लेखिका: प्रतिभा करमरकर
प्रकाशक: श्रीलेखा करमरकर (shrilekha.k@gmail.com)
बकुळीच्या फुलांचं छायाचित्र आणि त्याबाजूला धवल अक्षरात असलेल्या पुस्तकाच्या नावामुळे टवटवीत झालेल्या मुखपृष्ठाने पुस्तक हातात घेतल्या घेतल्या प्रसन्न वाटतं.
मुख्यत्वे कोल्हापूर आणि नारिशक्ती च्या दुहेरी वेणीवर रूळलेला २५ लेख, श्रुतिका, मुलाखाती, गप्पा आणि गोष्टींचा हा बहारदार गजरा.. कालनिरपेक्ष राहून साहित्य, माहिती, ज्ञान म्हणून हे सगळंच लिखाण चिरंतन टवटवीत आहे, हे प्रत्येक सुज्ञ वाचक ठासून सांगेल!
एकिकडे सकाळी फिरायला गेल्यावर आपल्या सगळ्यांना निदर्शनाला येतं ते सगळं लेखिका 'मॉर्निंग वाॅक' मधे अचूक शब्दात मांडते आणि उत्कृष्ट निरीक्षण वाचकाचा मनोवेध घेतं. .... तर दुसरीकडे अवघे पाऊणशे वयोमानाची 'जगावेगळी सुपरआजी ...' थेट बंगी जंपिंग करून, एकाच वर्षात उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पर्यटन करून आपला उत्साह वाढवते.
एकिकडे 'पालखी ज्ञानेशाची, दिंडी आयटीची' या शब्ददिंडीतून वारकऱ्यांचा निरलस भाव, जिद्द, नियोजनबद्ध दिंडी, उच्च शिक्षित तसंच परदेशी वारकऱ्यांचा सहभाग वाचकाला प्रवृत्त करतात. आजपर्यन्त वारी केलेल्या कोणाकडूनही मी वारीबद्दल वावगं काही ऐकलेलं नाही. .... तर दुसरीकडे बघता बघता नजर मालवलेली असूनही केवळ श्रुतीने सिनेमा एंजॉय करू शकणारी मदुराईतली डाॅक्टर व्ही. ऊषा ही 'एक हट्टी मुलगी' आणि 'ऋणानुबंधाच्या.. गाठी' मधला हात-पाय निकामी असलेला, मद्रासच्या स्पास्टिक सोसायटीचा हुशार विद्यार्थी राजीव राजन आणि त्याची जन्मांध शिक्षिका दीप्ती, धडधाकट वाचकाच्या नैराश्याला निवृत्त करतात.
एकिकडे '... महामंत्र गायत्रीचा' मधून आपण वझे गुरुजींबरोबर माॅरिशसला काॅन्फरन्ससाठी धावती भेट देऊन येतो. जागतिक कीर्तीच्या डॉक्टरांच्या पारिषदेतही तर्कशुद्धपणे व्याख्यान देऊन वझे गुरुजी गायत्रीमंत्राच्या वैद्यकीय उपयोगाबद्दल कुतूहल, सकारात्मक प्रतिसाद निर्माण करू शकले. यातून आधुनिक विज्ञानात भली थोरली पोकळी आहे आणि ती त्यांनाही अवगत, मान्य आहे हेच सिद्ध होतं; .....तर दुसरीकडे 'राजा की आ गयी बारात' मधून थेट जपानच्या राजा-राणीच्या लग्नाला हजेरी लावून त्यामागची सूरस कहाणी आपण जाणून घेतो.
एकिकडे 'श्री लक्ष्मीचा वरदहस्त' वाचत लक्ष्मीस्तवन करता करता दुसरीकडे '.. लढा सार्वजनिक स्वच्छतेचा' मधून 'एक्सनोरा' या संक्षिप्त शब्दाचा विस्तार उलगडतो. नारीशक्तिच्या जयघोषात कोल्हापूरच्या धाग्याला धरून भालजी पेंढारकर, अध्यात्माच्या सुत्राला धरून पांडुरंग शास्त्री यांच्या जोडीला एकच पुरुष लेखिकेच्या भावविश्वात तग धरून स्वतंत्र लेखाचा मानकरी झाला आहे. ते म्हणजे मद्रासचे एक्सनोराचे संस्थापक एम बी निर्मल. ह्याकडे व्यक्तिमहात्म्य म्हणून न बघता स्वच्छतेचं महत्व किती आहे, या, विषयाच्या भिंगातून त्याकडे बघितलं पाहिजे.
