मिळवायचा एवढंच उद्दिष्ट असलेले या पुस्तकातले २-३ महानयक सोडले तर इतर सर्व उद्योजकांचं आपल्या उत्पादनावर किंवा कर्मचार्‍यांवर किंवा समाजावर प्रेम होतं. ते भावनिक रित्या यातल्या कशाशी तरी तरी संलग्न होते. असा एक निष्कर्ष (ऑन ए lighter नोट) काढायलही वाव आहे की आताचं जे जीवघेण्या स्पर्धेचं स्वरूप आपण अनुभवतो तिथपर्यंत हे लोक आपल्याला कदाचित इतक्या लवकर घेऊन आले नसतेही. पण ... पण  ही विचारवंत, विश्लेषक, सल्लागार यांची जी त्रयस्थ जमात आहे ती या बेफामपणाला कारणीभूत आहे. कारण या तटस्थ भूमिकेतून त्यांनी उद्योगातल्या माणुसकीला, मूल्यांना तिलांजली दिली. वस्तुनिष्ठ, भांडवलवादी विचार आणि निश्कर्ष समोर आणले. भ्रमित होऊन कर्तुत्ववान उद्योजक आणि त्याचे व्यवस्थापक त्यामागे धावू लागले आणि ही मग शर्यत झाली. आजची परिस्थिति हे त्याचं फलित. 


नफेखोरीवर आधारलेल्या समाजाला व्यवस्थापनाची तत्व काय कामाची? शेवटी हे सगळं कशासाठी? हे प्रश्न आपल्याला पडावेत असं लेखकला वाटतं, यातून मला हे जाणवलं की व्यवस्थापन विश्वात संवेदनशील, संतुलित व्यक्तिमत्व हे मूळ तत्व असायला हवं. यात तडजोड नको. व्यक्ति, समाजघटक म्हणूनही हे प्रश्न पडायलाच हवेत.


समाजातलं एक उदाहरण देतो. कदाचित थोडं विषयांतर वाटेल. १९९० च्या आसपास एका वर्षी आमच्या गल्लीमध्ये बहुतेक घरांच्या पुढच्या अंगणात पावसाचं पाणी खूप तुंबलं. आदल्या वर्षीही थोडं पाणी आलं होतं पण फार साठलं नव्हतं. आदल्या वर्षाच्याआधी कधीही असं झालं नव्हतं. एका ओळखीच्या बांधकाम व्यवसायिकाने आईला सांगितलं की रस्त्याची पातळी चढी असल्याने आणि रस्त्याकडेने निचरा वाहिन्या बांधल्या नसल्याने अंगणात पानी साठतंय. पण या दोन्हीही गोष्टी तर कायम तशाच होत्या, मग आत्ताच तुंबई का? हा प्रश्न आईला नंतर पडला. काही महिन्यांनी रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळे रस्ता परत बांधायला घेतला होता. तेव्हा आईला लक्षात आलं की आता आहे त्या रस्त्यावर आणखी एक स्तर चढतोय. म्हणजे रस्त्याची ऊंची आणखी वाढणार, मग अंगणात आणखी पाणी साठणार की काय? आईने त्या व्यवसायिकाला बोलावून परिस्थिति दाखवली. त्याने, त्याचं नाव बाहेर कुठे न येऊ देण्याच्या अटीवर सांगितलं की, आईचा निश्कर्ष योग्य आहे. तसंच हे ही सांगितलं की रस्ता दुरुस्ति करतांना गरज असल्यास आधी तो खोदावा लागतो, त्याचे विविध स्तर अंथरून मग वरचा डांबराचा स्तर टाकायचा असतो. पण डांबरट कंत्राटदार खोदाई आणि खालच्या स्तरांचे पैसे खिशात टाकतात. तसंच रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूला उतार (आता मला कळलं की त्याला रोड कॅम्बर म्हणतात)  द्यायचा असतो, तो ही देत नाहीत. त्यामुळे दर वर्षी खड्डे पडून दर वर्षी कंत्राट मिळतं. हे ऐकून आईने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे, जिल्हा परिषद, नगरपालिकेत कामातल्या त्रुटींची तक्रार केली. नागरिकांनी काम थांबवावं अशी भूमिका घेतली. स्थानिक नगरसेवक भेटायला आला. मॅडम, रोड वगैरे सोयी करून मी 'मोहल्ल्या'ची प्रगति करतो तर तुम्ही त्यात खोडा घालता अशी अरेरावी करू लागला. त्यावर विषण्णपणे आई म्हणाली 'हो, प्रगति, पण खड्ड्यांच्या दिशेने...". लिखित स्वरुपात तिने दिलेली कारणं तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने आणि गल्लीतले लोक एकोप्याने या प्रसंगाला सामोरे गेल्याने आधी निचरा नलिका बांधून मग योग्य त्या प्रकारे रस्ता बांधला गेला. आणि हे सगळं कशासाठी? हा प्रश्न नागरिकांसाठी सुटला.

