त्याने निर्णय अमलात आणला, मग घरी कळवलं.
घरून अपेक्षेप्रमाणे 'ठीक आहे. तू तुझं भलंबूरं समजण्याएवढा मोठा झाला आहेस असं दिसतं. चला, म्हणजे आमचं कर्तव्य संपलं; आता पुढची नोकरी लागली की मगच फोन कर. आमचे आशीर्वाद पाठीशी आहेतच' असं उत्तर आलं. कितीही अपेक्षित असलं तरी हे आईकडून वदवलं गेलं होतं आणि ती ही खर्या हताशेने, रागाने बोलली असं अभिजीतला वाटलं. आधीच्या नोकरीत, litkon biotech, परत जायचे दरवाजे त्याने नोकरी सोडतांना आपणहोऊनच बंद करून घेतले होते. HR ला सर्व teammates बद्दल काहीही न लपवता खरे अभिप्राय दिले होते आणि ते काय दिले हे परत त्यांना सांगातांनाही त्याने मागचा पुढचा विचार केला नव्हता. send-off देतांना ज्या assistant manager ने त्याची मुलाखत घेऊन नोकरी दिली होती तो म्हणाला,
"your style might suit well there in Europe, America. too direct and straight! इधर तो मुश्किल हो जायेगा भाई. कुछ समय मे इधर पुणे मे तो घुम न पायेगा तू.... हाहा हा!"
तो अभिजीतच्या सत्याच्या मागे कधीच उभा राहिला नाही त्यामुळे त्याचं काही ऐकायचंच नाही हे तर ठरलंच होतं. त्यांच्या बोलण्यात काही गर्भितार्थ आहे का असा काही विचार करायचा प्रश्न नव्हता.
काही दिवसांपूर्वी "तुला साधं excel copy-paste करता येत नाही आणि बाता मारतोय", हे अभिजीतला बॉसचे शब्द मनात खोलवर रुतले होते. दोन वर्षं त्याने तहान भूक विसरून या कंपनीसाठी हाडाची काडं केली होती. कंपनीत सर्वात आधी ६.४५ ला तोच हजर असायचा. तशीही त्याला लवकर उठायची सवय होतीच.
पण planning engineer उशिरा आला म्हणून काम अडून राहिलं ही तक्रार त्याच्या आधीच्या माणसाबद्दल असे. म्हणून २० वर्ष अनुभव असलेल्या माणसाला दूर करून त्या जागी या scholar trainee engineer ला भरती केला होता. हा आल्यावर पहिला फरक झाला तो हाच की ती तक्रार परत आली नाही. त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापन खुश असलं तरी कामगार वर्ग नाराज होता. एक-दीड वर्षं काम केल्यावर इतरांशी बोलून आणि अनुभवाने त्याला हे कळलं होतं की दिवसभराचं काम निस्तरता निस्तरता रात्रीचे ९ कधी वाजायचे ते समजायचंसुद्धा नाही आणि मग सुरक्षा रक्षक office room ला रात्रीचं टाळं घालायला आला की निघावंच लागे. ४५ वर्षांचा कुटुंबवत्सल माणूस यानंतर घरी जाणार. मग घरच्या जबाबदर्या. परत सकाळी उठून घरची कामं आटपून यायला त्याला उशीर व्हायचा. अभिजीतच्या मागे ना कुटुंबकबिला ना काही प्रकृतीचा त्रास. मित्रांच्या खोलीवर २४ तास आओ जाओ अपना घर, उलट तिथे दिवसा थांबलं तर करणार काय हा प्रश्न! त्यामुळे तो सहजपणे वाट्टेल तेवढ्या लवकर येऊ शकत असे. नाही म्हंटलं तरी एका बालबच्चे वाल्या माणसाचं दाणापाणी आपण घेऊन बसलो ही सल अभिजीतला होतीच. कामगार काट खाऊन होते. ते या इंजीनियरला थेट काही बोलत नसले तरी अन्य इंजीनियरशी त्यांच्या हितसंबंधांची गणितं ठरलेली होती. त्यांच्या माध्यमातून अभिजीतचं नियोजन फसेल असे कट नित्य नेमाने सफल होत असत. सरळ स्वभावाच्या अभिजीतला हे काही समजत नसे आणि तो बेमालुम फसे. आता त्याला या सगळ्याचा उबग येऊ लागला होता.
या क्षणी त्याच्या हातात government corporation for IT education ची जाहिरात होती. १०००० रुपयात C, C++, VB, JAVA शिकवून ते नामांकित कंपन्यांमधे नोकरीही लावून देणार होते. असे courses ५०००० पर्यन्तचे होती तिथे. निर्णय झाला. नोकरी सोडायची आणि हे १०००० वालं शिबीर करायचं. घरून काही समर्थन मिळणार नव्हतच. आतापर्यंत स्वतःच्या नोकरीत साठवलेले पैसे वापरायचे, शिबीर करायचं आणि तिथूनच चक्क सॉफ्टवेअर मध्ये नवीन नोकरी मिळवायची! शिबिराचे पैसे सोडून खोलीभाडं, गाडीचं तेलपणी, खानावळ, न्याहारी, इस्त्री आणि मित्रांबरोबर रहात असल्याने होणारे अवांतर खर्चही करावे लागणार होते. 3 महीने अतितटीने पुरतील एवढेच पैसे होते. पण अभिजीतला स्वतःच्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास होता. नोकरी मिळायची १ जरी संधि त्या training institute मधून मिळाली तरी तिच्यावर तोच अधिकार करेल ह्याची अभिजीतला खात्री होती.
