"सौख्यकारी दुःखहारि दूतवैष्णव गायका..."
खरे आजोबांचा नित्य-पाठ लगबगीने चाललेला. १० वाजून २० मिनिटं झालेली. आजोबा दोनशे उंबरठे असलेल्या वरूण लेकफ्रंट सोसायटीमधे ब विभागात चवथ्या मजल्यावर रहायचे. हो, एकटेच. त्यांचा एकुलता एक मुलगा फिलाडेल्फिया ला गेलेला २२ वर्षांपूर्वी. तिकडेच कायमचा स्थायिक. सुरुवातीला ५-६ वर्ष दरवर्षी येऊन भेटून जात असे. नंतर आणखी कमी आणि आता तर पूर्ण संपर्क तुटलेला. आजींनी ईहलोक सोडून १० वर्ष झालेली. आज गृहसंस्थेची आपत्कालीन बैठक १० वाजता बोलावलेली. आजोबा कधीच बैठक चुकवत नसत. आज अंगात कणकण होती. म्हणून उशीर.
इकडे खाली संस्थेच्या तळघरातल्या बहुउद्देशीय सभागृहात आपात्कालीन सर्वसाधारण बैठक चालू होती. विषय, सभासदांना होणारा बंब्याचा उच्छाद आणि त्यावरील उपायांची अंमलबजावणी. सगळेजण तावातावाने मतं मांडत होते. "काल दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला. त्यांच्या अंगावर उडी मारून, फटकारून त्यांच्या हातातली भाजीची पिशवी घेऊन पळून गेला. त्याचा संयोजन समिती एका आवाजात तीव्र निषेध करते." संस्थासचीव सपकाळे.
"मालक, माणसांना बैठकीला बोलवून बंब्याचा निषेध करताय, इथेच तुमची धम्मक दिसून येते. " चौधरी.
"ओ अ-४२०, ते मालक नाहीत सचीव आहेत. सदस्यांच्या हिताचे सगळे उपाय आमची कमिटी करतच असते. मागे एकदा बंब्याने ४० दारांसामोरून दुधाच्या पिशव्या पळवल्या तेव्हाही मीटिंग घेतली होती. त्यात जोशींनी संगीतलेला लंगूर ड्रेस आणायचा प्रस्ताव आम्ही स्विकारला होता. नाही का?"
"मग, काय झालं त्याचं?"
"काय झालं काय, काय झालं? आपले सेक्युरिटीवाले तो ड्रेस घालून फिरायला नाही म्हणाले. जोशी स्वतः तर पहायलाही तयार नाहीत त्या ड्रेसकडे. तुम्ही घालताय का?"
"तो प्रस्ताव माझा नव्हता. मी एक वेगळंच सांगितलं होतं. पक्या जाळिंदरला बोलवा. तो सापळे लावून पकडून आंध्रच्या जंगलात सोडून येईल सगळ्या शेपटीवाल्यांना. फक्त २ लाख, म्हणजे घरटी २०००.."
" ओ चौ, बसा खाली. बंब्या आणि वाघ्याच्या जमातीतले कुठंही सोडले तरी परत येतात." खोत म्हणाले. "तुम्हाला अनुभव आहे वाटतं, परत यायचा..." एक सभासद.
".... तो तुमचा वैयक्तिक मुद्दा तुम्ही निस्तरा पण मुद्दलातले २००० रुपये आम्ही देणार नाही." एक सदस्य.
"हे बघा, सचीव काहीतरी सांगायचा प्रयत्न करताहेत. आपल्या संहितेप्रमाणे ते बोलत असतांना इतर कोणाला बोलायची परवानगी नाही. पिनड्राॅप पाहिजे." विधि समितीचे कार्यवाह.
"बाकी सगळे उपाय तपासून झाले आहेत. पकडून नेऊन सोडून येणं, लंगूरचा पोशाख घालून सुरक्षा रक्षक फिरवणं, उच्च कंपन उपकरणं बसवणं, वाघासारखे पट्टे अंगावर रंगवलेले कुत्रे पाळणं, लंगूर भाड्याने आणणं, वगैरे. यातले बरेच उपाय कायद्यात बसत नाहीत तर काही कायमस्वरूपी उपयोगी नाहीत तर काही आपल्या आवाक्याबहेरचे आहेत"
"हो हो. ते कंपन उपकरण मी माझ्या घरात बसवलं होतं आणि बंब्या खिडकीतून आल्यावर चालूही केलं ते. पण त्या बंब्याने फक्त कानात बोट घातलं आणि दुसर्या हाताने केळी घेऊन पळून गेला." ब २११ ची पुस्ति.
