शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

बंब्याचं अधःपतन!

 "सौख्यकारी दुःखहारि दूतवैष्णव गायका..."

खरे आजोबांचा नित्य-पाठ लगबगीने चाललेला. १० वाजून २० मिनिटं झालेली. आजोबा दोनशे उंबरठे असलेल्या  वरूण लेकफ्रंट सोसायटीमधे ब विभागात चवथ्या मजल्यावर रहायचे. हो, एकटेच. त्यांचा एकुलता एक मुलगा फिलाडेल्फिया ला गेलेला २२ वर्षांपूर्वी. तिकडेच कायमचा स्थायिक. सुरुवातीला ५-६ वर्ष दरवर्षी येऊन भेटून जात असे. नंतर आणखी कमी आणि आता तर पूर्ण संपर्क तुटलेला. आजींनी ईहलोक सोडून १० वर्ष झालेली. आज गृहसंस्थेची आपत्कालीन बैठक १० वाजता बोलावलेली. आजोबा कधीच बैठक चुकवत नसत. आज अंगात कणकण होती. म्हणून उशीर.

तिकडे गच्चीवरच्या पाण्याच्या टाक्यांवर बसून बंब्या आणि कंपू कधी लेकव्ह्यूचा आस्वाद घेत होते तर कधी सगळ्या सदनिकांच्या- बारीक जाळ्या लावून कडेकोट बंद केलेल्या- खिडक्या आणि बाल्कन्यांकडे पहात होते. त्यांच्या चेहेर्यावर भाव सदोदितच मिश्किल असत, त्यामुळे घरांमधून त्यांना बघत असलेल्यांना, तो कंपू आपल्याकडे बघून आपली चेष्टा करतोय असं वाटून ते, आतलेच, खजील होत.

इकडे खाली संस्थेच्या तळघरातल्या बहुउद्देशीय सभागृहात आपात्कालीन सर्वसाधारण बैठक चालू होती. विषय, सभासदांना होणारा बंब्याचा उच्छाद आणि त्यावरील उपायांची अंमलबजावणी. सगळेजण तावातावाने मतं मांडत होते. "काल दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला. त्यांच्या अंगावर उडी मारून, फटकारून त्यांच्या हातातली भाजीची पिशवी घेऊन पळून गेला. त्याचा संयोजन समिती एका आवाजात तीव्र निषेध करते." संस्थासचीव सपकाळे.

"मालक, माणसांना बैठकीला बोलवून बंब्याचा निषेध करताय, इथेच तुमची धम्मक दिसून येते. " चौधरी.

"ओ अ-४२०, ते मालक नाहीत सचीव आहेत. सदस्यांच्या हिताचे सगळे उपाय आमची कमिटी करतच असते. मागे एकदा बंब्याने ४० दारांसामोरून दुधाच्या पिशव्या पळवल्या तेव्हाही मीटिंग घेतली होती. त्यात जोशींनी संगीतलेला लंगूर ड्रेस आणायचा प्रस्ताव आम्ही स्विकारला होता. नाही का?"

"मग, काय झालं त्याचं?"

"काय झालं काय, काय झालं? आपले सेक्युरिटीवाले तो ड्रेस घालून फिरायला नाही म्हणाले. जोशी स्वतः तर पहायलाही तयार नाहीत त्या ड्रेसकडे. तुम्ही घालताय का?"


"तो प्रस्ताव माझा नव्हता. मी एक वेगळंच सांगितलं होतं. पक्या जाळिंदरला बोलवा. तो सापळे लावून पकडून आंध्रच्या जंगलात सोडून येईल सगळ्या शेपटीवाल्यांना. फक्त २ लाख, म्हणजे घरटी २०००.."

" ओ चौ, बसा खाली. बंब्या आणि वाघ्याच्या जमातीतले कुठंही सोडले तरी परत येतात."  खोत म्हणाले.  "तुम्हाला अनुभव आहे वाटतं, परत यायचा..." एक सभासद.

"बरंका ब-००७, ते ही महत्वाचं नाही. पोलिसांना कळलं ना तर पक्याला गरीब म्हणून सोडून देतील आणी मला आणि सचिवांना तेवढं हातकड्या लागतील. गपा तुम्ही." अध्यक्ष.

".... तो तुमचा वैयक्तिक मुद्दा तुम्ही निस्तरा पण मुद्दलातले २००० रुपये आम्ही देणार नाही." एक सदस्य.

"हे बघा, सचीव काहीतरी सांगायचा प्रयत्न करताहेत. आपल्या संहितेप्रमाणे ते बोलत असतांना इतर कोणाला बोलायची परवानगी नाही. पिनड्राॅप पाहिजे." विधि समितीचे कार्यवाह.


"बाकी सगळे उपाय तपासून झाले आहेत. पकडून नेऊन सोडून येणं, लंगूरचा पोशाख घालून सुरक्षा रक्षक फिरवणं, उच्च कंपन उपकरणं बसवणं, वाघासारखे पट्टे अंगावर रंगवलेले कुत्रे पाळणं, लंगूर भाड्याने आणणं, वगैरे. यातले बरेच उपाय कायद्यात बसत नाहीत तर काही कायमस्वरूपी उपयोगी नाहीत तर काही आपल्या आवाक्याबहेरचे आहेत"

"हो हो. ते कंपन उपकरण मी माझ्या घरात बसवलं होतं आणि बंब्या खिडकीतून आल्यावर चालूही केलं ते. पण त्या बंब्याने फक्त कानात बोट घातलं आणि दुसर्या हाताने केळी घेऊन पळून गेला." ब २११ ची पुस्ति.

"म्हणून गेल्या वर्षभरापासून आम्ही सगळ्यांना विनवतोय की बंब्याच्या टोळीला नका खायला देऊ. दाणा-पाणी मिळालं नाही तर फिरकायची नाहीत इकडे. पण लोकं ऐकत नाहीत. हे ब-४११ वाले काळोखे दर शनिवारी फलाहार देतात. रोज संध्याकाळी अ विभागातल्या लिफ्टजवळ चपात्या ठेवलेल्या असतात.."  
"चपात्या नाही फुलके असतात ते" अ-१११ वाल्या फणसे वहिनींनी दाताखाली ओठ चावला.
"म्हणजे तुम्हीच ठेवता तर. तर सर्व सभासदांपुढे प्रस्ताव आहे की या दोन सदनिकांना नियम तोडल्याबद्दल प्रत्येकी २००० दंड ठोठावण्याचा निर्णय ही सभा घेत आहे" सपकाळे उवाच.

"आम्ही दंड भरणार नाही. आम्ही मारूती समजून नैवेद्य देतो."   

"हे म्हणजे बंब्याला पोळी काळोखेला सुळी" 

"मग तुमचा मारुतराया आतापर्यंत तोडलेले आरसे, खाल्लेली फळं, पोहण्याच्या तलावाचं नुकसान भरून  देणाराय का?"

" काय का भगवान्,  मै तो गिलोरी से मारता बंब्या को" 

अनेक जण एकदमच बोलते झाले. एकच हलकल्लोळ. थोड्या वेळाने बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत होतांना, प्रस्तावावर मतदान न होताच सभा बरखास्त झाली. बैठकीला उशिरा पोहोचलेल्या खरे आजोबांनी सगळं बघितलं आणि अतीव विषादाने  ते आल्या पावली माघारी फिरले.


इकडे फणसे जिना चढून तळघरातून वर आले तर समोरच, बॅडमिंटन कोर्टवर, मुलं आणि बापे नेट काढून फूटबाॅल खेळत होते. फणसेंचे चिरंजीव बबलू ही होते त्यात. पप्पाही थोडे रेंगाळले लेकाच्या लाथांमधे किती ताकद आहे ते बघत. एवढ्यात धड् तड् धप्प असा मोठ्ठा आवाज होऊन एक मोठ्ठा ऐवज आकाशातून पडला. तो थेट बबलूच्या अंगावर. बबलू खाली, त्यावर ती वस्तू त्यावर बबलूचा पाठलाग करणारे आणखी दोन खेळाडू गडी!


ती वस्तू क्षणार्धात लंगडत भिंतीकडे गेली, मग आधी भिंतीवर उडी मारून तिथून गृहसंस्थेच्या हद्दिबाहेरच्या झाडावर चढून पसार झाली. तो बंब्या होता. आजूबाजूच्या लोकांनी भानावर आल्यावर आधी बबलूला उठवलं. त्याचा हात कोपरात मोडला होता. त्याला घेऊन सगळे खेळाडू आणि बाबलूचे पप्पा डाॅक्टरकडे गेले. काही बघे वरपासून खालपर्यंत बघत 'नक्की कसं झालं' याचा उहापोह करू लागले. काही जणांनी सचीव सपकाळेंना भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्वरित बॅडमिंटन कोर्टवर यायला सांगितलं.


सचीव, सभा बरखास्त झाल्यावर सुरक्षा कर्मचार्याकडून गच्चिची किल्ली घेऊन काही कामाने गच्चीत गेलेले. गच्चीचा दरवाजा उत्तर दिशेला होता तर कोर्ट दक्षिणेला. लिफ्टने येऊन उत्तरेच्या भिंतीलगत चालता चालता पलिकडल्या गृहसंस्थेच्या उपाध्यक्षाने हाक मारली.

"सपकाळे मी बजावतं तुला, हे आपल्या संस्थांच्या मधलं फाटक उघडं कर की रे. आमच्या वाहनांचा बराच मोठा वळसा वाचंल म्हणतो मी. या महिना अखेरीस पर्यंत वेळ देतो रे तुला. नाहीतर वचन आहे माझं की...."

"यल्लप्पा वचन रहित करा. हो, कारण ते फाटक उघडून मिळणार नाही. त्याच्या समोर आमचा वाॅकिंग ट्रॅकचा काही भाग आहे आणि तुमची वाहनं तिथून जाऊ देणं हा आमच्या सभासदांच्या जिवाशी खेळ होईल. नाही जमणार. क्षमस्व"  

"बघूनच घेतो की रे तुला, निन्नान्ना नोडकोलथिनि"

असं पुटपुटत यल्लप्पा चालता झाला. सपकाळे तरातरा बॅडमिंटन कोर्टवर गेले. तिथल्या प्रत्येकाने व्यक्ती तेवढे दृष्टीकोन या प्रमाणे घडून गेलेला प्रसंग सपकाळेंना कथिला.

"दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला तेव्हा त्याचं वैचारिक अधःपतन झाल्याचं आपल्याला कळालच होतं; आता शारीरिक अधःपतनही झालं आहे" प्राध्यापक वरेरकर नेहमीप्रमाणे पल्लेदार. बंब्या दोन पायावर माणसासारखं पण उघडाबंब उभं राही म्हणून, बंब्याचं बम्ब्याअसं बारसंही त्यांनीच केलेलं.


"गच्चीतून पडलाय तो. अधःपतन वगैरे काही नाही." 

"भगवंतांनी सांगितलंच आहे 'अधो गच्छंति तामसः'. वारेरकरांचं चालूच.


हा संवाद झडत असतांना इकडे सपकाळेंनी स्वतः सगळं निरिक्षण केलं. मग सपकाळे आणि संयोजन समितीने गच्चीवर जाऊन आणि सीसीटीव्ही पाहून निष्कर्श काढला. काळोखेंनी अ- विभागाच्या गच्चीवर बॅडमिंटन कोर्टाच्या वर येणार्या कोपर्यात कठड्यावर बंब्याला नैवेद्य म्हणून आंबे, सफरचंद ठेवली होती. ती खाता खाता बंब्या पडला. याचा  पुरावा म्हणून काळोखेंनी सभेआधी गच्चीची किल्ली घेतल्याची नोंद, गच्चीच्या कठड्यावरवर पडलेली आंब्याची सालं, अर्धवट खाल्लेली फळं आणि बंब्याबरोबर 'अधःपतन' होतांना  दिसलेली फळं वगैरेचा उल्लेख करण्यात आला. गच्चीत सीसीटीव्ही नव्हता, नाहीतर सगळं आपसूक स्पष्ट झालं असतं. लगोलग फणसेंनी त्यांच्या मुलाचा हात मोडायला नैवेद्य ठेवून कारणीभूत झाल्याबद्दल काळोखेंवर पोलिसात तक्रार दिली.


'हवं तिथे चढणार्या, एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीच्या गच्चीत पोहोचलेल्या केबल वरून २००-३०० मीटर्स चालणार्‍या बंब्याचा अधःपात झालाच कसा' या विचाराने काळोखेंनी तो पडतांनाचा कोर्टवरचा सीसीटीव्ही परत परत तपासून पाहिला. बंब्या भिंतीपासून किमान 5 मीटर अंतरावर आणि वरून सरळ उभ्या रेषेत पडला होता. म्हणजे पाडला होता की काय? अशी शंका येऊन काळोखेंनी किल्लीची नोंदवही तपासली. त्यात सभेनंतर सचीव सपकाळेंनी किल्ली घेतल्याची नोंद सापडली होतीच. काळोखेंनी लगेच सदनिकाधारकांच्या व्हाॅट्सअॅप समुहात सपकाळेंवर बंब्याला फेकून बबलूचा हात मोडल्याचं बालंट ठेवलं. सपकाळे म्हणाले की ते कपडे वाळत घालायला गेले होते आणि त्यांनी फेकेपर्यंत बंब्या बघत बसला असता होय?


आता पोलिसांकडे एकमेकांविरोधी तक्रारींचा गठ्ठाच झाला. बबलूचा हात मोडल्याला कारणीभूत म्हणून फणसेंची काळोखेंविरुद्ध, बंब्या आणि टोळीला खायला दिल्याबद्दल सपकाळे आणि मांडकेंची फणसे आणि काळोखेंविरुद्ध, सामाईक गच्चीचा अवैध वैयक्तिक वापर केल्याबद्दल फणसेंची सपकाळेंविरुद्ध, करोना काळात बैठक बोलवल्याबद्दल माजी अध्यक्षाची सपकाळे व मांडकेंविरुद्ध, करोना काळात बॅडमिंटन कोर्टवर एकत्र आल्याबद्दल संयोजन समितीची खेळणार्‍या सर्वांविरुध्द, इत्यादि इत्यादि. 