batch च्या २-३ दिवस आधीपासून त्याने room mates व मित्रांकडून reference books मिळवून जुजबी तयारी सुरू केलेली. त्याच्याकडे संगणक नव्हता ही अडचण होती. आधी वाचन केल्यामुळे सुरूवातीचे १-२ दिवस त्याचा शिबिरात चांगलाच प्रभाव पडला. शिबीर रोज ३ तास होतं. आणि नोकरी सोडलेली असल्याने भरपूर वेळ होता. मग शिकवणी संपली की अभिजीत तिथेच सराव करत बसे. अगदी तासनतास! त्या कंत्राटी प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. सुदर्शन हे होते. त्यांचं सगळीकडे बारीक लक्ष असे. जिद्दीने सराव करायला संगणकांसमोर बसलेल्या ठराविक प्रशिक्षणार्थीन्ंना ते कायम 'good good' किंवा 'keep it up' म्हणत. अभिजीतचा सराव जोरात चालू होता. प्रशिक्षक लोकही तसे तरुणच होते. अभिजीतला थोडे सीनियर. ते केंद्राच्या पहिल्या मजल्यावर दुपारची न्याहारी करीत. कधीतरी अभिजीतलाही आमंत्रण असे. सुदर्शनजी कधी दौर्यावर किंवा सुट्टीवर असत तेंव्हा यांच्यातलाच कोणीतरी केंद्र सांभाळे. आणि त्या दिवशी lunch ला चांगलाच कल्ला असे. पहिल्या महिन्याच्या शेवटी शेवटी अभिजीतला अशी कुणकुण लागली की इथे नोकरीच्या फार काही संधी उपलब्ध नाहीत.
यादरम्यान त्याला institute जवळच्या bus stop वर litkon मधले एक कामगार शेख दिसले. त्यांना अभिजीतच्या सरळ स्वभावाचं कौतुक होतं. म्हणून अभिजीत ख्याली खुशाली विचारायला थांबला. ते म्हणाले की, त्याने किंवा अन्य कोणीही कंपनी सोडली याचं व्यवस्थापक किंवा संचालकांना कोणाला सुखदुःख नसतं. पण अभिजीतने मनुष्यबळ व्यवस्थापकाकडे, स्वतःच्या व्यवस्थापनावर दिलेल्या वाईट शेर्यांमुळे, आतले सगळे बिथरले आहेत. कंपनीचं पुण्यात सगळीकडे जाळं आहे. इथल्या बहुतांश कंपन्या, संस्थानबरोबर त्यांचे हितसंबंध आहेत. व्यवस्थापकांनी असा ग्रह करून ठेवला आहे की तू या हितसंबंधींच्या संपर्कात आलास तर त्यांच्याकडेही व्यवस्थापनाची नालस्ति करशील आणि त्यामुळे कंपनीला नुकसान होईल. बोलणं चालू असतांनाच bus आली आणि अभिजीतने पटकन आभार मानून घेतले.
आता निम्मा course संपला होता. अभिजीतचा आत्मविश्वास आसमान छू रहा था. तो आता अधिक अभ्यास करू लागला होता. इथून job मिळणं शक्य नव्हतं, आता आणखी एक आघात झाला. सुदर्शांजींनी सगळ्यांना १ तासापेक्षा जास्त बसायला बंदी केली. courses वाढले असल्यामुळे संगणक रिक्त ठेवता येत नाहीत असं कारण दिलं गेलं. अभिजीतला तर काहीही करून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तिथे बसायचंच होतं. सुदर्शनजी त्याला सारखं टोकू लागले. तसं त्याने त्यांना उलट दाखवून दिलं की त्यांच्या जाहिरातीमद्धे रात्री १० पर्यन्त मोफत सरावही देऊ केलेला होता. तेवढ्यापुरते सुदर्शनजी परतले. अभिजीतही हुशार होता. आपण सुदर्शनजींपुढे फार टिकणार नाही हे त्याला उमगलं होतं. शिवाय शिबिराचा उल्लेख करून स्वतः बाहेर नोकरी शोधायची असेल तर शिबीर संपेपर्यंत थांबणं आवश्यक होतं. त्यानंतर नोकरी मिळायला किमान महिना तरी लागेल असा अभिजीतचा अंदाज होता. पण तोपर्यंत पुरेल एवढी पुंजी त्याच्याकडे नव्हती. म्हणून त्याने ओळखीच्या एका समया बनवणार्याकडे lathe machine rough turning चं काम घेतलं. सकाळी ७ ते १० शिबीर झालं की दुपारी १२ पर्यन्त तिथेच सराव करायचा. मग दुपारची न्याहारी करून कामावर जायचं, संध्याकाळी ८ पर्यन्त. संध्याकाळचं जेवण तिथेच कामगारांबरोबर करून तो खोलीवर येई आणि मग झोप येईपर्यंत रूममेटच्या संगणकावर परत सराव. महिना ८०० रुपये फक्त, पण तेवढाच आधार आणि हाताला काम.