"आम्ही दंड भरणार नाही. आम्ही मारूती समजून नैवेद्य देतो."
"हे म्हणजे बंब्याला पोळी काळोखेला सुळी"
"मग तुमचा मारुतराया आतापर्यंत तोडलेले आरसे, खाल्लेली फळं, पोहण्याच्या तलावाचं नुकसान भरून देणाराय का?"
" काय का भगवान्, मै तो गिलोरी से मारता बंब्या को"
अनेक जण एकदमच बोलते झाले. एकच हलकल्लोळ. थोड्या वेळाने बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत होतांना, प्रस्तावावर मतदान न होताच सभा बरखास्त झाली. बैठकीला उशिरा पोहोचलेल्या खरे आजोबांनी सगळं बघितलं आणि अतीव विषादाने ते आल्या पावली माघारी फिरले.
इकडे फणसे जिना चढून तळघरातून वर आले तर समोरच, बॅडमिंटन कोर्टवर, मुलं आणि बापे नेट काढून फूटबाॅल खेळत होते. फणसेंचे चिरंजीव बबलू ही होते त्यात. पप्पाही थोडे रेंगाळले लेकाच्या लाथांमधे किती ताकद आहे ते बघत. एवढ्यात धड् तड् धप्प असा मोठ्ठा आवाज होऊन एक मोठ्ठा ऐवज आकाशातून पडला. तो थेट बबलूच्या अंगावर. बबलू खाली, त्यावर ती वस्तू त्यावर बबलूचा पाठलाग करणारे आणखी दोन खेळाडू गडी!
ती वस्तू क्षणार्धात लंगडत भिंतीकडे गेली, मग आधी भिंतीवर उडी मारून तिथून गृहसंस्थेच्या हद्दिबाहेरच्या झाडावर चढून पसार झाली. तो बंब्या होता. आजूबाजूच्या लोकांनी भानावर आल्यावर आधी बबलूला उठवलं. त्याचा हात कोपरात मोडला होता. त्याला घेऊन सगळे खेळाडू आणि बाबलूचे पप्पा डाॅक्टरकडे गेले. काही बघे वरपासून खालपर्यंत बघत 'नक्की कसं झालं' याचा उहापोह करू लागले. काही जणांनी सचीव सपकाळेंना भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्वरित बॅडमिंटन कोर्टवर यायला सांगितलं.
सचीव, सभा बरखास्त झाल्यावर सुरक्षा कर्मचार्याकडून गच्चिची किल्ली घेऊन काही कामाने गच्चीत गेलेले. गच्चीचा दरवाजा उत्तर दिशेला होता तर कोर्ट दक्षिणेला. लिफ्टने येऊन उत्तरेच्या भिंतीलगत चालता चालता पलिकडल्या गृहसंस्थेच्या उपाध्यक्षाने हाक मारली.
"सपकाळे मी बजावतं तुला, हे आपल्या संस्थांच्या मधलं फाटक उघडं कर की रे. आमच्या वाहनांचा बराच मोठा वळसा वाचंल म्हणतो मी. या महिना अखेरीस पर्यंत वेळ देतो रे तुला. नाहीतर वचन आहे माझं की...."
"यल्लप्पा वचन रहित करा. हो, कारण ते फाटक उघडून मिळणार नाही. त्याच्या समोर आमचा वाॅकिंग ट्रॅकचा काही भाग आहे आणि तुमची वाहनं तिथून जाऊ देणं हा आमच्या सभासदांच्या जिवाशी खेळ होईल. नाही जमणार. क्षमस्व"
"बघूनच घेतो की रे तुला, निन्नान्ना नोडकोलथिनि"
असं पुटपुटत यल्लप्पा चालता झाला. सपकाळे तरातरा बॅडमिंटन कोर्टवर गेले. तिथल्या प्रत्येकाने व्यक्ती तेवढे दृष्टीकोन या प्रमाणे घडून गेलेला प्रसंग सपकाळेंना कथिला.