दोन तीन आठवडे झाले तरी या प्रसंगावरून रणकंदन चाललंच होतं. दरम्यानच्या काळात बंब्या संस्थेत परतला होता. तो आल्यामुळे आता काबूत आले की काय असे वाटत असलेले त्याच्या टोळीचे सदस्य नव्या उत्साहाने कामाला लागले होते. लहान मुलं खेळत असतांना मधेच येऊन त्यांचा क्रिकेटचा, फूटबॉलचा चेंडू घेऊन इकडे तिकडे भिरकावून देणं, बॅडमिंटनचं फूल हवेतल्या हवेल उडी मारून झेलणंआणि मग गच्चीच्या कठड्यावर उभं राहून ते फूल डोक्यावर ठेवून नाचणं वगैरे अनेक प्रकार सुरू होते. मुलं आणि बाया चांगलेच दहशतीत होते. जिकडे तिकडे शेपटीखालचा प्रसादही पाडला जात होता.


ब-३२१ मधले माधव गोळे हे पत्रकार होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यल्लप्पा त्याच्याशी हितसंबंध ठेवून होता. त्यांचा अधूनमधून फोन व्हायचा तसा आजही झाला. गप्पा झाल्या. "मग उद्या काय नवीन बातमी?"

"यलप्पा, उद्या घरगुतीच बातमी आहे..." म्हणत गोळेंनी २-३ आठवड्यांपूर्वीचा प्रसंग आणि पुढची कथा सांगितली.

"अरे माधवा, काय म्हणतो मी. तुला तर पोलिस तक्रारीची बातमी करता येणार ना फक्त. मग थांब की जरा आणखी दोन हफ्ते. वचन आहे रे माझं. आणखी मोठी बातमी देईन रे. त्या फणशाचा भ्रमणध्वनी क्रमांक मात्रं दे रे"  हा फोन संपवून यल्लप्पा लगेच त्या फोनवर लागले. "फणशा, हीतैशि बोलतो की रे. बबलूचा हात तुटला, लई वंगाळ की. काळोखेचा आंबा त्याच्यावर पडून  तुटला का? म्हणतो मी. नाही ना. बंब्याला ढकलले कोणी? अरे तू आणि तो काळोखे एकत्र येऊन बंब्याला ढकलून त्याचा पाय मोडला म्हणून वन्यजीव खाली त्या ढकलणार्‍या मनुष्याला गाडत का नाही म्हणतो मी"


झालं. वन्यजीव संरक्षण कायद्याअन्वये सपकाळे आणि मांडकेंवरोधात तक्रार झाली. लागल्या हाती बंब्याला गिलोरी मारणार्या सलीमचाचाला ही त्यात गोवलं गेलं. सर्व स्थानिक वृत्तपत्रात बातमी आली. गोळेंना ब्रेकिंग न्यूज प्रथम देऊन खप वाढवल्याबद्दल सहसंपादकपदी बढती मिळाली. इकडे सपकाळे आणि मांडकेंवर अनिमल प्रोटेक्शन ब्युरो, एपीबीने खटलाच लावला.


काही आठवडे गेले. सपकाळेंनी ढकललं याला पुरावा मिळत नव्हता. खटल्याचा तपास निरिक्षक पांढरेंकडून पुढे सरकत नाही म्हणून एपीबीने न्यायालयाकरवी निरिक्षक बदलून घेतला. वरूण गृहसंस्थेसमोर निदर्शनं, जाळपोळ, सचीव सपकाळेंचा पुतळा जाळणे वगैरे पण प्रकार झाले.


निरीक्षक पांढरेंनी त्यांचा शाळासवंगडी देवदत्तला सगळं सांगितलं. देवदत्त पत्रकार होता, पण बंगलोरात.


वरूण गृहसंस्थेचं नाव ऐकताच देवदत्तने त्याच्या संपादक साहेबाला विश्वासात घेतलं आणि ही 'स्टोरी कव्हर' करायला म्हणून तो थेट पुण्यात आला, ते ही खरे आजोबांकडे. हो,तो भाचा होता त्यांचा! खरे आजोबांच्या संपर्कात असणारा एकमेव नातेवाईक.

"काय म्हणतोस मामा?" मामांनी आपबीती सांगितली.

त्यांच्याकडे गृहसंस्थेचं दोन महिन्याचं देणं थकित होतं. खजिनदार लोढांनी त्यांना भेटायला बोलावलेलं. आजोबांकडे यावर्षीची गंगाजळी फक्त हातातोंडाची गाठ पडण्याइतपतच होती. निवृत्त होतांना सरकारने अडवलेलं प्रचंड घबाड येत्या वर्षात मिळालं की त्यांना कसली तोषिश रहाणार नव्हती. पण हेच वर्ष निघणं कठीण होतं. भिक्षुकीला आताशा कोणी बोलवत नसे. देवदत्तने त्यांना धीर दिला. मी सगळं आलबेल करूनच इथून जाईन अशी ग्वाही दिली. मग हळूच बंब्याच्या पडण्याचा मुद्दा काढला. खरे आजोबांनी खरे सगळे सांगितले. "हं असं आहे तर सगळं." 

एखादा आठवडाभर देवदत्त जरा तिथे रुळला. काही लोकांशी बोलला. तसा तो पूर्वीही मामाकडे येत असे. पण आता  सद्य परिस्थितीचा अंदाज घेत होता. पुढची रूपरेखा जुजबी तयार झाल्यावर तो कामाला लागला. आधी मोर्चा संयोजन समितीकडे होता. देवदत्त संस्थेचा सभासद नसल्याने त्याने संस्थेबाहेर रस्त्यावर मांडकेंची भेट घेतली व तो पत्रकार आहे आणि मांडकेंना बंब्याच्या प्रकरणातून तो बाहेर काढू शकतो असं छातीठोक सांगितलं. त्या बदल्यात तो ज्या काही परवानग्या मागेल त्या आणि अन्य काही मागण्या मान्य करणे एवढाच परतावा अपेक्षित होता. मांडकेंना ही एक आणखी ब्याद असं आधी वाटलं पण ते नाही न म्हणता तसेच दोलायमान अवस्थेत निघून गेले. देवदत्तला तेवढं पुरे होतं. तो शनिवारी खरे मामांना घेऊन तक्रार निवारण समितीपुढे गेला व मामांना शुल्क भरायला वर्षअखेरपर्यंत मुदत मिळायचा प्रस्ताव ठेवला. खजिनदार लोढांनी साफ धुडकावून लावलं. पुढच्या महिन्यात नाही भरलं तर जनरेटर जोडणी तोडण्यात येईल असं उलट बजावलं. यावर देवदत्तच्या अपेक्षेप्रमाणे अध्यक्ष मांडकेंनी मध्यस्थी केली व मामांचं वय लक्षात घेऊन व अर्थाजनाचं साधन नसल्यामुळे प्रस्ताव स्वीकारायची सुचना केली. लोढांना फारसं रुचलं नाही, पण अध्यक्षांची सुचना बंधनकारक होती.


अध्यक्ष वश झालेले हे आता समजलं होतं. आता त्यांच्याकडून शिफारस करून घेऊन सचीव सपकाळेंना देवदत्तने आपल्या अंमलाखाली आणलं. ते हातकड्या पडणार म्हणून नखशिखांत भयभीत होते. त्यांच्याकडून गच्चीच्या त्या प्रसिद्ध कोपर्याचं निरिक्षण करून छायाचित्रं काढायची परवानगी मिळवण्यात आली. पण तेही बरोबर येणार या अटीवर मिळाली. देवदत्तने ते लगेच मान्य केलं. प्राध्यापक वरेरकर घरी असले की सहसा सज्जात आरामखुर्चित बसून निवांत आकाशाकडे डोळे लावून कसलातरी गहन विचार करत बसत आणि मग गच्चीत निघलेली अशी जत्रा त्यांना विनासायास दिसे. बर्‍याचदा उत्सुकतेपोटी ते ही जात. आताची संधि घालवण्याचा तर प्रश्नच नव्हता!


देवदत्त गच्चीची, गच्चीतून खाली दिसणार्‍या बॅडमिंटन कोर्टाची छायाचित्रं काढत होता आणि मांडके व सपकळे कुतूहलयुक्त प्रश्नचिन्हांकित मुद्रेने त्याच्याकडे बघत होते. येवढ्यात "वैनतेयश्च पक्षिणाम, विभूतीम च जनार्दन" म्हणत प्राध्यापक महोदय गच्चीच्या मांडकेंजवळच्या कठड्याकडे पाहू लागले. मांडके एकदम दचकले. सपकाळेंनी त्यांचा ढळलेला तोल सावरला. त्या आवाज आणि हालचालींनी तो वैनतेय का कोण तो मात्र परागंदा झाला.


"काय हे प्रोफेसर, एक तर चोरपावलांनी आलात. आणि अवांतर व्यत्यय आणताय कामात." 

मांडकेंच्या या हल्ल्यातून वरेरकर वरमतायत तेव्हढ्यात आता सावरायची संधि चक्क देवदत्तने घेतली. "असू दे हो. पाहिजे तर त्यांनाही त्यांच्या लाडक्या विभूतिची दोन छायाचित्रं काढून देतो. साहेब, एक लक्षात ठेवा, सद्यस्थितीत मित्रं वाढवा. लोकांना आपलंसं करा."

गेला बाजार मांडकेंनाही दोन समजुतीच्या गोष्टी सांगून देवदत्तने आपला शेअर आणखी तेजीत आणला. सपकाळे आणि मांडके दोघांनाही त्याचं हे पटलेलं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. वरेरकरांना तर देवदत्तला कुठे ठेवू अन कुठे नाही असं झालं होतं. या वैनतेय वाल्या त्यांच्या वाक्याचा, का कोण जाणे, देवदत्तवर सकारात्मक परिणाम झाला असावा असं वाटत होतं. कारण तोपर्यंत चाचपडून पाहणारा तो आता एकाएकी आत्मविश्वासाने वावरत होता.

  

मग काही वेळ देवदत्त विचार करत हवेतच एकीकडून दुसरीकडे, वरुन खाली वगैरे हातवारे करत राहिला. अचानक एक उसासा टाकून त्याने कॅमेर्याचं झाकण लावलं. तो शहरल्यासारखा वाटत होता. सावलीसारखी साथ दिल्याबद्दल त्याने सपकाळे, मांडकेंचे आभार मानले व फार महत्वाचं निरिक्षण पूर्ण झाल्याचं सांगितलं पण निष्कर्श आणि पुरावा मिळेपर्यंत निरिक्षण गुलदस्त्यात ठेवणंच हितावहं असल्याचं त्यांना पटवलं. तरीही त्यांची मुखकमलं प्रफुल्लित झाल्याचं त्याच्या पारखी नजरेला गावलं होतं. त्यांना काय चाललय ते मात्र काही कळत नव्हतं.


देवदत्त संस्थेच्या समोरच्या विभागीय वाहतूक कार्यालयाजवळ असलेल्या चहावाल्याकडे रोज चहा हाणायला जात असे व वेगवेगळे विषय काढत असे. "साहेब, बरोबर. फारच कालवाकालव झाली रस्त्यावर त्या प्रसंगामुळे. चतुष्पाद बंब्या तर  गेला कुद्या मारत आणि अन हे द्विपाद बसलेत पादत." चहावाला छोट्या उवाच. त्याला जाणवलं की जेव्हा बंब्याच्या विषय निघतो तेव्हा बाजूचा चांभार मिष्किल हसतो. त्याने एकदोनदा पृच्छा केली देखील, पण अप्पा चांभार काही बधत नव्हता. मग एक दिवस निरिक्षक पांढरेंना बोलवून अप्पाला जरा खोपचात घेतलं. तर तो म्हणाला की सगळे बंगलेवाले मानतात तसं बंब्याची टोळी भटकी नाही. त्यांचा डोंबारी २५ किलोमिटर वर जंगलासारख्या भागात रहातो. हे ऐकून दोघंही चाट पडले व तडक तिकडे गेले. तिथे डोंबार्याची पत्नी भेटली. डोंबारी वारल्याला वर्ष लोटलेलं. डोंबार्याच्या व्यवसायाला कायदेशीर बंदी आल्यावर दोन वीत खळगी भरायच्या प्रश्नानं आ वासलेला. खळगी, हो, त्या सगळ्यांची. ते जोडपं, २ मुलं आणि ८ वानरं अशा 12 खळग्या. आता डोंबारणीने बंब्या आणि टोळीला मुक्त केलं होतं. म्हणून सध्या ते भटकत इतक्या दूर गेलेले.


काही दिवसांमधे सर्वत्र बातमी झळकली 'निरीक्षक पांढरेंनी बंब्याच्या टोळीचा २० कोस पाठलाग  करून त्यानी विहिरीत फेकलेल्या वस्तूंचा साठा शोधून काढला.' डोंबारणीला यात न गोवता देवदत्तन व पांढरेंनी तिला वरूण गृहसंस्थेत झाडलोट व देखभालीसाठी शिफारस करून उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. पांढरेंप्रमाणे नवीन निरिक्षकाकडूनही तपासात वेगळी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे त्या वस्तू तपासाला याच प्रकरणसंबंधातली प्रगति मानून पांढरेंची बंब्याच्या अधःपतन प्रकरणावर पुनर्नियुक्ती करण्यात आली.


आता देवदत्तला सगळं प्रकरण लख्खं उमजलं होतं. पुराव्याचा सापळा लावणं फक्त बाकी होतं. परत सपकाळे आणि मांडकेंवर जुगार लागला. "मांडके साहेब एक शेवटची विनंती. तुम्ही खरेमामांकडून गृहसंस्थेची शांत करून घ्या. येत्या शनिवारी. शांत गच्चीत होईल. "   

"चल पळ. मी पूर्ण नास्तिक आहे. ही थेरं खपवून नाही घेणार." 