कधी एकदा course संपतो असं त्याला झालं होतं. संपायच्या १ आठवडा आधी आक्रीत घडलं. सुदर्शनजींनी त्याला १ तास वेळ देऊन भेटायला बोलावलं. तो काय करतो? कौटुंबिक पार्श्वभूमी काय? पुढे काय करायचा विचार आहे? वगैरे अनेक प्रश्न विचारले.
"young man I am pleased with your willpower, dedication and hard-work. join me in my journey as instructor in my franchise."
पाच हजार रुपये महिना, रोज ३ lectures घ्यायची. उरलेल्या वेळात प्रशिक्षणार्थींचं शंकानिरसन करायचं. एकंदर ८ तास तिथे थांबायचं. अभिजीतला आपल्या जिद्दीचा विजय झाल्याचा आनंद झाला.
"thank you sir"
"its ok. all the best".
हा दाक्षिणात्य म्हातारा एकदम विपरीत कसा वागेल? असंही त्याला क्षणभर वाटून गेलं.
सुदर्शनजींनी प्रशिक्षणार्थीपासून प्रशिक्षक या बदलसाठी अभिजितला १ आठवडा वेळ दिला होता. दरम्यानच्या काळात litkon biotech company तल्या कर्मचार्यांचा संप अशी बातमी अभिजीतच्या वाचनात आली. नवीन ERP implementation च्या विरोधात तो सांप होता आणि त्यांची मागणी मान्य केली तर कंपनीने ERP साठी जी लाखोची गुंतवणूक केली होती ती वाया जाणार होती. नवीन ERP module आलं तर त्या कंपनीच्या पुरवठादारांबरोबर मिलीभागत करून कंपनीचे कर्मचारी जी अफरातफर करत ती पूर्ण थांबणार होती. म्हणून हा संप आहे हे अभिजीतला लगेच उमगलं.
शिबीर संपून १ आठवडा खंड पाडून अभिजीत सुदर्शन सरांकडे रुजू झाला. आधीची सगळी शिबिरं संपून प्रशिक्षणार्थींचा पूर्ण नवा गट आता आला होता. अभिजीतला प्रशिक्षणार्थी म्हणून ओळखणारं आता तिथे अन्य कोणी नव्हतं. अभिजीत C basics and algorithm प्रशिक्षक. इथे येणारे बहुतेक तरुण हे पदवी संपत आलेले किंवा संपवून नोकरी शोधत असलेले, संगणक सोडून अन्य अभियांत्रिकी शाखांचे असत. अभिजीतपेक्षा ३-४ वर्षं लहान. दीड महिना भुरर्कन उडून गेला. आता अभिजीतला आणखी काही गोष्टी कळाल्या होत्या. तिथले अन्य शिक्षक त्याच्यापेक्षा २-३ वर्षं मोठे होते. त्यातल्या बहुतेकांनी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची खात्री दिली म्हणून इथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिबीर केलं. मग नोकरी संदर्भात ९०% जणांचा भ्रमनिरास झाल्यावर सुदर्शांजींच्या खणपटीला बसून त्यंच्याकडूनच अर्थार्जन सुरू केलं. सगळे जण बाहेर नोकरी बघत होते; इथलेच संगणक, कागद, छपाई, इंटरनेट वापरुन. ३ तास प्रशिक्षण दिलं की प्रशिक्षणार्थींच्या शंका निरसनाला वगैरे कोणी थांबत नसे. वेगळ्या विभागात बसून नोकरी शोधायचेच उद्योग चालत. शिवाय सुदर्शांजींची आर्थिक स्थिति चांगली नव्हती म्हणे. हे कंत्राटी केंद्र त्यांनी कर्ज काढून सुरू केलं होतं आणि गेले २-३ महीने हप्ते थकले होते. एका कंपनीशी प्रशिक्षणाचाचा करार झाला तर ती कंपनी सुदर्शनजींबरोबर प्रशिक्षण करार करून त्यांना पूर्ण setup उभारून देणार होती आणि गुंतवणूक करणार होती. त्यातून त्यांचं कर्जही फेडलं जाणार होतं. अभिजीतला पगार मात्र आत्तासुद्धा महिन्याच्या महिन्याला मिळत असल्याने तो या माहितीबद्दल साशंक होता.
इतरांसारखं भांडण न करता अभिजीतला सुदर्शनजींनी प्रशिक्षक म्हणून नेमलाच कसा याचं इतर प्रशिक्षकांना आणि त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटत होतं. अभिजीत इमाने इतबारे ८ तास पूर्ण दक्ष राहून काम करू लागला. त्यामुळे त्याचं इतरांशी जुळत नव्हतं. अलीकडे सुदर्शनजीही फार काळ केंद्रात नसत. केंद्र उघडून सकाळी सर्वात लवकर येणार्या अभिच्या हवाली करून ते निघून जात ते क्वचित २-३ दा चक्कर टाकून जात. मग प्रशिक्षणार्थींच्या सर्व प्रश्नांचा सामना अभिजीतला करावा लागे. नोकरीसंबंधी प्रश्न आले की अभिजीत सरळ कानावर हात ठेवी आणि सुदर्शजींना संपर्क करायला सांगी. यामुळे आता डबघाईला आलेल्या काही तरूणांकडून त्याला नाही नाही ते ऐकावेही लागे. पण तो खमकेपणाने ठाकत होता. एकदा मात्र एका मुलाने त्याच्यावर हात उचलला. अन्य मुलांनी त्याला आडकाठी केली म्हणून तो प्रसंग निभावला. पण आता सुदर्शनजींशी बोलणं आवश्यक होतं. त्यांना मसलतीला बिलकूल वेळ होत नव्हता. अभिजीतने त्यांना १ आठवडा सुट्टी घेत असल्याचं कळवलं आणि अपेक्षेप्रमाणे सुदर्शनजींनी भेटीची वेळ दिली.