"दुर्वासे वहिनींवर बंब्याने हल्ला केला तेव्हा त्याचं वैचारिक अधःपतन झाल्याचं आपल्याला कळालच होतं; आता शारीरिक अधःपतनही झालं आहे" प्राध्यापक वरेरकर नेहमीप्रमाणे पल्लेदार. बंब्या दोन पायावर माणसासारखं पण उघडाबंब उभं राही म्हणून, बंब्याचं बम्ब्याअसं बारसंही त्यांनीच केलेलं.
"गच्चीतून पडलाय तो. अधःपतन वगैरे काही नाही."
"भगवंतांनी सांगितलंच आहे 'अधो गच्छंति तामसः'. वारेरकरांचं चालूच.
हा संवाद झडत असतांना इकडे सपकाळेंनी स्वतः सगळं निरिक्षण केलं. मग सपकाळे आणि संयोजन समितीने गच्चीवर जाऊन आणि सीसीटीव्ही पाहून निष्कर्श काढला. काळोखेंनी अ- विभागाच्या गच्चीवर बॅडमिंटन कोर्टाच्या वर येणार्या कोपर्यात कठड्यावर बंब्याला नैवेद्य म्हणून आंबे, सफरचंद ठेवली होती. ती खाता खाता बंब्या पडला. याचा पुरावा म्हणून काळोखेंनी सभेआधी गच्चीची किल्ली घेतल्याची नोंद, गच्चीच्या कठड्यावरवर पडलेली आंब्याची सालं, अर्धवट खाल्लेली फळं आणि बंब्याबरोबर 'अधःपतन' होतांना दिसलेली फळं वगैरेचा उल्लेख करण्यात आला. गच्चीत सीसीटीव्ही नव्हता, नाहीतर सगळं आपसूक स्पष्ट झालं असतं. लगोलग फणसेंनी त्यांच्या मुलाचा हात मोडायला नैवेद्य ठेवून कारणीभूत झाल्याबद्दल काळोखेंवर पोलिसात तक्रार दिली.
'हवं तिथे चढणार्या, एका इमारतीतून दुसर्या इमारतीच्या गच्चीत पोहोचलेल्या केबल वरून २००-३०० मीटर्स चालणार्या बंब्याचा अधःपात झालाच कसा' या विचाराने काळोखेंनी तो पडतांनाचा कोर्टवरचा सीसीटीव्ही परत परत तपासून पाहिला. बंब्या भिंतीपासून किमान 5 मीटर अंतरावर आणि वरून सरळ उभ्या रेषेत पडला होता. म्हणजे पाडला होता की काय? अशी शंका येऊन काळोखेंनी किल्लीची नोंदवही तपासली. त्यात सभेनंतर सचीव सपकाळेंनी किल्ली घेतल्याची नोंद सापडली होतीच. काळोखेंनी लगेच सदनिकाधारकांच्या व्हाॅट्सअॅप समुहात सपकाळेंवर बंब्याला फेकून बबलूचा हात मोडल्याचं बालंट ठेवलं. सपकाळे म्हणाले की ते कपडे वाळत घालायला गेले होते आणि त्यांनी फेकेपर्यंत बंब्या बघत बसला असता होय?
आता पोलिसांकडे एकमेकांविरोधी तक्रारींचा गठ्ठाच झाला. बबलूचा हात मोडल्याला कारणीभूत म्हणून फणसेंची काळोखेंविरुद्ध, बंब्या आणि टोळीला खायला दिल्याबद्दल सपकाळे आणि मांडकेंची फणसे आणि काळोखेंविरुद्ध, सामाईक गच्चीचा अवैध वैयक्तिक वापर केल्याबद्दल फणसेंची सपकाळेंविरुद्ध, करोना काळात बैठक बोलवल्याबद्दल माजी अध्यक्षाची सपकाळे व मांडकेंविरुद्ध, करोना काळात बॅडमिंटन कोर्टवर एकत्र आल्याबद्दल संयोजन समितीची खेळणार्या सर्वांविरुध्द, इत्यादि इत्यादि.