लोढांनी बदला घ्यायची ही संधी साधली. "सपकाळे, तुम्ही पूर्णच फसला आहात. सगळे मार्ग खुंटले आहेत. एपीबीवाले हातकड्या घेऊन ऊभेच आहेत. एक शांतही करून टाका, बघा दैव साथ देतय का".

देवदत्त म्हणाला "फक्त १२०००. शांत झाल्यावर महिन्यात तुम्ही सुटलेले असाल."


वाटाघाटी होऊन शेवटी दोन आठवड्यांनंतरच्या शनिवारी पूजा ठरली. डोंबारिण आता जरी बंब्या आणि टोळीला सांभाळत नसली तरी तिने बोलावलं तर टोळकं येणार हे देवदत्तला लक्षात आलं. तीच्याशी बोलल्यावर तिने पांगळ्या बंब्याऐवजी बाज्याला त्या शनिवारी सकाळी 9 वाजेनंतर वरूण गृहसंस्थेत बोलवायचं मान्य केलं. सपकाळेंना सांगून बॅडमिंटन कोर्टवर घालायच्या गवताच्या अतिरिक्त लाद्या आणून अ विभागाच्या गच्चीच्या त्या सुप्रसिद्ध कोपर्याच्या कठड्यावर ठेवण्यात आल्या. सकाळी सहाला खरे मामांनी ब-विभागाच्या गच्चीत पूजा मांडली. पूजा चालू असेपर्यंत सपकाळे, मांडके, लोढा, खरे मामा, वरेरकर आणि देवदत्त याशिवाय कोणीही नव्हतं. नऊ -सव्वानऊला पूजा संपवून खरे मामा इतरांना घेऊन ब विभागातून अ विभागातल्या कोपर्यात आले. त्या गवताच्या लाद्यांभोवती कमंडलूतलं उदक् फिरवून सगळ्यांनी मिळून लाद्या ढकलून दिल्या. मग त्याच जागी काठड्यावर खरे मामांनी आंब्याचा नैवेद्य ठेवला. मग सगळे जण निघून गच्चीतून खाली खरे मामांच्या घरी येऊन बसले. देवदत्तचे कॅमेरे गच्चीत सज्ज होते. थोडा फलाहार, तीर्थ, बासुंदी प्राशन झालं. मग दहाच्या सुमारास देवदत्त बाहेर येऊन आकाश निरखू लागला. एक दहाच मिनिटांमधे त्याने इशारा करताच डोंबारिण बाज्याला अ- विभागाच्या गच्चीच्या दाराशी सोडून परत खाली आली.

तेवढ्या वेळात देवदत्त आणि चमू कोर्टच्या बाजूला मोक्याच्या जागा पकडून बसले होते. इतर अनेक लोक बाल्कनी, उंबरठ्यात येऊन कोर्टकडे बघत होते. वर गच्चीत काय फिल्डिंग लावली आहे ते इतर कोणाला माहीत नव्हतं. पाच-सहा मिनिटांमधेच धड धडाड् धप्प. बाज्या वरून सरळ उभ्या रेषेत खाली गवताच्या लाद्यांवर आपटला व पळत भिंतीकडे गेला. मग भिंतीवरून उड्या मारून हद्दीबाहेरच्या झाडावर चढून लुप्त झाला.


सगळे डोळे विस्फारून आ वासून बघतच राहिले. हे रिवाइंड केल्याप्रमाणे घडत होतं!


पुढच्या रविवारी डीएसपी स्वतः वरूण बहुउद्देशिय सभागृहात स्टेजवर होते. देवदत्तने काढलेली चित्रफित ते दाखवणार होते. त्याआधी त्यांनी छोटंसं भाषण केलं. "बंब्याचं अधःपतन झालं कसं याचा सुगावा आम्हाला देवदत्तने मिळवून दिला आहे. पण ही चित्रफित काही मूळ प्रसंगाची नाही. त्यामुळे दोन अटिंवर आम्ही हा सुगावा मान्य करू. एक अट ही की, या प्रसंगातून उद्भवलेल्या तुमच्या आपसातल्या सर्व पोलिस तक्रारी तुम्ही मागे घ्याल आणि दुसरी ही की बंब्या आणि टोळीला कोणीही खायला घालणार नाही. तसं आत्ताच लिहून द्यावं लागेल."

सगळ्यांनी मान्य केलं. एकंदर प्रसंगाच्या दबावामुळे म्हणा किंवा थोडीफार उपरति झाल्यामुळे म्हणा काळोखे आणि फणसे ही खायला न घालायला तयार झाले. डीएसपिंनी एपीबी खटला मागे घेईल अशी ग्वाही दिली. खरे आजोबा, मांडके-सपकाळे आणि निरीक्षक पांढरेही देवदत्तकडे अतिशय कृतज्ञतेने बघत होते.

"वन विभाग बंब्या आणि टोळीबद्दल काय तो निर्णय घेईल. तोपर्यंत डोंबारणीला इथे रखरखावाच्या कामाला लावलं आहे. ती सर्व सदनिकांमधलं आणि समोरच्या बेकरीतलं उरलं सुरलं अन्न या संस्थेपासून चारशे मीटर दूर एका नियोजित जागी जाऊन बंब्याच्या टोळीला खाऊ घालेल व त्यांना इथून दूर ठेवेल. तसंच गेले काही दिवस संस्थेच्या दक्षिण भिंतीलगत सर्प सापडायचे ते का त्याचंही उत्तर या चित्रफितीत आहे. पण ह्या सगळ्याला कारणीभूत बंब्या आणि ती आसमानी शक्ति हे खलनायक नसून नायक आहेत. त्या शक्तिमुळे बंब्या आणि टोळीवर बराच वचक होता. खलनायक तर आपण माणसं. आपण वन्यपशूंचा रहिवास मोडून आपली वस्ति केली, म्हणून नाईलाजाने ते आपल्या कच्छपि लागतात. कोणीही त्यांना मारू नका, द्वेश करू नका."


मग चित्रफित सुरू करण्यात आली. यात आधी उभ्या पाईपांच्या घळीमधे त्या प्रसिद्ध कोपर्‍याखाली लपलेलं एक घरटं दाखवण्यात आलं. नंतरचं दृष्य होतं ते, ती वैनतेय का कोण ती, सर्प घेऊन त्या घरट्याभोवती घिरट्या घालत असल्याचं. मग चित्रफितिचा नायक बाज्या आला. बाज्या, खरे आजोबांनी पूजेनंतर कठड्यावर ठेवलेले आंबे खायला कठद्यावर चढला. बरोब्बर त्या खळगितल्या घरट्याच्या वरती होता तो. अचानक दोन दमदार पंजे बाज्याच्या मस्तकावर आवळले गेले.. त्या पंजांना वर रूंद आणि लांब पंखही होते. बाज्या त्या पंजांमध्ये उचलला गेला. मग त्याच्या प्रतिकारामुळे म्हणा किंवा त्या पंजांना बाज्याचं वजन पेललं नाही म्हणून, तो थेट खाली बॅडमिंटन कोर्टवर पडला. अगदि अस्संच झालं होतं बंब्याचं अधःपतन!


शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

Stick to the Screen, now!


https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=s6Zp7kPdVBk

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे |

घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे ||

विंदांच्या या पंक्ति आपल्या समाजाला दिशादर्शक आहेत. बहुतांश क्षेत्रात आज भरभरून देणारे दाते आहेत पण योग्य ते स्वीकारायची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. कोणी खरंच निरपेक्षपणे देऊ शकतं यावर आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे. 

होतकरू भारतीय मुलामुलींना हॉकीचं प्रशिक्षण द्यायचं स्वप्नं घेऊन पार जर्मनीहून आंद्रिया गढ हिम्मतगढला आलीये, २०१३ मध्ये. ती यासाठी वाट्टेल ते करायला  तयार आहे. आजपर्यंत करते आहे. हॉकि स्टीक्स देते आहे, मुलांना पळवते आहे, सिंथेटिक टर्फचे ढीग जमवते आहे, पालकांना पटवते आहे, शाळेला विश्वासात घेते आहे, एवढंच नव्हे तर स्वखर्चाने यूरोप टूरही करवून आणते आहे. ती झेप घेतेय, मुलांनाही उंच नेतेय पण ७ वर्षात जमिनीवर टर्फ अंथरायला तिला जमलेलं नाही... पटतंय का? त्याचीच ही गोष्ट.

या लघुपट निर्मात्याच्या अचूक शब्दात:

ही फिल्म वेड्या, स्वप्नाळू, काहीतरी ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे काम करणाऱ्या आंद्रिया सारख्या निस्पृह लोकांची गोष्ट आहे. या स्वप्नांच्या जगातील प्रवास खूपच अद्भुत असतो आणि ही स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी किंमतही मोजावी लागते.. या सगळ्या नाट्यमय प्रवासाची साधी सोपी गोष्ट म्हणजे स्टिक टू ड्रीम्स ही माझी पहिली फिल्म.

निर्माता चिन्मय अनिरुद्ध भावेने facebook वर लघुपटाची पूर्वपीठिका आणि सारांश दिलेलाआहे.   https://chinmaye.com/2020/10/24/mblogsticktodreams/?fbclid=IwAR3l3AB-jaWZdcTGnuqLSFjMR1iBVM3CsS_c_Hm70vVlY6aZ2oSvMrKDtH0

हा पाऊण तासाचा लघुपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत छान गुंतवून ठेवतो. समाज म्हणून आपण काय आहोत याची झलक या छोट्या मांडणीत कळते. कुठल्याही जागतिक स्पर्धेत जिंकायचं नव्हे फक्त टिकायचं असेल तरीही आपल्याला खडबडून जागं होण्याची गरज आहे. 

क्रीडाक्षेत्राशी संबंधित पूर्ण लांबीचे चित्रपट बनले आहेत. व्यावसायिक फायदा हा महत्वाचा घटक असल्याने अश्या चित्रपटांद्वारे त्यात अभिनीत नायक नायिकेचं larger than life उदात्तीकरण विकलं जातं आणि तेच लक्षात रहातं. मिल्खा, सचिन, धोनी, पंगा अशी लाटच अलीकडे आली. यातून व्यवस्थेवर प्रश्न उभे केले गेले जे रास्तच आहेत. पण या चित्रपटांना पटकथा आहे. चिन्मयचा लघुपट या विषयाला या चाकोरीतून बाहेर काढतो आणि 45 मिनिटं वास्तवात तरंगत ठेवतो. या लघुपटात पात्रं नाहीत तर खरेच नायक-खलनायक आहेत. भारत आणि युरोपमधलं चित्रिकरण आहे. संगीत आहे. नाटय आहे. कथा आहे. अचंबा आहे. परिणामकारकता आहे. चिन्मयने जवळ जवळ एकहाती सगळं निभावलंय आणि ते ही निर्मितीमुल्याशी तडजोड न करता. 

लघुपट स्वतः कथेच्या निष्कर्शावर भाष्य करत नाही. आहे ती परिस्थिति समोर ठेवून निष्कर्श काढायला प्रेक्षकला वाव देतो. हा या प्रस्तुतीचा माझ्या दृष्टीने सर्वात जमेच्या तीन आयामांपैकी एक आहे. खलतेला मुद्दाम बटबटीत केलेलं नाही. त्यांनाही त्यांची बाजू मांडायची संधि दिलेली आहे. खरं तर लघुपट कोण खल ते ठरवत नाही, तो कदाचित खल नसेलही. पण पडून राहिलेल्या बेशकिमती टर्फला तो किंवा त्याची वृत्ती करणीभूत आहे. दुसरा आयाम अर्थातच कथा. तिसरा आयाम म्हणजे चित्रण. फारच छान. अधिक काही लिहिण्यापेक्षा एवढंच सार्थ ठरेल की लघुपट आपल्याला, आपल्या जागी आणून कोणी दाखवतय असं न वाटता, आपणच तो तिथे तिथे जाऊन पहातोय असं वाटतं!

आपलं क्रीडामंत्रालय निधी देतं पण कार्यान्वयनाची जबाबदारी किंवा माहिती घेत नाही, त्याच्या विनियोगातल्या अडचणी दूर करत नाही. खासदार, जिल्हाधिकारी परवानग्या देतात पण कार्यालयात बसल्या बसल्या. परवानगीचा अर्थ असाही नाही का की तुमच्या उद्दिष्टात काही अडचणी आल्या तर किमान माझ्या अधिकारक्षेत्रात येणार्‍या अडचणी मी दूर करेन? खासदाराने एखाद्या जागेवर एखाद्या योजनेला 'हो' म्हणण्याआधी आमदार, सरपंच, स्थानिक नेते यांना विश्वासात घ्यायला नको का? नीतिगत पंगुपणा (policy paralysis) तून आपण थोडे बाहेर आलो आहोत, आता थोट्या  कार्यान्वयनातून (implementation paralysis) लवकर बाहेर यायला हवं. 

या लघुपटात एक शेतकरी सरपंच आलाय. त्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं वैभव दृग्गोचर आहे. शेतकरी आंदोलनं होतात तेंव्हा माध्यमांमधे गरीब बिचार्‍या शेतकर्‍याचा प्रतिनिधी म्हणून एक धोतर बंडीवाला शेतकरी दोराला लटकलेला दाखवून हळहळ, उन्माद पसरवण्याचा प्रयत्न होतो. त्या जोडीला यातल्या या शेतकर्‍याचं छायाचित्रही ठेवायला हवं. म्हणजे जनतेला पीडित शेतकरी आणि आंदोलक शेतकरी यातला फरक समजता येईल.