"young man! very good job. you are wondering where i go all these days. its rather a good news for you. I am starting a new center at shivaji nagar. and you know what? I want to shift you there." अभिजीत जरा चक्रावला.
"don't worry. I know its bit away for you. i will give you special allowance. you will be coordinator of that location. Come with me."
सुदर्शनजी त्यांच्या अलिशान ऑडी मधून अभिजीतला नव्या केंद्राकडे घेऊन गेले. ६० संगणकांनी सुसज्ज केंद्र त्या इमारतीच्या पहिल्यामजल्यावर होतं. सुदर्शनजींनी चक्क किल्ल्यांचा जुडगा अभिजीतच्या हाती ठेवला. त्यानेच ते केंद्र सकाळी उघडायचं आणि रात्री शेवटी बंद करायचं होतं. तिथे गल्ला नसणार होता. कारण नवीन प्रशिक्षणार्थिंची नोंदणी कर्वे रोडच्या मुख्य केंद्रातच होणार होती. अभिजीत जाम खुश होता. तो आता प्रशिक्षण समन्वयक होता.
तिसर्याच दिवसापासूनच प्रशिक्षणार्थींची नवी फळी नव्या केंद्रात आली. पहिला तास अभिजीतचा असे. पुढच्या तासांसाठी ते ते प्रशिक्षक येत व परत लगेच मुख्य केंद्रात परत जात. इथले शिबीर पूर्ण ८ तासांचे होते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी तिथेच थांबत. मग त्यातले काही संचालकांसमोर येऊन गप्पा मारत. अभिजीतच्या पृष्ठभूमीबद्दल विचारात. गाव, शिक्षण, नातेवाईक, मित्रं, आवडी वगैरे. खालती टपरीवर सिगरेट, चहा प्यायसाठी आमंत्रणही मिळे. पण अभिजीत कटाक्षाने केंद्रातच थांबे, अगदी चहा प्यायलाही जात नसे. तो सिगरेट तर ओढतच नसे. तरीही सुहास, सारंग, प्रसाद, संतोष, सुजीत,विनायक, मीनाक्षी, रमणी वगैरे एक कंपू त्याच्या आजूबाजूला असत. ही तशी वेगवेगळ्या शहरातून आलेली आणि आत्ताच ओळख होऊन जवळ आलेली पोरं होती. म्हणावी तर उनाड, म्हणावी तर हुन्नरी. तिथला lectures चा सोडून सगळा वेळ ते टिवल्याबावल्या करत पण रात्री आपआपल्या खोल्यांमधे जाऊन सराव करत असावेत. बहुतांश जण प्रज्ञावान होते. काही जण बोलाय वागायला रांगडेही होते. अभिजितसमोर त्याचीच टिंगल करायचे. अभिजीतचा सुदर्शांजिंबद्दलचा आदर समजून मुद्दाम त्यांचीही टिंगल चाले. यात सुहास हे एक खास व्यक्तिमत्व होतं. अभिजीतला त्याच्याच शब्दात अडकवून त्याला चहाला न्यायची युक्ति त्याला समजली होती. सुहास सुजीतला केंद्र सांभाळायला सांगून अभिजीतला चहाला नेत असे. अभिजितलाही त्याचं आकर्षण वाटू लागलं होतं पण तो आपल्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर येत नसे. तसं पूर्वायुष्यावरही तो फार बोलत नसे. त्याला बर्याच गोष्टी विसरायच्याच होत्या. एक दिवस सुहासने त्याला एक गुगली टाकली, "पानसरे नावाचा तुझ्या आधीच्या कंपनीत IT system manager होता ना?"
"हो. असावेत, मग. इथे त्यांचा काही संबंध नाही."
आधीची कंपनी ही सर्वात नकोशी आठवण अभिजीतने लगेच दूर ढकलली. २ दिवसांनी सुहास म्हणाला,
"मास्तर, हे नवं केंद्र सोडून लवकरात लवकर मुख्य केंद्रात परत जाल तर बरं.... जर बाहेर दुसरीकडे कोण विचारात नसेल तर"
"हो का, बरं. सुहास, मला एक सांग, तू काल परवा करून आणायला सांगितलेले सगळे प्रोग्रॅम करून आणलेस पण १० तारखेला दिलेला अजून नाही दाखवलास...."
"मास्तर, सध्या मी सांगतोय त्या प्रोग्रामकडे लक्ष द्या. १० तारखेला कदाचित मी पानसरेंच्या मागावर असेन म्हणून जमलं नसेल मला."