दोन तीन आठवडे झाले तरी या प्रसंगावरून रणकंदन चाललंच होतं. दरम्यानच्या काळात बंब्या संस्थेत परतला होता. तो आल्यामुळे आता काबूत आले की काय असे वाटत असलेले त्याच्या टोळीचे सदस्य नव्या उत्साहाने कामाला लागले होते. लहान मुलं खेळत असतांना मधेच येऊन त्यांचा क्रिकेटचा, फूटबॉलचा चेंडू घेऊन इकडे तिकडे भिरकावून देणं, बॅडमिंटनचं फूल हवेतल्या हवेल उडी मारून झेलणंआणि मग गच्चीच्या कठड्यावर उभं राहून ते फूल डोक्यावर ठेवून नाचणं वगैरे अनेक प्रकार सुरू होते. मुलं आणि बाया चांगलेच दहशतीत होते. जिकडे तिकडे शेपटीखालचा प्रसादही पाडला जात होता.
ब-३२१ मधले माधव गोळे हे पत्रकार होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यल्लप्पा त्याच्याशी हितसंबंध ठेवून होता. त्यांचा अधूनमधून फोन व्हायचा तसा आजही झाला. गप्पा झाल्या. "मग उद्या काय नवीन बातमी?"
"यलप्पा, उद्या घरगुतीच बातमी आहे..." म्हणत गोळेंनी २-३ आठवड्यांपूर्वीचा प्रसंग आणि पुढची कथा सांगितली.
"अरे माधवा, काय म्हणतो मी. तुला तर पोलिस तक्रारीची बातमी करता येणार ना फक्त. मग थांब की जरा आणखी दोन हफ्ते. वचन आहे रे माझं. आणखी मोठी बातमी देईन रे. त्या फणशाचा भ्रमणध्वनी क्रमांक मात्रं दे रे" हा फोन संपवून यल्लप्पा लगेच त्या फोनवर लागले. "फणशा, हीतैशि बोलतो की रे. बबलूचा हात तुटला, लई वंगाळ की. काळोखेचा आंबा त्याच्यावर पडून तुटला का? म्हणतो मी. नाही ना. बंब्याला ढकलले कोणी? अरे तू आणि तो काळोखे एकत्र येऊन बंब्याला ढकलून त्याचा पाय मोडला म्हणून वन्यजीव खाली त्या ढकलणार्या मनुष्याला गाडत का नाही म्हणतो मी"
झालं. वन्यजीव संरक्षण कायद्याअन्वये सपकाळे आणि मांडकेंवरोधात तक्रार झाली. लागल्या हाती बंब्याला गिलोरी मारणार्या सलीमचाचाला ही त्यात गोवलं गेलं. सर्व स्थानिक वृत्तपत्रात बातमी आली. गोळेंना ब्रेकिंग न्यूज प्रथम देऊन खप वाढवल्याबद्दल सहसंपादकपदी बढती मिळाली. इकडे सपकाळे आणि मांडकेंवर अनिमल प्रोटेक्शन ब्युरो, एपीबीने खटलाच लावला.
काही आठवडे गेले. सपकाळेंनी ढकललं याला पुरावा मिळत नव्हता. खटल्याचा तपास निरिक्षक पांढरेंकडून पुढे सरकत नाही म्हणून एपीबीने न्यायालयाकरवी निरिक्षक बदलून घेतला. वरूण गृहसंस्थेसमोर निदर्शनं, जाळपोळ, सचीव सपकाळेंचा पुतळा जाळणे वगैरे पण प्रकार झाले.
निरीक्षक पांढरेंनी त्यांचा शाळासवंगडी देवदत्तला सगळं सांगितलं. देवदत्त पत्रकार होता, पण बंगलोरात.
वरूण गृहसंस्थेचं नाव ऐकताच देवदत्तने त्याच्या संपादक साहेबाला विश्वासात घेतलं आणि ही 'स्टोरी कव्हर' करायला म्हणून तो थेट पुण्यात आला, ते ही खरे आजोबांकडे. हो,तो भाचा होता त्यांचा! खरे आजोबांच्या संपर्कात असणारा एकमेव नातेवाईक.
"काय म्हणतोस मामा?" मामांनी आपबीती सांगितली.
