मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

साहित्य परिचय- बोर्डरूम

 पुस्तक: बोर्डरूम, व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर     

लेखक: अच्युत गोडबोले, अतुल कहाते

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

मुद्रक: रोहन एंटरप्राईसेस

आवृत्त्या, पहिली: २००२, अकरावी: २०१०, अठरावी: २०१६ 


व्यवस्थापकीय तत्वांची सुरुवात या पुस्तकाय अभावितपणे होते ती पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत लेखकद्वयितले ज्येष्ठ लेखक स्वतः दुर्दम्य आशावाद बाळगून आहेत असं लिहितात, तिथूनच. तो कशाबद्दल आणि त्याची पृष्ठभूमी हा विषय वेगळा आणि त्याची मला पुरेशी कल्पनाही नसावी. तथापि,  बोर्डरूममध्ये आसनस्थ व्हायसाठी किंवा झाल्यावर व्यवस्थापकांकडे काय काय असावं लागतं, काय काय करावं लागतं, त्यांनी विचार कसे सर्वांगीण करावेत, उद्योग घड्याळाच्या काट्यावर सुरळीत चालायचा तर व्यवस्थापकाच्या वैयक्तिक दिवसाचा काटा कसा फिरतो, कार्यवाटप करतांना काय काळजी घ्यावी, कुठली नीती वापरावी हे सगळं आत्मसात करायसाठी या पुस्तकाचं प्रास्ताविक, (तेव्हाच्या-) उद्याचं आर्थिक जग आणि बेचैन करणारे प्रश्न ही प्रकरणं वाचावीत. माझ्या दृष्टीने नवख्या किंवा मध्यम पातळीवर असलेल्या व्यक्तिला हे प्रास्ताविक, प्रकरणं समजली तरी सर्वोच्च व्यवस्थापन कक्षापर्यन्तचा मार्ग समजेल आणि योग्य वेळी आठवत राहिली तर तो मार्ग सुकरही होईल. कारण हा माणूस नोकरशाहितून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारची म्हणजे 'मेरावाला टाइप' च्या माणसांची या पुस्तकात तुरळकच वर्णनं आहेत. व्यवस्थापनासंदर्भात असलेल्या पुस्तकातून वाचकाला जे अपेक्षित आहे ते प्रास्ताविकातून छानच मिळतंआणि लेखकांना जे द्यायचंय तो पुस्तकाचा मुख्य मसुदा आहे.

 

मी माझ्या आयुष्याची जवळजवळ निम्मी वर्षं अभियंता म्हणून कार्यरत आहे. व्यवस्थापन हा विषय जवळचा, अनुभवातला आहे. तरीही अच्युत गोडबोले आणि अतुल कहातें सारख्या दिग्गजांच्या पुस्तकावर मी या भूमिकेतून काही लिहावं एवढी माझी व्यावसायिक कुवत आणि आवाका नाही. त्यांनी या लिखाणातून जे संदेश पोहोचवले आहेत त्यांचं आकलन किंवा ग्रहण करून त्याप्रमाणे कार्यान्वय अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या पुस्तकातल्या काही नायकांनी यशस्वीपणे वपरलंय असं  एक व्यवस्थापकीय तत्व म्हणजे 'ग्राहक केंद्रस्थानी असतो'. लेखक-वाचक या नात्यात मी ग्राहक म्हणून केंद्रस्थानी येतो आणि त्या भूमिकेतून पुस्तकाबद्दल व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगतो.


खरं सांगायचं तर ह्या पुस्तकात व्यवस्थापकीय तत्व किंवा वैशिष्ट्य याची यादी, व्याख्या किंवा तत्सम खल केला असेल असं समजून मी हे समोर घेतलं. त्यानंतर श्रीगणेशा करण्याआधी किमान ५ दिवस असं काहीतरी बोजड वाचायसाठीच्या म्हणून मानसिक तयारीत गेले. पण हे पुस्तक त्या वहिवाटेने जात नाही. कोणाची अपेक्षा असं फास्टफूड या पुस्तकातून पुढ्यात येण्याची असेल तर तसं होणार नाही. अगदि रंजकपणे केलेलं विविध यशस्वी उद्योजकांचा उदय, झळाळी आणि काहींचा अस्त तसच मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेली व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कर्तुत्वाला इंधन ठरलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू याचं वर्णन या पुस्तकात आहे. 


गेली काही वर्षं रोजगार कमी होण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरतात. यात कोणता पक्ष- हे दुय्यम आहे, पक्षाची सरकारी का विरोधी ही भूमिका, तो पक्ष या मुद्द्याला कसं हाताळणार हे ठरवते. निरपेक्षपणे विचार केला तर लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण हे दोन्हीही तीव्रतेने वृद्धिंगत होताहेत. हयांचं प्रमाण खरं तर व्यस्त हवं. हे दोन्हीही वाढत असतील तेंव्हा व्यवसायाच्या संधि कमी झाल्या तरच गणित सुटेल. तसंच ते सुटतय. यात सरकारचा दोष सकृतदर्शनी नाही. कारण ते लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण यातली वाढ थोपवू शकत नाहीत. रोजगार म्हणजे केवळ नोकरी आणि मजुरी नाही तर व्यवसाय हा सुद्धा रोजगार आहे. व्यवसायाच्या संधि वाढवल्या तरी ते रोजगार मिळवून दिल्यासारखंच आहे. गेल्या ५-६ वर्षात सरकारने हे मान्य करून जनतेला पटवायचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी उद्युक्त करणार्‍या अनेक योजना, उपयुक्त ठरणार्‍या सोयी, सुविधा, सवलती याची अक्षरशः रास उभी केली आहे. हे पुस्तक सध्या कर्मचारी असलेल्या किंवा कर्मचारी होणं हेच ध्येय अशी कल्पना उरी बाळगलेल्या पण उद्योजक मालक होण्याची कुवत असलेल्यांना तो विचार करायला प्रेरित करतं.


ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की आपल्यासमोर शाश्वत उद्दीष्ट ठेवलं की उपजत स्वभावगुण त्या दिशेने प्रवण होतात. यामुळे उद्दीष्टसिद्धता तर होतेच पण ती होता होता या उपजत गुणांनाही पैलू पडतात आणि वृद्धी होत जाते. रॉबर्ट ओवेनचा अंतस्थ हेतु कामगारांची पिळवणूक थांबवणं हा होता. मग विक्री कसब, आत्मविश्वास, बेरकीपणा, नीतीमत्ता, विश्लेषणकौशल्य या गुणांनी त्या शिकाऊ कामगारात- आधी व्यवस्थपक, मग उद्योजक अशी स्थित्यंतरं घडवली. तो यशस्वी झाला. हेंरी फोर्डकडून स्वप्न बघणं आणि बघितली म्हणून ती साध्य होणं, अपार संपत्तीचा फक्त सहेतुक वापर, परिपूर्णता येईपर्यंत संयम बाळगणं, कामाचे तास कमी करून वेतनवृद्धी निर्णय (त्या काळी), यामुळे त्याने काय साध्य केलं ते आपण जाणतोच. 


IBM चा संस्थापक वॉटसन हा पूर्वी त्याच्या नियोक्त्यासाठी पैशाच्या व्यवहारांची देखभाल करे आणि त्यातूनच मग आक्रमक माहिती तंत्र वापरुन त्याने IBM ची आधारशीला ठेवली. विक्रेत्याला (salesman) महत्व, मूल्यांवर श्रद्धा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत आदरभावाचं इतरांनी केलेलं संगोपन यामुळे ही आधारशीला भक्कम ठरली. केवळ रणनीतीत फेरफार करून आधी आपटलेली तीच वस्तु त्याच माणसांकरवी लोकप्रिय करता येते हे 'ली आयकोका' ने दाखवलं. फोर्डने कर्मचारी हाताळण्यात केलेल्या चुका आणि त्यामुळे त्याला मोजावी लागलेली किंमत. लोकांच्या गुणांचं त्यांच्या देशबांधवांनाच (किंवा उद्योगाला) सोयर नसेल तर अन्य देश (स्पर्धक उद्योग) त्या लोकांचा वापर करून मूळच्या त्यांच्या देशावर मात होऊ शकते हे डेमिंग आणि ज्यूरनचं उदाहरण दाखवून देतं. उत्पादन मानक ठरवणं आणि कसोशीने पाळणं, सुटसुटीतपणा ही तत्व वापरुन मॅकदोनल्ड्सचं साम्राज्य उभं आहे. तसंच ग्राहकाला आवडणारी एखादी धंदेवाईक खुबी आपल्या उत्पादनात असेल तर ती गुपित म्हणून जतन केली की स्पर्धेत तग लागतो, ह्याचं मॅकदोनल्ड्स हे मासलेवाईक किंवा मसालेवाईक उदाहरण. याहीपुढे कोक, नाइके, फेडेक्स, इंटेल, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम, डाऊ, एस अँड पि, ओर्‍याकल, ई-बे, अमेझोन, पेपाल, नोकिया या सगळ्यांचं आणि आणखीही उद्योगांचं वर्णन या पुस्तकात आहे. ते बोजड नाही, रंजक आहे.


दोनशेच्या आसपास परदेश वार्‍या केलेल्या, काही उद्योगांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहिलेल्या वरिष्ठ लेखकाचं वाचन विस्तृत आहे हे संदर्भ यादी स्पष्ट करते. हजारो माणसं आणि हजारो कोटी रुपये हाताळणारा हा एक माणूस उरलेल्या वेळातही व्यवस्थापनाची किंवा त्या दृष्टिकोनातून एवढी पुस्तकं वाचतो. हा ध्यास शिकण्यासारखा आहे.


येन केन प्रकारेण पैसा मिळवायचा एवढंच उद्दिष्ट असलेले या पुस्तकातले २-३ महानयक सोडले तर इतर सर्व उद्योजकांचं आपल्या उत्पादनावर किंवा कर्मचार्‍यांवर किंवा समाजावर प्रेम होतं. ते भावनिक रित्या यातल्या कशाशी तरी तरी संलग्न होते. असा एक निष्कर्ष (ऑन ए lighter नोट) काढायलही वाव आहे की आताचं जे जीवघेण्या स्पर्धेचं स्वरूप आपण अनुभवतो तिथपर्यंत हे लोक आपल्याला कदाचित इतक्या लवकर घेऊन आले नसतेही. पण ... पण  ही विचारवंत, विश्लेषक, सल्लागार यांची जी त्रयस्थ जमात आहे ती या बेफामपणाला कारणीभूत आहे. कारण या तटस्थ भूमिकेतून त्यांनी उद्योगातल्या माणुसकीला, मूल्यांना तिलांजली दिली. वस्तुनिष्ठ, भांडवलवादी विचार आणि निश्कर्ष समोर आणले. भ्रमित होऊन कर्तुत्ववान उद्योजक आणि त्याचे व्यवस्थापक त्यामागे धावू लागले आणि ही मग शर्यत झाली. आजची परिस्थिति हे त्याचं फलित. 


नफेखोरीवर आधारलेल्या समाजाला व्यवस्थापनाची तत्व काय कामाची? शेवटी हे सगळं कशासाठी? हे प्रश्न आपल्याला पडावेत असं लेखकला वाटतं, यातून मला हे जाणवलं की व्यवस्थापन विश्वात संवेदनशील, संतुलित व्यक्तिमत्व हे मूळ तत्व असायला हवं. यात तडजोड नको. व्यक्ति, समाजघटक म्हणूनही हे प्रश्न पडायलाच हवेत.


समाजातलं एक उदाहरण देतो. कदाचित थोडं विषयांतर वाटेल. १९९० च्या आसपास एका वर्षी आमच्या गल्लीमध्ये बहुतेक घरांच्या पुढच्या अंगणात पावसाचं पाणी खूप तुंबलं. आदल्या वर्षीही थोडं पाणी आलं होतं पण फार साठलं नव्हतं. आदल्या वर्षाच्याआधी कधीही असं झालं नव्हतं. एका ओळखीच्या बांधकाम व्यवसायिकाने आईला सांगितलं की रस्त्याची पातळी चढी असल्याने आणि रस्त्याकडेने निचरा वाहिन्या बांधल्या नसल्याने अंगणात पानी साठतंय. पण या दोन्हीही गोष्टी तर कायम तशाच होत्या, मग आत्ताच तुंबई का? हा प्रश्न आईला नंतर पडला. काही महिन्यांनी रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळे रस्ता परत बांधायला घेतला होता. तेव्हा आईला लक्षात आलं की आता आहे त्या रस्त्यावर आणखी एक स्तर चढतोय. म्हणजे रस्त्याची ऊंची आणखी वाढणार, मग अंगणात आणखी पाणी साठणार की काय? आईने त्या व्यवसायिकाला बोलावून परिस्थिति दाखवली. त्याने, त्याचं नाव बाहेर कुठे न येऊ देण्याच्या अटीवर सांगितलं की, आईचा निश्कर्ष योग्य आहे. तसंच हे ही सांगितलं की रस्ता दुरुस्ति करतांना गरज असल्यास आधी तो खोदावा लागतो, त्याचे विविध स्तर अंथरून मग वरचा डांबराचा स्तर टाकायचा असतो. पण डांबरट कंत्राटदार खोदाई आणि खालच्या स्तरांचे पैसे खिशात टाकतात. तसंच रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूला उतार (आता मला कळलं की त्याला रोड कॅम्बर म्हणतात)  द्यायचा असतो, तो ही देत नाहीत. त्यामुळे दर वर्षी खड्डे पडून दर वर्षी कंत्राट मिळतं. हे ऐकून आईने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे, जिल्हा परिषद, नगरपालिकेत कामातल्या त्रुटींची तक्रार केली. नागरिकांनी काम थांबवावं अशी भूमिका घेतली. स्थानिक नगरसेवक भेटायला आला. मॅडम, रोड वगैरे सोयी करून मी 'मोहल्ल्या'ची प्रगति करतो तर तुम्ही त्यात खोडा घालता अशी अरेरावी करू लागला. त्यावर विषण्णपणे आई म्हणाली 'हो, प्रगति, पण खड्ड्यांच्या दिशेने...". लिखित स्वरुपात तिने दिलेली कारणं तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने आणि गल्लीतले लोक एकोप्याने या प्रसंगाला सामोरे गेल्याने आधी निचरा नलिका बांधून मग योग्य त्या प्रकारे रस्ता बांधला गेला. आणि हे सगळं कशासाठी? हा प्रश्न नागरिकांसाठी सुटला.

