शनिवार, ७ मे, २०२२

प्रश्नपर्वः आपल्या सगळ्यांचे प्रश्न

 

पुस्तक: प्रश्नपर्व
लेखक: प्रवीण दवणे
प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन
प्रथमावृत्ती: २०१४ (बहुधा)
ग्रंथालय: 'ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या योजनेतली बंगळुरूमधली पेटी

देवा गजाननाची १००० हून अधिक गीतं. चित्रपटगितं, मालिकागितं वगैरे अन्य प्रकार मोजले त्या तीन शुन्यांच्या आधीचे आकडे बदलायचे. गद्य लिखाण म्हणाल तर.... 'बर्‍यापैकी वाचन आहे हो याचं' असं आपण ज्या सामान्य व्यक्तीचं वर्णन करू तिने जेवढी पुस्तकं वाचलेली असतात, त्यापेक्षा जास्त यांनी लिहिलेली आहेत. ओघवतं, सहजसाध्य लिखाण. संवेदनशील मन. नीरक्षीरविवेक. ३५ वर्षं पेशाने आणि खरं तर कायमचे शिक्षक. अशा दवणेंना आपण हक्काने आचार्य म्हणू. दवणेआचार्य. 

या प्रस्तावनेची आणि त्यांच्या पुस्तकाच्या 'प्रश्नपर्व' या नावाची तुलना केली तर तुमच्या मनात काय आलं? विसंगती? थोडक्यात- प्रश्न समजणारी, समजावून सांगणारी, उत्तरं माहिती असलेली आणि माहिती नसलेली उत्तरं कशी शोधावीत त्याची युक्ति शिकावणारी व्यक्ति म्हणजे आचार्य... त्यांनाही उकल नं होणार्‍या प्रश्नांचं पर्व? 

हे पुस्तक वाचून मला त्यांच्या सर्व प्रश्नांमध्ये या वरच्या प्रश्नाची भर घालाविशी वाटली. हो, कारण मी त्यांच्या सर्व प्रश्नांशी सहमत आहे. दवणे परिपक्व शिक्षक होते त्या काळात मी वेगळ्या शहरात शालेय विद्यार्थी होतो. '(पृष्ठ ६)शिक्षणबाह्य कामांनी मेटाकुटीला आलेला शिक्षक' आम्ही पाहिला आहे. तरीही त्या काळात शिकवण्यात तळमळ होती. क्लिक क्लिक... ३० वर्षं पार, आत्ताची परिस्थिती कशी विषद करायची? हे पर्व बाद करून लेखकाला नवीन पर्व सुरू करावं लागेल. 

'(पृष्ठ ७)द्वेषावर आधारित मालिका. हिंसा आणि अनैतिक संबंधांचा उद्घोष करणारे सिनेमे'. '(पृष्ठ ९५)अफाट लोकसंख्या, गरजांचे क्रम उलटसुलट करणाऱ्या जाहिराती, बाह्यश्रीमंतीला प्रतिष्ठा म्हणून सादर करणारी माध्यमं, पिढी घडवण्यासाठी पुरेसा उपलब्ध असलेला निधी मिळू नये अशी लाल फीत,' दोन्हीशी सहमत. सिनेमे आणि मालिका यांच्या सुरुवातीच्या काळात आपल्या संस्कृती, वारसा, समाजाचं प्रतिबिंब त्यात होतं. याचे संस्कार प्रेक्षकावर व्हायचे, तशी शक्यता होती. ही माध्यमं हळूहळू यापासून दूर गेली. दूरदूरच जात राहिली. आता तर आपल्या संस्कृतीत कल्पनासुद्धा करता येणार नाही अशी दृश्य, संवाद यात दिसतात, कानी पडतात. आणि ह्या अकल्पिताचं प्रतिबिंब उलटून समाजात पडतं. '(पृष्ठ ४१) आपल्या सौंदर्याचे मुक्त व अवाजवी प्रदर्शन स्त्री नेमके काय व कोणासाठी करते आहे?' या प्रश्नाचं- कारण जे समोर पाहिलं त्याचे संस्कार होतात आणि तेच करावसं वाटतं- हे एक उत्तर नाही का?