त्यांच्याकडे गृहसंस्थेचं दोन महिन्याचं देणं थकित होतं. खजिनदार लोढांनी त्यांना भेटायला बोलावलेलं. आजोबांकडे यावर्षीची गंगाजळी फक्त हातातोंडाची गाठ पडण्याइतपतच होती. निवृत्त होतांना सरकारने अडवलेलं प्रचंड घबाड येत्या वर्षात मिळालं की त्यांना कसली तोषिश रहाणार नव्हती. पण हेच वर्ष निघणं कठीण होतं. भिक्षुकीला आताशा कोणी बोलवत नसे. देवदत्तने त्यांना धीर दिला. मी सगळं आलबेल करूनच इथून जाईन अशी ग्वाही दिली. मग हळूच बंब्याच्या पडण्याचा मुद्दा काढला. खरे आजोबांनी खरे सगळे सांगितले. "हं असं आहे तर सगळं."
एखादा आठवडाभर देवदत्त जरा तिथे रुळला. काही लोकांशी बोलला. तसा तो पूर्वीही मामाकडे येत असे. पण आता सद्य परिस्थितीचा अंदाज घेत होता. पुढची रूपरेखा जुजबी तयार झाल्यावर तो कामाला लागला. आधी मोर्चा संयोजन समितीकडे होता. देवदत्त संस्थेचा सभासद नसल्याने त्याने संस्थेबाहेर रस्त्यावर मांडकेंची भेट घेतली व तो पत्रकार आहे आणि मांडकेंना बंब्याच्या प्रकरणातून तो बाहेर काढू शकतो असं छातीठोक सांगितलं. त्या बदल्यात तो ज्या काही परवानग्या मागेल त्या आणि अन्य काही मागण्या मान्य करणे एवढाच परतावा अपेक्षित होता. मांडकेंना ही एक आणखी ब्याद असं आधी वाटलं पण ते नाही न म्हणता तसेच दोलायमान अवस्थेत निघून गेले. देवदत्तला तेवढं पुरे होतं. तो शनिवारी खरे मामांना घेऊन तक्रार निवारण समितीपुढे गेला व मामांना शुल्क भरायला वर्षअखेरपर्यंत मुदत मिळायचा प्रस्ताव ठेवला. खजिनदार लोढांनी साफ धुडकावून लावलं. पुढच्या महिन्यात नाही भरलं तर जनरेटर जोडणी तोडण्यात येईल असं उलट बजावलं. यावर देवदत्तच्या अपेक्षेप्रमाणे अध्यक्ष मांडकेंनी मध्यस्थी केली व मामांचं वय लक्षात घेऊन व अर्थाजनाचं साधन नसल्यामुळे प्रस्ताव स्वीकारायची सुचना केली. लोढांना फारसं रुचलं नाही, पण अध्यक्षांची सुचना बंधनकारक होती.
अध्यक्ष वश झालेले हे आता समजलं होतं. आता त्यांच्याकडून शिफारस करून घेऊन सचीव सपकाळेंना देवदत्तने आपल्या अंमलाखाली आणलं. ते हातकड्या पडणार म्हणून नखशिखांत भयभीत होते. त्यांच्याकडून गच्चीच्या त्या प्रसिद्ध कोपर्याचं निरिक्षण करून छायाचित्रं काढायची परवानगी मिळवण्यात आली. पण तेही बरोबर येणार या अटीवर मिळाली. देवदत्तने ते लगेच मान्य केलं. प्राध्यापक वरेरकर घरी असले की सहसा सज्जात आरामखुर्चित बसून निवांत आकाशाकडे डोळे लावून कसलातरी गहन विचार करत बसत आणि मग गच्चीत निघलेली अशी जत्रा त्यांना विनासायास दिसे. बर्याचदा उत्सुकतेपोटी ते ही जात. आताची संधि घालवण्याचा तर प्रश्नच नव्हता!
देवदत्त गच्चीची, गच्चीतून खाली दिसणार्या बॅडमिंटन कोर्टाची छायाचित्रं काढत होता आणि मांडके व सपकळे कुतूहलयुक्त प्रश्नचिन्हांकित मुद्रेने त्याच्याकडे बघत होते. येवढ्यात "वैनतेयश्च पक्षिणाम, विभूतीम च जनार्दन" म्हणत प्राध्यापक महोदय गच्चीच्या मांडकेंजवळच्या कठड्याकडे पाहू लागले. मांडके एकदम दचकले. सपकाळेंनी त्यांचा ढळलेला तोल सावरला. त्या आवाज आणि हालचालींनी तो वैनतेय का कोण तो मात्र परागंदा झाला.
