बारकू शाळेत लक्ष देऊन ऐके, त्या जोरावर उत्तीर्ण होणं हे काही त्याला आव्हान नव्हतं. एकदा का घरी आला की मात्र पुस्तकं वह्या कधीही दप्तरातून बाहेर निघत नसत. वाचायला घेतलं की त्याला झोप येई. गृहपाठाचाही पत्ता नसे. आकडे मात्र त्याचे जीवलग दोस्त होते. त्यामुळे गणित त्याला फार शिकवावं लागत नसे आणि त्यामुळे ते पुस्तकही उघडायचा प्रश्नच नव्हता.
त्या दिवशी बारकू पुण्याच्या गरवारे प्रशालेत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या काही शिक्षकांसमोर बसला होता. मुलाखत द्यायला! राज्यस्तरीय टॅलेंट सर्चची लेखी परीक्षा पार करून तो या टप्प्यात आला होता. लेखी परीक्षा दिल्यावर या खांदेश्याने हेरलं होतं की अशा परीक्षांमध्ये कठीण म्हणून असणारे प्रश्न ताईच्या इयत्तेत अभ्यासक्रमाचा भाग होते. मग मुलाखतीतही असंच पुढच्या इयत्तेतले प्रश्न विचारात असतील तर?
या विचाराने त्याने मुलाखतीआधी ताईची पुस्तकं वाचून जायचं ठरवलं होतं. पण कसचं काय. सवयी अशा सुटतात होय! पुण्याला जायचं सामान भरायची वेळ आली तरी आळसाच्या वेताळाने या खांदेशी विक्रमाची पाठुंगुळी सोडली नव्हती. शेवटी त्याने फक्त अनुक्रमणिका वाचून घेतल्या! त्यातल्या त्यात नागरिकशास्त्रातल्या शेवटच्या प्रकरणाबद्दल त्याला त्याच्या वेगळ्या नावामुळे कुतूहल वाटलं म्हणून शेवटचं पान उघडून त्याने तेव्हढी तृष्णा शमवली होती.
गणिताच्या बाकावर बसलेल्या परीक्षकांना त्याने पार गुंडाळून ठेवलं. शेवटचा प्रश्नार्थक शब्द सुरू व्हायच्या आतच उत्तर देणं ही तर त्याची खासियत होती. याच सवयीचा वापर करून एका चाणाक्ष परीक्षक बाईंनी आयत्या वेळी शेवटचे शब्द 'किती तास लागले?' ऐवजी 'किती तास उरले?' असे फिरवले आणि त्या खांदेश्याला त्या वयात आवश्यक असा सबुरीचा पाठ दिला आणि पाठही थोपटली.
इतर विषयातलं आपलं पितळ माहीत असल्याने त्याने गणिताची उत्तरं बाजूच्या बाकांनाही ऐकू जातील अशा बावन्नकशि खणखणीत आवाजात दिली होती आणि प्रतिमाप्रतिष्ठापना करून ठेवली होती.
बाहेर गडद मळभ दाटून आल्यानं भर दुपारी शाळेच्या दालनात सगळे दिवे लावावे लागले होते. बारकूला पुढच्या बाकावर इभूनाला सामोरं जायचं होतं.
"पंडितजी कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले ते कोणतं वर्ष होतं?"
सनावळ्यांना तर बारकूच्या मेंदूने कायम चलेजाव केलेलं होतं. १९४६ मध्ये त्याच्या आजोबांचे सावद्याचे मित्र बापू वंजारी स्वातंत्र्यसैनिक म्हणून पकडले गेले. त्याची गोष्ट आजोबा रंगवून सांगत. ती मात्र त्याला स्मृतीत होती. इतिहासाच्या पुस्तकात सावदा, पारोळा, नशिराबाद, मुक्ताईनगर इथल्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल काही असतं तर बारकूने पैकीच्या पैकी गुण आणले असते.
"... बरं ते राहू दे, पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांचं मृत्यू वर्ष?"