  

व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या किंवा ते क्षेत्र निवडायला बाशिंग बांधलेल्या अथवा त्याबद्दल जिज्ञासा असलेल्या वाचकाला हवंय ते या पुस्तकात आहे. त्याहीपुढे जाऊन, लिहीणार्‍याची मूल्यही घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं!

रविवार, २१ मार्च, २०२१

शंकर पाटील यांचं 'जुगलबंदी'


लघुकथा संग्रह: जुगलबंदी              

लेखक: शंकर पाटील 

(जीवनकाल १९२६ ते १९९४)

प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

प्रथम आवृत्ति: 

५ सप्टेंबर १९९८, सध्याचं  ८ वं  मुद्रण २०१४ 


मी वाचलेलं हे शंकर पाटील यांचं पहिलंच पुस्तक. मुखपृष्ठावरूनआणि नावावरून कथासंग्रहाबद्दल अंदाज बांधायएवढा तय्यार वाचक मी नाही. ते बरं आहे असं पुस्तक वाचून झाल्यावर वाटलं!

मेहता पब्लिशिंग नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपल्या लेखकाची छायाचित्रासकट ओळख करून देतात. आतली प्रत्येक लघुकथा या ओळखीला जागते. अस्सल गावराण सभोवताल आणि त्याचं तशाच भाषेत वर्णन. हातचं राखून असं काही नाही. मुद्दाम काही वाढवलय असंही नाही. व पु काळेंसारख्या लेखकांच्याकथांमध्ये येतात तशी खास दुहेरी उद्गारवाचकचिन्हांमध्ये लेखकाच्या नावे प्रसिद्धी पावतील अशी वाक्यही नाहीत. पण कथांमध्ये आशय आहे. 

बाज गावराण असला तरी प्रत्येक लघुकथेचा विषय वेगळा आहे, म्होरक्या वेगळा आहे. 


बापाचा मोठा लेक शहरात आजारी पडल्यावर त्याच्यासाठी पैसे जमवतांना त्या खेडूत म्हातार्‍याची होणारी वैचारिक घालमेल, त्याच्या तत्वांनी त्याच्यातल्या गरजूवर केलेली मात आणि त्यामुळे जवळ जवळ सुटलेली समस्याही कशी अधांतरी रहाते याचं वर्णन 'भावकी' कथेत येतं. 

'कणा' कथेत सहजीवनातल्या सकारात्मक वास्तवाचं दर्शन होतं. एक जण मोडला तर दुसरा जोम धरतो आणि दुसरा वाकला तर पहिला ताठ होतो. महाभारतात वगैरे जसे अधिरथी महारथी एकमेकांच्या प्राणाचं रक्षण करायला सरसावतात तसाच हा संसार-संग्राम आहे. तो निभावला की सहजीवन चालू रहातं. यात पैसाअडका, संपत्ति वगैरे तोंडी लावण्यापुरतंच असतं, एकमेकाला जगवण्याची जिद्द महत्वाची.

'खरं की खोटं' मधे एकाच कुटुंबातली प्रेम आणि विश्वास असलेली माणसं तेवढी एकमेकांना आपलीशी वाटतात आणि ती एकमेकांचं नक्की ऐकतात, हे आजोबा-नातवाच्या नात्यातून चितारलय. हे वर्णन मन हळवं करून जातं.

'एक मंगलकार्य', 'दरवेशी आणि अस्वलं' आणि 'खासदारांची जनसेवा' या कथांमधून समाजात अगदी सर्व स्तरात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी कर्मचार्‍यांचा नेते, अधिकारी यांच्या खाजगी कामासाठी वापर, तो नाही होऊ दिला तर होणारे परिणाम, परितोषिक वितरणात कशी वर्णी लागते, नेते मंडळींच्या कोट्यातून नोकरी मिळणं म्हणजे काय, इत्यादि अगदि लख्खपणे मांडलं आहे. या लिखाणाचं वैशिष्ठ्य हे की यात हे  फक्त थेट मांडलय, त्यावर काहीही त्रागा किंवा संताप व्यक्त केलेला नाही. तसाच तो वाचकाच्या मनातही निर्माण होत नाही. पण आहे हे योग्य नाही हे नक्की कळतं.

'मास्तर मास्तर तिरकामठा' आणि 'इथे कायदा झक मारतो' या कथांमध्ये गावाकडे एखाद्या आडदांड व्यक्तिला डिवचला की काय परिणाम होतात आणि यातून मग डिवचणारा कोणीही प्रतिष्ठित असेल जसं मास्तर, सरपंच, तलाठी अगदी जिल्हाधिकारी असला, तरी त्यालाही सुतासारखा सरळ आणण्याची पात्रता अशा आडदांडामध्ये असते. याचं वर्णन केलय.

'काखेत कळसा' मधे चारचाकी गाडीतून सम्मेलनाला परगावी निघालेले ४ वकील, खेडूतांच्या स्वभावाचे त्यांचे चर्वितचर्वण चाललेले अनुभव आणि तेव्हढ्यात २ खेडूतांनी त्यांची एकत्र असतांना केलेली छोटीशी दिशाभूल याचं रंगतदार वर्णन आहे.

'जुगलबंदी' कथा एक लंपट व्यक्तिमत्व रेखाटते. वाचक जर खेड्यात किंवा लहानश्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलेला असेल तर त्याला अशा व्यक्ति आणि कथा यांचं नाविन्य नक्कीच वाटणार नाही. तथापि अशा विविध अंगि, वेगवेगळे विषय, नाति, आशय, आवाका असणार्‍या या गावरान मेव्याचं बारसं आणि मुखपृष्ठ त्यातल्या एकमेव लंपट कथेवरून केलंय, हा वाचकसमाजाच्या आवडी-निवडीचा आरसा समजायचा का?

रविवार, ७ मार्च, २०२१

साहित्य परिचय: सोविएत रशियाची केजीबी

पुस्तक: सोव्हिएत रशियची केजीबी    

प्रथम आवृत्ति: २७ डिसेंबर २०१२

प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन्स

लेखक: पंकज कालुवाला


नव्वदच्या दशकातली रहस्यकथा वाचकांची पिढी म्हणजे फास्टर फेणे पासून ते बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक असा प्रवास. तिथून पुढे शेरलॉक होल्म्स. या रहस्यकथा वाचकांचा प्रतीनिधी असलेल्या माझं पुढे अनेक कारणांनी भरपूर असं वाचन झालं नाही. आता कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी योजनेने पुस्तकं घरात आणून ठेवल्यावर रहस्यकथा नाही तरी हेरगिरीवर बेतलेलं पंकज कालुवाला लिखित सोविएत रशियाची केजीबी हे पुस्तक हाती आलं. पंकज कालूवला यांनी विविध देशांच्या गुप्तहेर संघटनांवर ७-८ पुस्तकांमधून लिखाण केलं आहे, म्हणजे त्यांचा या विषयातला व्यासंग दांडगा आहे.

या पुस्तकाची सुरुवात 'ऐतिहासिक पार्श्वभूमी' या प्रकारणाने होते. लेखक, वाचक आणि पुस्तक म्हणून ही पार्श्वभूमी सुरुवातीच्या पृष्ठांमधे विशद करून वाचकाच्या मनाची केजीबी या मुख्य विषयासाठी मशागतच केली आहे. त्यामुळे एकंदर मजकुराबद्दलची अपेक्षा सर्वोच्च पातळीवर नेली जाते. पुढे प्रत्येक प्रकरणात हे पुस्तक आपल्याला गुंतवून ठेवतं हे नक्की. 

केजीबीच्या स्थापनेच्या किमान सव्वा शतक आधीपासूनच्या रशियन गुप्तहेर खात्यांचा  मागोवा हे पुस्तक घेतं. झारशाही ते बोलशेव्हिक कम्यूनिस्ट राजसत्ता हा प्रवास हेरगिरीच्या अनुषंगाने मांडला गेला आहे. यात थेट उल्लेख केलेला नसला तरी हे स्पष्ट आहे की जसजशी सत्ता पालटली किंवा सत्ताप्रमुख बदलला तसतशी हेरखात्याची नावं बदलत गेली. मुळातच राजेशाही ते कम्यूनिस्ट असे हे एक वर्चस्ववादी ते पुढचा वर्चस्ववादी असे बदल असल्याने केवळ हेरसंस्थेच्या नावांनाच नाही तर आधीच्या हेरांच्या कळपाला पण मूठमाती मिळत गेली. यात काहीच नवल नाही. 

हेरगिरीच्या योजना कशा असतात, त्यात खरं, स्पष्ट असं काहीच नसतं आणि हेर या व्यक्तीच्या वैयक्तिक हुशारीवर, ती व्यक्ति आपल्या वरिष्ठांचा विश्वास कसा सांभाळते आणि स्वतः कोणावर विश्वास ठेवायचा हे किती अचूक ठरवते यावर एखाध्या राष्ट्राचंही भवितव्य ठरू शकत असतं. शिवाय याची योग्य ती पोचपावतीही मिळू शकत नाही, जिवंतपणी किंवा नंतरही. अगदि तुरळक लोकांना ही पोच मिळवण्याचं भाग्य साधतं. कारण त्यांना पोच मिळणं म्हणजेच त्यांचा पराक्रम जाहीर होणं आणि त्या पराक्रमाला त्यांच्या बोलवित्या धन्याने मान्यता देणं. हे पुस्तक अशा रशियन भाग्यवंतांवर बेतलेलं आहे. 

हा मथितार्थ निघतो हे, तसंच लेखकाचा अभ्यास ही या पुस्तकाची बलस्थानं आहेत. प्रत्येक नायकाचा पराक्रम व्यवस्थित ठसेल असा उलगडला आहे. त्या त्या नायकाची छायाचित्रंही आहेत. एवढंच नाही तर छायाचित्रांची संख्याही पराक्रमाच्या अनुपातात आहे. प्रकरण वाचतांना आधी आतली सगळी छायाचित्रं पाहून घेतली, मग प्रकरण वाचलं आणि परत छायाचित्रं पाहिली की त्या चेहेर्‍यांवर त्या प्रकरणात वर्णन केलेले त्यांचे कुटिलता, क्रौर्य, चातुर्य वगैरे गुण जाणवू लागतात. साकल्याने बघता पुस्तक गुंतवून ठेवतं आणि प्रभावही पाडतं.

असं असलं तरीही साधारण मध्याच्या नंतर मला कसलीतरी उणीव, पोकळी भासू लागली. मग काही बाबी ध्यानात आल्या. पुस्तक २०१२ साली लिहिलंय. वाचक वर्ग बव्हंशी लेनिनच्या हत्येनंतर, भारताच्या स्वातंत्र्‍यानंतर  जन्मलेला आहे. पुस्तकाच्या नावात केजीबी आहे. केजीबी नावाने ही संस्था १९५४ साली जन्माला आली. पुस्तकाच्या ८० व्या पानापर्यन्त म्हणजे शास्त्रिजींवरील प्रकरण सुरूहोईपर्यंत आपण वाचतो ते सगळं १९५४ च्या आधीचं आहे. त्यामुळे अर्ध्याच्यावर पुस्तक हे पूर्वेतीहासातच संपलेलं आहे. तसंच नावात सोविएत रशिया असल्याने १९९१ पर्यन्त, सोविएत यूनियनची शकलं होईपर्यंत येऊन हे लिखाण थांबतं. आज केजीबी अस्तित्वात नाही याची पुरेशी जाणीव या विषयांमधे अनभिज्ञ अशा वाचकाला तरी होत नाही. 

तसंच लेनिनचा इतक्यांदा उल्लेख आला पण केजीबी लेनिनच्या मृत्यूनंतर अस्तित्वात आली हा उल्लेख वाचकाला घटनांची सुसूत्रता कळायसाठी ठळकपणे होणं आवश्यक होतं. या बाबींमुळे काय वाचायला मिळणार या सुरुवातीपासूनच्या जिज्ञासेवर,आडाख्यांवर पाणी पडतं. सुरूवातीला मशागत झाल्यावर पीक निघालंच नाही किंवा फक्त जोडपिकं निघावी अशी अवस्था होते.