"काय हे प्रोफेसर, एक तर चोरपावलांनी आलात. आणि अवांतर व्यत्यय आणताय कामात."
मांडकेंच्या या हल्ल्यातून वरेरकर वरमतायत तेव्हढ्यात आता सावरायची संधि चक्क देवदत्तने घेतली. "असू दे हो. पाहिजे तर त्यांनाही त्यांच्या लाडक्या विभूतिची दोन छायाचित्रं काढून देतो. साहेब, एक लक्षात ठेवा, सद्यस्थितीत मित्रं वाढवा. लोकांना आपलंसं करा."
गेला बाजार मांडकेंनाही दोन समजुतीच्या गोष्टी सांगून देवदत्तने आपला शेअर आणखी तेजीत आणला. सपकाळे आणि मांडके दोघांनाही त्याचं हे पटलेलं त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. वरेरकरांना तर देवदत्तला कुठे ठेवू अन कुठे नाही असं झालं होतं. या वैनतेय वाल्या त्यांच्या वाक्याचा, का कोण जाणे, देवदत्तवर सकारात्मक परिणाम झाला असावा असं वाटत होतं. कारण तोपर्यंत चाचपडून पाहणारा तो आता एकाएकी आत्मविश्वासाने वावरत होता.
मग काही वेळ देवदत्त विचार करत हवेतच एकीकडून दुसरीकडे, वरुन खाली वगैरे हातवारे करत राहिला. अचानक एक उसासा टाकून त्याने कॅमेर्याचं झाकण लावलं. तो शहरल्यासारखा वाटत होता. सावलीसारखी साथ दिल्याबद्दल त्याने सपकाळे, मांडकेंचे आभार मानले व फार महत्वाचं निरिक्षण पूर्ण झाल्याचं सांगितलं पण निष्कर्श आणि पुरावा मिळेपर्यंत निरिक्षण गुलदस्त्यात ठेवणंच हितावहं असल्याचं त्यांना पटवलं. तरीही त्यांची मुखकमलं प्रफुल्लित झाल्याचं त्याच्या पारखी नजरेला गावलं होतं. त्यांना काय चाललय ते मात्र काही कळत नव्हतं.
देवदत्त संस्थेच्या समोरच्या विभागीय वाहतूक कार्यालयाजवळ असलेल्या चहावाल्याकडे रोज चहा हाणायला जात असे व वेगवेगळे विषय काढत असे. "साहेब, बरोबर. फारच कालवाकालव झाली रस्त्यावर त्या प्रसंगामुळे. चतुष्पाद बंब्या तर गेला कुद्या मारत आणि अन हे द्विपाद बसलेत पादत." चहावाला छोट्या उवाच. त्याला जाणवलं की जेव्हा बंब्याच्या विषय निघतो तेव्हा बाजूचा चांभार मिष्किल हसतो. त्याने एकदोनदा पृच्छा केली देखील, पण अप्पा चांभार काही बधत नव्हता. मग एक दिवस निरिक्षक पांढरेंना बोलवून अप्पाला जरा खोपचात घेतलं. तर तो म्हणाला की सगळे बंगलेवाले मानतात तसं बंब्याची टोळी भटकी नाही. त्यांचा डोंबारी २५ किलोमिटर वर जंगलासारख्या भागात रहातो. हे ऐकून दोघंही चाट पडले व तडक तिकडे गेले. तिथे डोंबार्याची पत्नी भेटली. डोंबारी वारल्याला वर्ष लोटलेलं. डोंबार्याच्या व्यवसायाला कायदेशीर बंदी आल्यावर दोन वीत खळगी भरायच्या प्रश्नानं आ वासलेला. खळगी, हो, त्या सगळ्यांची. ते जोडपं, २ मुलं आणि ८ वानरं अशा 12 खळग्या. आता डोंबारणीने बंब्या आणि टोळीला मुक्त केलं होतं. म्हणून सध्या ते भटकत इतक्या दूर गेलेले.