कसली तरी चाहूल दिल्यासारखा सुहास म्हणाला. त्या गर्भित भावाकडे दुर्लक्ष करून अभिजीत म्हणाला,
"हे बघ तू या अवांतर गोष्टीतून लक्ष काढून programming वर केन्द्रित कर बरं. परवा काय म्हणे तर पानसरे सुदर्शनजींना भेटले. आता काय तर म्हणे तर नवं केंद्र सुरक्षित नाही, परत जा. कशाला हवेत तुला ते विषय? ....एकतर तुला माझा स्वभाव तुला माहिती आहे..."
"पेपर मधे बातम्या येताहेत. तुमच्या भवितव्याचा विचार करतोय." सुहासचं बोलणं परत गर्भित आणि सहेतुक होतं. त्याचे डोळे तांबड्या पांढर्या रश्शाने भरल्यासारखे दिसत.
"हे बघ तुझ्या programming मधे असलेल्या शंकांचं मी नक्की निरसन करेन. तू माझ्या नोकरीची चिंता करू नको, पटलं नाही तर लाथ मारतो मी."
"मास्तर, वय काय तुझं? २ वर्षांचं अंतर आहे फक्त आपल्यात. जरा डोळे उघड. ५००० रुपयांवर किती दिवस जगणार तू? आणि तेही मिळायचे नाहीत यापुढे. हे सगळे वेगवेगळे विषय नाहीत, एकच आहे. तुला चिंता नाही हे कळलं म्हणूनच ती आम्ही करतो...." ही त्याची खास कोल्हापुरी स्टाइल. चेहेर्यावर निर्विकार पण शब्द जाळ. दोघेही परतले. या प्रसंगामुळे त्यांच्यातली कटुता वाढली वगैरे नव्हती. ते चहा प्यायला जातच. चकमकीही झडत. उलट आणखी भावनिक जवळीक झाली असावी.
असाच आठवडा-दहा दिवस गेले असतील. तो सोमवार होता. गाडी लावून, खिशातल्या केंद्राच्या किल्ल्या हातात घेऊन नेहेमीच्या लयीत जिना चढून केंद्राच्या दाराशी येतो तर काय.... १ दार तुटलेलं दुसरंही सताड उघडं. त्या काळी स्मार्ट फोन नव्हते. त्यामुळे छायाचित्रं काढायचा प्रश्न नव्हता. नीट निरिक्षण करून अभिजीतने आधी सुदर्शांजींना त्याच्या मोबाइलवरुन संपर्क केला. त्यांनी त्याला आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे ७ च्या आत ते फोन उचलणार नव्हते. पण संपर्काचा प्रयत्न केला याची नोंद आता झाली होती. मग त्याने एसएमएसही पाठवून ठेवला आणि आत पाय टाकला. आतला देखावा आणखी भकास होता. आत एकही संगणक शिल्लक नव्हता सगळी टेबल्स रिकामी होती. काही तर टेबल्सही गायब होती.
सगळं दृश्य मनात साठवून उजळणी करून तो आपल्या जागेवर आला. आता तो वहीत टिपून घेत सुदर्शनजींच्या return callची वाट पाहू लागला. नेहेमीप्रमाणे विनायक हा प्रशिक्षणार्थी ७ ला ५ मिनिटं असतांना आला. त्याने सगळं पाहिलं, अभिजितकडे पाहिलं आणि लगेच सुहासला फोन लावला. तसे सगळेच साडेसातपर्यंत येत, पण हे ऐकून सुहास लगेच निघाला. विनायककरवी ही बातमी प्रसाद, तृप्ति, सुजीत, नमिता, सारंग वगैरे सर्वांपर्यंत क्षणार्धात पसरली. सगळेजण येण्याआत हे सुदर्शांजींना कळणं गरजेचं आहे कारण सुट्टी द्यायचा किंवा मुख्य शाखेत बदली जागी प्रशिक्षण वर्ग घ्यायचा निर्णय तेच घेऊ शकणार होते. असा विचार करून आणखी वाट नं पहाता अभिजीतनेच परत आपणच कॉल लावला. सुदर्शांजींनी सगळं ऐकून घेतलं. त्यांच्या बोलण्याची लय शांत होती पण प्रचंड शॉक बसल्याचं ते म्हणाले.
"which police station have you contacted?"
"No Sir, i thought that its important that you know it first. Then you could decide appropriately."
"very good. very good. I will call you again. wait for my next instruction".
"Ok Sir. Sir, some students have come here, shall i send them to main center?"
"Yes, yes. ask them to start immediately. Display a board outside."
"Yes sir. Thank you sir."
हे बोलणं होईपर्यंत 3-४ टाळकी जमली होती. अभिजीतने सुदर्शांजींचा निर्णय सांगितला तशी सगळे जण गडबडीने मुख्य शाखेकडे जायला निघाले.
"सुहास येतोय म्हणालाय ना? मग आपण थांबूय का त्याच्यासाठी?" नमिताने प्रस्ताव ठेवला.