एकिकडे 'अतिथि देवो भव' मधल्या पाहुण्यांच्या नकोशा सवयी आपल्यातल्याही यजमानाला उद्वेग आणतात. पाहुणे आणि यजमान हे विषय पुलंनी आणि अन्यही लेखकांनी हाताळले आहेत. रौद्ररस किंवा संताप व्यक्त होतांना आवेशात एखादा वावगा शब्दही लेखणीतून उतरणं अगदी स्वाभाविक आहे. हे शब्दही भाषेचं लेणं आहेतच. तरीही ते लिखित स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचू नयेत ही जबाबदारी लेखक आणि प्रकाशक यांनी संयुक्तपणे उचलली पाहिजे, नाही का? तसंच मुद्रणदोषही मोक्याच्या ठिकाणी रसभंग करतात. ते पुढील आवृत्तीत टाळायला हवेत. .... तर दुसरीकडे 'जन पळभर म्हणतील' मधली सांत्वनकर्ती मंडळी उद्वेगाच्या आगीत तेल ओततात. आपण भारतीय आधी भावनिक स्थैर्याला महत्व देतो. त्या कालावधीत विचारलेले वस्तुनिष्ठ प्रश्नही असंबद्ध ठरतात म्हणून ते, व्यक्तिचा काळ येऊन गेला तरी प्रश्नाची वेळ आलेली नाही, हे समजून टाळलेले बरे!
एकिकडे लेखिकेची लेखणी धरून खगोल शास्त्रात उंच भरारी घेणार्या जयंत नारळीकरांना आपण त्यांच्या घरातच गाठतो. डॉ. मंगला जयंत नारळीकर हे तसं सामान्यांना परिचित नाव. त्यांचा साधेपणा, कलासक्तपणा, कसब, शिक्षण आणि मुख्य म्हणजे काटेकोरपणा लेखिकेने व्यवस्थित विषद केला आहे. मोजक्या शब्दात मांडणी करण्यासंदर्भात यात आलेला 'अमुक तमुक रस्ता कसा आहे? या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणूस कसं देतो' हा भाग मला तेवढासा पटला किंवा रुचला नाही. उत्सवमूर्तिचं असामान्यत्व सिद्ध करायला सामान्यांशी तुलना कुचकामी ठरते. शिवाय या अशा व्यक्तिमत्वांबद्दल वाचतांना वाचकाने स्वतःला सामान्य गृहीत धरलेलं असतं. .... तर दुसरीकडे प्रभा कुलकर्णी या कर्तबगार उद्योजिकेच्या आयुष्याची, कारखान्यांची फेरी घडते.
एकिकडे लेखिका, बेबी शकुंतला आणि मदनमोहन लोहियांमार्फत आपल्याला भालजी पेंढारकरांच्या स्टुडिओतल्या वातावरणाची मोहक सफर घडवून आणतात. भालजींचं कौशल्य, खंबीरपणा, शिस्त, विवेक आणि सचोटीचं चित्रिकरण करतात, .... तर दुसरीकडे लेफ्ट. जन. थोरातांच्या भार्या लीलाताईंबरोबर आपण ध्येयनिष्ठ लष्करी संसाराचा रोमांचक फेरफटका मारून येतो. नवरा सैन्यात व्यस्त असतांना देशभर डझनावारी अनोळखी ठिकाणी राहून या डॉक्टरिणबाईंनी गोर-गरिबांची केलेली सेवा अतुलनीय आहे.
आशयगर्भ लेखन लेखकाला आणि वाचकाला विजयी करतं. १९९२ आधी लिहिलेलं, '... थोरात यांची ही जोडीने चाललेली वाटचाल अशीच दीर्घकाळ चालू राहो,... ' या वाक्याने सांगता झालेलं लिखाण प्रवाही असल्यानं त्याच प्रवाहात "हो हो, १००%!" असं वाचकाच्या मनात लेखिकेशी अनुमोदन उमटवतं. प्रवाह सोडून माहितीजाळात पृथक्करण केलं की, लेफ्ट. जन. थोरात १९९२ साली निवर्तल्याचं कळतं. तरीही वाचक जिंकतो, कारण तो आता भावनिक तरंगासोबतच काळसापेक्ष माहितीनं समृद्ध झालेला असतो. मग तो वाचक प्रत्येक लेखाचा असाच मागोवा घेतो आणि माहितीच्या कक्षा विस्तारत रहातात. चित भी मेरी पट भी मेरी असाच हा प्रकार आहे. त्यामुळे लिखाण कालपरत्वे कोमेजत नाही हेच खरं!