काही दिवसांमधे सर्वत्र बातमी झळकली 'निरीक्षक पांढरेंनी बंब्याच्या टोळीचा २० कोस पाठलाग करून त्यानी विहिरीत फेकलेल्या वस्तूंचा साठा शोधून काढला.' डोंबारणीला यात न गोवता देवदत्तन व पांढरेंनी तिला वरूण गृहसंस्थेत झाडलोट व देखभालीसाठी शिफारस करून उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं. पांढरेंप्रमाणे नवीन निरिक्षकाकडूनही तपासात वेगळी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे त्या वस्तू तपासाला याच प्रकरणसंबंधातली प्रगति मानून पांढरेंची बंब्याच्या अधःपतन प्रकरणावर पुनर्नियुक्ती करण्यात आली.
आता देवदत्तला सगळं प्रकरण लख्खं उमजलं होतं. पुराव्याचा सापळा लावणं फक्त बाकी होतं. परत सपकाळे आणि मांडकेंवर जुगार लागला. "मांडके साहेब एक शेवटची विनंती. तुम्ही खरेमामांकडून गृहसंस्थेची शांत करून घ्या. येत्या शनिवारी. शांत गच्चीत होईल. "
"चल पळ. मी पूर्ण नास्तिक आहे. ही थेरं खपवून नाही घेणार."
लोढांनी बदला घ्यायची ही संधी साधली. "सपकाळे, तुम्ही पूर्णच फसला आहात. सगळे मार्ग खुंटले आहेत. एपीबीवाले हातकड्या घेऊन ऊभेच आहेत. एक शांतही करून टाका, बघा दैव साथ देतय का".
देवदत्त म्हणाला "फक्त १२०००. शांत झाल्यावर महिन्यात तुम्ही सुटलेले असाल."
वाटाघाटी होऊन शेवटी दोन आठवड्यांनंतरच्या शनिवारी पूजा ठरली. डोंबारिण आता जरी बंब्या आणि टोळीला सांभाळत नसली तरी तिने बोलावलं तर टोळकं येणार हे देवदत्तला लक्षात आलं. तीच्याशी बोलल्यावर तिने पांगळ्या बंब्याऐवजी बाज्याला त्या शनिवारी सकाळी 9 वाजेनंतर वरूण गृहसंस्थेत बोलवायचं मान्य केलं. सपकाळेंना सांगून बॅडमिंटन कोर्टवर घालायच्या गवताच्या अतिरिक्त लाद्या आणून अ विभागाच्या गच्चीच्या त्या सुप्रसिद्ध कोपर्याच्या कठड्यावर ठेवण्यात आल्या. सकाळी सहाला खरे मामांनी ब-विभागाच्या गच्चीत पूजा मांडली. पूजा चालू असेपर्यंत सपकाळे, मांडके, लोढा, खरे मामा, वरेरकर आणि देवदत्त याशिवाय कोणीही नव्हतं. नऊ -सव्वानऊला पूजा संपवून खरे मामा इतरांना घेऊन ब विभागातून अ विभागातल्या कोपर्यात आले. त्या गवताच्या लाद्यांभोवती कमंडलूतलं उदक् फिरवून सगळ्यांनी मिळून लाद्या ढकलून दिल्या. मग त्याच जागी काठड्यावर खरे मामांनी आंब्याचा नैवेद्य ठेवला. मग सगळे जण निघून गच्चीतून खाली खरे मामांच्या घरी येऊन बसले. देवदत्तचे कॅमेरे गच्चीत सज्ज होते. थोडा फलाहार, तीर्थ, बासुंदी प्राशन झालं. मग दहाच्या सुमारास देवदत्त बाहेर येऊन आकाश निरखू लागला. एक दहाच मिनिटांमधे त्याने इशारा करताच डोंबारिण बाज्याला अ- विभागाच्या गच्चीच्या दाराशी सोडून परत खाली आली.
तेवढ्या वेळात देवदत्त आणि चमू कोर्टच्या बाजूला मोक्याच्या जागा पकडून बसले होते. इतर अनेक लोक बाल्कनी, उंबरठ्यात येऊन कोर्टकडे बघत होते. वर गच्चीत काय फिल्डिंग लावली आहे ते इतर कोणाला माहीत नव्हतं. पाच-सहा मिनिटांमधेच धड धडाड् धप्प. बाज्या वरून सरळ उभ्या रेषेत खाली गवताच्या लाद्यांवर आपटला व पळत भिंतीकडे गेला. मग भिंतीवरून उड्या मारून हद्दीबाहेरच्या झाडावर चढून लुप्त झाला.