लिहिलं गेलं त्या काळात '(पृष्ठ ३४) कुटुंब उरलं तर समाज उरेल.' मला मान्य आहे. पण आजच्या शिक्षणात हे बिंबवतात का? '(पृष्ठ ३६)माधुकरी मागून उच्चपदावर पोहोचलेली धडपडणारी मुले कुठे आणि अर्धा टक्का कमी मिळाला तर नर्व्हस ब्रेकडाऊनचा ॲटॅक येणारी मुलं कुठे.' क्लिक क्लिक...आता मुलांचं शिक्षणशुल्क भरता येणं हीच पालकत्वाची, माझा पगार आला- माझा 'फीडबॅक' चांगला आला ही गुरूपदाची आणि पालकांच्या आयुष्यात 'ढवळाढवळ' न होऊ देता आपण वाढतो आहोत ही मुलांची परमोच्च सिद्धि आहे. कसली धडपड आणि कसला ॲटॅक. '(पृष्ठ 71) पैसा आणि देहतृप्ती हे एकमेव सत्य मानणाऱ्या कुठल्यातरी आक्रमक शक्तीचे षडयंत्र यशस्वी होतांना दिसते आहे.' पैसा हे सत्य शाळा शिकवते असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. दोन आकडी बेरजा करतांना बावचळणार्‍या ५वी-६वीच्या मुलांना शाळा करीयरपाथ म्हणून कॉम्प्यूटर कोडिंग क्लासेस देता आहेत. देहतृप्ती हे सत्य मालिका, ओटीटी, चित्रपटातून अगदी समोर आणि नित्य मांडलेलं आहे.

'(पृष्ठ ३७) आई-बाबांच्या करियरच्या समांतर धावणार्‍या गाडया, (पृष्ठ ८४) बाबा परदेशी-आईचा ओव्हरटाईम', '(पृष्ठ ८६) स्पर्धेची झिंग चढलेले फाजील जागरूक पालक'... सगळं खरं आहे. पण हे आई-बाबा कुणी तयार केले? आई-बाबांचे आई-बाबा असे नव्हते ना? म्हणजे हे नवजात आई-बाबा आपल्या संस्कृतीतून निपजलेले नाहीत. कुटुंबातल्या व्यक्तींच्या भूमिका परस्परपूरक असाव्यात हे आजच्या शिक्षणात अंतर्भूत नाही. 'समानता' या नावाने आजचा समाज आणि शिक्षण 'समान अंतर' ठेवण्याचे संस्कार करतो आहे हे आई-बाबांच्या समांतर गाडया सिद्ध करताहेत का?

आत्ताची शिक्षणपद्धती पाश्चात्य पद्धतीवर बेतलेली आहे. तिथेही हेच चित्र आहे. श्री. अनिल अवचट यांनी १९९० च्या दशकामध्ये लिहीलेल्या अमेरिका या पुस्तकात तिथल्या तेव्हाच्या नवीन पिढीची अवस्था विषद केली आहे. आपणही तिथे पोहोचतो आहोत. जलद विकासाच्या नावाखाली अमेरिकेने अनुभवलेली तात्कालिक सुबत्तेची ५०-६०वर्षं गाळून आपण थेट त्या व्यवस्थेच्या दूरगामी परिणामांकडे झपाट्याने पोहोचलो आहोत.

मला प्रकर्षाने असं वाटतं की 'प्रश्नपर्व' मध्ये आजच्या समाजाबद्दल लेखकाला पडलेल्या बहुतांश प्रश्नांची उकल याच पुस्तकातल्या त्यांच्या शिक्षणव्यवस्थेबद्दलच्या विधानांमधे आणि प्रश्नांमधे आहे. फक्त ते वेगळ्या संगतीने मांडायला हवं.

उत्तर १: '(पृष्ठ ६१) ध्यासाला सकारात्मक उद्दिष्ट देण्याचं काम समाजातील शिक्षण व्यवस्थेचं आहे.' पण ते झालं नाही. का तर.. '(पृष्ठ ८९) मी (शिक्षकाने) कशाकशाशी तडजोडी केल्या. शाळा म्हणजे उत्तीर्ण एवढाच शिक्का लावून जगाच्या बाजारात पाठवणारे गोडाऊन झाले आहे.' ध्यासाला दिशा देण्याऐवजी शिक्षणव्यवस्था स्वतःच तडजोडीच्या दिशेने गेली असंच ही दोन विधानं सिद्ध करत नाहीत का? 