एकिकडे 'असे दागिने सुरेख बाई' मधून आपण धातूच्या दागिन्यांच्या दुनियेत जातो. या नररत्नांनी ठासून भरलेल्या पुस्तकाची सुरुवात दागिन्यांच्या यादीने होते हा योगायोग की प्रकाशकाची योजना असावी? या लेखातली दागिन्यांची यादी संपतच नाहीये असं वाटतं. दक्षिण भारतापासून ते राजस्थानपर्यन्तच्या दागिन्यांचा मागोवा यात आहे. बरेच प्रसिद्ध लोक दागिने घडवायला पुण्या-मुंबईतून कोल्हापूरला येतात (.. आणि लेखिकेला गवसतात?!) हे कळतं. साजाच्या मध्यभागी असलेल्या पदकावर पूर्वी कृष्ण असायचा तो आता लाल खडा असतो, हे कळल्यावर हा बदल कधी आणि का झाला असेल असा प्रश्न अभावितपणे येतो, जो लेखिकेने सोडवलेला नाही. ... तर दुसरीकडे 'अभी तो मै जवान हू' मधून शरीर हा दागिना कसा कोरा करकरीत ठेवायचा याचं विवेचन लेखिकेकडून होतं. नव्वदच्या दशकापासून कोट्टाकलच्या वैद्यशाळेच्या आश्रमात देशी विदेशी साधक कायाकल्प करायला येतात. तरी तो आश्रम, त्याचं महात्म्य आजच्या 'सबकुछ व्हायरलच्या' जमान्यातही तसं दबलेलंच आहे.
'वधुपरिक्षा - काल आणि आज' मधून उलटलेल्या काळाबरोबर वधुपरिक्षेचे पालटलेले संदर्भ साक्षात स्वर्गातल्या देवतांच्या संवादातून आपलं मनोरंजन करतात. .... तर दुसरीकडे लग्न ठरल्यावर घडणार्या जत्थ्याच्या परंपरेचं साद्यंत वर्णन 'लगीन ठरलं ...' मधून समोर येतं. आपल्या समाजाच्या अशा घड्या पूर्णपणे मिटल्या आहेत. एकेकाळी याच घड्या आपलं अर्थकारण चालवत आणि समाज एकसंधही ठेवत असत.
एकिकडे 'प्रकाशाची वाट' चालत पितृछत्र हरवलेली हमजा हट्टाने एकट्या तिच्या आईकडून कन्यादान करून घेत असतांना आपल्याला तिच्या लग्नमंडपात नेते, .... तर दुसरीकडे 'चुकतंय कुठं?' मधून लेखिका, पालकांचे पालक स्वतःच्या पाल्यांना त्यांच्या पाल्यांबाबत ते चुकत असतील तर त्या मधल्या पीढीला समजावून सांगून ताळ्यावर आणू शकतात ते कसं, हे संगतवार मांडते. प्रबोधनपर संवाद कसे लिहावेत याचा हा या पुस्तकातला पहिला उत्कृष्ठ नमुना आहे. आकाशवाणीसाठी लिहीलेल्या श्रुतिका फारच खुमासदार झाल्या आहेत. काल्पनिक पात्रांच्या संवादामुळे विषयावर थेट आणि गंभीर हल्ला न होताही तो व्यवस्थित गळी उतरतो. हे संवाद लिहिण्याचं लेखिकेचं कसब निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.
एकिकडे 'ज्योतीने तेजाची आरती' ला हजर राहून स्वाध्याय परिवाराची ओळख होते. पांडुरंग शास्त्री आठवलेंवर भावपूर्ण लिहिलं आहे. तरीही तो कुठेही प्रोपागंडा वाटत नाही, ही त्या लिखाणाची खुबी किंवा लेखिकेने सांभाळलेला संयम आहे. .... तर दुसरीकडे 'ग्राहक चळवळ कशासाठी? कोणासाठी?' मधून ग्राहक एव राजा हे समजून घेता येतं. विधीची पदवी घेऊन ग्राहक न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी दशकभर काम पाहिलं आहे. एकेकाळी मी ही ग्राहक चळवळीत आईच्या हाताखाली सक्रिय होतो. आता विक्री-विनिमय पद्धति सेवेच्या व्याख्या बदलल्या आहेत. या परस्थितीत कोपर्यावरचा दुकानदार देशोधडीला लागेल असं दिसतय. दुर्दैवाने आपल्याकडे गुन्हेगारी, फसवेगिरीची क्षेत्रं आधी फोफावतात आणि मग व्यवस्थेला त्यांचा पाठलाग करता करता धाप लागते. लुच्चा विक्रेता कचाट्यात सापडून, ग्राहक 'राजाचा' मुकुट चढवतच होता, एव्हढ्यात ऑनलाइन प्रकार आला. नेहेमीप्रमाणे या क्षेत्राला मुक्त कुरण मिळालं आणि आता बहुतेकांनी तुंबड्या भरल्यावर त्यासंबंधी कायदे येताहेत. आता कायदे येणार, मग जागृती होणार.. समाज म्हणून आपण, आपले नेते कायम बॅकफूटवरच रहातो आणि नवनवे फिरकीपटू चेंडू हातभर फिरवतात आणि आपला त्रिफळा उडवतात.