  

व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या किंवा ते क्षेत्र निवडायला बाशिंग बांधलेल्या अथवा त्याबद्दल जिज्ञासा असलेल्या वाचकाला हवंय ते या पुस्तकात आहे. त्याहीपुढे जाऊन, लिहीणार्‍याची मूल्यही घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं!

रविवार, २१ मार्च, २०२१

शंकर पाटील यांचं 'जुगलबंदी'


लघुकथा संग्रह: जुगलबंदी              

लेखक: शंकर पाटील 

(जीवनकाल १९२६ ते १९९४)

प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

प्रथम आवृत्ति: 

५ सप्टेंबर १९९८, सध्याचं  ८ वं  मुद्रण २०१४ 


मी वाचलेलं हे शंकर पाटील यांचं पहिलंच पुस्तक. मुखपृष्ठावरूनआणि नावावरून कथासंग्रहाबद्दल अंदाज बांधायएवढा तय्यार वाचक मी नाही. ते बरं आहे असं पुस्तक वाचून झाल्यावर वाटलं!

मेहता पब्लिशिंग नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपल्या लेखकाची छायाचित्रासकट ओळख करून देतात. आतली प्रत्येक लघुकथा या ओळखीला जागते. अस्सल गावराण सभोवताल आणि त्याचं तशाच भाषेत वर्णन. हातचं राखून असं काही नाही. मुद्दाम काही वाढवलय असंही नाही. व पु काळेंसारख्या लेखकांच्याकथांमध्ये येतात तशी खास दुहेरी उद्गारवाचकचिन्हांमध्ये लेखकाच्या नावे प्रसिद्धी पावतील अशी वाक्यही नाहीत. पण कथांमध्ये आशय आहे. 

बाज गावराण असला तरी प्रत्येक लघुकथेचा विषय वेगळा आहे, म्होरक्या वेगळा आहे. 


बापाचा मोठा लेक शहरात आजारी पडल्यावर त्याच्यासाठी पैसे जमवतांना त्या खेडूत म्हातार्‍याची होणारी वैचारिक घालमेल, त्याच्या तत्वांनी त्याच्यातल्या गरजूवर केलेली मात आणि त्यामुळे जवळ जवळ सुटलेली समस्याही कशी अधांतरी रहाते याचं वर्णन 'भावकी' कथेत येतं. 

'कणा' कथेत सहजीवनातल्या सकारात्मक वास्तवाचं दर्शन होतं. एक जण मोडला तर दुसरा जोम धरतो आणि दुसरा वाकला तर पहिला ताठ होतो. महाभारतात वगैरे जसे अधिरथी महारथी एकमेकांच्या प्राणाचं रक्षण करायला सरसावतात तसाच हा संसार-संग्राम आहे. तो निभावला की सहजीवन चालू रहातं. यात पैसाअडका, संपत्ति वगैरे तोंडी लावण्यापुरतंच असतं, एकमेकाला जगवण्याची जिद्द महत्वाची.

'खरं की खोटं' मधे एकाच कुटुंबातली प्रेम आणि विश्वास असलेली माणसं तेवढी एकमेकांना आपलीशी वाटतात आणि ती एकमेकांचं नक्की ऐकतात, हे आजोबा-नातवाच्या नात्यातून चितारलय. हे वर्णन मन हळवं करून जातं.