स्टिक टू ड्रीम्स म्हणजे ध्येयाला चिकटून रहा. हे चिन्मय आंद्रियाच्या, तिच्या भारतीय मुलांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतोय. स्टिक टू ड्रीम्स म्हणजे जगज्जेते बनायच्या स्वप्नासाठी आंद्रिय देत असलेली हॉकि स्टिक. स्टिक टू ड्रीम्स मधलं ड्रीम म्हणजे हॉकी बॉल आपल्या खेळाडूंच्या स्टिकला स्टिक होईल, गोल होईपर्यंत ते परमोच्च क्षण. याहीपुढे जाऊन या लघुपटातून अन्यही संदेश आहेत. सबळ स्त्रि  म्हणजे काय? सबळ स्त्री असते आंद्रियासारखी. स्वतःचा व्यवसाय करणारी. स्वप्नं बघणारी. स्वप्नासाठी परक्या देशात जाऊन तिथल्या नव्या पिढीला पंख देणारी, पण आपण जर्मन असणं न विसरणारी. अर्धांग  व्यवस्थेसमोर हार न मानणारी. तिच्या कथा दिशा देतील. अंद्रियाला घडवणारी प्रगती घडते आहे. त्या वाटेवर जातांना त्या प्रगतीला पोषक व्यवस्थाही घडवावी लागेल. (भारतात सबळ स्त्रिया नाहीतच असा अर्थ नाही. लघुपटाच्या अनुषंगाने लिहिलं हे आहे.)

अजून काही वर्षं तरी, अशा आंद्रियाच अशा कथांच्या नायिका ठरत रहाणार. जरी यातली मुलं आपल्या देशाची नायक-नायिका होतील तरी 'घेणार्‍याने घेत जावे' हे रूजल्याचं कळेल. अशा आंद्रिया आपल्या देशातून निर्माण होतील आणि एखाद दुसर्या आठवड्यात टर्फ पसरू शकतील, त्या दिवशी हा लघुपटही सार्थक होईल. '.... एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे' च लागतील !!

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

अटलजींच्या दिवाळी काव्याचा स्वैर अनुवाद

 

जब मन में हो मौज बहारों की         जेव्हा मनात मौज बहरते 

चमकाएँ चमक सितारों की,         तारकांनी नभ चमचमते

जब ख़ुशियों के शुभ घेरे हों         जेव्हा सर्वां शुभ सुखावते

तन्हाई  में  भी  मेले  हों,                 एकाकीपण गर्दीस मिळते

आनंद की आभा होती है         आनंदाची आभा विलसते 

*उस रोज़ 'दिवाली' होती है ।* *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

 जब प्रेम के दीपक जलते हों         जेव्हा प्रेमाची ज्योत तेवते 

 सपने जब सच में बदलते हों,         स्वप्नवत् जेव्हा सत्यात येते 

 मन में हो मधुरता भावों की         मनोमानीचे माधुर्य भावते 

 जब लहके फ़सलें चावों की,         जेव्हा भाताचे पीक लहरते 

 उत्साह की आभा होती है         उत्साहाची आभा पसरते 

 *उस रोज़ दिवाली होती है ।*       *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

जब प्रेम से मीत बुलाते हों         जेव्हा मित्रप्रेम साद घातले 

दुश्मन भी गले लगाते हों,         शत्रुशीही गळाभेट होते 

जब कहींं किसी से वैर न हो         जेव्हा कुणाशी वैर न सुचते 

सब अपने हों, कोई ग़ैर न हो,        आणि कोणी परकेही नसते 

अपनत्व की आभा होती है         आपुलकीची प्रभा विलसते 

*उस रोज़ दिवाली होती है ।*         *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

जब तन-मन-जीवन सज जाएं         जेव्हा तन-मन-जीवन सजते 

सद्-भाव  के बाजे बज जाएं,         सद्भावाची सरगम गुंजते 

महकाए ख़ुशबू ख़ुशियों की         जेव्हा श्वासात सुख दरवळते 

मुस्काएं चंदनिया सुधियों की,         धान्य सुगीचे टपोर चमकते 

तृप्ति  की  आभा होती  है          सूदूर तृप्तिचे तेेज पसरते 

*उस रोज़ 'दिवाली' होती है .*। *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*


हा स्वैर अनुवाद आहे. यात चुकाही असू शकतात. त्याबद्दल क्षमा मागून मार्गदर्शनाची अभिलाषा ठेवतो.. 


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

मी वाचलेलं पुलकित: गुण गाईन आवडी


पुस्तक:- गुण गाईन आवडी; 
लेखक:- पु. लं. देशपांडे
प्रथम आवृत्ती:- १९७५; 
प्रकाशक:-  मौज प्रकाशन
वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना

(गायक गातांना कधीतरी डाव्या हाताचा अंगठा आणि दुमडलेल्या तर्जनीच्या चिमटीत कानाची पाळी पकडून चूक झाल्याची खूण करताना त्यांच्या मनात जी भावना उमटत असेल तीच, पु लं च्या लिखाणाबद्दल उजव्या हातानं लिहितांना प्रत्येक वाक्यानंतर उमटली असेल!)

गीतेत अर्जुन विचारतो,
स्त्थिततप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव 
स्थितधिः किं प्रभाषेत, किं आसित् व्रजेत किं (स्थितप्रज्ञ झालेले लोक कसे बोलतात, वागतात, बसतात, उठतात?). पुरुषोत्तम भगवान कृष्ण अर्थातच तात्विक शंकानिरसन करतो. (करतात असं म्हणून आम्ही त्याला परकं का करावं?!). 

याच प्रश्नाची सोदाहरण उकल पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, आपल्याला विचारायचीही तोशिष न देता, ज्या पुस्तकात सविस्तर विशद करतात ते 'गुण गाईन आवडी'. कोणत्याही क्षेत्रात कतृत्वाची उच्च पातळी गाठायसाठी अंशतः तरी स्थितप्रज्ञता बाणवलेली असावी लागते. हे सगळे, असे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातले काही स्थितप्रज्ञ!

पुस्तक वाचायला किती वेळ लागावा हे लिखाणाच्या दीर्घतेवर, त्या दीर्घतेतल्या अक्षरांच्या आकारामानावर वगैरे अवलंबूनअसतं तेवढंच त्या लिखाणात किती ज्ञान भरलंय यावरूनही ते ठरतं. याची पुरेपूर जाणीव करून देणारं पु लं चं 1975 ला प्रथम प्रकाशित झालेलं हे पुस्तक.

व्यक्ती आणि वल्ली द्वारे पुलंनी काही सामान्य व्यक्तींच्या असामान्य छटांना, लकबींचा असामान्य प्रसिद्धी मिळवून दिली, आपल्याला परिचय करून दिला.  वास्तविक आणि काल्पनिक व्यक्तींचा तो कल्पनाविस्तार. तर गुण गाईन आवडी हे मुळातच प्रसिद्ध असलेल्या असामान्य व्यक्ती पुलंच्या मनःचक्षूंना कशा दिसल्या त्याचं सामान्यांसाठी वर्णन आहे. अमुक एका व्यक्तीचा जन्म या तारखेला झाला आणि त्या तारखेला मृत्यू होईपर्यंत ती जगली कशी अशा पद्धतीचं हे वर्णन नाही. तर रसिक, श्रोते, वाचक, अनुयायी यांच्यापेक्षा जरा आणखी जवळच्या परिघातून केलेलं त्यांचं वर्णन आहे. नाॅनस्ट्राईकर असलेला सचीन अझहर, कांबळी, सौरभ, राहूल आदिंचं कसं वर्णन करील तसं.

केशवराव दातेंबद्दल पुलंची लेखणी अशी काय चाललीये की या क्षेत्रात स्थित नसते तर पुलं उत्तम गणितप्रज्ञ झाले असते हे नक्की. दोन तीन ओळींचा प्रश्न सोडवायला निष्णात गणिती जसा याला क्ष, त्याला य मानू म्हणून सुरू करतो आणि मग त्या अज्ञात बीजांशी एक दोन पानं झगडून, बीजांना विषयात गुंतवून, त्यांना गुंगारा देऊन मग मूळ प्रश्नात वापरलेल्या शब्दात उत्तर काढतो- त्याप्रमाणे नाटक, नट, नटमंडळ्या वगैरेंच्या मूलभूत तत्वांपासून वगैरे सुरुवात करून परिच्छेदाच्या शेवटी पुलं ध्रुव पदावर यावं तसं केशवरावांकडे येतात. कधी कधी अशी शंका येते की 'गुण गाईन आवडी' यातला गुण या शब्दाचा अर्थ स्वभाववैशिष्ट्य, पैलू किंवा छटा असा विशाल असावा. यातलं 'ऐकण्याचा अभिनय' हे वर्णन खरोखरच नटांच्या क्रमिक अभ्यासक्रमात असावं असं आहे.

संगीत क्षेत्राशी आलेला संपर्क रघुनाथ कृष्ण फडके या शिल्पकाराला पु लं च्या परिघात पितामहाची जागा पटकावून देतो आणि त्यातही पुलंना त्यांनी स्वतः न भेटलेले असल्याची रुखरुख आहे अशा भास्करबुवांचा संग फडकेंना लाभलेला असल्यानं. फडकेंचं बहुआयामि व्यक्तिमत्व पुलं उलगडून दाखवतात. त्यात इंग्रजी अधिकारी माणसांचे किती पारखी होते आणि भारतियांच्या स्वतःच्या उन्नतीसाठी stick to your guns सांगायला कमी करायचे नाहीत, ते वाचायलाच हवं.

आपण हे पुस्तक वाचतो तसंच भास्करबुवा पुलंना वाचनातून आणि चर्चांमधून जाणवले. गोपाळ गायन समाजाच्या गोविंदराव देसायांचे उद्गार पुलं उद्ध्रुत करतात, 'बुवांचे गायन ऐकून घमेंड, दुष्टपणा, हेवा, ईर्षा, निंदा इत्यादि विकार नाहिसे होतात.' अर्जुनाला दिलेल्या उत्तरात श्रीकृष्ण याच स्थितीला 'स्थितप्रज्ञस् तदोच्यते' असं म्हणतो. म्हणजे, भास्करबुवांच्या श्रवणाने श्रोता काही काळ अशा स्थितप्रज्ञतेला पावत असेल तर ती प्रस्तुति केवळ दैवी, दिव्य असणार! ही कल्पना आपलं संजयासारखं अद्भुत रोमहर्षण करून जाते. 

वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व ही पुलंच्या खास लोभातली माणसं. त्यांच्याबद्दल पुलं भरभरून लिहितात. मी पुण्यात दशकापेक्षा जास्त राहिलो, वावरलो पण ते अभियंता म्हणून. बाकी मी कानसेनही नाही. अशा पद्धतीचं साहित्यही मी आधी वाचलेलं नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर पुणं ही सांस्कृतिक दृष्ट्या काय भारलेली जागा आहे ते लक्षात येतं. या पुस्तकात उल्लेख असलेलं एकएक ठिकाण तसंच उल्लेख असलेली माणसं जिथे वावरली आहेत ती अन्य ठिकाणं, ही पाॅवर हाऊसेस् आहेत. देवाने अशी काही सोय ठेवली असती किंवा यापुढे विज्ञानाने तशी ती निर्माण केली, की, अशा ठिकाणी गेल्यावर, किंवा बाजूने गेलं तरी,  तिथे वावरलेल्या या महानायकांच्या सामर्थ्यातून साधनेतून थोडं तेज आमच्यात उतरेल, तर आम्ही आतापर्यंत ॲव्हेंजर, मार्व्हल्सपेक्षा कितीतरी पट सामर्थ्यवान झालो असतो. असं वाटणं ही त्यांची आणि पुलंच्या लेखणीची ताकद आहे. वसंतराव, कुमार, मल्लिकार्जुन मंसूर आणि लतादिदिंबद्दल लिहितांना गाण्याची तांत्रिक बाजू हातचं न राखता पुलं सामोरी ठेवतात. गाण्याची जाण नसण्यार्यांच्यातही ते वर्णन गाणं उतरवून जातं आणि उगाचच, आता आपल्यालाही संगीत उलगडलंय असं माझ्यासारख्याला वाटू लागतं. फक्त त्या खुशीत सूर लावेपर्यंत किंवा ठेका धरेपर्यंत! 

मध्यम, धैवत, ताना, मुरक्या, लयकारी वगैरे बद्दल पु लं जे लिहितात त्यावरून हल्लिच्या 'जजेस' नामे लोक्सनी गायन स्पर्धांच्या नावाखाली काय थोतांड माजवलंय ते प्रकर्षाने जाणवतं. लतादिदिंबद्दलचं पुलकित वाचून वाटतं की पुलं या पुस्तकाचे पुढचे खंड काढून अन्य मंगेशकर आणि या पुस्तकात ओझरते वा संक्षिप्त उल्लेख असलेल्या अत्रे, पंडित भीमसेन जोशी आदि विभूतींबद्दल लिहितंच राहिले असते आणि आपण वाचतच राहिलो असतो तर.....