बारकू बोटाने फळीवरच्या कागदाचा कोपरा नखाने दुमडायचा चाळा करत तिकडेच खाली बघू लागला. बाई गुणपुस्तिकेत आणखी एक फुली मारायला सरसावल्या तसं बारकू अजिजीने म्हणला,
" मॅडम, इंदिराजी १९८४ साली गेल्या आणि राजीव गांधी १९९१ साली."
बारकूच्या जन्मानंतर झालेले इंदिराजी, राजीवजींचे मृत्यू त्याच्या जीवनाचा भाग असल्याने त्याला ते लक्षात ठेवावे लागले नव्हते.
"हे अगदी बरोबर आहे. पण हे मुलाखतीतल्या प्रश्नाचं उत्तर नाही त्यामुळे मला फुली मारावी लागेल."
"ब्रह्मदेश भारताच्या कुठे आहे?"
"पश्चिमेला.."
चाचरत बारकू म्हणाला. बाईंनी फळीवरच्या नकाशाकडे अंगुलीनिर्देश करत तो पूर्वेला असल्याचं दर्शवलं आणि आणखी एक फुली मारली. 'भू जर गोल आहे तर पश्चिमेकडूनही तो लागेलच की' बारकू मनात म्हणाला. भुसावळहून पाचोर्याला जाणारी बस पूर्वेकडल्या फलाटावर लागते हे त्याला माहिती होतं.
बाई आता फार काही विचारणार नव्हत्याच. बाजूला बसलेल्या 'ना.शा.' च्या गुरुजींकडे त्यांनी कटाक्ष टाकला.
"लांबच्या गावातून मजल मारलीस इथवर, वा वा, अभिनंदन!"
मिशीखालून कुठूनतरी आवाज आला. मिशीने विस्फारून हास्य दाखवलं. बारकू काही बोलला नाही.
"टी व्ही पहातोस ना? काय पहातोस टी व्ही वर?"
गुरुजींनी खरं तर त्याच्यावरचा ताण कमी करायला हे विचारलं होतं, पण भाऊ परीक्षेच्या कोमात असल्याने त्याचा ताण आणखी वाढला. 'आता टीव्हीचा ना.शा. शी काय संबंध...' तो परत काही बोलला नाही.
"बर, बर. शाळेत संगणक आले आहेत का?"
परत तेच. गुरुजी विषय विसरले बहुधा..
"हो हो, आलेत की सर. माझा फास्ट फ्रेंड आहे पक्या, त्याचे वडील परवाच भांडले शाळेत, संगणक ठेवलेल्या खोलीचं दार सारखं उघडं रहातं आणि वातानुकूलन रहात नाही म्हणून..."
माहितीचा जणू कडा कोसळला.
"ठीक, ठीक. विषय सोडू नको. ही नागरिकशास्त्राची तोंडी परीक्षा आहे. काय? लहान लहान शहरात कॉम्प्यूटर, म्हणजे देशाची प्रगति होते आहे. हो ना? ही सगळी प्रगति कशामुळे झाली सांग बघू?"
त्याच्या आधीच्या उत्तरावरून बारकू अलिकडच्या काळासंबंधी तयारी करून आलाय असं वाटून, त्याला याबद्दल विचारलं तर त्याला एखादा गुण देता येईल या विचाराने त्यांनी प्रश्न टाकला. बारकू 'भारत सरकारने विज्ञान-तंत्रज्ञानाचं देशाच्या विकाससाठीचं महत्व ओळखून तसं धोरण ठरवलं म्हणून शाळाशाळांमद्धे संगणक आले' असं काहीतरी उत्तर देईल अशी त्यांची अपेक्षा होती. अगदी 'माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या दूरदृष्टिमुळे' असं सांगितलं तरी त्याला गुण देण्याची त्यांची तयारी होती.