तसं प्रत्येकाच्या मनात इथून तातडीने सुटका करून घ्यायचा बेत होता पण सुहास त्यांचा म्होरक्या होता. ते द्विधा असतांनाच सुहास हेलमेट सावरत आला. सगळ्यांनी त्याच्याभोवती कोंडाळं केलं. त्याने प्रत्येकाचा सल्ला विचारला. त्यातला एकजण नेहेमी वेगळ्याप्रकारे विचार करी. त्याचं म्हणणं पडलं की, आपण आत्ता जर इथून निघून गेलो तर तिकडे main center मध्ये आपल्याला लगेच class मध्ये कोंबतील आणि मग आपल्या इथल्या सोयी सुविधांबद्दलच्या तक्रारी, त्याबद्दल काय झालं वगैरे काही कळणार नाही. तसच या प्रकरणाचं काय झालं ते ही समजणार नाही. सुहासला हे पटल्यासारखा दिसलं. सगळ्यांनी तिथेच थांबून सुदर्शनसरांवर दबाव टाकायचं ठरवलं. सरांचा प्रतीनिधी म्हणून अभिजीत तोफेच्या तोंडी होताच. अभिजीतभोवतीच्या सगळ्या खुर्च्या प्रशिक्षणार्ठींनी व्यापून टाकल्या. जे बसले नाहीत ते त्याचभोवती घिरट्या घालू लागले. एवढ्यात अभिजीतला call आला. प्रसादने खूण करून फोन loud वर टाकायला लावला. दोन्हीही बाजूंनी अभिजीतची कोंडी केली जात होती. पण आपण काही गुन्हा केलेला नाही हे मनाशी घोकत अभिजीत या सगळ्या घटना स्मरणात ठेवत होता. तिकडून सुदर्शनजी बोलते झाले,
"abhijt i have informed police. let them investigate without hinderance. you come here immediately." अभिजीतही लगेच jerkin चढवू लागला.
"मास्तर, कुठे चालला? हललात तर याद राखा!." सुहास.
" बरं. ठीक आहे. संस्थेचा प्रतीनिधी म्हणून इथे कोणीतरी हवच नाहीतरी. सरांना कळवतो तसं."
"ए जय, मास्तरचा मोबाइल ताब्यात घे रे. ......अरे ताब्यात घे, खिशात नाही. तिथेच ठेव टेबलवर." सुहास म्हणाला. अभिजीतसमोर जयच्या शेजारी बसलेल्या जाईने अभिजितचा मोबाइल जय कडून घेऊन तिच्या स्वतःच्या पुढ्यात ठेवला. हे छोटे छोटे डाव थंड डोक्याच्या अभिजीतला समजत होते. सध्या तो कोणालाही विरोध करणार नव्हता. मग जय, जाई आणि धिप्पाड सुजीतला अभिजीत वर लक्ष ठेवायला सांगून सुहास, प्रसाद, सारंग, विनायक, रमणी, मीनाक्षी हा त्याचा नेहेमीचा कंपू घेऊन विरुद्ध म्हणजे अग्नेय कोपर्यात गेला व काहीतरी गुप्त खलबतं झाली.अगदि थोड्या वेळात पण बरेच कृतीशील निर्णय घेतले असावेत. सगळेजण निघून प्रवेशद्वाराजवळ अभिजीतच्या टेबलासमोर आले. विनायक आणि रमणी बॅग आणि हेलमेट घेऊन मेन ब्रांचकडे तडक निघाले. ते तिथे काय चाललंय त्यावर लक्ष ठेवणार होते, तसंच त्यांच्या शिबिराच्या होणार्या हेळसांडीबद्दल सुदर्शांजींना भंडावून सोडायचंही त्यांनी ठरवलं होतं. मूळ उद्देश हा होता की ते तिथे असतील तर त्यांना तिथेच डांबून ठेवायचं. सारंग कोणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होता.
"सुहास, अण्णासाहेब फोन उचलत नाहीत, मी प्रत्यक्ष जाऊन येतो बंगल्यावर. जवळच आहे." सारंग म्हणाला.
"रंग्या, फोन लागला नाही, प्रत्यक्ष भेट तरी मिळणार आहे का नक्की? नाहीतर backup तयार करावा लागेल मला." सुहास.
"बस क्या भिडू, इतनाही पेहेचाना मेरे को? काम चोख करून येईन. या शनिवारी बसू रात्री सगळे अण्णासाहेबाच्या farm house वर!"
हे सगळे गेल्यावरही सुहासच्या सल्ला मसलती चालूच होत्या.
एव्हड्यात दोन कॉंस्टेबल आले. त्यांनी सगळी पहाणी केली. बरोबरच्या फोटोग्राफरने सगळीकडे फ्लॅश मारले. पोलिसांनी तरुणांच्या कंपुला काही प्रश्न विचारले. आपसात काही चर्चा केली. आणि मोर्चा थेट अभिजीतकडे वळवला. चला उठा सर. सर ना तुम्ही. नाश्ता केला असेल तर बरं, नाहीतर आता खाणं कधी आणि कसं मिळेल ते काही सांगता येत नाही."
"ते जे काय माझ्या नशिबात असेल ते होईल. तुम्हाला विडी-काडी करायची असेल तर खालून करून या. माझ्या संस्थेचा मी इथे एकटाच प्रतीनिधी आहे. दुसरं कोणी आल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आणि वारंट दाखवा"
याचे हात वरपर्यंत पोहोचले आहेत की काय अशी एक शंका कॉंस्टेबलच्या मनालाही शिवून गेली असावी. पण तो ही बारा गावचं पाणी पिऊन निब्बर होता,
"ए चल गुमान. अटक करत नाहीये. चौकशीला घेऊन जातोय."