स्त्री पार्टी करणार्या बापु मानेंनंतर लगेच लतादिदिंबद्दल लेख आहे. दीदिंबद्दलच्या लेखात पंडित दीनानाथांचा उल्लेख अपरिहार्य आहे. पंडितजींच्याही गायकीबद्दल गौरवोद्गार आहेतच. पंडित दीनानाथांनी अनेक स्त्री भूमिका केल्या. पुलं बालगंधर्व, मास्टर नरेश आणि बापू मानेंना सर्वोत्तम स्त्री पार्टी अशी प्रशस्ति देतात तेव्हा वाचकाला दीनानाथांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही आणि स्त्री पार्टी म्हणून त्यांचा उल्लेख सुद्धा पु लं नी का टाळला असावा असा प्रश्न मनात येतो. 'मोरूची मावशी' मधे एकदा स्त्री पात्रे स्त्रीयाच करत होत्या तरी नाटक थंडगार गोळा होऊन पडले होते हे वाचून बापू मानेंच्या अभिनयाची उंची जाणवते. नाटककार राम गणेश गडकरी, कवि बा. भ. बोरकर आणि संगीतकार वसंत पवार यांचेही आवडीने गूण गाऊन पुलं या पुस्तकाच्या सांस्कृतिक स्वरुपाला साकल्य प्रदान करतात. तसंच या स्थितप्रज्ञतेची संगत करणारी नको त्या व्यसनांची बाजूही सामोरी येते. ब्रह्मदेशात जन्मलेल्या, माहेरच्या करमरकर, त्याकाळच्या उच्चशिक्षित आणि आधुनिक इरावती कर्वें पुलंच्या महाविद्यालयीन वयात लेखिका म्हणून संपर्कात आल्या आणि पुलंना भुरळ पाडत राहिल्या. एरवी आपल्या साहित्यातून, कौतुकाने स्वतःचं घर पाहुण्यांना दाखवणार्या सामान्य माणसाची पुलं यथेच्छ टिंगल करतात. त्यामानाने इरावती बाईंनी त्यांचं नवं घर पुलंना दाखवलं त्याचं खर्या कौतुकाने केलेलं रसभरित वर्णन इथे वाचायला मिळतं. 

असा मी असामी मधे असलेली 'तुमच्या त्या लेंग्याचा आणि पंचांचा साहेबाच्या पॅटीवर काही परिणाम होणार नाही' किंवा 'कसला रे हिंदू बांधव, भोंदू भांधव सगळे' ही वाक्यं पात्रांच्या तोंडी 'खसखशित' विनोद म्हणून घातलेली असली तरी पुलं या प्रत्यक्ष व्यक्तीचा राजकीय कलही ती दर्शवून जातात. समाजवादी राम मनोहर लोहिया यांचा समावेश या पुस्तकात व्हावा हे काही नवल नाही. त्या काळची राजकीय मंडळी कशी होती हे आजच्या पिढीला सांगायला लोहिया, जय प्रकाश नारायण यासारखी उदाहरणं मिळणार नाहीत. गोवा मुक्ति संग्रामातलं लोहियांचं योगदान पु लं इथे मांडतात. लोहिया म्हणाले होते, "भिकेच्या झोळीत अन्नधान्य घालणार्या परदेशी सैयांपुढे नटण्यासाठी ही नगरी (दिल्लीची सत्ता) स्वतःकरता पाण्यासारखा पैसा उधळते. पण जिथे लक्षावधी भारतीय नागरिक जमतात अशा तीर्थक्षेत्रात ना संडासाच्या सोयी, ना सुंदर सडका" याचा अर्थ असा निघतो की तीर्थक्षेत्रांच्या अनुषंगाने संवर्धन हा (फक्त) तथाकथित उजव्या विचारसरणीचा कार्यक्रम नसून समाजवादाचीही तीच विचारसरणी आहे. ती फक्त हिंदूंची ईच्छा नसून भारतीय नागरिकांसाठी करायचं आहे. मग 2014 च्या लोकसभेत मोदी मुलायम सिंगांना उद्देशून वारंवार 'आपली नाळ एकच आहे, ती म्हणजे लोहिया. त्यांच्या प्रेरणेनेच मी ही कामं करतोय' असं का म्हणत होते, त्यातली (काही) कामं कुठली आणि मुलायमसिंगांच्या उत्तर प्रदेशात भाजपाला 'न भूतो' असं यश  या आळवणीनंतर का मिळतं याचा संदर्भ लागतो.

पुलंनी निवडलेले बहुतेक गायक हे कुठल्याही घराण्याशी स्वतःला बांधून न घेतलेले आहेत. पुलंना एकंदरीतच चाकोरी किंवा धोपटमार्ग सोडलेली, बिकट वाटेवर गेलेली, काहीशी बंडखोर किंवा काहीतरी असामान्यतेचा कढ आलेली पण स्थितप्रज्ञ अशी माणसं भुरळ घालतात. बाबा आमटे आणि सेनापती बापट हे असेच स्थितप्रज्ञ. 'वेरूळची भग्न शिल्प पहातांना फुटलेली नाकं आणि तोडलेले हात मनानं भरून काढता ना? मग या जिवंत भग्नावशेषांमधलं मूळचं शिल्प तुम्हाला दिसत नाही?' हे बाबांचं कुष्ठरोग्यांबद्दलचं वाक्य आपल्या चंगळवादि मनात खोलवर वार करतं. गिरणी आंदोलनात प्राणत्यागाच्या घोषित वेळेला 'अजून चार पाच तास वेळ आहे तोवर जरा लवंडतो' हे सेनापती बापट यांचं वाक्य सैनिकाच्या स्थित आवश्यक प्रज्ञेचं दर्शन घडवतं.

या पुस्तकातल्या नायकांचे पाय जमिनीवर होते हे पुलं कटाक्षाने नमूद करतात. भास्करबुवा बखले म्हणत, 'मी गायलो नाही, तुम्ही गाववून घेतलंत', नानासाहेब फाटक म्हणायचे 'गणपतरावांच्या आवाजापुढं आमचा गळा दुबळा म्हणावा लागेल', मॅट्रीकला पहिला आला म्हणून कुणा कुमार देशमुखांना राम गणेश गडकरींनी स्वतःकडे कमालीचे गौणत्व घेऊन लिहिलेले पत्र, वृद्धत्वात लहान मुलांमध्ये खेळून रडीच्या डावावरून नाटकी भांडणारे सेनापती बापट, वगैरे. याच क्रमात पुलंचं स्वतःचं एक टिपणं येतं, ''मध्यंतरी काही लोकांनी गाण्याला देशभक्तीला जुंपले होते, हल्ली बिचारे टूथपेष्ट आणि डोकेधुखीच्या गोळ्या विकायला बाजारात येतात' ही कोटी पुलंनी कोणावर केली असावी हे शोधायची मज पामराला गरज वाटत नाही. पण यामुळे पुलं स्वतः अन्य कलाकारांच्याच नाही तर कलेच्याही पुढे गेलेले होते आणि त्याची त्यांना अंतरिक जाणीव होती असं वाटून जातं.

बाबा आमटे अति सधन पृष्ठभूमि सोडून कुष्ठरोग्यांबरोबर हालअपेष्टा सहन करत जगले. हे सांगता सांगता पुलं प्रेक्षक, श्रोते, वाचक चाहते हे मात्र कसे बदलत गेले आहेत, त्यांची अभिरुची हीन होत चालली आहे हे ही सांगत रहातात. 'असली (बाबा आमटेंसारखी वडिलोपार्जित सधनता असलेली) माणसे पोलिसात किंवा फाॅरेष्टात जातात, पैसे खातात, आणि रिटायर होतांना शहराबाहेर मोठा बंगला बांधतात' असं सार्वत्रिक विधान, 'बेगड आणि सोने यात फरक करायला सामान्य वाचकाला तरी कुठे सवड आहे' अशा टिपण्या पुलं करतात, ते बहुधा आपण सामान्य लोक सामान्य का राहिलो ह्याचं नकळत उगाळलेलं अंजन समजून आपण स्व ची दृष्टी सुधारायला हवी. आणि यामुळेच केशवराव दाते कधी 'आमच्या वेळचे ते राहिले नाही' असं चुकूनही म्हणत नसत याची महती अधिक ठळक गोंदवून रहाते.

हे पुस्तक मी 'ग्रंथ तुमच्या दारी' या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' च्या योजनेअंतर्गत वाचलं. एकदा वाचल्यावर, भविष्यात मी स्वतः  लेखन करतांना, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातले यातले संदर्भ आठवत रहातील आणि नीट नाही आठवले तर रुखरुख लागेल. म्हणून हे विकतच घ्यायला हवं.


शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

योर टॅलेंट हॅज चेंज्ड योर डेस्टिनि

'ए, हे बघ कोणीतरी भेटायला आलंय तुला.' 
रूम पार्टनर म्हणाला, तसं, 
'कोण आहे?' विचारत, 
चहाची तयारी करत असलेला प्रभाकर बाहेरच्या खोलीत आला. पुण्यात दोन खोल्यांचं घर तिघात वाटून रहात असत ते. जॉब नसलेला एकटा हाच. म्हणून तिघा रूममेट्सचा स्वयपाक, केर वारा, कपडे, भांडी या जबाबदार्‍या घेतलेल्या. बाहेर आलेला गुरव त्याची आधीची कंपनी जयलक्ष्मी फ्लो मीटर्समधला सर्विस एक्झिक्युटिव होता. 
'तू पाय धुवून आतच ये. एक कप चहा वाढवतो.' 
'चहा कशाला रे, जरा गप्पा मारतो नि जातो की रे बस पकडून इथूनच. ४० मिनिटं आहेत फक्त.' 
पाय धुता धुता.चहा कशाला ही फक्त सभ्यता, चहा न पिता कस्टमर सर्विसिंगमधे काम सुचणं अशक्यच. 
'बोल आता. असा घाईत कसा इकडे?'
'काय नाय रे. मी तुझी तक्रार केली तिथून तुझे नि बॉस चे खटके सुरू झाले. मग तू रागावून जॉब सोडला. म्हंटलं थोडं प्रायश्चित्त घेऊ.' 
'जाऊ दे ना. मी ते विसरलो आहे.' चहा पोहे देत देत प्रभाकर म्हणाला. 
विसरायचा प्रयत्न करत असला तरी ते इतका सोपं नव्हतं. त्यामुळे, तू का उपटलास परत माझ्या आयुष्यात असे भाव चेहेर्‍यावर. 
'ते बरिक छान केलस बघ. मला माहिती रे, तू आता कम्प्युटर कोर्सेस करतो, पण जॉब नाही. चणचण आहे म्हणून शेयरिंग मधे राहतो. हो का नाही?' 
कर्नाटकात भरपूर कस्टमर साइट्स असल्यानं कानडी हेल. प्रभाकर ने दीर्घं उसासा सोडला आणि जखमेवर मीठ चोळायला आलास असा कटाक्ष टाकला. 
'राग सोड रे. कोणी कायमचा शत्रू नाही. हे बघ, हिंदुस्तान मिलानो एफएमसीजीला वेन्डर डेवलपमेंट एक्झिक्युटिव हवाय. सहा महिन्याचं कॉंट्रॅक्ट, ८ हजार महिना' सकाळ वर्तमानपत्रातली १ जुलै २००१ ची जाहिरात दाखवत गुरव. 
'अरे पण मी तर क्यु सी मधे काम केलय' 
'ते सोड की. त्यांना १ वर्षाचा अनुभव हवा आहे, तुझा ३ वर्षाचा आहे, इंजीनियर म्हणून. हिंदुस्तान मिलानो आपला कस्टमर. माझी ओळख आहे थेट वाइस प्रेसिडेंटशी. कॉंट्रॅक्ट पुढे वाढत रहातं' 
प्रभा विचारात पडला. 
'विचार कर नि संध्याकाळ पर्यन्त एसएमएस कर. चलो, बेस्ट लक'. 
प्रभाकरचं डोकं आऊट झालं होतं. ज्या लोकांनी कारस्थान केल्यानं त्याने जॉब सोडला त्यांचेच पाय धरायचे? तीन दिवसांनी गुरव चा फोन आला. त्याने व्हीपी ला १ आठवडा मुदत वाढवायला सांगितली असा म्हणत होता. 
'घेच रे तू जॉब. आता कॉंट्रॅक्ट असलं तरी कंपनी मोठी आहे. काम आवडलं तर कायमही करतात अशा ठिकाणी.' रूम पार्टनर्सनी ही भरीला घातला. 
प्रभाकरचा थोडा थोडा खर्च ते उचलत होते. नाही म्हंटलं तरी प्रभाकरला ते नको होतं. तो मुलाखतीला गेला. व्हीपी बासूंनी काही प्रश्न विचारले. स्कॉलरशिप मिळालेली असल्याचा बासूंवर 'बासू'ताच प्रभाव झाला. त्यांनी त्याला पुढील १ तारखेपासून रुजू व्हायला सांगितले. 