सगळे डोळे विस्फारून आ वासून बघतच राहिले. हे रिवाइंड केल्याप्रमाणे घडत होतं!
पुढच्या रविवारी डीएसपी स्वतः वरूण बहुउद्देशिय सभागृहात स्टेजवर होते. देवदत्तने काढलेली चित्रफित ते दाखवणार होते. त्याआधी त्यांनी छोटंसं भाषण केलं. "बंब्याचं अधःपतन झालं कसं याचा सुगावा आम्हाला देवदत्तने मिळवून दिला आहे. पण ही चित्रफित काही मूळ प्रसंगाची नाही. त्यामुळे दोन अटिंवर आम्ही हा सुगावा मान्य करू. एक अट ही की, या प्रसंगातून उद्भवलेल्या तुमच्या आपसातल्या सर्व पोलिस तक्रारी तुम्ही मागे घ्याल आणि दुसरी ही की बंब्या आणि टोळीला कोणीही खायला घालणार नाही. तसं आत्ताच लिहून द्यावं लागेल."
सगळ्यांनी मान्य केलं. एकंदर प्रसंगाच्या दबावामुळे म्हणा किंवा थोडीफार उपरति झाल्यामुळे म्हणा काळोखे आणि फणसे ही खायला न घालायला तयार झाले. डीएसपिंनी एपीबी खटला मागे घेईल अशी ग्वाही दिली. खरे आजोबा, मांडके-सपकाळे आणि निरीक्षक पांढरेही देवदत्तकडे अतिशय कृतज्ञतेने बघत होते.
"वन विभाग बंब्या आणि टोळीबद्दल काय तो निर्णय घेईल. तोपर्यंत डोंबारणीला इथे रखरखावाच्या कामाला लावलं आहे. ती सर्व सदनिकांमधलं आणि समोरच्या बेकरीतलं उरलं सुरलं अन्न या संस्थेपासून चारशे मीटर दूर एका नियोजित जागी जाऊन बंब्याच्या टोळीला खाऊ घालेल व त्यांना इथून दूर ठेवेल. तसंच गेले काही दिवस संस्थेच्या दक्षिण भिंतीलगत सर्प सापडायचे ते का त्याचंही उत्तर या चित्रफितीत आहे. पण ह्या सगळ्याला कारणीभूत बंब्या आणि ती आसमानी शक्ति हे खलनायक नसून नायक आहेत. त्या शक्तिमुळे बंब्या आणि टोळीवर बराच वचक होता. खलनायक तर आपण माणसं. आपण वन्यपशूंचा रहिवास मोडून आपली वस्ति केली, म्हणून नाईलाजाने ते आपल्या कच्छपि लागतात. कोणीही त्यांना मारू नका, द्वेश करू नका."
मग चित्रफित सुरू करण्यात आली. यात आधी उभ्या पाईपांच्या घळीमधे त्या प्रसिद्ध कोपर्याखाली लपलेलं एक घरटं दाखवण्यात आलं. नंतरचं दृष्य होतं ते, ती वैनतेय का कोण ती, सर्प घेऊन त्या घरट्याभोवती घिरट्या घालत असल्याचं. मग चित्रफितिचा नायक बाज्या आला. बाज्या, खरे आजोबांनी पूजेनंतर कठड्यावर ठेवलेले आंबे खायला कठद्यावर चढला. बरोब्बर त्या खळगितल्या घरट्याच्या वरती होता तो. अचानक दोन दमदार पंजे बाज्याच्या मस्तकावर आवळले गेले.. त्या पंजांना वर रूंद आणि लांब पंखही होते. बाज्या त्या पंजांमध्ये उचलला गेला. मग त्याच्या प्रतिकारामुळे म्हणा किंवा त्या पंजांना बाज्याचं वजन पेललं नाही म्हणून, तो थेट खाली बॅडमिंटन कोर्टवर पडला. अगदि अस्संच झालं होतं बंब्याचं अधःपतन!