"चौकशी? करा इथेच. विचाराल ते सांगतो."
"आधीची नोकरी भांडण करून सोडून आला. आता १५-२० लाखांचा माल चोरतो आणि वर मला अक्कल शिकवतो होय रे.. "
"सुजीत, सुहास अरे फोटोग्राफरकडून आपल्यासाठी या साहेबांचा फोटो काढून घ्या. बघा ना, यांनी अशीही माणसं पहिली आहेत जी १५-२० लाखांचा दरोडा टाकतात आणि मग पोलिसांकडून पकडून घ्यायला तिथेच ठिय्या देतात." जाई म्हणाली. यावर सगळे प्रशिक्षणार्थी हसले. "होय हो मास्तर, किल्ल्या असतांना दरवाजा तोडायचे कष्ट का घेतले हो तुम्ही?" सुजीत म्हणाला. परत सगळे हसले. अरे बापरे, हा एकटा नाही तर? असं कॉन्स्टेबलला क्षणभर वाटलं.
"ए तुम्ही साले दुतोंडी. तुम्हीच सुदर्शनसरकडे तक्रार केली ना? अन आता काय हे विपरीत?"
"आम्ही मास्तरबद्दल?. छ्या बुवा. आमची या मास्तरबद्दल काही तक्रार नाही आणि तुम्ही त्यांना नेलं तरी आमचं काही बिघडत नाही साहेब. पण नवल वाटलं ते बोलले."
"आम्ही सुदर्शनकडे सुदर्शनबद्दलच तक्रार केली आहे." प्रसाद म्हणाला.
आता कॉन्स्टेबल थोडा विचार करू लागला. सुदर्शनजिंकडे या मुलांनी समन्वयकाची तक्रार केली असं सांगितल्याने त्याचे आणि सुदर्शनजींचे पत्ते उघडे पडले होते. कॉन्स्टेबल अभिजीतला उचलून नेतोय याला ३०-३५ तरुण मुलं साक्षीदार असणार होती. प्रकरण अंगाशी तर येणार नाही? एवढ्यात कॉन्स्टेबलचा वॉकी ठणाणला.
"yes sir" कॉन्स्टेबल ढोलपेने फोनवर सल्युट मारला म्हणजे त्याचा कोणी वरिष्ठ होता. "हो सर. इथेच आलोय. इथल्या समन्वयकाला घेऊन येतोय थेट." ढोलपे इतरांपासून दूर जात दारात बाहेर तोंड काढत म्हणाले.
"त्याला विचारायचे प्रश्न तिथेच विचारा आणि सोडून द्या."
"साहेब, पानसरे आणि सुदर्शनजींबरोबर परवाच्या मीटिंग मध्ये तुम्हीच तर त्याला पळून जातांना पकडायला सांगितलं होतं ना...."
"पळून जातांना पकडलाय का तुम्ही त्याला?"
"साहेब, सुदर्शनजींनी दिलेल्या गाडीवर आम्ही नजर ठेवून दबा धरून बसलेलो पण तो आलाच नाही गाडीकडे. तुम्ही ९ च्या आत कामगिरी आटोपायला सांगीतलेली. वेळ जवळ आली म्हणून आम्हीच वरती आलो."
"म्हणजे पळून जातांना पकडला नाही ना? उगीच वाद घालू नका ढोलपे. त्या समन्वयकाने आणखी मोठ्या माशाला संपर्क केला आहे. समन्वयकाचं नाव अभिजीतच ना?"
"हो साहेब अभिजीत. पण त्याने कोणाला कॉनटॅक्ट केला नाही. त्याचा फोन आधीपासूनच ताब्यात घेतलेला आहे...."
"ढोलपे, आमदार साहेबाचा आदेश आला आहे. तो त्यांचा माणूस आहे. जरा लाज ठेवा आपली तिथे. no more questions. just follow the orders."
फोन संपतोय तोच दार अडवून उभ्या असलेल्या ढोलपेंना excuse me म्हणत सारंग आत आला. ढोलपेंनी आधी वॉकीला सल्युट केला. फोनआधी अभिजीतची वैयक्तिक तपासणी करायच्या नावाने हिसकावून घेतलेलं लायसेंस, आय-कार्ड, किल्ल्यांचा जुडगा वगैरे आणि मोबाइलही त्यांनी अभिजीतला परत केला. व ते स्वतः अभिजीतचा reliever येइतो तिथेच थांबणार आहेत असं त्यांनी सांगितलं.
सुहासने अग्नेय कोपर्यात जाऊन सुदर्शांजींना फोन लावला. सगळे प्रशिक्षणार्थी तावातावाने त्यांना झापत होते. शिबिराचे पैसे परत मागत होते. सुदर्शांजींनी त्यांना मुख्य केंद्रात येऊन आजची लेक्चर्स करून मग चर्चा करू अशी सारवासारव केली, ती त्यांनी मान्य केली. ते सगळे तिथून निघून गेले आणि अभिजीतचा reliever अवतरला. त्याने अभिजीतकडून किल्ल्यांचा जुडगा ताब्यात घेतला आणि सुदर्शांजींनी त्याला मुख्य केंद्रात बोलवल्याचं सांगितलं. ढोलपेंनी किल्ली हस्तांतरणाची नोंद करून दोघांची स्वाक्षरी घेतली आणि अभिजीतला जाऊ दिलं.