८ हजार म्हणजे फार नसले तरी रूम मेट्स ची देणी २-३ महिन्यांमधे फिटू शकणार होती. काम मिळणार आणि अनुभव पदरी पडणार अशा सगळ्या आशा प्रभाकरच्या पल्लवित झाल्या. मिलानो हा मोठा ब्रॅंड. भारतातला एफएमसीजीचा सव्वीस टक्के वाटा त्यांच्याकडे होता. पी अँड जी, एचएलएल बरोबरीने ते कायम पहिल्या तीन मधे असायचे. देशभरात १२ ठिकाणी कारखाने, कलकत्त्यात मुख्य कार्यालय, मुंबईत आर्थिक मुख्यालय आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस. याच ठिकाणी पुरवठादारांची निवड उच्च पातळीवरून होई. प्रभाकरचं काम सुरू झालं. सुरूवातीचे १-२ आठवडे, अपेक्षेप्रमाणे माणसांची ओळख, कार्यालयाची ओळख, जागा निश्चिति यात गेले. फक्त ८० लोकांचच कार्यालय होतं. बरेच सगळे उच्चपदस्थ अधिकारी. बंगाल्यांची संख्या जास्त. मराठी तसे खालच्या पातळीवर. कॉंट्रॅक्ट वर ३ जण. पहिलं काम मिळालं ते पुरवठादारांची संपर्क माहिती संगणकीकृत करण्याचं. ५ पृष्ठ यादी होती. लगेचच झाली. पण २-३ लोकांनी तपासून काही काही फेरफार सांगितले आणि २ तासांचं काम ३ दिवस चाललं. मग वेगळ्या साहेबाने वेगळी यादी दिली. हे असंच सुरू राहिलं, महिनाभर. बासू साहेब आठवड्यातून एकदा तरी ख्याली घेत. 
'कैसा चालो आहे?' 
मराठी मिश्रित हिन्दी, ती ही बंगाली हेलामधून. एवढ्या मोठ्या बॉसला आणि उभ्या उभ्या काय सांगणार. 
'सर कर रहा हू सर. सब साब लोग कुछ न कुछ काम दे रहे है.' 
महिन्याचा धनादेश देतांना मात्र त्यांच्या केबिन मध्ये बोलवून देत असत. प्रभाकरला दिला तेव्हा तिथे गांगुली, बॅनर्जी वगैरे साहेब पण होते. 'परभा...' बासू नेहेमीच अशीच हाक मारत; त्यात दर्प आणि हेटाळणी असे ती प्रभाकरला बिलकुल आवडत नसे. 
'कैसा चालो आहे? आपनी काजा पशन्दा कराशेना?' 
'हो साहेब. काम तर काम आहे ना' 
प्रभाकर ने असा प्रश्न आला तर द्यायचं ठरवलेलं उत्तर काढलं. 'आमाडेरा बंगाली बछ्छे ए प्रकारचे काज कोरोबेना, क्यों गांगुली?' 'गांगुली गालात हसले 'तबे मर्द मराठा शे'. 
सगळे बंगाली हसले तर प्रभाकर ही हसला. म्हणजे मराठींकडून आम्ही शेलकि कामं करून घेतो हा अर्थ समजण्याएवढा अनुभव नव्हता त्याला. तीन चार महीने उलटले. साधारण अशीच ऑफिस असिस्टेंट टाइप कामं करावी लागत होती. आता करार नुतनीकरणही जवळ आलेलं. त्यामुळे या वेळी मात्र प्रभाकर ने तोंड उघडलं. 
'साहेब आहे ते काम मी छान करतोच आहे, हवं तर बॅनर्जी साहेब, गांगुली साहेबांना विचारा. थोडा इंजीनियरचा अनुभवही मिळाला तर उपकार होतील..' 
'परभा, मेरा भालो बच्चा परभा, बस इतना ही' गांगुली कडे वळत बासू म्हणाले, 'कल से इसको तूम ले लो. बच्चा, हम तुम्हारा कॉंट्रॅक्ट नेक्स्ट मोंथ रेन्यू कोरेगा, ओके'. 
प्रभाकर खुश झाला. आता थोडं तरी कॉष्टिंग, पुरवठादारांची तुलना अशी कामं मिळू लागली. आता त्याची बसायची जागा गांगुली साहेबांच्या केबिन जवळ होती. दुसरा करार कालावधी सुरू झाला होता. गांगुली साहेब मधूनच कधीतरी 
'साला ये डिकोस्टा पावे ना' असं म्हणत असत. 
एकदा केबिन मध्ये काम प्रस्तुतिसाठी गेलेलं असतांना मनाचा हिय्या करून प्रभाकर ने विचारलंच. 
'सर, ते डिकोस्टा कोण सांगाल का?' 
'ऑ... हं. बहार बैठ के हमरो बातोको सुनता तुम, हं. कोई बात नहि, कोई बात नहि. आज हमरा मूड अछ्छा है. धुंडेगा टुम उसको? ठीक ठीक. गोवा के प्लांट मे था डिकोस्टा. होमरा जिगरी यार.आब हम प्लांट मे फोन करेगा तो कोई आदमी उठाएगा आणि मेरा नाम गांगुली सून को फोन पोटक देगा. मोबाइल भी लागे नहि. तूम धुंडेगा तो 3 साल का कॉंट्रॅक्ट करेगा हम तुमसे.' 
कॉंट्रॅक्टसाठी नाही पण शोधायच्या आनंदासाठी प्रभाकरने ते काम स्वीकारलं. गंगूलींनी आता त्याला केबिन मधेच जागा दिली. गांगुली असं नाव ऐकून कोणीतरी फोन ठेवतं म्हणजे नाव, ओळख न सांगता खाजगी फोन आहे असं दाखवत प्रयत्न करायला हवा. त्याने ऑफिस कोन्त्याक्त लिस्ट मधून प्लान्ट मध्ये टेबल वर फोन केला. 
'डिकोस्टा अंकल से बात करना है' 
'कौन?' 
'उनके दोस्त का बेटा. इम्पॉर्टंट काम है' 
'डिकोस्टा ऑफिस मे नही. १ हफ्ते बाद कॉल करो.' 
बरोबर १ आठवड्याने प्रभाकरने कॉल केला. परत तेच उत्तर. ३ र्‍या वेळेला ही तेच उत्तर म्हंटल्यावर प्रभाकरने चिडीचा सूर घेतला. 
'यू से सेम थिंग एव्री टाइम.' 
'ठीक है, २ दिन बाद करो' असं करत आणखी २ आठवडे गेले. आता प्रभाकरने रीसेप्शनिस्टल फोन लावला. तिला हे असं होतय हे सांगितलं. तिने काहीच उत्तर न देता फोन आपटला. प्रभाकर ही ऐकणारयातला नव्हता. 'शक्ति, युक्ति, बुद्धि ने अखंड यज्ञ चालवू' या पठडीतला होता तो. त्याने तिला रोज फोन लावला सुरुवात केली. शेवटी एक दिवस ती द्रवली. 
'इये अप्प्रेशियेट यॉर एफर्ट्स. पण डिकोस्टा साहेबांची आणि त्यांच्या असिस्टंटची चौकशी चालू होती. आता ते सक्तीच्या रजेवर आहेत. मी मोबाइल नंबर देते, पण लोक म्हणतात की तो लागत नाही.; 
ती मराठी असल्याचं त्याला उगीचच बरं वाटलं तिने सट्ट्कन सांगितलेला क्रमांक त्याच्या तल्लख बुद्धीत साठवलेला, तो त्याने कागदावर टिपला. पण काही उपयोग झाला नाही. तो क्रमांक बंदच लागत होता. आता काय करावं या विवंचनेत तो होता. गांगुली साहेब अधून मधून कुत्सित पणे बोलत, 
'अरे तूम मर्द मराठा क्या ढुंडेगा ओमरे दोस्त को'. 
काही दिवसांनी प्रभाकरच्या मनात एकदम कल्पना चमकली. त्याने परत रीसेप्शनिस्ट ला कॉल लावला. तिला त्याचा नंबर सवयीचा होता. एक दोन दा तिने उचलला नाही. पण मग एकदा उचलला. 'आता काय तुझं, मराठी माणूस?' 'मॅडम, तुम्ही मागच्या वेळी डिकोस्टाचे अस्सिस्टंटही बडतर्फ झाले म्हणालात..'
'हो म्हणाले, तर मग?' 
'त्यांचा काही संपर्क क्रमांक देता येईल का?' 
'हह' 
आसा उसासा टाकत तिने एक मोबाईल क्रमांक दिला. 
'मॅडम, प्यार हो रहा किसी से?' 
तिच्या शेजारच्या असिस्टेंट रिसेपाशनिस्ट मॅडमचा आवाज फोन ठेवता ठेवता त्याच्या कानात शिरला. प्रभाकरने लगोलग डिकोस्टाच्या असिस्टंट पेद्रोंना संपर्क केला. ओळखीचा क्रमांक नसल्यानं असावं बहुदा पेद्रो काही कॉल उचलेनात. प्रभाकर प्रयत्ने वाळूचे कण रगडणारच. त्याने एसएमएस केला. ;डिकोस्टा अंकलच्या मित्राचा मुलगा बोलतो आहे,महत्वाचं बोलायचय', अशा अर्थाचा आंग्ल मधून. पेद्रोने अनपेक्षितपणे ओके असं उत्तर पाठवलं. पण उद्दिष्टाने परत खो दिला. अफरातफरीच्या कारणावरून बडतर्फ झालेले डिकोस्टा आता कंडोलिम सोडून वाल्पोईला निघून गेले होते. पेद्रोंनी डिकोस्टांचा वाल्पोईचा फोन क्रमांक सांभाळून ठेवला नव्हता किंवा मोबाईलही नव्हता. पण प्रभाकरला नवीन धागे मिळाले होते. डिकोस्तांचं ठिकाण. 
डिरेक्टरी मधून लॅंडलाइन संपर्क क्रमांक मिळू शकतो, नाही का?! 
प्रभाकरला परत 'प्यारि' रिसेपशनिस्ट आठवली. तिला फोन करून त्याने 'उत्तर गोवा' जिल्ह्याचे 'यल्लो पेजेस' नेहेमीच्या टपालात घालून पाठवा म्हणून विनंती केली. तिनेही लगेच मान्य केलं. प्रभाकरला हायसं वाटलय अशी स्वतःलाच जाणीव व्हायच्या आत गांगुली कानावर रीसीवर ठेवून चढया आवाजात बोलले 
'गांगुली हिअर. नो सेंडिंग ऑफ येल्लो पेजेस एक्सेत्रा. यू अंडरस्टँड?'
'येस सर'
'इस बच्चे का सब मेरे ओनोमोती से होगा'
'राइट सर'
गांगुलींनी रिसीवर आपटला आणि एक विशिष्ट कटाक्ष प्रभाकर च्या दिशेने फेकला. कार्यालयातल्या सर्व कनिष्ठ लोकांना या कटाक्षाचा अर्थ गांगुली रागावले आहेत आणि जाच्यावरुन तो कटाक्ष tangent करून ओघळवत आणला आहे त्याने त्वरीत त्यांच्या समोर हजर होऊन शांत उभं राहायचं आहे असा असतो हे माहिती होतं. प्रभाकर काही क्षण उठला नाही तर तो तुलनेने नवखा असल्याने गंगूलींच्या गोड असिस्टेंट ने नेत्रपल्लवी ने त्याला जागा दाखवली. प्रभाकरला तेवढं पुरे होतं. तो समोर येऊन उभा राहिला आणि तोंड उघडणार तेवढ्यात परत 'श्शु' ची खूण झाली.
थोडा अस्वस्थ होईपर्यंत एवढा वेळ गेला. गांगुली मधेच कटाक्ष टाकत होते तर पुढच्या क्षणी आपलं लक्षं नाही असं दर्शवत होते. असं २-3दा झाल्यावर नेहेमीच्या योग्य क्षणी त्या गोड मुलीने पाण्याचा पेला गंगूलिंसमोर समोर सरकवला. पाणी पिऊन गांगुली एकदम निवळले. 
'बेटा, कॉर्पोरेट इज ए टीम वर्क. सब कुछ अकेला नही कोरो. बात कोरो. एक्स्पेरीन्सेड आदमी को बोताओ, पुछो. फिर कोरो.'
परत फोन कानाला लावून मुख्य कारकुनाकडून त्यांनी नॉर्थ गोवा चे येल्लो पेजेस तत्काळ प्रभाकर च्या टेबलवर ठेवायची आज्ञा केली. प्रभाकर चकित झाला. 'अवर इज इंडिया रिजन वेन्डर रिलेशन हेड ऑफिस. वी कीप येल्लो पेजेस ऑफ ऑल मिलानो लोकेशन्स अँड वेन्डर लोकेशन्स! अवर गोवा फ्याक्टोरी इज इन नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्त. समझा?' हे पूर्ण व्हायच्या आत ते पुस्तक त्याच्या टेबल वर आलं सुद्धा. 'अब जाओ और धुंडो. बेस्ट लक.' 
   
प्रभाकरने वाल्पोईची यादी उघडली तर तिथे ३-४ पानं भरून डिकोस्टा. प्रभाकरने\ एक एक करून सगळे क्रमांक लावायचे ठरवले. 
'मे आय टॉक टु डिकोस्टा अंकल फ्रॉम मिलानो?' असं तो प्रत्येकाला विचारे. आणि .. अंततो गत्वा.... यश! 
तडक नंबर गांगुलींकडे, गांगूलींनी पटापट फोन लावला. ख्याली घेतली. १ आठवडा सुट्टी टाकून डिकोस्टाला भेटून 'मोंथ-एंड' च्या आत परतले. 

शेवटच्या आठवड्यात बासुन्च्या केबिनमधे पगार होत, तेव्हा गांगुली डीसीएफओ असल्यानं तिथे बसत. प्रभाकर धनादेश घ्यायला आल्यावर गांगुलींनी बासुंकडे त्याची शिफारस केली. खूप हुशार मुलगा आहे, याला पे-रोल वर घ्या असं सांगितला. बासुंनी थोडा विचार केल्यासारखा केला. 
'अभि तो परभाकर ने तुम्हारा काम किया. मेरा भी एक काम करेगा तो दे देङे पे-रोल. आज से परभाकर बॅनर्जी के साथ काम करेगा.' 
हे ऐकून गांगुली अस्वस्थ झालेले प्रभाकरला स्पष्ट जाणवलं. पण बासुंसमोर कोणी बोलत नसे. गांगुलीचं केबिन सोडतांना त्यांनी याला समोर बसवून घेतला. मित्रासारर्ख्या गप्पा मारल्या. आपलं करिएर कसं उभं राहिलं वगैरे सांगितलं. मग म्हणाले, 'बेटा, तुम ईधार कोईसे आया?' प्रभाकरने काय ते खरं सांगितलं. 
'बेटा, बॉस के साथ झोगडा हो के तुमने जॉब छोडा, वोहि बॉस का खास आदमि तुमको ईधार का रास्ता दिखाया. सोचो बेटा, सोचो. और ये भी याद राखो के जोंगाल मे सिद्धा पेड पेहेले कटता. तुम्हारा ब्रेन हई ना ये खुद के लिये पेहले इस्तेमाल करो. बॅनर्जि का काम करो, आख और कान खुल्ला रोख के. आय विल नोट इंटरप्ट बट फॉलो माय इन्स्त्रक्शोंस ईफ आय कॉल यू. गीता मे भगवान अर्जून को बोले वही मै तुमको बोलता 'तेषामहम् समुद्धर्त्ता, मय्यावेशितचेतसाम्. क्यो समझा कुछ? आमि तुमारे भालो, योर टॅलेंट हॅज चेंज्ड योर डेस्टिनि, बेटा. जाओ.' 