इतर सर्व प्रकरणांमध्ये अमुक असा जागतिक परिणाम तमुक एकट्या हेराच्या पराक्रमामुळे झाला असे खात्रीशीर निश्कर्ष काढले आहेत. भारताचा उल्लेख  ८० व्या पानानंतर ३ प्रकरणांमध्ये आहे. शास्त्रीजींच्या प्रकरणात लेखक काहीही खात्रीशीर निश्कर्ष काढत नाही आणि वाचकालाच प्रश्नात टाकून प्रकरण संपतं. त्यामुळे चांगलाच भ्रमनिरास होतो. केवळ यातला निश्कर्ष निघाला नाही म्हणून भ्रमनिरास होतो असे नाही तर यामुळे अन्य प्रकरणात केलेली छातीठोक विधानं, जोडलेले धागे किती खरे असावेतअशी शंका येते. मग हे पुस्तक सत्य आणि निर्भीड हेरकथा या पातळीवरून थोडं ढळतं.

हेरगिरीच्या पुढे जाऊन हेरखाती, राज्यकर्ते, देश, यांच्यातले संबंध, त्यांचे क्रियाकलाप याचा प्रकाशझोत वाचकाच्या विवेकबुद्धीवर पडतो. मग 'माझा नेता', 'माझा देश', 'देशाभिमान' हे सगळं कसं अगदी कचकड्यासारखं तकलादु आहे ते त्या झोतात दिसतं. अगदि राष्ट्राध्यक्ष, राजनेते, सैन्य, पोलिस, न्यायालयं, हेर ही सगळी नकली नावं असावीत; प्रत्यक्षात साम्यवाद,राजेशाही, डावे, उजवे अशी आवरणं घेऊन जागतिक संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळ्या, आणि त्यातली ही वेगवेगळी खाती, पदं आहेत तसंच त्यांनी देश या उदात्त संकल्पनेच्या आडोशातून जमिनीचे तुकडे वाटून घेतले आहेत इथपर्यंतही संशय येऊन जातो. 

तो संशयच असो!

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

निरोप सरत्या वर्षाचा

मूळ कविता                     Translation

मंगेश पाडगावकर            Purudatta Ratnakar


मी उद्या असणार नाही       I will not live tomorrow 

असेल कोणी दूसरे            next one will born in fact

मित्रहो सदैव राहो             you must leave sorrow

चेहरे तुमचे हासरे             keeping your smile intact


झाले असेल चांगले          something to light

किंवा काही वाईटही         something to fight

मी माझे काम केले           giving was my job

नेहमीच असतो राईट मी    always done right


माना अथवा नका मानु      Believe me or don't you

तुमची माझी नाळ आहे     we belong to each other

भले होओ , बुरे होओ        good and bad through

मी फक्त " काळ " आहे     I was Moment of matter


उपकारही नका मानु         Dont say thank you

आणि दोषही देऊ नका     don't feel sorry, mate

निरोप माझा घेताना         only say bye bye

गेट पर्यन्त ही येऊ नका    not even walk to gate


उगवत्याला " नमस्कार "   Salute to next Rise

हीच रीत येथली               must follow tradition

विसरु नका ' एक वर्ष '     memorable was our

साथ होती आपली           yearlong Association


धुंद असेल जग उद्या          Welcome new year

नव वर्षाच्या स्वागताला      tomorrow and late

तुम्ही मला खुशाल विसरा   forget me please

दोष माझा प्राक्तनाला        leave me with Fate


शिव्या ,शाप,लोभ,माया      Curse, Bless, Love, Hate

यातले नको काही              don't attach any string

मी माझे काम केले             no intention or interest

बाकी दूसरे काही नाही       did my job else nothing


निघताना " पुन्हा भेटु "       "See you again"

असे मी म्हणनार नाही        will be a false Lip

" वचन " हे कसे देऊ          that Promise

जे मी पाळणार नाही        which I can't keep


मी कोण ? सांगतो             Before revealing self

" शुभ आशीष " देऊ द्या     let all my blessings flow

" सरणारे वर्ष " मी             I am this passing year

आता मला जाउ द्या।         Now let me go, let me go !

मूळ कविता                     Translation

मंगेश पाडगावकर            Purudatta Ratnakar

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्

त्याने निर्णय अमलात आणला, मग घरी कळवलं.

घरून अपेक्षेप्रमाणे 'ठीक आहे. तू तुझं भलंबूरं समजण्याएवढा मोठा झाला आहेस असं दिसतं. चला, म्हणजे आमचं कर्तव्य संपलं; आता पुढची नोकरी लागली की मगच फोन कर. आमचे आशीर्वाद पाठीशी आहेतच' असं उत्तर आलं. कितीही अपेक्षित असलं तरी हे आईकडून वदवलं गेलं होतं आणि ती ही खर्‍या हताशेने, रागाने बोलली असं अभिजीतला वाटलं. आधीच्या नोकरीत, litkon biotech, परत जायचे दरवाजे त्याने नोकरी सोडतांना आपणहोऊनच बंद करून घेतले होते. HR ला सर्व teammates बद्दल काहीही न लपवता खरे अभिप्राय दिले होते आणि ते काय दिले हे परत त्यांना सांगातांनाही त्याने मागचा पुढचा विचार केला नव्हता. send-off देतांना ज्या assistant manager  ने त्याची मुलाखत घेऊन नोकरी दिली होती तो म्हणाला, 

"your style might suit well there in Europe, America. too direct and straight! इधर तो मुश्किल हो जायेगा भाई. कुछ समय मे इधर पुणे मे तो घुम न पायेगा तू.... हाहा हा!" 

तो अभिजीतच्या सत्याच्या मागे कधीच उभा राहिला नाही त्यामुळे त्याचं काही ऐकायचंच नाही हे तर ठरलंच होतं.  त्यांच्या बोलण्यात काही गर्भितार्थ आहे का असा काही विचार करायचा प्रश्न नव्हता.

काही दिवसांपूर्वी "तुला साधं excel copy-paste करता येत नाही आणि बाता मारतोय", हे अभिजीतला बॉसचे शब्द मनात खोलवर रुतले होते. दोन वर्षं त्याने तहान भूक विसरून या कंपनीसाठी हाडाची काडं केली होती. कंपनीत सर्वात आधी ६.४५ ला तोच हजर असायचा. तशीही त्याला लवकर उठायची सवय होतीच. 

पण planning engineer उशिरा आला म्हणून काम अडून राहिलं ही तक्रार त्याच्या आधीच्या माणसाबद्दल असे. म्हणून २० वर्ष अनुभव असलेल्या माणसाला दूर करून त्या जागी या scholar trainee engineer ला भरती केला होता. हा आल्यावर पहिला फरक झाला तो हाच की ती तक्रार परत आली नाही. त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापन खुश असलं तरी कामगार वर्ग नाराज होता. एक-दीड वर्षं काम केल्यावर इतरांशी बोलून आणि अनुभवाने त्याला हे कळलं होतं की दिवसभराचं काम निस्तरता निस्तरता रात्रीचे ९ कधी वाजायचे ते समजायचंसुद्धा नाही आणि मग सुरक्षा रक्षक office room ला रात्रीचं टाळं घालायला आला की निघावंच लागे. ४५ वर्षांचा कुटुंबवत्सल माणूस यानंतर घरी जाणार. मग घरच्या जबाबदर्‍या. परत सकाळी उठून घरची कामं आटपून यायला त्याला उशीर व्हायचा. अभिजीतच्या मागे ना कुटुंबकबिला ना काही प्रकृतीचा त्रास. मित्रांच्या खोलीवर २४ तास आओ जाओ अपना घर, उलट तिथे दिवसा थांबलं तर करणार काय हा प्रश्न! त्यामुळे तो सहजपणे वाट्टेल तेवढ्या लवकर येऊ शकत असे. नाही म्हंटलं तरी एका बालबच्चे वाल्या माणसाचं दाणापाणी आपण घेऊन बसलो ही सल अभिजीतला होतीच. कामगार काट खाऊन होते. ते या इंजीनियरला थेट काही बोलत नसले तरी अन्य इंजीनियरशी त्यांच्या हितसंबंधांची गणितं ठरलेली होती. त्यांच्या माध्यमातून अभिजीतचं नियोजन फसेल असे कट नित्य नेमाने सफल होत असत. सरळ स्वभावाच्या अभिजीतला हे काही समजत नसे आणि तो बेमालुम फसे. आता त्याला या सगळ्याचा उबग येऊ लागला होता.

या क्षणी त्याच्या हातात government corporation for IT education ची जाहिरात होती. १०००० रुपयात C, C++, VB, JAVA शिकवून ते नामांकित कंपन्यांमधे नोकरीही लावून देणार होते. असे courses ५०००० पर्यन्तचे होती तिथे. निर्णय झाला. नोकरी सोडायची आणि हे १०००० वालं शिबीर करायचं. घरून काही समर्थन मिळणार नव्हतच. आतापर्यंत स्वतःच्या नोकरीत साठवलेले पैसे वापरायचे, शिबीर करायचं आणि तिथूनच चक्क सॉफ्टवेअर मध्ये नवीन नोकरी मिळवायची! शिबिराचे पैसे सोडून खोलीभाडं, गाडीचं तेलपणी, खानावळ, न्याहारी, इस्त्री आणि मित्रांबरोबर रहात असल्याने होणारे अवांतर खर्चही करावे लागणार होते. 3 महीने अतितटीने पुरतील एवढेच पैसे होते. पण अभिजीतला स्वतःच्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास होता. नोकरी मिळायची १ जरी संधि त्या training institute मधून मिळाली तरी तिच्यावर तोच अधिकार करेल ह्याची अभिजीतला खात्री होती.

batch च्या २-३ दिवस आधीपासून त्याने room mates व मित्रांकडून reference books मिळवून जुजबी तयारी सुरू केलेली. त्याच्याकडे संगणक नव्हता ही अडचण होती. आधी वाचन केल्यामुळे सुरूवातीचे १-२ दिवस त्याचा शिबिरात चांगलाच प्रभाव पडला. शिबीर रोज ३ तास होतं. आणि नोकरी सोडलेली असल्याने भरपूर वेळ होता. मग शिकवणी संपली की अभिजीत तिथेच सराव करत बसे. अगदी तासनतास! त्या कंत्राटी प्रशिक्षण केंद्राचे  संचालक श्री. सुदर्शन हे होते. त्यांचं सगळीकडे बारीक लक्ष असे. जिद्दीने सराव करायला संगणकांसमोर बसलेल्या ठराविक प्रशिक्षणार्थीन्ंना ते कायम 'good good' किंवा 'keep it up' म्हणत. अभिजीतचा सराव जोरात चालू होता. प्रशिक्षक लोकही तसे तरुणच होते. अभिजीतला थोडे सीनियर. ते केंद्राच्या पहिल्या मजल्यावर दुपारची न्याहारी करीत. कधीतरी अभिजीतलाही आमंत्रण असे. सुदर्शनजी कधी दौर्‍यावर किंवा सुट्टीवर असत तेंव्हा यांच्यातलाच कोणीतरी केंद्र सांभाळे. आणि त्या दिवशी lunch ला चांगलाच कल्ला असे. पहिल्या महिन्याच्या शेवटी शेवटी अभिजीतला अशी कुणकुण लागली की इथे नोकरीच्या फार काही संधी उपलब्ध नाहीत. 

यादरम्यान त्याला institute जवळच्या bus stop वर litkon मधले एक कामगार शेख दिसले. त्यांना अभिजीतच्या सरळ स्वभावाचं कौतुक होतं. म्हणून अभिजीत ख्याली खुशाली विचारायला थांबला. ते म्हणाले की, त्याने किंवा अन्य कोणीही कंपनी सोडली याचं व्यवस्थापक किंवा संचालकांना कोणाला सुखदुःख नसतं. पण अभिजीतने मनुष्यबळ व्यवस्थापकाकडे, स्वतःच्या व्यवस्थापनावर दिलेल्या वाईट शेर्यांमुळे, आतले सगळे बिथरले आहेत. कंपनीचं पुण्यात सगळीकडे जाळं आहे. इथल्या बहुतांश कंपन्या, संस्थानबरोबर त्यांचे हितसंबंध आहेत. व्यवस्थापकांनी असा ग्रह करून ठेवला आहे की तू या हितसंबंधींच्या संपर्कात आलास तर त्यांच्याकडेही व्यवस्थापनाची नालस्ति करशील आणि त्यामुळे कंपनीला नुकसान होईल. बोलणं चालू असतांनाच bus आली आणि अभिजीतने पटकन आभार मानून घेतले.

आता निम्मा course संपला होता. अभिजीतचा आत्मविश्वास आसमान छू रहा था. तो आता अधिक अभ्यास करू लागला होता. इथून job मिळणं शक्य नव्हतं, आता आणखी एक आघात झाला. सुदर्शांजींनी सगळ्यांना १ तासापेक्षा जास्त बसायला बंदी केली. courses वाढले असल्यामुळे संगणक रिक्त ठेवता येत नाहीत असं कारण दिलं गेलं. अभिजीतला तर काहीही करून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तिथे बसायचंच होतं. सुदर्शनजी त्याला सारखं टोकू लागले. तसं त्याने त्यांना उलट दाखवून दिलं की त्यांच्या जाहिरातीमद्धे रात्री १० पर्यन्त मोफत सरावही देऊ केलेला होता. तेवढ्यापुरते सुदर्शनजी परतले. अभिजीतही हुशार होता. आपण सुदर्शनजींपुढे फार टिकणार नाही हे त्याला उमगलं होतं. शिवाय शिबिराचा उल्लेख करून स्वतः बाहेर नोकरी शोधायची असेल तर शिबीर संपेपर्यंत थांबणं आवश्यक होतं. त्यानंतर नोकरी मिळायला किमान महिना तरी लागेल असा अभिजीतचा अंदाज होता. पण तोपर्यंत पुरेल एवढी पुंजी त्याच्याकडे नव्हती. म्हणून त्याने ओळखीच्या एका समया बनवणार्‍याकडे lathe machine rough turning चं काम घेतलं. सकाळी  ७ ते १० शिबीर झालं की दुपारी १२ पर्यन्त तिथेच सराव करायचा. मग दुपारची न्याहारी करून कामावर जायचं, संध्याकाळी ८ पर्यन्त. संध्याकाळचं जेवण तिथेच कामगारांबरोबर करून तो खोलीवर येई आणि मग झोप येईपर्यंत रूममेटच्या संगणकावर परत सराव. महिना ८०० रुपये फक्त, पण तेवढाच आधार आणि हाताला काम. 