'एक मंगलकार्य', 'दरवेशी आणि अस्वलं' आणि 'खासदारांची जनसेवा' या कथांमधून समाजात अगदी सर्व स्तरात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी कर्मचार्‍यांचा नेते, अधिकारी यांच्या खाजगी कामासाठी वापर, तो नाही होऊ दिला तर होणारे परिणाम, परितोषिक वितरणात कशी वर्णी लागते, नेते मंडळींच्या कोट्यातून नोकरी मिळणं म्हणजे काय, इत्यादि अगदि लख्खपणे मांडलं आहे. या लिखाणाचं वैशिष्ठ्य हे की यात हे  फक्त थेट मांडलय, त्यावर काहीही त्रागा किंवा संताप व्यक्त केलेला नाही. तसाच तो वाचकाच्या मनातही निर्माण होत नाही. पण आहे हे योग्य नाही हे नक्की कळतं.

'मास्तर मास्तर तिरकामठा' आणि 'इथे कायदा झक मारतो' या कथांमध्ये गावाकडे एखाद्या आडदांड व्यक्तिला डिवचला की काय परिणाम होतात आणि यातून मग डिवचणारा कोणीही प्रतिष्ठित असेल जसं मास्तर, सरपंच, तलाठी अगदी जिल्हाधिकारी असला, तरी त्यालाही सुतासारखा सरळ आणण्याची पात्रता अशा आडदांडामध्ये असते. याचं वर्णन केलय.

'काखेत कळसा' मधे चारचाकी गाडीतून सम्मेलनाला परगावी निघालेले ४ वकील, खेडूतांच्या स्वभावाचे त्यांचे चर्वितचर्वण चाललेले अनुभव आणि तेव्हढ्यात २ खेडूतांनी त्यांची एकत्र असतांना केलेली छोटीशी दिशाभूल याचं रंगतदार वर्णन आहे.

'जुगलबंदी' कथा एक लंपट व्यक्तिमत्व रेखाटते. वाचक जर खेड्यात किंवा लहानश्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलेला असेल तर त्याला अशा व्यक्ति आणि कथा यांचं नाविन्य नक्कीच वाटणार नाही. तथापि अशा विविध अंगि, वेगवेगळे विषय, नाति, आशय, आवाका असणार्‍या या गावरान मेव्याचं बारसं आणि मुखपृष्ठ त्यातल्या एकमेव लंपट कथेवरून केलंय, हा वाचकसमाजाच्या आवडी-निवडीचा आरसा समजायचा का?

रविवार, ७ मार्च, २०२१

साहित्य परिचय: सोविएत रशियाची केजीबी

पुस्तक: सोव्हिएत रशियची केजीबी    

प्रथम आवृत्ति: २७ डिसेंबर २०१२

प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन्स

लेखक: पंकज कालुवाला


नव्वदच्या दशकातली रहस्यकथा वाचकांची पिढी म्हणजे फास्टर फेणे पासून ते बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक असा प्रवास. तिथून पुढे शेरलॉक होल्म्स. या रहस्यकथा वाचकांचा प्रतीनिधी असलेल्या माझं पुढे अनेक कारणांनी भरपूर असं वाचन झालं नाही. आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेने पुस्तकं घरात आणून ठेवल्यावर रहस्यकथा नाही तरी हेरगिरीवर बेतलेलं पंकज कालुवाला लिखित सोविएत रशियाची केजीबी हे पुस्तक हाती आलं. पंकज कालूवला यांनी विविध देशांच्या गुप्तहेर संघटनांवर ७-८ पुस्तकांमधून लिखाण केलं आहे, म्हणजे त्यांचा या विषयातला व्यासंग दांडगा आहे.

या पुस्तकाची सुरुवात 'ऐतिहासिक पार्श्वभूमी' या प्रकारणाने होते. लेखक, वाचक आणि पुस्तक म्हणून ही पार्श्वभूमी सुरुवातीच्या पृष्ठांमधे विशद करून वाचकाच्या मनाची केजीबी या मुख्य विषयासाठी मशागतच केली आहे. त्यामुळे एकंदर मजकुराबद्दलची अपेक्षा सर्वोच्च पातळीवर नेली जाते. पुढे प्रत्येक प्रकरणात हे पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवतं हे नक्की. 