एकीकडे गांगुली सावध रहायला सांगत होते,तर दुसरीकदे नशीब उघडलय असं म्हणत होते. प्रभाकर पूर्ण गोंधळला होता. बासुंनी उधृत केलेली खास कामगिरी आता बॅनर्जी साद्यंत सांगू लागले. मिलानो डिटर्जंटच्या कंडोलिमच्या फॅक्टरीत काही वर्षांपूर्वी विस्तार प्रकल्प आखला होता. तेव्हा चुकीने बरंच सामान डबल मागवलं गेलं. तो प्रकल्प नंतर रखडत गेला आणि मग बंद पडला. मध्यंतरीच्या काळात हे सगळं सामान फॅक्टरीच्या आजूबाजूच्या गोदामांमध्ये पडून राहिलं आणि सडून गेलं. आता त्या सामानाच्या पुरवठादार कंपन्या ते सामान परत घ्यायला तयार नव्हत्या. त्यातली १ कंपनी होती जयलक्षी फ्लो मीटर्स. बॅनर्जी म्हणाले की आता ती कंपनी निम्मी निम्मी सेटलमेंट करायला तयार झाली आहे. पुरवलेले व अजूनही वापरण्याजोगे असलेली मीटर्स म्हणजे प्रवाह मापक जर मिलानो ने जयलक्ष्मिला परत केले तर ते तपासून खात्री करून मिलानोच्या तामिळनाडू मधल्या प्रकल्पाला नव्याने विकायचे आणि जे मापक बाद झालेत त्याची झळ मिलानो आणि जयलक्ष्मिने निम्मी निम्मी वाटून घ्यायची असा करार झाला आहे. यात मेख ही आहे की सगळ्या पुरवठादारांचं सामान गोदामांमध्ये एकत्र सडतय. त्यातलं जयलक्ष्मिचं वेगळं करून त्यातलं परत उपयोगी आणि निरुपयोगी असं वेगवेगळं करायचंय. प्रभाकरने जयलक्ष्मिमधे क्यू सी चं काम केलेलं असल्याने तो यासाठी योग्य माणूस आहे, हे सांगायची गरज नव्हती. कंडोलिमला त्याला साळगावकर नावाचा सहकारी मिळणार होता. तो ही आधी जयलक्ष्मी मधे होता आणि आता मिलानोच्या कंडोलिम फॅक्टरी मधे कामाला होता. शनिवारी पुण्याहून निघून प्रभाकर कंडोलिमला रविवारी पोहोचला. कंपनीच्या अतिथीगृहात त्याची सोय करण्यात आली होती. अशा पद्धतीचं पहिलंच काम आणि हॉटेलसारखी व्यवस्था वगैरे प्रथमतःच होत असल्याने प्रभाकर सुखावला. 

सकाळी ७ ला रीसेप्शनकडे नोंदणी करायची असल्याने तो ५ वाजताच उठला आणि ६.१५ पर्यन्त सगळं आटपून नाश्ता घेणार इतक्यात त्याला फोन आला. 
'प्रभाकर, गांगुली हिअर. तुम गोडाऊन जाने के लिये कार मांगो. उधार फोर्म होगा. भर के दे दो. कार नही मिलेगा. तुम रेजेक्टेड कर के स्टॅम्प डालके ले लो. कुछ भी हो जावे तो भी ट्रक मे नही बैठना. गुड डे.' 
प्रभाकरला काही बोलायची संधि न मिळता फोन शांत झाला. प्रभाकरला खरं तर ट्रक मधे बसायला मिळणार हे पण थ्रिल होतं. पण त्याने गांगुली साहेबांचं ऐकायचं ठरवलं आणि रीसेप्शन सुरू झाल्या झाल्या तिथे बॅनर्जी साहेबांचं अधिकार पत्र दाखवून नाव नोंदणी केली व कारची मागणी केली. अपेक्षेप्रमाणे रिसेप्शनिस्ट नाही म्हणाली. प्रभाकरने तिला दम भरला की १५ मिंनितांमद्धे गाडी मिळाली नाही तर तो बॅनर्जी साहेबांकडे तक्रार करेल आणि तो तिथेच ठाण मांडून बसला. रिसेप्शनिस्ट तर त्याच्याकडे लक्षही देत नव्हती. थोड्या वेळाने उगीचच आपण फोनवर बोलतोय असा त्याने आव आणला. आश्चर्य म्हणजे त्याचं ते बोलण्याचं नाटक संपल्यावर लगेचच रिसेप्शनिस्टने त्याला बोलावलं. विस्फारल्या नजरेने प्रभाकर तिच्याकडे गेला. 
'तुझा आवाज ओळखीचा वाटतो. डिकोस्टाचा संपर्क क्रमांक मागण्यासाठी सारखे कॉल करणारा तूच का तो?' 
'हो मॅडम मीच करत होतो फोन.' 
 'वेल डन.' ती खरोखरच प्रेमात होती की काय त्याच्या आवाजाच्या? 
'ठीक आहे, मी तुला गाडी देते. पण त्याची पावती तुझ्या ऑफिसला पाठवली जाईल.' 
प्रत्यक्ष वित्तीय अधिकार्‍यानेच गाडी घ्यायला सांगितली असल्याने आणि बिल तेच सम्मत करणार असल्याने प्रभाकरने लगेच मान्य केलं आणि सलगावकर आला की त्याला गोदामकडे पाठवायला सांगायलाही तो विसरला नाही. गोदाम १२ मैलांवर निर्जन जागी होतं. थोडी भीतीदायक जागा होती सहसा कोणाला लक्षात येणार नाही अशी. रान वाढलेलं,आजूबाजूला श्वापदं होती. त्याने एक एक खोली उघडली आणि ट्रक्सची वाट पहात बसला. एवढ्यात परत फोन आला. 
'तुमको गाडी मिला, मुझे खबर मिल गया. आब सुनो. दोपहर तक काम करो. फिर वो साळगावकर को कोई ऐसा मार्क दिखा दो जिससे वो तुम्हारे मीटर्स पोहेचान सके. फिर लंच के टाइम गोडौन को ताला लगा के तुम दोनो कंपनी मे लंच करो. ट्रक ड्राईवर और बाकी लोगो को साथ मे नाही लो. लंच के बाद गोडावून की चावी अपने नाम से उसको साळगावकर के नाम पर कर दो और कोई वजह बना के तुम गोडौन वापस मत जाओ. कम टू पुणे इमिडियटली. बॅनर्जी पुछेगा तो बोल दो के गांगुली ने वापस बुलाया. बेस्ट लक' 
परत एकदा बोलायची संधीच मिळाली नाही. दुपारपर्यंत भरपूर मेहेनत करून त्याने आधी एकावर एक पडलेलं सामान पसरलं आणि जयलक्ष्मीचं सामान वेगळं काढायला सुरुवात केली. मजूर, ट्रकचालक यांनाही कसं ओळखायचं ते समजावून सांगितलं. 

पुढे सगळं गांगुलींच्या बरहुकूम झालं. साळगावकरला शंका येईल आणि तो किल्ली नावावर करायला नाही म्हणेल असं त्याला वाटलं होतं. पण झालंउलटच. आपण कंपनीला कुठल्यातरी मोठ्या संकटातून वाचवतोय आणि आता तर पूर्ण श्रेय आपल्यालाच मिळणार असा त्याचा सूर दिसला. की रजिस्ट्रार ला त्याने मोठ्या ऐटीत सकाळपासूनच माझ्या नावावर करा असं सुचवलं. प्रभाकरला यावर विचार करायला बिलकूल वेळ नव्हता. गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे तो जीवाचा आटापिटा करून दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजेच्या आत गोवा हद्दीच्या बाहेर होता आणि बॅनर्जी साहेबांचा फोन आला. 
'किधार हो परभाकर?' 
'बस मे हू सर.' 
'बस किधार है?' 
आजूबाजूला पाहून दिसेल ते नाव सांगितलं त्याने. 
'गोवा को क्रोस कर दिया. ठीक है, किधार जोएगा, इधोर आयेगा तो देखता तुमको.' 
गोवा क्रॉस करण्याचा काय संबंध हे त्याला समजत नव्हतं. पोहोचल्या पोहोचल्या रूमवर न जाता प्रभाकर ऑफिसला गेला. संस्कार, दुसरं काय. तर त्याला आधी बाहेरच अडवला. बासु साहेब सुट्टीवर होते ते अर्जंट येणार तोपर्यंत थांबवला होता. बासु साहेब येण्याचा आणि मला आत येऊ देण्याचा काय संबंध हे पुढचं कोडं आलं. 

बासु आले तेच जळजळीत कटाक्ष टाकत. थोड्या वेळाने प्रभाकर केबिनमधे गेला तर उच्चपदस्थ मंडळ आधीच तिथे होतं. त्यांची तिथे आधी बंगाली मधून बरीच चर्चा, चर्चा कसली भांडणच झाली. एकंदर सूर असा होता की बॅनर्जी साहेबांनी जयलक्ष्मिबरोबर एवढा मोठा व्यवहार ठरवून दिला आणि प्रभाकरमुळे त्यावर पाणी पडलं. प्रभाकर कामचुकारपणा करून तिथून निघून आला. गांगुलींनी त्याला यायला सांगितलं म्हणून सगळे त्यांना रागवत होते. तर गांगुली म्हणत होते की काम तर झालं आहे मग व्यवहार फिसकटला कसा? प्रभाकरला परत बोलावण्याचं कारण जे गांगुलींनी सांगितलं ते ऐकून प्रभाकरला धक्का बसला. नियमाविरुद्ध कार मागितल्यामुळे त्याला परत बोलावलं असं सांगितलं त्यांनी चक्क. यावर अधिक चर्चा प्रभाकर समोर नको असं म्हणत बासुंनी पुढील कार्यक्रम आणि तारीख ठरवली आणि गंगूलींना प्रभाकरवर पुढची कार्‍यवाही करायला सांगितली. 

गांगुलींनी प्रभाकरला केबिनमधे बोलावून घेतला. तिथे बॅनर्जीही आले. नियमविरुद्ध वागल्यामुळे करार रद्द करण्यात आल्याचं प्रभाकरला सांगण्यात आलं. तो नवागत असल्यानं त्याला उरलेल्या ५ पैकी १ महिन्याचे अतिरिक्त करारशूल्क देऊन त्याची पाठवणी करण्यात आली. ते रेलीविंग लेटर नंतर कुरीयर करणार होते. प्रभाकरला आणखी आणखी धक्के बसत होते.  

तो तडक रूमवर आला. रूमवर येतो तोच त्याला चरक आयुर्वेदीय कंपनि कडून मुलाखतीसाठी फोन आला. उद्याच जायचं होतं. एका डोळ्यात आसू तर दुसर्‍यात हसू घेऊन तो सगळं विसरून मुलाखतीच्या तयारीला लागला. ३-४ वेगवेगळ्या लोकांनी मुलाखती घेतल्या. शेवटी सीईओ पराशार आले. 
'यू आर रीयालि शार्प. यॉर जॉब वास शुअर बट वुई ऑल्सो एक्सामाइंड यू फॉर हायर पोस्ट. यू नीड सम ट्रेनिंग अँड वुई बिलिव दॅट वुई हाव ए वेरी ब्राईट सिनिएर एक्सेकुटीव राइट हिअर. यू विल जॉइन अस ऑन फर्स्ट इन इंदोर. गुड लक'. 
प्रभाकर आता एकदम चक्रावून गेला होता. काय गोंधळ चाललाय ते त्याला काही कळत नव्हतं. जाता जाता चरक आयुर्वेदीयच्या रिसेप्शनिस्टने त्याला १ लिफाफा दिला. त्यावर 'ओपेन ऑन फर्स्ट' असं लिहिलेलं होतं. 

प्रभाकर ने घरी येऊन गांगुली साहेबांना मोबाइल करायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ऑफिस क्रमांकावर त्यांना गाठायचं धारिष्ट्य त्याच्यात नव्हतं. १ तारीख जवळच होती, म्हणून तो तयारीमधे गुंतून गेला. २९ तारखेला तो निघणार होता त्या सकाळी त्याच्या रूममेटने त्याला महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी दाखवली --
'कंडोलिमच्या वेशीवर असलेल्या मिलानोच्या गोदामातून जयलक्ष्मि फ्लो मीटर्सचा लाखोंचा माल पळवतांना तरुणाला रंगेहात अटक. याआधीच किमान १.५ कोटींचा माल पळवला असण्याची शक्यता'. खाली ट्रक मधे बसलेल्या साळगावकरचं छायाचित्र होतं. 


प्रभाकरचा उल्लेख मात्र कुठेही नव्हता. आता मात्र प्रभाकरला सगळा गुंता उलगडला. जयलक्ष्मिच्या दोन जुन्या, मॅनेजमेंटशी भांडलेल्या कर्मचार्‍यांना दरोडेखोर ठरवून व जुना माल चोरीला गेला असं दाखवून नवे करार करायचे असा मामला होता तर एकूण. 
'तू याच कंपनिमधे गेलेलास ना?' 
'हो रे. पण मी होतो तिथे तरी मला असं काही होतय असं लक्षात आलं नाही. खरच दृष्टीआड सृष्टि.' 
प्रभकरने काही थांग लागू दिला नाही. अन्य लोकांना काही सांगून त्याचा काही उपयोग तर नव्हताच. 

१ तारखेला नोकरीवर रुजू होऊन अपॉईंटमेंट लेटर हातात आल्यावर मात्र  चरक कंपनिच्या अतिथि निवासात दुपारच्या भोजनाच्या वेळी, मनाचा हिय्या करत त्याने गंगूलींच्या टेबलावरचा क्रमांक लावला. पण तो रिसेप्शोंनिस्ट कडे गेला. तिने सांगितलं की गांगुली निवृत्त झालेत, कालच शेवटचा दिवस होता व ते थेट त्यांच्या मूळ गावी, मिदनापूरला जाणार होते आणि काहीही संपर्क सोडलेला नाही. 