कधी एकदा course संपतो असं त्याला झालं होतं. संपायच्या १ आठवडा आधी आक्रीत घडलं. सुदर्शनजींनी त्याला १ तास वेळ देऊन भेटायला बोलावलं. तो काय करतो? कौटुंबिक पार्श्वभूमी काय? पुढे काय करायचा विचार आहे? वगैरे अनेक प्रश्न विचारले. 

"young man I am pleased with your willpower, dedication and hard-work. join me in my journey as instructor in my franchise." 

पाच हजार रुपये महिना, रोज ३ lectures घ्यायची. उरलेल्या वेळात प्रशिक्षणार्थींचं शंकानिरसन करायचं. एकंदर ८ तास तिथे थांबायचं. अभिजीतला आपल्या जिद्दीचा विजय झाल्याचा आनंद झाला. 

"thank you sir"  

"its ok. all the best". 

हा दाक्षिणात्य म्हातारा एकदम विपरीत कसा वागेल? असंही त्याला क्षणभर वाटून गेलं. 

सुदर्शनजींनी प्रशिक्षणार्थीपासून प्रशिक्षक या बदलसाठी अभिजितला १ आठवडा वेळ दिला होता. दरम्यानच्या काळात litkon biotech company तल्या कर्मचार्‍यांचा संप अशी बातमी अभिजीतच्या वाचनात आली. नवीन ERP implementation च्या विरोधात तो सांप होता आणि त्यांची मागणी मान्य केली तर  कंपनीने ERP साठी जी लाखोची गुंतवणूक केली होती ती वाया जाणार होती. नवीन ERP module आलं तर त्या कंपनीच्या पुरवठादारांबरोबर मिलीभागत करून कंपनीचे कर्मचारी जी अफरातफर करत ती पूर्ण थांबणार होती. म्हणून हा संप आहे हे अभिजीतला लगेच उमगलं. 

शिबीर संपून १ आठवडा खंड पाडून अभिजीत सुदर्शन सरांकडे रुजू झाला. आधीची सगळी शिबिरं संपून प्रशिक्षणार्थींचा पूर्ण नवा गट आता आला होता. अभिजीतला प्रशिक्षणार्थी म्हणून ओळखणारं आता तिथे अन्य कोणी नव्हतं. अभिजीत C basics and algorithm प्रशिक्षक. इथे येणारे बहुतेक तरुण हे पदवी संपत आलेले किंवा संपवून नोकरी शोधत असलेले, संगणक सोडून अन्य अभियांत्रिकी शाखांचे असत. अभिजीतपेक्षा ३-४ वर्षं लहान. दीड महिना भुरर्कन उडून गेला. आता अभिजीतला आणखी काही गोष्टी कळाल्या होत्या. तिथले अन्य शिक्षक त्याच्यापेक्षा २-३ वर्षं मोठे होते. त्यातल्या बहुतेकांनी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची खात्री दिली म्हणून इथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिबीर केलं. मग नोकरी संदर्भात ९०% जणांचा भ्रमनिरास झाल्यावर सुदर्शांजींच्या खणपटीला बसून त्यंच्याकडूनच अर्थार्जन सुरू केलं. सगळे जण बाहेर नोकरी बघत होते; इथलेच संगणक, कागद, छपाई, इंटरनेट वापरुन. ३ तास प्रशिक्षण दिलं की प्रशिक्षणार्थींच्या शंका निरसनाला वगैरे कोणी थांबत नसे. वेगळ्या विभागात बसून नोकरी शोधायचेच उद्योग चालत. शिवाय सुदर्शांजींची आर्थिक स्थिति चांगली नव्हती म्हणे. हे कंत्राटी केंद्र त्यांनी कर्ज काढून सुरू केलं होतं आणि गेले २-३ महीने हप्ते थकले होते. एका कंपनीशी प्रशिक्षणाचाचा करार झाला तर ती कंपनी सुदर्शनजींबरोबर प्रशिक्षण करार करून त्यांना पूर्ण setup उभारून देणार होती आणि गुंतवणूक करणार होती. त्यातून त्यांचं कर्जही फेडलं जाणार होतं. अभिजीतला पगार मात्र आत्तासुद्धा महिन्याच्या महिन्याला मिळत असल्याने तो या माहितीबद्दल साशंक होता. 

इतरांसारखं भांडण न करता अभिजीतला सुदर्शनजींनी प्रशिक्षक म्हणून नेमलाच कसा याचं इतर प्रशिक्षकांना आणि त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटत होतं. अभिजीत इमाने इतबारे ८ तास पूर्ण दक्ष राहून काम करू लागला. त्यामुळे त्याचं इतरांशी जुळत नव्हतं. अलीकडे सुदर्शनजीही फार काळ केंद्रात नसत. केंद्र उघडून सकाळी सर्वात लवकर येणार्‍या अभिच्या हवाली करून ते निघून जात ते क्वचित २-३ दा चक्कर टाकून जात. मग प्रशिक्षणार्थींच्या सर्व प्रश्नांचा सामना अभिजीतला करावा लागे. नोकरीसंबंधी प्रश्न आले की अभिजीत सरळ कानावर हात ठेवी आणि सुदर्शजींना संपर्क करायला सांगी. यामुळे आता डबघाईला आलेल्या काही तरूणांकडून त्याला नाही नाही ते ऐकावेही लागे. पण तो खमकेपणाने ठाकत होता. एकदा मात्र एका मुलाने त्याच्यावर हात उचलला. अन्य मुलांनी त्याला आडकाठी केली म्हणून तो प्रसंग निभावला. पण आता सुदर्शनजींशी बोलणं आवश्यक होतं. त्यांना मसलतीला बिलकूल वेळ होत नव्हता. अभिजीतने त्यांना १ आठवडा सुट्टी घेत असल्याचं कळवलं आणि अपेक्षेप्रमाणे सुदर्शनजींनी भेटीची वेळ दिली. 

"young man! very good job. you are wondering where i go all these days. its rather a good news for you. I am starting a new center at shivaji nagar. and you know what? I want to shift you there." अभिजीत जरा चक्रावला. 

"don't worry. I know its bit away for you. i will give you special allowance. you will be coordinator of that location. Come with me." 

सुदर्शनजी त्यांच्या अलिशान ऑडी मधून अभिजीतला नव्या केंद्राकडे घेऊन गेले. ६० संगणकांनी सुसज्ज केंद्र त्या इमारतीच्या पहिल्यामजल्यावर होतं. सुदर्शनजींनी चक्क किल्ल्यांचा जुडगा अभिजीतच्या हाती ठेवला. त्यानेच ते केंद्र सकाळी उघडायचं आणि रात्री शेवटी बंद करायचं होतं. तिथे गल्ला नसणार होता. कारण नवीन प्रशिक्षणार्थिंची नोंदणी कर्वे रोडच्या मुख्य केंद्रातच होणार होती. अभिजीत जाम खुश होता. तो आता प्रशिक्षण समन्वयक होता.

तिसर्‍याच दिवसापासूनच प्रशिक्षणार्थींची नवी फळी नव्या केंद्रात आली. पहिला तास अभिजीतचा असे. पुढच्या तासांसाठी ते ते प्रशिक्षक येत व परत लगेच मुख्य केंद्रात परत जात. इथले शिबीर पूर्ण ८ तासांचे होते. त्यामुळे प्रशिक्षणार्थी तिथेच थांबत. मग त्यातले काही संचालकांसमोर येऊन गप्पा मारत. अभिजीतच्या पृष्ठभूमीबद्दल विचारात. गाव, शिक्षण, नातेवाईक, मित्रं, आवडी वगैरे. खालती टपरीवर सिगरेट, चहा प्यायसाठी आमंत्रणही मिळे. पण अभिजीत कटाक्षाने केंद्रातच थांबे, अगदी चहा प्यायलाही जात नसे. तो सिगरेट तर ओढतच नसे. तरीही सुहास, सारंग, प्रसाद, संतोष, सुजीत,विनायक, मीनाक्षी, रमणी वगैरे एक कंपू त्याच्या आजूबाजूला असत. ही तशी वेगवेगळ्या शहरातून आलेली आणि आत्ताच ओळख होऊन जवळ आलेली पोरं होती. म्हणावी तर उनाड, म्हणावी तर हुन्नरी. तिथला lectures चा सोडून सगळा वेळ ते टिवल्याबावल्या करत पण रात्री आपआपल्या खोल्यांमधे जाऊन सराव करत असावेत. बहुतांश जण प्रज्ञावान होते. काही जण बोलाय वागायला रांगडेही होते. अभिजितसमोर त्याचीच टिंगल करायचे. अभिजीतचा सुदर्शांजिंबद्दलचा आदर समजून मुद्दाम त्यांचीही टिंगल चाले. यात सुहास हे एक खास व्यक्तिमत्व होतं. अभिजीतला त्याच्याच शब्दात अडकवून त्याला चहाला न्यायची युक्ति त्याला समजली होती. सुहास सुजीतला केंद्र सांभाळायला सांगून अभिजीतला चहाला नेत असे.  अभिजितलाही त्याचं आकर्षण वाटू लागलं होतं पण तो आपल्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर येत नसे. तसं पूर्वायुष्यावरही तो फार बोलत नसे. त्याला बर्‍याच गोष्टी विसरायच्याच होत्या. एक दिवस सुहासने त्याला एक गुगली टाकली, 

"पानसरे नावाचा तुझ्या आधीच्या कंपनीत IT system manager होता ना?" 

"हो. असावेत, मग. इथे त्यांचा काही संबंध नाही." 

आधीची कंपनी ही सर्वात नकोशी आठवण अभिजीतने लगेच दूर ढकलली. २ दिवसांनी सुहास म्हणाला,

"मास्तर, हे नवं केंद्र सोडून लवकरात लवकर मुख्य केंद्रात परत जाल तर बरं.... जर बाहेर दुसरीकडे कोण विचारात नसेल तर" 

"हो का, बरं. सुहास, मला एक सांग, तू काल परवा करून आणायला सांगितलेले सगळे प्रोग्रॅम करून आणलेस पण १० तारखेला दिलेला अजून नाही दाखवलास...." 

"मास्तर, सध्या मी सांगतोय त्या प्रोग्रामकडे लक्ष द्या. १० तारखेला कदाचित मी पानसरेंच्या मागावर असेन म्हणून जमलं नसेल मला." 

कसली तरी चाहूल दिल्यासारखा सुहास म्हणाला. त्या गर्भित भावाकडे दुर्लक्ष करून अभिजीत म्हणाला, 

"हे बघ तू या अवांतर गोष्टीतून लक्ष काढून programming वर केन्द्रित कर बरं. परवा काय म्हणे तर पानसरे सुदर्शनजींना भेटले. आता काय तर म्हणे तर नवं केंद्र सुरक्षित नाही, परत जा. कशाला हवेत तुला ते विषय? ....एकतर तुला माझा स्वभाव तुला माहिती आहे..."  

"पेपर मधे बातम्या येताहेत. तुमच्या भवितव्याचा विचार करतोय." सुहासचं बोलणं परत गर्भित आणि सहेतुक होतं. त्याचे डोळे तांबड्या पांढर्‍या रश्शाने भरल्यासारखे दिसत. 

"हे बघ तुझ्या programming मधे असलेल्या शंकांचं मी नक्की निरसन करेन. तू माझ्या नोकरीची चिंता करू नको, पटलं नाही तर लाथ मारतो मी."  

"मास्तर, वय काय तुझं? २ वर्षांचं अंतर आहे फक्त आपल्यात. जरा डोळे उघड. ५००० रुपयांवर किती दिवस जगणार तू? आणि तेही मिळायचे नाहीत यापुढे. हे सगळे वेगवेगळे विषय नाहीत, एकच आहे. तुला चिंता नाही हे कळलं म्हणूनच ती आम्ही करतो...."  ही त्याची खास कोल्हापुरी स्टाइल. चेहेर्‍यावर निर्विकार पण शब्द जाळ. दोघेही परतले. या प्रसंगामुळे त्यांच्यातली कटुता वाढली वगैरे नव्हती. ते चहा प्यायला जातच. चकमकीही झडत. उलट आणखी भावनिक जवळीक झाली असावी. 