पण हे सांगायएव्हढी प्रगल्भता किंवा घोकमपट्टी त्याच्याकडे नव्हती. तो कधी भुवईच्यावर तर्जनीने खाजवत होता तर कधी कानाच्या पाळिमागे करंगळीने. बोटंही लुळी पडल्यागत वाटत होती. कधी एकदा हे सगळं संपतं आणि आपण परत गावी जातोय असं त्याला झालंय असं त्याच्या देहबोलीवरून वाटत होतं. आता बाहेर एक वावटळ येऊन झाडांची वाळलेली पानं इतस्ततः भरकटत होती आणि रिपरिप सुरू होत होती.
बाईंच्या चेहेर्यावर मिश्किल भाव होते. गुरुजीही त्याच्याकडे निरखून बघत होते. बाई काहीतरी समारोपाचं बोलणार एवढ्यात त्यांना बारकूच्या देहबोलीतला फरक जाणवून त्या थबकल्या. बारकूच्या डोळ्यात चमक आली. हाताच्या पंजांमध्ये बळ आलं. फळीवर उजव्या हाताने आत्मविश्वासपूर्वक, जणू, एक प्रहार करत बारकू उत्तरला,
"पंचवार्षिक योजना.. हो नक्कीच! पंचवार्षिक योजनांमुळे भारताची प्रगति झाली."
त्याला अचानक 'ते' आठवलं होतं, 'ते'. ते ताईच्या पुस्तकातलं शेवटचं पान! शेवटचा परिच्छेद म्हणाना. 'भारताच्या पंचवार्षिक योजना, १९५१ ते १९६६..' बारकूच्या उत्तराचा आवाका, संगणकापुरत्या संदर्भाला व्यापून उरणारा असला, तरीही 'देशाची प्रगति' या संदर्भाला तो आवाका यथायोग्य होता आणि भाऊच्या इयत्तेतल्या मुलाने हे उत्तर देणं अपेक्षित नव्हतच.
"पंचवार्षिक योजनांमुळेच... नाही म्हणजे.. त्यामुळेच, त्यामुळेच प्रगति झाली."
जास्त बोलावं की नाही या विचाराने तो थोडा गांगरला. कारण 'पंचवार्षिक योजना' या दोन शब्दांमध्येच त्याला असलेला वाचनाचा पाठिंबा संपला होता. दोघेही परीक्षक आता मरगळ झटकून ताठ बसले होते. बाई तर एकदम आशावादी वाटू लागल्या होत्या.
"बोल की, बोल ना. त्या योजनांमुळे प्रगति कशी झाली ते सांगत होतास ना?"
त्यांचा सकारात्मक प्रतिसाद जाणवून बारकूचा धीर चेपला. बारकूच्या अंगभूत चलाखीने त्याचा ताबा घेतला.
"माझे बाबा सांगतात की जानेवारी ते मे दरम्यान ते माझ्या पुढच्या इयत्तेत काय काय घ्यावं लागणार त्याची यादी करतात आणि पैसे साठवतात. तरीही माझी एखादी सहल चुकतेच म्हणा. पण आपल्या सरकारने तर पुढे काय करायचं ते पाच वर्ष आधीच, १९५१ मधे ठरवलं आणि दर पाच वर्षांनी ते ठरवत राहिले, १९६६ पर्यन्त. त्यासाठी पैसेही बाजूला ठेवले त्यांनी. म्हणूनच आपल्या देशाची प्रगति झाली."
१९५१ ते १९६६ असं वाचलेलं अस्सं बाहेर आलं!
"अरे पण शाळेमध्ये संगणक तर अलीकडे आले ना, १९९० नंतर?"
गुरुजींनी त्याला शब्दात पकडायचा यत्न केला.
"सर, पण १९६६ मधेच सरकारला पंचवार्षिक योजनांचे फायदे कळाले होते त्यामुळे तशाच प्रकारच्या योजनेअंतर्गत संगणकावर खर्च झाला असणार."