एकिकडे समारोप होतांना 'झुंज एका धरणाशी' देण्यासाठी मेधा पाटकरांबरोबर दर्याखोर्यांमधे ठाण मांडून बसावसं वाटतं. मेधा पाटकरांचा एक मुद्दा माझ्या लहानपणापासून आमच्या कुटुंबात सर्वमान्य होता, आहे. तो म्हणजे, मोठमोठी धरणं हे जलसंधारणाचं योग्य साधन नाही. छोटे छोटे बांध, पाणी अडवून जिरवणं, लागवडीखालील क्षेत्र वाढवणं हे उपाय पर्यावरणपूरक आहेत. अलीकडे महाराष्ट्र सरकार, पाणी फाऊंडेशन वगैरे एकत्र येऊन जलयुक्त शिवार राबवतात. यावर मेधाताईंचं काय म्हणणं आहे? ते मला माहिती नाही कारण तो विषय त्यातल्या राजकरणामुळे माझ्या कक्षेबाहेर राहिला. माझं एकूण वाचन कितीही तुटपुंजं असलं तरी आपल्या पौराणिक कथांमध्ये विमानाच्या सुद्धा संकल्पना आहेत हे मी वाचलंय, ऐकलंय. पण अवाढव्य धरणाचा उल्लेख मला तरी आढळत नाही. भारतीय पुराणकथांमधून न गवसणारा कुठलाही आधुनिक आविष्कार किंवा निर्माण पर्यावरणपूरक किंवा दीर्घकालीन उन्नतीकारक असण्याबद्दल मला कायम शंका येत राहील! ....तर दुसरीकडे, धरणाशी ठाण मांडण्याआधी लेखिकेने आपल्याला, ' जिकडे पहावे तिकडे बर्फ आणि मी एकाकी असह्य' हे अनुभवलेल्या बच्छेंद्री पाल सोबत थेट एव्हरेस्टवर पोहोचवून आणलेलं असतं.
एकिकडे लेखिका माजी न्यायाधीश असल्याने मी माझी मिमांसा 'माय लॉर्ड' म्हणत, शपथेवर, जसं वाटलं तसं सादर केलीये. .... तर दुसरीकडे यात 'एकिकडे..दुसरीकडे' असं 'कंपेअर एंड कॉन्ट्रास्ट' तंत्र वापरलंय. लेखिका मुंबईत जन्मलेल्या असल्या तरी कोल्हापूरने त्यांचं मन व्यापलेलं आहे. शहरी असल्या तरी गावरानाची ओढ आहे. अतिउच्च शिक्षित असल्या तरी रूढी परंपरांना फाटा दिलेला नाही. पुस्तकातलं लिखाण एकांगी, एकरंगी नाही. तसंच लेखिकेकडे याचा अजूनही भरपूर साठा आहे. यापुढचं संकलन अन्य बहुरंगी साधनाच्या, प्रतिमेच्या नावाने करता येईल. बुंधा लेखिकेच्या अंगणात असला तरी फुलांचा सडा आम्हा वाचकांच्या अंगणात पडतोय. अन् यापुढचा बहर शेकड्याने सडा पाडो..
४ टिप्पण्या:
Sundar
खूप छान
Compare and contrast चा जरा अतिरेक झाल्यासारखा वाटतो . पण प्रदीर्घ आणि बैजवार विश्लेषण नवीन वाचकांना पुस्तकाचा शोध घेऊन लिखाणाचा आस्वाद घेण्यास उद्युक्त करेल .
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी सहमत आहे. लिहीन तशी सुधारणा होत राहील. सडेतोड अभिप्राय सुधारणेला दिशा आणि गति देतात. आपलं नाव कळलं तर अधिक बरं.
टिप्पणी पोस्ट करा