राजा विलासी झाल्यावर त्याला तंबी देऊ शकणारा आणि तो उन्मत्त झाल्यावर त्याची सत्ता उलथवू शकणारा चाणक्य. त्याचा वारसा सांगणार्‍या शिक्षकाने तडजोडी का केल्या? इथे शिक्षक हा सामूहिक शब्द आहे, वैयक्तिक दवणेंपुरता मर्यादित नाही. '(पृष्ठ ६८) गुण द्यावेच लागतात, कारण पुढच्या वर्षी मराठीला विद्यार्थी मिळायला हवेत ना!' हे वाचकाला पटलं की नाही ते अलाहिदा, पण ही तडजोड करून मराठीचे विद्यार्थी वाढले का? तसं दिसत नाही. ते कमी होण्याची गती मंदावलीअसेल पण झाले कमीच. त्यापेक्षा योग्य तेवढे गुण दिल्यामुळे विद्यार्थीसंख्या अचानक घटली असती तर सरकारला जागं करता आलं नसतं का? नवीन योजना बनवायला उदयुक्त करता आलं नसतं का? '(पृष्ठ 21) गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणारे धोरण हे अपरिहार्य आहे. पण गुन्हाच करावासा वाटू नये यासाठीची योजना कुठली आहे?' ही योजना शिक्षण हीच आहे. 

आज महाराष्ट्रात राहून स्वतःची मुलं आंग्ल माध्यमात घालणारे नेते 'दुकानाच्या पाट्या मराठी हव्यात' म्हणत मराठीचे कैवारी असल्याचा आव आणतात तेव्हा भाऊ तोरसेकरांसारखा एक पत्रकार 'पाट्यांवरचं ते मराठी वाचता येणारी माणसं तुमच्याकडे आहेत का?' असा खडा सवाल करतो. हा प्रश्न शिक्षकांनी उचलून धरायला नको का? त्यावर तोडगा काढायला सरकारला बाध्य करणं हे आजच्या चाणक्याचं काम नाही? नेतेही याच समाजाने, शिक्षणाने घडवले. म्हणून शिक्षण हेच सर्वोच्च जबाबदारीचं काम आहे. शिक्षकालाच प्रश्न पडणं आणि त्यांची त्याला उकल नं होणं ही शोकांतिका आहे.

मी लहान असतांना काश्मीरच्या बातम्या यायच्या. त्यातून बर्‍याचदा असं समजायचं की दहशतवाद्यांकडे आधुनिक एके-४७ होत्याआणि सुरक्षारक्षकांकडे पारंपरिक बंदुका. म्हणून सैन्याची हानी जास्त किंवा बीमोड करायला वेळ खूप लागला वगैरे. यावरून हे उमगतं की कुठलंही संहारक शस्त्र हे इतरांना खुलं करण्याआधी सैन्य, पोलिस यांच्याकडे आलं पाहिजे. तसंच सिनेमे, दूरचित्रवाणी, सामाजिक माध्यमं, आंतरजाल ही जणू सामाजिक शस्त्रं आहेत. ती थेट समजाच्या स्वाधीन करण्याआधी शैक्षणिक धुरिणांनी ती पारखून, त्याच्या वापराचे नियम ठरवून, त्याचे कायदे सत्ताधिशांना बनवायला लावून, ते समाजाला शिकवून, नंतर ते शिकलेल्यांना ती खुली करायला हवीत. माणसाला मर्कट होण्यापासून रोखू शकणार्‍या शिक्षकानेच तडजोडी केल्या. मग तयार होणार्‍या माकडांच्या हातातलं कोलीत पाहून शिक्षकाला प्रश्न पडावेत यात काहीच नवल नाही. दवणेंनीच लिहिलंय, '(पृष्ठ 78) परिणाम दिसल्यावर जागं झालं तर खूप उशीर झालेला असतो.'

असो. विचारप्रवर्तक पुस्तक आहे. दवणेंना पडलेले प्रश्न १९५० ते २००० दरम्यान जन्मलेल्या प्रत्येक भारतीयाला, किमान सुविद्य मराठी व्यक्तिला तरी निश्चित पडले असणार यात काहीही शंका नाही. मनोमनीच्या त्या प्रश्नांची अभिव्यक्ती म्हणजे हे पुस्तक. मध्यंतरीचा आचार्य चाणक्य यांच्यासारख्यांचा काळ सोडला तर सत्तेला शहाणपण न सांगणार्‍या द्रोणाचार्‍यांच्या काळापासून आजच्या दवणेआचार्‍यांच्या काळात आपला समाज आला. ही व्यक्तींची तुलना नाही, फक्त काळाची तुलना आहे. खरं तर समाज त्याच जागी आला पण काळ सोकावत जातो आहे.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

अप्रतिम, खूप महत्त्वाचे विचार मांडले आहेत

अनामित म्हणाले...

खूप खूप महत्वाचे विचार मांडलेत शिक्षणाविषयी, एक शिक्षक म्हणून मला नक्कीच पुस्तक वाचायला आवडेल, कोण जाणे माझ्याही प्रश्नांची उकल होईल.

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...