असाच आठवडा-दहा दिवस गेले असतील. तो सोमवार होता. गाडी लावून, खिशातल्या केंद्राच्या किल्ल्या हातात घेऊन नेहेमीच्या लयीत जिना चढून केंद्राच्या दाराशी येतो तर काय.... १ दार तुटलेलं दुसरंही सताड उघडं. त्या काळी स्मार्ट फोन नव्हते. त्यामुळे छायाचित्रं काढायचा प्रश्न नव्हता. नीट निरिक्षण करून अभिजीतने आधी सुदर्शांजींना त्याच्या मोबाइलवरुन संपर्क केला. त्यांनी त्याला आधीच सांगून ठेवल्याप्रमाणे ७ च्या आत ते फोन उचलणार नव्हते. पण संपर्काचा प्रयत्न केला याची नोंद आता झाली होती. मग त्याने एसएमएसही पाठवून ठेवला आणि आत पाय टाकला.  आतला देखावा आणखी भकास होता. आत एकही संगणक शिल्लक नव्हता सगळी टेबल्स रिकामी होती. काही तर टेबल्सही गायब होती. 

सगळं दृश्य मनात साठवून उजळणी करून तो आपल्या जागेवर आला. आता तो वहीत टिपून घेत सुदर्शनजींच्या return callची वाट पाहू लागला. नेहेमीप्रमाणे विनायक हा प्रशिक्षणार्थी ७ ला ५ मिनिटं असतांना आला. त्याने सगळं पाहिलं, अभिजितकडे पाहिलं आणि लगेच सुहासला फोन लावला. तसे सगळेच साडेसातपर्यंत येत, पण हे ऐकून सुहास लगेच निघाला. विनायककरवी ही बातमी प्रसाद, तृप्ति, सुजीत, नमिता, सारंग वगैरे सर्वांपर्यंत क्षणार्धात पसरली. सगळेजण येण्याआत हे सुदर्शांजींना कळणं गरजेचं आहे कारण सुट्टी द्यायचा किंवा मुख्य शाखेत बदली जागी प्रशिक्षण वर्ग घ्यायचा निर्णय तेच घेऊ शकणार होते. असा विचार करून आणखी वाट नं पहाता अभिजीतनेच परत आपणच कॉल लावला. सुदर्शांजींनी सगळं ऐकून घेतलं. त्यांच्या बोलण्याची लय शांत होती पण प्रचंड शॉक बसल्याचं ते म्हणाले. 

"which police station have you contacted?" 

"No Sir, i thought that its important that you know it first. Then you could decide appropriately." 

"very good. very good. I will call you again. wait for my next instruction". 

"Ok Sir.  Sir, some students have come here, shall i send them to main center?" 

"Yes, yes. ask them to start immediately. Display a board outside."  

"Yes sir. Thank you sir."

हे बोलणं होईपर्यंत 3-४ टाळकी जमली होती. अभिजीतने सुदर्शांजींचा निर्णय सांगितला तशी सगळे जण गडबडीने मुख्य शाखेकडे जायला निघाले. 

"सुहास येतोय म्हणालाय ना? मग आपण थांबूय का त्याच्यासाठी?" नमिताने प्रस्ताव ठेवला. 

तसं प्रत्येकाच्या मनात इथून तातडीने सुटका करून घ्यायचा बेत होता पण सुहास त्यांचा म्होरक्या होता. ते द्विधा असतांनाच सुहास हेलमेट सावरत आला. सगळ्यांनी त्याच्याभोवती कोंडाळं केलं. त्याने प्रत्येकाचा सल्ला विचारला. त्यातला एकजण नेहेमी वेगळ्याप्रकारे विचार करी. त्याचं म्हणणं पडलं की, आपण आत्ता जर इथून निघून गेलो तर तिकडे main center मध्ये आपल्याला लगेच class मध्ये कोंबतील आणि मग आपल्या इथल्या सोयी सुविधांबद्दलच्या तक्रारी, त्याबद्दल काय झालं वगैरे काही कळणार नाही. तसच या प्रकरणाचं काय झालं ते ही समजणार नाही. सुहासला हे पटल्यासारखा दिसलं. सगळ्यांनी तिथेच थांबून सुदर्शनसरांवर दबाव टाकायचं ठरवलं. सरांचा प्रतीनिधी म्हणून अभिजीत तोफेच्या तोंडी होताच. अभिजीतभोवतीच्या सगळ्या खुर्च्या प्रशिक्षणार्ठींनी व्यापून टाकल्या. जे बसले नाहीत ते त्याचभोवती घिरट्या घालू लागले. एवढ्यात अभिजीतला call आला. प्रसादने खूण करून फोन loud वर टाकायला लावला. दोन्हीही बाजूंनी अभिजीतची कोंडी केली जात होती. पण आपण काही गुन्हा केलेला नाही हे मनाशी घोकत अभिजीत या सगळ्या घटना स्मरणात ठेवत होता. तिकडून सुदर्शनजी बोलते झाले,  

"abhijt i have informed police. let them investigate without hinderance. you come here immediately." अभिजीतही लगेच jerkin चढवू लागला. 

"मास्तर, कुठे चालला?  हललात तर याद राखा!." सुहास.

" बरं. ठीक आहे. संस्थेचा प्रतीनिधी म्हणून इथे कोणीतरी हवच नाहीतरी. सरांना कळवतो तसं." 

"ए जय, मास्तरचा मोबाइल ताब्यात घे रे. ......अरे ताब्यात घे, खिशात नाही. तिथेच ठेव टेबलवर." सुहास म्हणाला. अभिजीतसमोर जयच्या शेजारी बसलेल्या जाईने अभिजितचा मोबाइल जय कडून घेऊन तिच्या स्वतःच्या पुढ्यात ठेवला. हे छोटे छोटे डाव थंड डोक्याच्या अभिजीतला समजत होते. सध्या तो कोणालाही विरोध करणार नव्हता. मग जय, जाई आणि धिप्पाड सुजीतला अभिजीत वर लक्ष ठेवायला सांगून सुहास, प्रसाद, सारंग, विनायक, रमणी, मीनाक्षी हा त्याचा नेहेमीचा कंपू घेऊन विरुद्ध म्हणजे अग्नेय कोपर्‍यात गेला व काहीतरी गुप्त खलबतं झाली.अगदि थोड्या वेळात पण बरेच कृतीशील निर्णय घेतले असावेत. सगळेजण निघून प्रवेशद्वाराजवळ अभिजीतच्या टेबलासमोर आले. विनायक आणि रमणी बॅग आणि हेलमेट घेऊन मेन ब्रांचकडे तडक निघाले. ते तिथे काय चाललंय त्यावर लक्ष ठेवणार होते, तसंच त्यांच्या शिबिराच्या होणार्‍या हेळसांडीबद्दल सुदर्शांजींना भंडावून सोडायचंही त्यांनी ठरवलं होतं. मूळ उद्देश हा होता की ते तिथे असतील तर त्यांना तिथेच डांबून ठेवायचं. सारंग कोणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होता. 

"सुहास, अण्णासाहेब फोन उचलत नाहीत, मी प्रत्यक्ष जाऊन येतो बंगल्यावर. जवळच आहे." सारंग म्हणाला. 

"रंग्या, फोन लागला नाही, प्रत्यक्ष भेट तरी मिळणार आहे का नक्की? नाहीतर backup तयार करावा लागेल मला." सुहास. 

"बस क्या भिडू, इतनाही पेहेचाना मेरे को? काम चोख करून येईन. या शनिवारी बसू रात्री सगळे अण्णासाहेबाच्या farm house वर!"

हे सगळे गेल्यावरही सुहासच्या सल्ला मसलती चालूच होत्या. 

एव्हड्यात दोन कॉंस्टेबल आले. त्यांनी सगळी पहाणी केली. बरोबरच्या फोटोग्राफरने सगळीकडे फ्लॅश मारले. पोलिसांनी तरुणांच्या कंपुला काही प्रश्न विचारले. आपसात काही चर्चा केली. आणि मोर्चा थेट अभिजीतकडे वळवला. चला उठा सर. सर ना तुम्ही. नाश्ता केला असेल तर बरं, नाहीतर आता खाणं कधी आणि कसं मिळेल ते काही सांगता येत नाही." 

"ते जे काय माझ्या नशिबात असेल ते होईल. तुम्हाला विडी-काडी करायची असेल तर खालून करून या. माझ्या संस्थेचा मी इथे एकटाच प्रतीनिधी आहे. दुसरं कोणी आल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आणि वारंट दाखवा" 

याचे हात वरपर्यंत पोहोचले आहेत की काय अशी एक शंका कॉंस्टेबलच्या मनालाही शिवून गेली असावी. पण तो ही बारा गावचं पाणी पिऊन निब्बर होता, 

"ए चल गुमान. अटक करत नाहीये. चौकशीला घेऊन जातोय."   

"चौकशी? करा इथेच. विचाराल ते सांगतो."  

"आधीची नोकरी भांडण करून सोडून आला. आता १५-२० लाखांचा माल चोरतो आणि वर मला अक्कल शिकवतो होय रे.. " 

"सुजीत, सुहास अरे फोटोग्राफरकडून आपल्यासाठी या साहेबांचा फोटो काढून घ्या. बघा ना, यांनी अशीही माणसं पहिली आहेत जी १५-२० लाखांचा दरोडा टाकतात आणि मग पोलिसांकडून पकडून घ्यायला तिथेच ठिय्या देतात." जाई म्हणाली. यावर सगळे प्रशिक्षणार्थी हसले. "होय हो मास्तर, किल्ल्या असतांना दरवाजा तोडायचे कष्ट का घेतले हो तुम्ही?" सुजीत म्हणाला. परत सगळे हसले. अरे बापरे, हा एकटा नाही तर? असं कॉन्स्टेबलला क्षणभर वाटलं. 

"ए तुम्ही साले दुतोंडी. तुम्हीच सुदर्शनसरकडे तक्रार केली ना? अन आता काय हे विपरीत?" 

"आम्ही मास्तरबद्दल?. छ्या बुवा. आमची या मास्तरबद्दल काही तक्रार नाही आणि तुम्ही त्यांना नेलं तरी आमचं काही बिघडत नाही साहेब. पण नवल वाटलं ते बोलले."

"आम्ही सुदर्शनकडे सुदर्शनबद्दलच तक्रार केली आहे." प्रसाद म्हणाला. 

आता कॉन्स्टेबल थोडा विचार करू लागला. सुदर्शनजिंकडे या मुलांनी समन्वयकाची तक्रार केली असं सांगितल्याने त्याचे आणि सुदर्शनजींचे पत्ते उघडे पडले होते.  कॉन्स्टेबल अभिजीतला उचलून नेतोय याला ३०-३५ तरुण मुलं साक्षीदार असणार होती. प्रकरण अंगाशी तर येणार नाही? एवढ्यात कॉन्स्टेबलचा वॉकी ठणाणला. 

"yes sir" कॉन्स्टेबल ढोलपेने फोनवर सल्युट मारला म्हणजे त्याचा कोणी वरिष्ठ होता. "हो सर. इथेच आलोय. इथल्या समन्वयकाला घेऊन येतोय थेट."  ढोलपे इतरांपासून दूर जात दारात बाहेर तोंड काढत म्हणाले.

"त्याला विचारायचे प्रश्न तिथेच विचारा आणि सोडून द्या." 

"साहेब, पानसरे आणि सुदर्शनजींबरोबर परवाच्या मीटिंग मध्ये तुम्हीच तर त्याला पळून जातांना पकडायला सांगितलं होतं ना...."  

"पळून जातांना पकडलाय का तुम्ही त्याला?"

"साहेब, सुदर्शनजींनी दिलेल्या गाडीवर आम्ही नजर ठेवून दबा धरून बसलेलो पण तो आलाच नाही गाडीकडे. तुम्ही ९ च्या आत कामगिरी आटोपायला सांगीतलेली. वेळ जवळ आली म्हणून आम्हीच वरती आलो."

"म्हणजे पळून जातांना पकडला नाही ना? उगीच वाद घालू नका ढोलपे. त्या समन्वयकाने आणखी मोठ्या माशाला संपर्क केला आहे. समन्वयकाचं नाव अभिजीतच ना?"  

"हो साहेब अभिजीत. पण त्याने कोणाला कॉनटॅक्ट केला नाही. त्याचा फोन आधीपासूनच ताब्यात घेतलेला आहे...."   

"ढोलपे, आमदार साहेबाचा आदेश आला आहे. तो त्यांचा माणूस आहे. जरा लाज ठेवा आपली तिथे.  no more questions. just follow the orders." 

फोन संपतोय तोच दार अडवून उभ्या असलेल्या ढोलपेंना excuse me म्हणत सारंग आत आला. ढोलपेंनी आधी वॉकीला सल्युट केला. फोनआधी अभिजीतची वैयक्तिक तपासणी करायच्या नावाने हिसकावून घेतलेलं लायसेंस, आय-कार्ड, किल्ल्यांचा जुडगा वगैरे आणि मोबाइलही त्यांनी अभिजीतला परत केला. व ते स्वतः अभिजीतचा reliever येइतो तिथेच थांबणार आहेत असं त्यांनी सांगितलं. 

सुहासने अग्नेय कोपर्‍यात जाऊन सुदर्शांजींना फोन लावला. सगळे प्रशिक्षणार्थी तावातावाने त्यांना झापत होते. शिबिराचे पैसे परत मागत होते. सुदर्शांजींनी त्यांना मुख्य केंद्रात येऊन आजची लेक्चर्स करून मग चर्चा करू अशी सारवासारव केली, ती त्यांनी मान्य केली. ते सगळे तिथून निघून गेले आणि अभिजीतचा reliever अवतरला. त्याने अभिजीतकडून किल्ल्यांचा जुडगा ताब्यात घेतला आणि सुदर्शांजींनी त्याला मुख्य केंद्रात बोलवल्याचं सांगितलं. ढोलपेंनी किल्ली हस्तांतरणाची नोंद करून दोघांची स्वाक्षरी घेतली आणि अभिजीतला जाऊ दिलं.