पुरेशा वाचनाअभावी बारकू जर-तर मध्ये शिरला असला तरी तर्कही बिनचूक होता आणि पीव्ही नरसिम्हा राव यांच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढवलेल्या पंचवार्षिक निधीतूनच संगणकक्रांति साद घालत होती ही वस्तुस्थितीही तर्काला पूरक होती. त्यामुळे दोन्हीही परीक्षकांनी टाळ्या वाजवल्या. गणिताच्या बाकावरुन वारंवार येणार्या टाळ्यांमद्धे इभूनाच्या बाकाकडून आलेल्या टाळ्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
बारकूने खिडकीतून बाहेर बघितलं. आता रिपरिप संपून मळभही सरलं होतं आणि बाहेरचं प्रांगण लख्ख प्रकाशात निथळत होतं. बाई विचारत्या झाल्या,
"ठीक आहे, आपण मान्य करू. पण तुझ्या गावातल्या घरापुढे पक्का रस्ता आहे का?"
"नाही मॅडम. आता बांधणार आहेत"
"मग, १९६६ मध्ये नियोजनाचं महत्व कळल्यामुळे भारताने ९०च्या दशकात संगणक आणले; पण रस्ते मात्र बांधले नाहीत, याबद्दल काय तर्क आहे तुझा?"
बाईंनी हा जाता जाता टाकलेला गुगली होता, परीक्षेचा प्रश्न नव्हता. बाहेर बघणार्या बारकूची बुब्बुळं परत दवबिंदुसारखी टपोरी झाली. "रस्ता पक्का आता करणार आहेत म्हणजे सरकारने १९६६ मध्ये नाही तरी ८० च्या दशकात तरी रस्त्याचं नियोजन केलं असणारच मॅडम. पण दिल्लीहून पाठवलेले पैसे पोहोचले नसतील कदाचित..."
बोलता बोलता आपल्याच विधानात काहीतरी पोकळी असल्याचं त्याला जाणवलं.
"म्हणजे, आधी पैसे यायला उशीर झाला असेल. माझे बाबा ट्रेझरीमध्ये आहेत ना, त्यामुळे किती वेळ लागतो ते मला माहिती आहे... त्यानंतर कदाचित सामान रस्त्यात अडकून पडलं असेल. मालवाहू ट्रकची समस्या असेल.. आपलं हवामान बेभरवशी, कदाचित बरीच खडी वगैरे वादळात, पावसात वाहून गेली असेल..... मजूर लोकांना उन्हातान्हात काम करायला त्रास होत असेल.......... डांबर तयार करणारी यंत्र पुरेशी नसतील .... ...."
प्रसिद्ध वैज्ञानिक वसंत गोवारीकर यांच्या हातून पदक आणि प्रमाणपत्र स्वीकारेस्तोवर- सबुरीचा सल्ला, पुस्तकाचं एक पृष्ठ वाचलं तर त्या पृष्ठाने आपल्याला थेट राज्य गुणवत्ता यादीत आणून बसवलं अशी समजूत आणि पंचवार्षिक नियोजन घरासमोर रस्त्यावर का दिसत नाही हा प्रश्न, हे बारकूच्या मनात खोलवर रूजले होते!
बारकू आज काय करतोय याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण जर तो असेल तर कदाचित या मुलाखतीनंतरपासून त्याने भरपूर वाचन केलं असेल. कदाचित बारकू उच्चविद्याविभूषित असेल. कदाचित भारतीय प्रशासकीय सेवेत असेल. कदाचित बारकू आता नियोजन आणि अंमलबजावणी यातली दरी मिटवायचा प्रयत्न करत असेल..
९ टिप्पण्या:
बारकू सध्या मंत्ती मंडळात असण्याची शक्यता जास्त आहे
Apratim
छान
Nice
खुपच छान
मस्त गुंगून ठेवणारी कथा ! सत्य घटना की कल्पना? कल्पना असेल तर बेस्टच. काहीही असले तरी शब्दांकन उत्तम!
खरंच छान आहे
वा मस्त कथा
बारकू काय करत असेल काहीच सांगता येत नाही पण तो सज्जन गृहस्थ असेल कदाचित
झकास. मला कळलं बारकू कोण ते 😊
टिप्पणी पोस्ट करा