यामुळे आलेली हताशा लपवत प्रभाकर भोजनालयात गेला. चरकचे सीईओ १ तारखेला ज्या कार्यालयात किंवा कारखान्यात असतील तिथे ते १ तारखेला नवीन कर्मचार्‍यांबरोबर लंच घेत. आज योगायोगाने ते इथे होते. त्यांच्यासमोर आनंदी दिसणं आवश्यक होतं. जेवता जेवता सीईओ प्रत्येकाशी बोलत होते. प्रभाकरला ते म्हणाले 'माय फ्रेंड गांगुली मस्ट नॉट हाव रेफर्ड यू विदाउट मेरीट. इट्स ऑन यू टू प्रूव हिम करेक्ट.' आणखी एक सुखद धक्का!

 नव्या नवलाईचा पहिला दिवस आटपून प्रभाकर संध्याकाळी चरक कंपनीच्या अतिथीगृहात परतला. त्याला इंदोरमध्ये हवा तसा रहिवास मिळेपर्यंत १ महिना इथे रहाता येणार होतं. येऊन त्याने सामान लावायला घेतलं. त्यात त्याला तो १ तारखेला उघडायचा लिफाफा मिळाला. आत एक चिठ्ठी होती. 

'आमि तुमारे भालो बेटा. योर टॅलेंट हॅज चेंज्ड योर डेस्टिनि' असं लिहिलेली आणि खाली गांगूली साहेबांची लफ्फेदार सही होती!

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

..... तेथे कर माझे जुळती: माधव विद्वांस


क्लाइव हुंबे (Clive Humbe) म्हणाला 'data is new oil' . हे विधान machine to machine communication, artificial networking यासंदर्भात जास्त लागू केलं जातं. पण याचा अर्थ new data is oil असा सीमित नाही. हिंदुस्तान सारख्या प्राचीन देशात खूप खूप जुनी माहिती उत्खनन करायची गरज आहे. फार फार तर त्याला आपण crude oil, कच्चं तेल म्हणू या! हे फार महत्वाचं आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असं सगळं जग मान्य करत असतांना आपले काही लोक 'आमच्याकडे रामायण काळापासून विमानाची संकल्पना होती' असं अभिमानाने सांगतात. आजच्या 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा काळात पुरावे, आकृत्या, आरेखनं, गणन ह्याचं पाठबळ नसेल तर ह्या फक्त बढाया ठरतील. खर्या असल्या तरी! म्हणून आपली संस्कृति, माणसं, शास्त्रं याचा प्रत्येक छोटा मोठा संदर्भ संकलित, संकरित व जतन करून त्यावर अधिक अभ्यास, संशोधन होणं गरजेचं आहे.


Bookganga वरील e-books, bites of India, Facebook अशी आधुनिक माध्यमं वापरत खासकरून हिंदुस्तान आणि हिंदुस्तानींबद्दल 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधूर ते ते' आपल्यापर्यंत पोहोचवणार्या श्री. माधव अनंत विद्वांस यांचा जन्म २४ जुलै १९४९ रोजी  महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. त्यांनी माध्यमिक शिक्षण द्रविड़ महाविद्यालय, वाई येथे व पदविका अभ्यासक्रम वाईच्याच किसनवीर महाविद्यालयातून संप्पन्न केला. लहानपणापासून वाचन, इतिहास व चित्रकलेची आवड आहे. बरेच मित्र शेतकरी घरातले होते त्यामुळे बांधावरच बालपण गेलं, वाईच्या कृष्णाघाटावर पोहण्याची मजाही औरच होती. काही काळ छत्रपति हायस्कुल, भवानी नगर, इंदापूर इथे शिक्षक म्हणून सेवारत होते. त्यानंतर सहकारी वस्तुभांडारात व लेखनिक ,विश्वकोशामध्ये नकाशा विभागात अभ्यागत म्हणून काम केलं. त्यांची नोकरी आणि आवड हा छान मिलाप घडला.

रंगावली स्पर्धेत पारितोषिक मिळवलं. पुणे रायगड व आसपास सायकलवर भटकंती केली. पद्मविभूषण पंडित सातवळेकरांच्या १९७५ सालीच्या 'सद्धर्म' च्या नेपाळ विशेषांकामध्ये मध्ये पहिली कविता व लेख लिहिला. २००५ साली पंचशील परिक्रमा हे बौद्ध स्थळांची माहिती देणारं त्यांचं पुस्तक प्रकशित झालं .

माधवजी भारतीय जीवन प्राधिकरण मधे तब्बल ३८ वर्षं कार्यरत होते.  लेखन करायला लागणारी एकाग्रता व उसंत नोकरी करतांना मिळत नव्हती, मात्रं वाचन अव्याहत चालू असायचं. सेनानिवृत्तीनंतर वाचनाची, ही, दीर्घ मुदतीची ठेव खुली करून त्यांनी लेखनाद्वारे व्यक्त व्हायला सुरुवात केली.

www.bookganga.com वर भारतातील ६००० स्थळांची एकत्रित माहिती देणारा ७०० पानांचा 'भारतीय पर्यटन कोष' किंवा ' encyclopedia of Indian tourism ' हा ebook स्वरूपात २०११ मधे प्रकाशित केला. तो आजमितीला फक्त ५५० रुपयांमधे उपलब्ध आहे. फेसबुक वर आरुढ झाल्यानंतर आतापर्यंत ५००० मित्र झाले व त्यावर त्यांनी लिहिलेल्या त्यांमजकूरांवर likes चा आकडा १२ लाख पार गेला आहे. ३६५ दिवसांच्या सुमारे ४००० नोंदी संकलित करून महत्वाच्या व्यक्तींचे वाढदिवस ,जयंती ,पुण्यतिथीचा दिवशी त्यांचे कार्याबद्दल विकिपीडिया व मराठी विश्वकोश तसेच वृत्तपत्रात आलेली माहिती मित्रांना त्याच दिवशीही फेसबुकचे माध्यमातून ते देत असतात. सातारचे स्थानिक पाक्षिक "दक्ष " मध्ये हि माहिती बरेच दिवस येत होती. मीडिया मॅगझीन "बाइट्स ऑफ इंडिया" मध्ये दर बुधवारी पर्यटन विषयक लेख येतो, तसेच दैनिक प्रभात मध्ये आठवड्यातून तीन वेळा विविधा या संपादकीय सदरात स्फुट लेख येतो.

सध्या पाणीपुरवठा खात्यातील निवृत्त सेवक संघटनेचे कार्यकर्ते म्हणूनही ते क्रियाशील आहेत. सातारचे प्रसिद्ध तालीम मास्तर व्यायामाचार्य कै. भिडे गुरुजींचे ते नातजावई होत. त्यांचे वडील अनंत विद्वांस वाई नगरपरिषदेत मुख्याधिकारी होते. माधवजींनी प्रवासाची आवड बर्यापैकी जपली. सहकुटुंब राजस्थान ,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक ,गुजरात ,तामिळनाडूत चेन्नई, उटी, ओरिसा ,काश्मीर ,हिमाचल एवढा भाग पाहिला. सहलीला जाण्याअगोदर काय बघायचे याची माहिती करून मगच प्रवास केला. या उत्कृष्ठ नियोजनाचं फलित म्हणजेच पर्यटन कोष (encyclopedia of Indian tourism). हे संकलन इंग्रजीत आहे. सांप्रत ते "बाइट्स ऑफ इंडिया" मधून मराठी व इंग्रजी भाषेतून साप्ताहिक लेखनमालिकेच्या रुपातही प्रसीद्ध होत आहे व आतापर्यंत ३५ लेख झाले आहेत. एका लेखात साधारण एक जिल्हा, त्याचा इतिहास व पर्यटन विशेष अशी साकल्याने माहिती दिली जाते. हे करतांना  तसंच अन्य संदर्भ नूतनिकृत करायला ते विसरलेले नाहीत.

गृहदक्ष पत्नि सौ नीलिमा, मुलगी सौ अनघा-जावई संदीप ,नातु ओजस, विधिद्न्य मुलगा आणि सून श्री रोहित व सौ केतकी असा परिवार आहे. तर्कतीर्थ लक्षमणशात्री जोशी हे त्यांचे आदर्श होत तर गोनीदा आवडते लेखक.

खालील छायाचित्रात ते सौ. नीलिमा विद्वांस यांच्या खांद्यावर हात ठेवून माधवजी दूरवरच्या प्रदेशाकडे अंगुलीनिर्देश करत हितगूज करत आहेत. हे फक्त प्रतीकात्मक आहे. हा हात त्यांनी मोठ्या मनाने आपल्याही खांद्यावर ठेवलेला आहे.


माधवजी संकलनाचं काम करताहेत ते अतिशय मोलाचं आहे. इतर अनेकांनीही या दिशेने कार्यरत होणं आवश्यक आहे. याची जाणीव मला प्रकर्शाने झाली तो २०१८ सलातला प्रसंग उधृत करतो. आपले पंतप्रधान मोदी सांगतात की, प्रत्येक भारतीयानं किमान ५ परदेशी लोकांना भारतात पर्यटनासाठी आमंत्रित करावं. प्रसंग होता माझ्या यूरोपियन मित्रांबरोबर सहभोजनाचा. मी दरवर्षी प्रमाणं विषय काढला. ठिकाणं सुचवली. यावेळेला नवीन असलेलाएक सदस्य म्हणाला "we are scared of coming to India. There are so many wrongdoings. Specially with women." इतरही काही सदस्यांनी याच पद्धतिचं मत मांडलं. एक समाज म्हणून मुळातच आपल्यापासून जरा दूर राहिलेलं बरं असं मागणार्या देशांमधे या अशा बातम्या विषारी ठरत आहेत. " you are suggesting since 2016. We thought about it but ended up visiting Thailand, Vietnam ". चर्चेने बरीच नकोशी दिशा घेतल्यावर मुखक्षेप करणं अपरिहार्य झालं. " we know each other since २०१६. Tell me a single instance when anyone of you felt unsafe in my company? ... Then do you believe all Indians are like those portrayed in the news? many of us those you know come here leaving their family in India. Did any thing happened to their families back in Indida? have you heard? " अशा स्वरुपाचे प्रश्न विचारल्यावर संभाषणाची दिशा बदलली. नवीन सभासदाला चूक उमगली. " no no Puru. Absolutely not. But that's what we see in our media. ".... !?!

बांधवांनो आता मला सांगा, माधवजी जी माहिती अव्याहतपणे व्रतस्थ होऊन आपल्यापर्यंत पोहोचवताहेत तीच ती उत्तम उदात्त उन्नत महन्मधूर, परदेशी लोकांच्या गळी उतरवली पाहिजे. गरज असेल तिथे भाषांतर करूनही हे पोहोचवायलाच हवं. Facebook वर १२ लाख likes १२०० लोकांनी मिळून दिले असं धरूया. त्यातले फक्त १२० जणं जरी दूत बनले तरी हिंदुस्तान बद्दल जगात आशादायक संदेश नक्की जाईल. चला, या तेलावर प्रक्रिया करून ते उत्तम उदात्ततेचं इंधन बनवूया!

आंग्ल भाषेत s लावून अनेकवचन होतं. भरपूर माहिती, द्न्यान असलेला १ विद्वान असेल तर ती विद्वत्ता वाटून अनेक विद्वानांच्या तोडीचे झालेले १ च विद्वान म्हणजे आपले लाडके माधव विद्वांस! त्यांना दिल से सलाम, शुभेच्छा, अभिनंदन!!

बडोद्याचे साहित्यप्रेमी अजातशत्रू श्रीमंत हिंमतबहादूर जितेंद्रसिह गाईकवाड यांची  माधवजिंशी भेट झाली तो अविस्मरणीय क्षण. गाईकवाड हे इतिहास प्रेमी असून सयाजीराव यांच्यावरील विद्वंस यांनी फेस बुक वर टाकलेली पोस्ट वाचून त्यानं फोन केला तेंव्हा पासून त्यांची मैत्री झाली आहे .





लेखन: पुरुदत्त रत्नाकर,  संदर्भ: रोहित विद्वांस 
-----------------------------------------------------------------------------------

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

आई म्हणजे ...

आई म्हणजे आई म्हणजे आई असते
डोळे उघडता समोर असते, 
पाठीशी मात्रं कायम असते।।

तिच्या बाबांचे त्यागलेले सत्व, तुमच्या बाबांचे स्विकारलेले श्रीत्व असते,
तुम्हाला सामावणारे तिचे स्वत्व असते, 
तुम्हाला प्रत्यक्ष करणारे देवत्व असते,
आई म्हणजे आई म्हणजे आई असते। 

हरिहारेश्वरची देवी पार्वति माझी रत्ना होते
कुणाला चारुशिला, ज्योति, प्रतिज्ञा ओ देते 
कुणाची निवेदिता, वसुंधरा, सुवर्णा असते 
छे हो, ती फक्त आई असते
आईला का कोणी नावे ठेवते?। 

आईच्या हृदयात तुम्हाला जागा असते, 
तिची कव तुमची पागा असते, 
तुमचे अस्तित्व तिने कातलेला धागा असते,
तुमचे व्यक्तित्व तिने विणलेला तागा असते 
आई म्हणजे आई म्हणजे आई असते। 

आई ममतेचा अथांग सागर, क्षमतेचे अथांग आकाश असते
ती समाधानाचा प्राणवायु पुरवते
ती संकल्पाची ज्योतही जागवते, 
आईच विश्वासाची आधारभूमि देते। 

डोळे उघडता समोर असते, असता दिसता नाहीशी होते ..... 
मग काय, ती डोळे मिटल्यावरही समोर येते, 
पाठीशी मात्रं कायम असते 
आई म्हणजे आई म्हणजे आई असते। 

व्यक्ति नसते, 
प्रवृत्ति असते,
पाठीशी असते, 
कायम रहाते 
आई असते....  ।।

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...