सुदर्शनजींचे डोळे आग ओकत होते. अभिजीतवर उगीच विश्वास ठेवला, मराठी माणूस कामाचाच नाही वगैरे गरळ ओकत त्यांनी त्याला त्या महिन्याच्या पूर्ण पगाराचा धनादेश दिला आणि आजचा दिवस शेवटचा म्हणून सांगितलं. अभिजीत याविरुद्ध भांडू शकत होता. पण आजचं कुभांड झाल्यावर त्याला काम करणं शक्य होणार नव्हतं. कोणी आणि काय केलं असावं हे जुजबी कळल्याशिवाय किंवा त्याबद्दल खात्रीशीर तर्क बांधता आल्याशिवाय यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे ठरवणं मूर्खपणा झाला असता. आणि ज्याच्या गाठीला १ महिना पुरेल एव्हडेही पैसे नाहीत तो कोणाकोणाचा सामना किती दिवस करू शकणार होता? हा ही विचार त्याच्या मनात होता. 

संध्याकाळी सुहासच्या बॅचचे सगळे प्रशिक्षणार्थी त्या दिवशीची lectures आटोपून सुदर्शनजींसमोर चर्चेला बसले. संगणक नीट चालत नाहीत, सगळ्या संगांनाकांना power backup नाही, शिकवणारे सगळेच नवागत आहेत, job guaranty चं काय वगैरे अनेक मुद्दे होते त्यांचे. शेवटी सुदर्शनजी course fee २0% कमी करायला तयार झाले. तसंच अननुभवी अभिजीतला काढून टाकलं असल्याचं त्यांनी जाहीर केलं. याचा परिणाम उलटाच झाला. तरुणांना तोच प्रशिक्षक म्हणून हवा होता! उलट त्याला आणखी languages द्याव्या असं त्यांचं मत होतं. जोपर्यंत अभिजीत परत येत नाही तोपर्यंत ते सगळे classes वर बहिष्कार टाकणार अशी एक टूम निघाली. आता प्रकरण हाताबाहेर चालल्याची जाणीव सुदर्शांजींना होऊ लागली. त्यांनी त्या तरुणांना वेळ निभावून नेण्यापुरतं आश्वासन दिलं आणि पाठवणी केली. तरुणही तयारीचे होते. पुढच्या दिवशी ते कोणीही येणार नव्हते. तो दिवस अभिजीतला परत आणायला म्हणून मोकळा केला होता त्यांनी. सरांनी अभिजीतला एसएमएस पाठवून चर्चेला बोलावून घेतले. अभिजीत आधी परत रुजू व्हायला नाही म्हणाला तशी त्याचा पगार दुप्पट करतो म्हणाले. अभिजीतने प्रस्ताव ठेवला की दरोड्याच्या चौकशीतून पूर्ण सुटका होणार असेल आणि सरांचा त्याच्यावर आळ नाही असं ते लिहून देणार असतील तर तो येईल. सुदर्शनजी म्हणाले की ते तर आता करावच लागेल. पण अभिजीत पुण्यात थांबला तर त्याच्या careerला असेच धोके निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं. हे काही अभिजीतला आवडलं नाही. म्हणून तो परत रुजू होण्याचा अंतिम निर्णय रात्री ९ वाजेपर्यंत सांगतो म्हणून सरांना टांगतं ठेवून तिथून निघून गेला. 


दुपारी बराच विचार करून त्याने सुहासला फोन लावला आणि सगळा प्रसंग सांगितला. सुहासने त्याला स्वतःच्या खोलीवर बोलावून घेतलं. मग तिथे संयुक्त रणनीती ठरली. या batchचे प्रतीनिधी आणि अभिजीत सरांना भेटायला गेले. शेवटी तह झाला. सुदर्शनजींची आर्थिक स्थिति तंगीची असल्याने ते course fee परत करू शकणार नाहीत, हे माहीत असल्याचं प्रशिक्षणार्थिंनी त्यांना लक्षात आणून दिलं. त्यावर असं ठरलं की, litkon biotech ची नवीन ERP बॅच ज्यासाठी ती नवी शाखा सुरू केली होती ती रद्द करून त्याचा उरलेला निधि आहेत त्या batch ना कबुल केलेल्या उत्तम दर्जाच्या संगणकांसह व अन्य सुविधांसह देण्यासाठी वापरला जाईल. सुदर्शनजी त्यांना सगळ्यांना नोकरी लावून देतील तर त्यांची कोणतीही तक्रार असणार नाही. अभिजीत दुप्पट पगारावर फक्त ही batch प्रशिक्षित करण्यापुरता पुन्हा रुजू होणार होता. तो आणखी एक language ही शिकवणार होता. सुदर्शनजी त्याला ही batch संपल्यावर हैदराबादला मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवून देणार होते! अर्थातच त्यानंतर त्यांचं दिवाळं निघणार असल्याने पुढच्या शिबिरांच्या सगळ्या जाहिराती त्वरित उतरवल्या गेल्या. व ती जागाही विकायचा फलक सुदर्शनजींनी लावून टाकला.

अभिजीतला आता हे सुभाषित लक्षात ठेवणं आवश्यक होतं:

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । 

प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

बंब्याचं अधःपतन!

 "सौख्यकारी दुःखहारि दूतवैष्णव गायका..."

खरे आजोबांचा नित्य-पाठ लगबगीने चाललेला. १० वाजून २० मिनिटं झालेली. आजोबा दोनशे उंबरठे असलेल्या  वरूण लेकफ्रंट सोसायटीमधे ब विभागात चवथ्या मजल्यावर रहायचे. हो, एकटेच. त्यांचा एकुलता एक मुलगा फिलाडेल्फिया ला गेलेला २२ वर्षांपूर्वी. तिकडेच कायमचा स्थायिक. सुरुवातीला ५-६ वर्ष दरवर्षी येऊन भेटून जात असे. नंतर आणखी कमी आणि आता तर पूर्ण संपर्क तुटलेला. आजींनी ईहलोक सोडून १० वर्ष झालेली. आज गृहसंस्थेची आपत्कालीन बैठक १० वाजता बोलावलेली. आजोबा कधीच बैठक चुकवत नसत. आज अंगात कणकण होती. म्हणून उशीर.

तिकडे गच्चीवरच्या पाण्याच्या टाक्यांवर बसून बंब्या आणि कंपू कधी लेकव्ह्यूचा आस्वाद घेत होते तर कधी सगळ्या सदनिकांच्या- बारीक जाळ्या लावून कडेकोट बंद केलेल्या- खिडक्या आणि बाल्कन्यांकडे पहात होते. त्यांच्या चेहेर्यावर भाव सदोदितच मिश्किल असत, त्यामुळे घरांमधून त्यांना बघत असलेल्यांना, तो कंपू आपल्याकडे बघून आपली चेष्टा करतोय असं वाटून ते, आतलेच, खजील होत.

इकडे खाली संस्थेच्या तळघरातल्या बहुउद्देशीय सभागृहात आपात्कालीन सर्वसाधारण बैठक चालू होती. विषय, सभासदांना होणारा बंब्याचा उच्छाद आणि त्यावरील उपायांची अंमलबजावणी. सगळेजण तावातावाने मतं मांडत होते. "काल दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला. त्यांच्या अंगावर उडी मारून, फटकारून त्यांच्या हातातली भाजीची पिशवी घेऊन पळून गेला. त्याचा संयोजन समिती एका आवाजात तीव्र निषेध करते." संस्थासचीव सपकाळे.

"मालक, माणसांना बैठकीला बोलवून बंब्याचा निषेध करताय, इथेच तुमची धम्मक दिसून येते. " चौधरी.

"ओ अ-४२०, ते मालक नाहीत सचीव आहेत. सदस्यांच्या हिताचे सगळे उपाय आमची कमिटी करतच असते. मागे एकदा बंब्याने ४० दारांसामोरून दुधाच्या पिशव्या पळवल्या तेव्हाही मीटिंग घेतली होती. त्यात जोशींनी संगीतलेला लंगूर ड्रेस आणायचा प्रस्ताव आम्ही स्विकारला होता. नाही का?"

"मग, काय झालं त्याचं?"

"काय झालं काय, काय झालं? आपले सेक्युरिटीवाले तो ड्रेस घालून फिरायला नाही म्हणाले. जोशी स्वतः तर पहायलाही तयार नाहीत त्या ड्रेसकडे. तुम्ही घालताय का?"


"तो प्रस्ताव माझा नव्हता. मी एक वेगळंच सांगितलं होतं. पक्या जाळिंदरला बोलवा. तो सापळे लावून पकडून आंध्रच्या जंगलात सोडून येईल सगळ्या शेपटीवाल्यांना. फक्त २ लाख, म्हणजे घरटी २०००.."

" ओ चौ, बसा खाली. बंब्या आणि वाघ्याच्या जमातीतले कुठंही सोडले तरी परत येतात."  खोत म्हणाले.  "तुम्हाला अनुभव आहे वाटतं, परत यायचा..." एक सभासद.

"बरंका ब-००७, ते ही महत्वाचं नाही. पोलिसांना कळलं ना तर पक्याला गरीब म्हणून सोडून देतील आणी मला आणि सचिवांना तेवढं हातकड्या लागतील. गपा तुम्ही." अध्यक्ष.

".... तो तुमचा वैयक्तिक मुद्दा तुम्ही निस्तरा पण मुद्दलातले २००० रुपये आम्ही देणार नाही." एक सदस्य.

"हे बघा, सचीव काहीतरी सांगायचा प्रयत्न करताहेत. आपल्या संहितेप्रमाणे ते बोलत असतांना इतर कोणाला बोलायची परवानगी नाही. पिनड्राॅप पाहिजे." विधि समितीचे कार्यवाह.


"बाकी सगळे उपाय तपासून झाले आहेत. पकडून नेऊन सोडून येणं, लंगूरचा पोशाख घालून सुरक्षा रक्षक फिरवणं, उच्च कंपन उपकरणं बसवणं, वाघासारखे पट्टे अंगावर रंगवलेले कुत्रे पाळणं, लंगूर भाड्याने आणणं, वगैरे. यातले बरेच उपाय कायद्यात बसत नाहीत तर काही कायमस्वरूपी उपयोगी नाहीत तर काही आपल्या आवाक्याबहेरचे आहेत"

"हो हो. ते कंपन उपकरण मी माझ्या घरात बसवलं होतं आणि बंब्या खिडकीतून आल्यावर चालूही केलं ते. पण त्या बंब्याने फक्त कानात बोट घातलं आणि दुसर्या हाताने केळी घेऊन पळून गेला." ब २११ ची पुस्ति.

"म्हणून गेल्या वर्षभरापासून आम्ही सगळ्यांना विनवतोय की बंब्याच्या टोळीला नका खायला देऊ. दाणा-पाणी मिळालं नाही तर फिरकायची नाहीत इकडे. पण लोकं ऐकत नाहीत. हे ब-४११ वाले काळोखे दर शनिवारी फलाहार देतात. रोज संध्याकाळी अ विभागातल्या लिफ्टजवळ चपात्या ठेवलेल्या असतात.."  
"चपात्या नाही फुलके असतात ते" अ-१११ वाल्या फणसे वहिनींनी दाताखाली ओठ चावला.
"म्हणजे तुम्हीच ठेवता तर. तर सर्व सभासदांपुढे प्रस्ताव आहे की या दोन सदनिकांना नियम तोडल्याबद्दल प्रत्येकी २००० दंड ठोठावण्याचा निर्णय ही सभा घेत आहे" सपकाळे उवाच.

"आम्ही दंड भरणार नाही. आम्ही मारूती समजून नैवेद्य देतो."   

"हे म्हणजे बंब्याला पोळी काळोखेला सुळी" 

"मग तुमचा मारुतराया आतापर्यंत तोडलेले आरसे, खाल्लेली फळं, पोहण्याच्या तलावाचं नुकसान भरून  देणाराय का?"

" काय का भगवान्,  मै तो गिलोरी से मारता बंब्या को" 

अनेक जण एकदमच बोलते झाले. एकच हलकल्लोळ. थोड्या वेळाने बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत होतांना, प्रस्तावावर मतदान न होताच सभा बरखास्त झाली. बैठकीला उशिरा पोहोचलेल्या खरे आजोबांनी सगळं बघितलं आणि अतीव विषादाने  ते आल्या पावली माघारी फिरले.


इकडे फणसे जिना चढून तळघरातून वर आले तर समोरच, बॅडमिंटन कोर्टवर, मुलं आणि बापे नेट काढून फूटबाॅल खेळत होते. फणसेंचे चिरंजीव बबलू ही होते त्यात. पप्पाही थोडे रेंगाळले लेकाच्या लाथांमधे किती ताकद आहे ते बघत. एवढ्यात धड् तड् धप्प असा मोठ्ठा आवाज होऊन एक मोठ्ठा ऐवज आकाशातून पडला. तो थेट बबलूच्या अंगावर. बबलू खाली, त्यावर ती वस्तू त्यावर बबलूचा पाठलाग करणारे आणखी दोन खेळाडू गडी!