केजीबीच्या स्थापनेच्या किमान सव्वा शतक आधीपासूनच्या रशियन गुप्तहेर खात्यांचा  मागोवा हे पुस्तक घेतं. झारशाही ते बोलशेव्हिक कम्यूनिस्ट राजसत्ता हा प्रवास हेरगिरीच्या अनुषंगाने मांडला गेला आहे. यात थेट उल्लेख केलेला नसला तरी हे स्पष्ट आहे की जसजशी सत्ता पालटली किंवा सत्ताप्रमुख बदलला तसतशी हेरखात्याची नावं बदलत गेली. मुळातच राजेशाही ते कम्यूनिस्ट असे हे एक वर्चस्ववादी ते पुढचा वर्चस्ववादी असे बदल असल्याने केवळ हेरसंस्थेच्या नावांनाच नाही तर आधीच्या हेरांच्या कळपाला पण मूठमाती मिळत गेली. यात काहीच नवल नाही. 

हेरगिरीच्या योजना कशा असतात, त्यात खरं, स्पष्ट असं काहीच नसतं आणि हेर या व्यक्तीच्या वैयक्तिक हुशारीवर, ती व्यक्ति आपल्या वरिष्ठांचा विश्वास कसा सांभाळते आणि स्वतः कोणावर विश्वास ठेवायचा हे किती अचूक ठरवते यावर एखाध्या राष्ट्राचंही भवितव्य ठरू शकत असतं. शिवाय याची योग्य ती पोचपावतीही मिळू शकत नाही, जिवंतपणी किंवा नंतरही. अगदि तुरळक लोकांना ही पोच मिळवण्याचं भाग्य साधतं. कारण त्यांना पोच मिळणं म्हणजेच त्यांचा पराक्रम जाहीर होणं आणि त्या पराक्रमाला त्यांच्या बोलवित्या धन्याने मान्यता देणं. हे पुस्तक अशा रशियन भाग्यवंतांवर बेतलेलं आहे. 

हा मथितार्थ निघतो हे, तसंच लेखकाचा अभ्यास ही या पुस्तकाची बलस्थानं आहेत. प्रत्येक नायकाचा पराक्रम व्यवस्थित ठसेल असा उलगडला आहे. त्या त्या नायकाची छायाचित्रंही आहेत. एवढंच नाही तर छायाचित्रांची संख्याही पराक्रमाच्या अनुपातात आहे. प्रकरण वाचतांना आधी आतली सगळी छायाचित्रं पाहून घेतली, मग प्रकरण वाचलं आणि परत छायाचित्रं पाहिली की त्या चेहेर्‍यांवर त्या प्रकरणात वर्णन केलेले त्यांचे कुटिलता, क्रौर्य, चातुर्य वगैरे गुण जाणवू लागतात. साकल्याने बघता पुस्तक गुंतवून ठेवतं आणि प्रभावही पाडतं.

असं असलं तरीही साधारण मध्याच्या नंतर मला कसलीतरी उणीव, पोकळी भासू लागली. मग काही बाबी ध्यानात आल्या. पुस्तक २०१२ साली लिहिलंय. वाचक वर्ग बव्हंशी लेनिनच्या हत्येनंतर, भारताच्या स्वातंत्र्‍यानंतर  जन्मलेला आहे. पुस्तकाच्या नावात केजीबी आहे. केजीबी नावाने ही संस्था १९५४ साली जन्माला आली. पुस्तकाच्या ८० व्या पानापर्यन्त म्हणजे शास्त्रिजींवरील प्रकरण सुरूहोईपर्यंत आपण वाचतो ते सगळं १९५४ च्या आधीचं आहे. त्यामुळे अर्ध्याच्यावर पुस्तक हे पूर्वेतीहासातच संपलेलं आहे. तसंच नावात सोविएत रशिया असल्याने १९९१ पर्यन्त, सोविएत यूनियनची शकलं होईपर्यंत येऊन हे लिखाण थांबतं. आज केजीबी अस्तित्वात नाही याची पुरेशी जाणीव या विषयांमधे अनभिज्ञ अशा वाचकाला तरी होत नाही. 

तसंच लेनिनचा इतक्यांदा उल्लेख आला पण केजीबी लेनिनच्या मृत्यूनंतर अस्तित्वात आली हा उल्लेख वाचकाला घटनांची सुसूत्रता कळायसाठी ठळकपणे होणं आवश्यक होतं. या बाबींमुळे काय वाचायला मिळणार या सुरुवातीपासूनच्या जिज्ञासेवर,आडाख्यांवर पाणी पडतं. सुरूवातीला मशागत झाल्यावर पीक निघालंच नाही किंवा फक्त जोडपिकं निघावी अशी अवस्था होते.