सुदर्शनजींचे डोळे आग ओकत होते. अभिजीतवर उगीच विश्वास ठेवला, मराठी माणूस कामाचाच नाही वगैरे गरळ ओकत त्यांनी त्याला त्या महिन्याच्या पूर्ण पगाराचा धनादेश दिला आणि आजचा दिवस शेवटचा म्हणून सांगितलं. अभिजीत याविरुद्ध भांडू शकत होता. पण आजचं कुभांड झाल्यावर त्याला काम करणं शक्य होणार नव्हतं. कोणी आणि काय केलं असावं हे जुजबी कळल्याशिवाय किंवा त्याबद्दल खात्रीशीर तर्क बांधता आल्याशिवाय यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे ठरवणं मूर्खपणा झाला असता. आणि ज्याच्या गाठीला १ महिना पुरेल एव्हडेही पैसे नाहीत तो कोणाकोणाचा सामना किती दिवस करू शकणार होता? हा ही विचार त्याच्या मनात होता.
संध्याकाळी सुहासच्या बॅचचे सगळे प्रशिक्षणार्थी त्या दिवशीची lectures आटोपून सुदर्शनजींसमोर चर्चेला बसले. संगणक नीट चालत नाहीत, सगळ्या संगांनाकांना power backup नाही, शिकवणारे सगळेच नवागत आहेत, job guaranty चं काय वगैरे अनेक मुद्दे होते त्यांचे. शेवटी सुदर्शनजी course fee २0% कमी करायला तयार झाले. तसंच अननुभवी अभिजीतला काढून टाकलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं. याचा परिणाम उलटाच झाला. तरुणांना तोच प्रशिक्षक म्हणून हवा होता! उलट त्याला आणखी languages द्याव्या असं त्यांचं मत होतं. जोपर्यंत अभिजीत परत येत नाही तोपर्यंत ते सगळे classes वर बहिष्कार टाकणार अशी एक टूम निघाली. आता प्रकरण हाताबाहेर चालल्याची जाणीव सुदर्शांजींना होऊ लागली. त्यांनी त्या तरुणांना वेळ निभावून नेण्यापुरतं आश्वासन दिलं आणि पाठवणी केली. तरुणही तयारीचे होते. पुढच्या दिवशी ते कोणीही येणार नव्हते. तो दिवस अभिजीतला परत आणायला म्हणून मोकळा केला होता त्यांनी. सरांनी अभिजीतला एसएमएस पाठवून चर्चेला बोलावून घेतले. अभिजीत आधी परत रुजू व्हायला नाही म्हणाला तशी त्याचा पगार दुप्पट करतो म्हणाले. अभिजीतने प्रस्ताव ठेवला की दरोड्याच्या चौकशीतून पूर्ण सुटका होणार असेल आणि सरांचा त्याच्यावर आळ नाही असं ते लिहून देणार असतील तर तो येईल. सुदर्शनजी म्हणाले की ते तर आता करावच लागेल. पण अभिजीत पुण्यात थांबला तर त्याच्या careerला असेच धोके निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं. हे काही अभिजीतला आवडलं नाही. म्हणून तो परत रुजू होण्याचा अंतिम निर्णय रात्री ९ वाजेपर्यंत सांगतो म्हणून सरांना टांगतं ठेवून तिथून निघून गेला.
दुपारी बराच विचार करून त्याने सुहासला फोन लावला आणि सगळा प्रसंग सांगितला. सुहासने त्याला स्वतःच्या खोलीवर बोलावून घेतलं. मग तिथे संयुक्त रणनीती ठरली. या batchचे प्रतीनिधी आणि अभिजीत सरांना भेटायला गेले. शेवटी तह झाला. सुदर्शनजींची आर्थिक स्थिति तंगीची असल्याने ते course fee परत करू शकणार नाहीत, हे माहीत असल्याचं प्रशिक्षणार्थिंनी त्यांना लक्षात आणून दिलं. त्यावर असं ठरलं की, litkon biotech ची नवीन ERP बॅच ज्यासाठी ती नवी शाखा सुरू केली होती ती रद्द करून त्याचा उरलेला निधि आहेत त्या batch ना कबुल केलेल्या उत्तम दर्जाच्या संगणकांसह व अन्य सुविधांसह देण्यासाठी वापरला जाईल. सुदर्शनजी त्यांना सगळ्यांना नोकरी लावून देतील तर त्यांची कोणतीही तक्रार असणार नाही. अभिजीत दुप्पट पगारावर फक्त ही batch प्रशिक्षित करण्यापुरता पुन्हा रुजू होणार होता. तो आणखी एक language ही शिकवणार होता. सुदर्शनजी त्याला ही batch संपल्यावर हैदराबादला मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवून देणार होते! अर्थातच त्यानंतर त्यांचं दिवाळं निघणार असल्याने पुढच्या शिबिरांच्या सगळ्या जाहिराती त्वरित उतरवल्या गेल्या. व ती जागाही विकायचा फलक सुदर्शनजींनी लावून टाकला.
अभिजीतला आता हे सुभाषित लक्षात ठेवणं आवश्यक होतं:
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।
प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