ती वस्तू क्षणार्धात लंगडत भिंतीकडे गेली, मग आधी भिंतीवर उडी मारून तिथून गृहसंस्थेच्या हद्दिबाहेरच्या झाडावर चढून पसार झाली. तो बंब्या होता. आजूबाजूच्या लोकांनी भानावर आल्यावर आधी बबलूला उठवलं. त्याचा हात कोपरात मोडला होता. त्याला घेऊन सगळे खेळाडू आणि बाबलूचे पप्पा डाॅक्टरकडे गेले. काही बघे वरपासून खालपर्यंत बघत 'नक्की कसं झालं' याचा उहापोह करू लागले. काही जणांनी सचीव सपकाळेंना भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्वरित बॅडमिंटन कोर्टवर यायला सांगितलं.


सचीव, सभा बरखास्त झाल्यावर सुरक्षा कर्मचार्याकडून गच्चिची किल्ली घेऊन काही कामाने गच्चीत गेलेले. गच्चीचा दरवाजा उत्तर दिशेला होता तर कोर्ट दक्षिणेला. लिफ्टने येऊन उत्तरेच्या भिंतीलगत चालता चालता पलिकडल्या गृहसंस्थेच्या उपाध्यक्षाने हाक मारली.

"सपकाळे मी बजावतं तुला, हे आपल्या संस्थांच्या मधलं फाटक उघडं कर की रे. आमच्या वाहनांचा बराच मोठा वळसा वाचंल म्हणतो मी. या महिना अखेरीस पर्यंत वेळ देतो रे तुला. नाहीतर वचन आहे माझं की...."

"यल्लप्पा वचन रहित करा. हो, कारण ते फाटक उघडून मिळणार नाही. त्याच्या समोर आमचा वाॅकिंग ट्रॅकचा काही भाग आहे आणि तुमची वाहनं तिथून जाऊ देणं हा आमच्या सभासदांच्या जिवाशी खेळ होईल. नाही जमणार. क्षमस्व"  

"बघूनच घेतो की रे तुला, निन्नान्ना नोडकोलथिनि"

असं पुटपुटत यल्लप्पा चालता झाला. सपकाळे तरातरा बॅडमिंटन कोर्टवर गेले. तिथल्या प्रत्येकाने व्यक्ती तेवढे दृष्टीकोन या प्रमाणे घडून गेलेला प्रसंग सपकाळेंना कथिला.

"दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला तेव्हा त्याचं वैचारिक अधःपतन झाल्याचं आपल्याला कळालच होतं; आता शारीरिक अधःपतनही झालं आहे" प्राध्यापक वरेरकर नेहमीप्रमाणे पल्लेदार. बंब्या दोन पायावर माणसासारखं पण उघडाबंब उभं राही म्हणून, बंब्याचं बम्ब्याअसं बारसंही त्यांनीच केलेलं.


"गच्चीतून पडलाय तो. अधःपतन वगैरे काही नाही." 

"भगवंतांनी सांगितलंच आहे 'अधो गच्छंति तामसः'. वारेरकरांचं चालूच.


हा संवाद झडत असतांना इकडे सपकाळेंनी स्वतः सगळं निरिक्षण केलं. मग सपकाळे आणि संयोजन समितीने गच्चीवर जाऊन आणि सीसीटीव्ही पाहून निष्कर्श काढला. काळोखेंनी अ- विभागाच्या गच्चीवर बॅडमिंटन कोर्टाच्या वर येणार्या कोपर्यात कठड्यावर बंब्याला नैवेद्य म्हणून आंबे, सफरचंद ठेवली होती. ती खाता खाता बंब्या पडला. याचा  पुरावा म्हणून काळोखेंनी सभेआधी गच्चीची किल्ली घेतल्याची नोंद, गच्चीच्या कठड्यावरवर पडलेली आंब्याची सालं, अर्धवट खाल्लेली फळं आणि बंब्याबरोबर 'अधःपतन' होतांना  दिसलेली फळं वगैरेचा उल्लेख करण्यात आला. गच्चीत सीसीटीव्ही नव्हता, नाहीतर सगळं आपसूक स्पष्ट झालं असतं. लगोलग फणसेंनी त्यांच्या मुलाचा हात मोडायला नैवेद्य ठेवून कारणीभूत झाल्याबद्दल काळोखेंवर पोलिसात तक्रार दिली.


'हवं तिथे चढणार्या, एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीच्या गच्चीत पोहोचलेल्या केबल वरून २००-३०० मीटर्स चालणार्‍या बंब्याचा अधःपात झालाच कसा' या विचाराने काळोखेंनी तो पडतांनाचा कोर्टवरचा सीसीटीव्ही परत परत तपासून पाहिला. बंब्या भिंतीपासून किमान 5 मीटर अंतरावर आणि वरून सरळ उभ्या रेषेत पडला होता. म्हणजे पाडला होता की काय? अशी शंका येऊन काळोखेंनी किल्लीची नोंदवही तपासली. त्यात सभेनंतर सचीव सपकाळेंनी किल्ली घेतल्याची नोंद सापडली होतीच. काळोखेंनी लगेच सदनिकाधारकांच्या व्हाॅट्सअॅप समुहात सपकाळेंवर बंब्याला फेकून बबलूचा हात मोडल्याचं बालंट ठेवलं. सपकाळे म्हणाले की ते कपडे वाळत घालायला गेले होते आणि त्यांनी फेकेपर्यंत बंब्या बघत बसला असता होय?


आता पोलिसांकडे एकमेकांविरोधी तक्रारींचा गठ्ठाच झाला. बबलूचा हात मोडल्याला कारणीभूत म्हणून फणसेंची काळोखेंविरुद्ध, बंब्या आणि टोळीला खायला दिल्याबद्दल सपकाळे आणि मांडकेंची फणसे आणि काळोखेंविरुद्ध, सामाईक गच्चीचा अवैध वैयक्तिक वापर केल्याबद्दल फणसेंची सपकाळेंविरुद्ध, करोना काळात बैठक बोलवल्याबद्दल माजी अध्यक्षाची सपकाळे व मांडकेंविरुद्ध, करोना काळात बॅडमिंटन कोर्टवर एकत्र आल्याबद्दल संयोजन समितीची खेळणार्‍या सर्वांविरुध्द, इत्यादि इत्यादि. 


दोन तीन आठवडे झाले तरी या प्रसंगावरून रणकंदन चाललंच होतं. दरम्यानच्या काळात बंब्या संस्थेत परतला होता. तो आल्यामुळे आता काबूत आले की काय असे वाटत असलेले त्याच्या टोळीचे सदस्य नव्या उत्साहाने कामाला लागले होते. लहान मुलं खेळत असतांना मधेच येऊन त्यांचा क्रिकेटचा, फूटबॉलचा चेंडू घेऊन इकडे तिकडे भिरकावून देणं, बॅडमिंटनचं फूल हवेतल्या हवेल उडी मारून झेलणंआणि मग गच्चीच्या कठड्यावर उभं राहून ते फूल डोक्यावर ठेवून नाचणं वगैरे अनेक प्रकार सुरू होते. मुलं आणि बाया चांगलेच दहशतीत होते. जिकडे तिकडे शेपटीखालचा प्रसादही पाडला जात होता.


ब-३२१ मधले माधव गोळे हे पत्रकार होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यल्लप्पा त्याच्याशी हितसंबंध ठेवून होता. त्यांचा अधूनमधून फोन व्हायचा तसा आजही झाला. गप्पा झाल्या. "मग उद्या काय नवीन बातमी?"

"यलप्पा, उद्या घरगुतीच बातमी आहे..." म्हणत गोळेंनी २-३ आठवड्यांपूर्वीचा प्रसंग आणि पुढची कथा सांगितली.

"अरे माधवा, काय म्हणतो मी. तुला तर पोलिस तक्रारीची बातमी करता येणार ना फक्त. मग थांब की जरा आणखी दोन हफ्ते. वचन आहे रे माझं. आणखी मोठी बातमी देईन रे. त्या फणशाचा भ्रमणध्वनी क्रमांक मात्रं दे रे"  हा फोन संपवून यल्लप्पा लगेच त्या फोनवर लागले. "फणशा, हीतैशि बोलतो की रे. बबलूचा हात तुटला, लई वंगाळ की. काळोखेचा आंबा त्याच्यावर पडून  तुटला का? म्हणतो मी. नाही ना. बंब्याला ढकलले कोणी? अरे तू आणि तो काळोखे एकत्र येऊन बंब्याला ढकलून त्याचा पाय मोडला म्हणून वन्यजीव खाली त्या ढकलणार्‍या मनुष्याला गाडत का नाही म्हणतो मी"


झालं. वन्यजीव संरक्षण कायद्याअन्वये सपकाळे आणि मांडकेंवरोधात तक्रार झाली. लागल्या हाती बंब्याला गिलोरी मारणार्या सलीमचाचाला ही त्यात गोवलं गेलं. सर्व स्थानिक वृत्तपत्रात बातमी आली. गोळेंना ब्रेकिंग न्यूज प्रथम देऊन खप वाढवल्याबद्दल सहसंपादकपदी बढती मिळाली. इकडे सपकाळे आणि मांडकेंवर अनिमल प्रोटेक्शन ब्युरो, एपीबीने खटलाच लावला.


काही आठवडे गेले. सपकाळेंनी ढकललं याला पुरावा मिळत नव्हता. खटल्याचा तपास निरिक्षक पांढरेंकडून पुढे सरकत नाही म्हणून एपीबीने न्यायालयाकरवी निरिक्षक बदलून घेतला. वरूण गृहसंस्थेसमोर निदर्शनं, जाळपोळ, सचीव सपकाळेंचा पुतळा जाळणे वगैरे पण प्रकार झाले.


निरीक्षक पांढरेंनी त्यांचा शाळासवंगडी देवदत्तला सगळं सांगितलं. देवदत्त पत्रकार होता, पण बंगलोरात.


वरूण गृहसंस्थेचं नाव ऐकताच देवदत्तने त्याच्या संपादक साहेबाला विश्वासात घेतलं आणि ही 'स्टोरी कव्हर' करायला म्हणून तो थेट पुण्यात आला, ते ही खरे आजोबांकडे. हो,तो भाचा होता त्यांचा! खरे आजोबांच्या संपर्कात असणारा एकमेव नातेवाईक.

"काय म्हणतोस मामा?" मामांनी आपबीती सांगितली.

त्यांच्याकडे गृहसंस्थेचं दोन महिन्याचं देणं थकित होतं. खजिनदार लोढांनी त्यांना भेटायला बोलावलेलं. आजोबांकडे यावर्षीची गंगाजळी फक्त हातातोंडाची गाठ पडण्याइतपतच होती. निवृत्त होतांना सरकारने अडवलेलं प्रचंड घबाड येत्या वर्षात मिळालं की त्यांना कसली तोषिश रहाणार नव्हती. पण हेच वर्ष निघणं कठीण होतं. भिक्षुकीला आताशा कोणी बोलवत नसे. देवदत्तने त्यांना धीर दिला. मी सगळं आलबेल करूनच इथून जाईन अशी ग्वाही दिली. मग हळूच बंब्याच्या पडण्याचा मुद्दा काढला. खरे आजोबांनी खरे सगळे सांगितले. "हं असं आहे तर सगळं." 

एखादा आठवडाभर देवदत्त जरा तिथे रुळला. काही लोकांशी बोलला. तसा तो पूर्वीही मामाकडे येत असे. पण आता  सद्य परिस्थितीचा अंदाज घेत होता. पुढची रूपरेखा जुजबी तयार झाल्यावर तो कामाला लागला. आधी मोर्चा संयोजन समितीकडे होता. देवदत्त संस्थेचा सभासद नसल्याने त्याने संस्थेबाहेर रस्त्यावर मांडकेंची भेट घेतली व तो पत्रकार आहे आणि मांडकेंना बंब्याच्या प्रकरणातून तो बाहेर काढू शकतो असं छातीठोक सांगितलं. त्या बदल्यात तो ज्या काही परवानग्या मागेल त्या आणि अन्य काही मागण्या मान्य करणे एवढाच परतावा अपेक्षित होता. मांडकेंना ही एक आणखी ब्याद असं आधी वाटलं पण ते नाही न म्हणता तसेच दोलायमान अवस्थेत निघून गेले. देवदत्तला तेवढं पुरे होतं. तो शनिवारी खरे मामांना घेऊन तक्रार निवारण समितीपुढे गेला व मामांना शुल्क भरायला वर्षअखेरपर्यंत मुदत मिळायचा प्रस्ताव ठेवला. खजिनदार लोढांनी साफ धुडकावून लावलं. पुढच्या महिन्यात नाही भरलं तर जनरेटर जोडणी तोडण्यात येईल असं उलट बजावलं. यावर देवदत्तच्या अपेक्षेप्रमाणे अध्यक्ष मांडकेंनी मध्यस्थी केली व मामांचं वय लक्षात घेऊन व अर्थाजनाचं साधन नसल्यामुळे प्रस्ताव स्वीकारायची सुचना केली. लोढांना फारसं रुचलं नाही, पण अध्यक्षांची सुचना बंधनकारक होती.


अध्यक्ष वश झालेले हे आता समजलं होतं. आता त्यांच्याकडून शिफारस करून घेऊन सचीव सपकाळेंना देवदत्तने आपल्या अंमलाखाली आणलं. ते हातकड्या पडणार म्हणून नखशिखांत भयभीत होते. त्यांच्याकडून गच्चीच्या त्या प्रसिद्ध कोपर्याचं निरिक्षण करून छायाचित्रं काढायची परवानगी मिळवण्यात आली. पण तेही बरोबर येणार या अटीवर मिळाली. देवदत्तने ते लगेच मान्य केलं. प्राध्यापक वरेरकर घरी असले की सहसा सज्जात आरामखुर्चित बसून निवांत आकाशाकडे डोळे लावून कसलातरी गहन विचार करत बसत आणि मग गच्चीत निघलेली अशी जत्रा त्यांना विनासायास दिसे. बर्‍याचदा उत्सुकतेपोटी ते ही जात. आताची संधि घालवण्याचा तर प्रश्नच नव्हता!