इतर सर्व प्रकरणांमध्ये अमुक असा जागतिक परिणाम तमुक एकट्या हेराच्या पराक्रमामुळे झाला असे खात्रीशीर निश्कर्ष काढले आहेत. भारताचा उल्लेख  ८० व्या पानानंतर ३ प्रकरणांमध्ये आहे. शास्त्रीजींच्या प्रकरणात लेखक काहीही खात्रीशीर निश्कर्ष काढत नाही आणि वाचकालाच प्रश्नात टाकून प्रकरण संपतं. त्यामुळे चांगलाच भ्रमनिरास होतो. केवळ यातला निश्कर्ष निघाला नाही म्हणून भ्रमनिरास होतो असे नाही तर यामुळे अन्य प्रकरणात केलेली छातीठोक विधानं, जोडलेले धागे किती खरे असावेतअशी शंका येते. मग हे पुस्तक सत्य आणि निर्भीड हेरकथा या पातळीवरून थोडं ढळतं.

हेरगिरीच्या पुढे जाऊन हेरखाती, राज्यकर्ते, देश, यांच्यातले संबंध, त्यांचे क्रियाकलाप याचा प्रकाशझोत वाचकाच्या विवेकबुद्धीवर पडतो. मग 'माझा नेता', 'माझा देश', 'देशाभिमान' हे सगळं कसं अगदी कचकड्यासारखं तकलादु आहे ते त्या झोतात दिसतं. अगदि राष्ट्राध्यक्ष, राजनेते, सैन्य, पोलिस, न्यायालयं, हेर ही सगळी नकली नावं असावीत; प्रत्यक्षात साम्यवाद,राजेशाही, डावे, उजवे अशी आवरणं घेऊन जागतिक संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळ्या, आणि त्यातली ही वेगवेगळी खाती, पदं आहेत तसंच त्यांनी देश या उदात्त संकल्पनेच्या आडोशातून जमिनीचे तुकडे वाटून घेतले आहेत इथपर्यंतही संशय येऊन जातो. 

तो संशयच असो!

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

निरोप सरत्या वर्षाचा

मूळ कविता                     Translation

मंगेश पाडगावकर            Purudatta Ratnakar


मी उद्या असणार नाही       I will not live tomorrow 

असेल कोणी दूसरे            next one will born in fact

मित्रहो सदैव राहो             you must leave sorrow

चेहरे तुमचे हासरे             keeping your smile intact


झाले असेल चांगले          something to light

किंवा काही वाईटही         something to fight

मी माझे काम केले           giving was my job

नेहमीच असतो राईट मी    always done right


माना अथवा नका मानु      Believe me or don't you

तुमची माझी नाळ आहे     we belong to each other

भले होओ , बुरे होओ        good and bad through

मी फक्त " काळ " आहे     I was Moment of matter


उपकारही नका मानु         Dont say thank you

आणि दोषही देऊ नका     don't feel sorry, mate

निरोप माझा घेताना         only say bye bye

गेट पर्यन्त ही येऊ नका    not even walk to gate


उगवत्याला " नमस्कार "   Salute to next Rise

हीच रीत येथली               must follow tradition

विसरु नका ' एक वर्ष '     memorable was our

साथ होती आपली           yearlong Association


धुंद असेल जग उद्या          Welcome new year

नव वर्षाच्या स्वागताला      tomorrow and late

तुम्ही मला खुशाल विसरा   forget me please

दोष माझा प्राक्तनाला        leave me with Fate


शिव्या ,शाप,लोभ,माया      Curse, Bless, Love, Hate

यातले नको काही              don't attach any string

मी माझे काम केले             no intention or interest

बाकी दूसरे काही नाही       did my job else nothing


निघताना " पुन्हा भेटु "       "See you again"

असे मी म्हणनार नाही        will be a false Lip

" वचन " हे कसे देऊ          that Promise

जे मी पाळणार नाही        which I can't keep


मी कोण ? सांगतो             Before revealing self

" शुभ आशीष " देऊ द्या     let all my blessings flow

" सरणारे वर्ष " मी             I am this passing year

आता मला जाउ द्या।         Now let me go, let me go !

मूळ कविता                     Translation

मंगेश पाडगावकर            Purudatta Ratnakar

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...