देवदत्त गच्चीची, गच्चीतून खाली दिसणार्‍या बॅडमिंटन कोर्टाची छायाचित्रं काढत होता आणि मांडके व सपकळे कुतूहलयुक्त प्रश्नचिन्हांकित मुद्रेने त्याच्याकडे बघत होते. येवढ्यात "वैनतेयश्च पक्षिणाम, विभूतीम च जनार्दन" म्हणत प्राध्यापक महोदय गच्चीच्या मांडकेंजवळच्या कठड्याकडे पाहू लागले. मांडके एकदम दचकले. सपकाळेंनी त्यांचा ढळलेला तोल सावरला. त्या आवाज आणि हालचालींनी तो वैनतेय का कोण तो मात्र परागंदा झाला.


"काय हे प्रोफेसर, एक तर चोरपावलांनी आलात. आणि अवांतर व्यत्यय आणताय कामात." 

मांडकेंच्या या हल्ल्यातून वरेरकर वरमतायत तेव्हढ्यात आता सावरायची संधि चक्क देवदत्तने घेतली. "असू दे हो. पाहिजे तर त्यांनाही त्यांच्या लाडक्या विभूतिची दोन छायाचित्रं काढून देतो. साहेब, एक लक्षात ठेवा, सद्यस्थितीत मित्रं वाढवा. लोकांना आपलंसं करा."

गेला बाजार मांडकेंनाही दोन समजुतीच्या गोष्टी सांगून देवदत्तने आपला शेअर आणखी तेजीत आणला. सपकाळे आणि मांडके दोघांनाही त्याचं हे पटलेलं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. वरेरकरांना तर देवदत्तला कुठे ठेवू अन कुठे नाही असं झालं होतं. या वैनतेय वाल्या त्यांच्या वाक्याचा, का कोण जाणे, देवदत्तवर सकारात्मक परिणाम झाला असावा असं वाटत होतं. कारण तोपर्यंत चाचपडून पाहणारा तो आता एकाएकी आत्मविश्वासाने वावरत होता.

  

मग काही वेळ देवदत्त विचार करत हवेतच एकीकडून दुसरीकडे, वरुन खाली वगैरे हातवारे करत राहिला. अचानक एक उसासा टाकून त्याने कॅमेर्याचं झाकण लावलं. तो शहरल्यासारखा वाटत होता. सावलीसारखी साथ दिल्याबद्दल त्याने सपकाळे, मांडकेंचे आभार मानले व फार महत्वाचं निरिक्षण पूर्ण झाल्याचं सांगितलं पण निष्कर्श आणि पुरावा मिळेपर्यंत निरिक्षण गुलदस्त्यात ठेवणंच हितावहं असल्याचं त्यांना पटवलं. तरीही त्यांची मुखकमलं प्रफुल्लित झाल्याचं त्याच्या पारखी नजरेला गावलं होतं. त्यांना काय चाललय ते मात्र काही कळत नव्हतं.


देवदत्त संस्थेच्या समोरच्या विभागीय वाहतूक कार्यालयाजवळ असलेल्या चहावाल्याकडे रोज चहा हाणायला जात असे व वेगवेगळे विषय काढत असे. "साहेब, बरोबर. फारच कालवाकालव झाली रस्त्यावर त्या प्रसंगामुळे. चतुष्पाद बंब्या तर  गेला कुद्या मारत आणि अन हे द्विपाद बसलेत पादत." चहावाला छोट्या उवाच. त्याला जाणवलं की जेव्हा बंब्याच्या विषय निघतो तेव्हा बाजूचा चांभार मिष्किल हसतो. त्याने एकदोनदा पृच्छा केली देखील, पण अप्पा चांभार काही बधत नव्हता. मग एक दिवस निरिक्षक पांढरेंना बोलवून अप्पाला जरा खोपचात घेतलं. तर तो म्हणाला की सगळे बंगलेवाले मानतात तसं बंब्याची टोळी भटकी नाही. त्यांचा डोंबारी २५ किलोमिटर वर जंगलासारख्या भागात रहातो. हे ऐकून दोघंही चाट पडले व तडक तिकडे गेले. तिथे डोंबार्याची पत्नी भेटली. डोंबारी वारल्याला वर्ष लोटलेलं. डोंबार्याच्या व्यवसायाला कायदेशीर बंदी आल्यावर दोन वीत खळगी भरायच्या प्रश्नानं आ वासलेला. खळगी, हो, त्या सगळ्यांची. ते जोडपं, २ मुलं आणि ८ वानरं अशा 12 खळग्या. आता डोंबारणीने बंब्या आणि टोळीला मुक्त केलं होतं. म्हणून सध्या ते भटकत इतक्या दूर गेलेले.


काही दिवसांमधे सर्वत्र बातमी झळकली 'निरीक्षक पांढरेंनी बंब्याच्या टोळीचा २० कोस पाठलाग  करून त्यानी विहिरीत फेकलेल्या वस्तूंचा साठा शोधून काढला.' डोंबारणीला यात न गोवता देवदत्तन व पांढरेंनी तिला वरूण गृहसंस्थेत झाडलोट व देखभालीसाठी शिफारस करून उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. पांढरेंप्रमाणे नवीन निरिक्षकाकडूनही तपासात वेगळी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे त्या वस्तू तपासाला याच प्रकरणसंबंधातली प्रगति मानून पांढरेंची बंब्याच्या अधःपतन प्रकरणावर पुनर्नियुक्ती करण्यात आली.


आता देवदत्तला सगळं प्रकरण लख्खं उमजलं होतं. पुराव्याचा सापळा लावणं फक्त बाकी होतं. परत सपकाळे आणि मांडकेंवर जुगार लागला. "मांडके साहेब एक शेवटची विनंती. तुम्ही खरेमामांकडून गृहसंस्थेची शांत करून घ्या. येत्या शनिवारी. शांत गच्चीत होईल. "   

"चल पळ. मी पूर्ण नास्तिक आहे. ही थेरं खपवून नाही घेणार." 

लोढांनी बदला घ्यायची ही संधी साधली. "सपकाळे, तुम्ही पूर्णच फसला आहात. सगळे मार्ग खुंटले आहेत. एपीबीवाले हातकड्या घेऊन ऊभेच आहेत. एक शांतही करून टाका, बघा दैव साथ देतय का".

देवदत्त म्हणाला "फक्त १२०००. शांत झाल्यावर महिन्यात तुम्ही सुटलेले असाल."


वाटाघाटी होऊन शेवटी दोन आठवड्यांनंतरच्या शनिवारी पूजा ठरली. डोंबारिण आता जरी बंब्या आणि टोळीला सांभाळत नसली तरी तिने बोलावलं तर टोळकं येणार हे देवदत्तला लक्षात आलं. तीच्याशी बोलल्यावर तिने पांगळ्या बंब्याऐवजी बाज्याला त्या शनिवारी सकाळी 9 वाजेनंतर वरूण गृहसंस्थेत बोलवायचं मान्य केलं. सपकाळेंना सांगून बॅडमिंटन कोर्टवर घालायच्या गवताच्या अतिरिक्त लाद्या आणून अ विभागाच्या गच्चीच्या त्या सुप्रसिद्ध कोपर्याच्या कठड्यावर ठेवण्यात आल्या. सकाळी सहाला खरे मामांनी ब-विभागाच्या गच्चीत पूजा मांडली. पूजा चालू असेपर्यंत सपकाळे, मांडके, लोढा, खरे मामा, वरेरकर आणि देवदत्त याशिवाय कोणीही नव्हतं. नऊ -सव्वानऊला पूजा संपवून खरे मामा इतरांना घेऊन ब विभागातून अ विभागातल्या कोपर्यात आले. त्या गवताच्या लाद्यांभोवती कमंडलूतलं उदक् फिरवून सगळ्यांनी मिळून लाद्या ढकलून दिल्या. मग त्याच जागी काठड्यावर खरे मामांनी आंब्याचा नैवेद्य ठेवला. मग सगळे जण निघून गच्चीतून खाली खरे मामांच्या घरी येऊन बसले. देवदत्तचे कॅमेरे गच्चीत सज्ज होते. थोडा फलाहार, तीर्थ, बासुंदी प्राशन झालं. मग दहाच्या सुमारास देवदत्त बाहेर येऊन आकाश निरखू लागला. एक दहाच मिनिटांमधे त्याने इशारा करताच डोंबारिण बाज्याला अ- विभागाच्या गच्चीच्या दाराशी सोडून परत खाली आली.

तेवढ्या वेळात देवदत्त आणि चमू कोर्टच्या बाजूला मोक्याच्या जागा पकडून बसले होते. इतर अनेक लोक बाल्कनी, उंबरठ्यात येऊन कोर्टकडे बघत होते. वर गच्चीत काय फिल्डिंग लावली आहे ते इतर कोणाला माहीत नव्हतं. पाच-सहा मिनिटांमधेच धड धडाड् धप्प. बाज्या वरून सरळ उभ्या रेषेत खाली गवताच्या लाद्यांवर आपटला व पळत भिंतीकडे गेला. मग भिंतीवरून उड्या मारून हद्दीबाहेरच्या झाडावर चढून लुप्त झाला.


सगळे डोळे विस्फारून आ वासून बघतच राहिले. हे रिवाइंड केल्याप्रमाणे घडत होतं!


पुढच्या रविवारी डीएसपी स्वतः वरूण बहुउद्देशिय सभागृहात स्टेजवर होते. देवदत्तने काढलेली चित्रफित ते दाखवणार होते. त्याआधी त्यांनी छोटंसं भाषण केलं. "बंब्याचं अधःपतन झालं कसं याचा सुगावा आम्हाला देवदत्तने मिळवून दिला आहे. पण ही चित्रफित काही मूळ प्रसंगाची नाही. त्यामुळे दोन अटिंवर आम्ही हा सुगावा मान्य करू. एक अट ही की, या प्रसंगातून उद्भवलेल्या तुमच्या आपसातल्या सर्व पोलिस तक्रारी तुम्ही मागे घ्याल आणि दुसरी ही की बंब्या आणि टोळीला कोणीही खायला घालणार नाही. तसं आत्ताच लिहून द्यावं लागेल."

सगळ्यांनी मान्य केलं. एकंदर प्रसंगाच्या दबावामुळे म्हणा किंवा थोडीफार उपरति झाल्यामुळे म्हणा काळोखे आणि फणसे ही खायला न घालायला तयार झाले. डीएसपिंनी एपीबी खटला मागे घेईल अशी ग्वाही दिली. खरे आजोबा, मांडके-सपकाळे आणि निरीक्षक पांढरेही देवदत्तकडे अतिशय कृतज्ञतेने बघत होते.

"वन विभाग बंब्या आणि टोळीबद्दल काय तो निर्णय घेईल. तोपर्यंत डोंबारणीला इथे रखरखावाच्या कामाला लावलं आहे. ती सर्व सदनिकांमधलं आणि समोरच्या बेकरीतलं उरलं सुरलं अन्न या संस्थेपासून चारशे मीटर दूर एका नियोजित जागी जाऊन बंब्याच्या टोळीला खाऊ घालेल व त्यांना इथून दूर ठेवेल. तसंच गेले काही दिवस संस्थेच्या दक्षिण भिंतीलगत सर्प सापडायचे ते का त्याचंही उत्तर या चित्रफितीत आहे. पण ह्या सगळ्याला कारणीभूत बंब्या आणि ती आसमानी शक्ति हे खलनायक नसून नायक आहेत. त्या शक्तिमुळे बंब्या आणि टोळीवर बराच वचक होता. खलनायक तर आपण माणसं. आपण वन्यपशूंचा रहिवास मोडून आपली वस्ति केली, म्हणून नाईलाजाने ते आपल्या कच्छपि लागतात. कोणीही त्यांना मारू नका, द्वेश करू नका."


मग चित्रफित सुरू करण्यात आली. यात आधी उभ्या पाईपांच्या घळीमधे त्या प्रसिद्ध कोपर्‍याखाली लपलेलं एक घरटं दाखवण्यात आलं. नंतरचं दृष्य होतं ते, ती वैनतेय का कोण ती, सर्प घेऊन त्या घरट्याभोवती घिरट्या घालत असल्याचं. मग चित्रफितिचा नायक बाज्या आला. बाज्या, खरे आजोबांनी पूजेनंतर कठड्यावर ठेवलेले आंबे खायला कठद्यावर चढला. बरोब्बर त्या खळगितल्या घरट्याच्या वरती होता तो. अचानक दोन दमदार पंजे बाज्याच्या मस्तकावर आवळले गेले.. त्या पंजांना वर रूंद आणि लांब पंखही होते. बाज्या त्या पंजांमध्ये उचलला गेला. मग त्याच्या प्रतिकारामुळे म्हणा किंवा त्या पंजांना बाज्याचं वजन पेललं नाही म्हणून, तो थेट खाली बॅडमिंटन कोर्टवर पडला. अगदि अस्संच झालं होतं बंब्याचं अधःपतन!


आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...