लेखक: अच्युत गोडबोले, अतुल कहाते
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
मुद्रक: रोहन एंटरप्राईसेस
आवृत्त्या, पहिली: २००२, अकरावी: २०१०, अठरावी: २०१६
व्यवस्थापकीय तत्वांची सुरुवात या पुस्तकाय अभावितपणे होते ती पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत लेखकद्वयितले ज्येष्ठ लेखक स्वतः दुर्दम्य आशावाद बाळगून आहेत असं लिहितात, तिथूनच. तो कशाबद्दल आणि त्याची पृष्ठभूमी हा विषय वेगळा आणि त्याची मला पुरेशी कल्पनाही नसावी. तथापि, बोर्डरूममध्ये आसनस्थ व्हायसाठी किंवा झाल्यावर व्यवस्थापकांकडे काय काय असावं लागतं, काय काय करावं लागतं, त्यांनी विचार कसे सर्वांगीण करावेत, उद्योग घड्याळाच्या काट्यावर सुरळीत चालायचा तर व्यवस्थापकाच्या वैयक्तिक दिवसाचा काटा कसा फिरतो, कार्यवाटप करतांना काय काळजी घ्यावी, कुठली नीती वापरावी हे सगळं आत्मसात करायसाठी या पुस्तकाचं प्रास्ताविक, (तेव्हाच्या-) उद्याचं आर्थिक जग आणि बेचैन करणारे प्रश्न ही प्रकरणं वाचावीत. माझ्या दृष्टीने नवख्या किंवा मध्यम पातळीवर असलेल्या व्यक्तिला हे प्रास्ताविक, प्रकरणं समजली तरी सर्वोच्च व्यवस्थापन कक्षापर्यन्तचा मार्ग समजेल आणि योग्य वेळी आठवत राहिली तर तो मार्ग सुकरही होईल. कारण हा माणूस नोकरशाहितून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारची म्हणजे 'मेरावाला टाइप' च्या माणसांची या पुस्तकात तुरळकच वर्णनं आहेत. व्यवस्थापनासंदर्भात असलेल्या पुस्तकातून वाचकाला जे अपेक्षित आहे ते प्रास्ताविकातून छानच मिळतंआणि लेखकांना जे द्यायचंय तो पुस्तकाचा मुख्य मसुदा आहे.
मी माझ्या आयुष्याची जवळजवळ निम्मी वर्षं अभियंता म्हणून कार्यरत आहे. व्यवस्थापन हा विषय जवळचा, अनुभवातला आहे. तरीही अच्युत गोडबोले आणि अतुल कहातें सारख्या दिग्गजांच्या पुस्तकावर मी या भूमिकेतून काही लिहावं एवढी माझी व्यावसायिक कुवत आणि आवाका नाही. त्यांनी या लिखाणातून जे संदेश पोहोचवले आहेत त्यांचं आकलन किंवा ग्रहण करून त्याप्रमाणे कार्यान्वय अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या पुस्तकातल्या काही नायकांनी यशस्वीपणे वपरलंय असं एक व्यवस्थापकीय तत्व म्हणजे 'ग्राहक केंद्रस्थानी असतो'. लेखक-वाचक या नात्यात मी ग्राहक म्हणून केंद्रस्थानी येतो आणि त्या भूमिकेतून पुस्तकाबद्दल व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगतो.
खरं सांगायचं तर ह्या पुस्तकात व्यवस्थापकीय तत्व किंवा वैशिष्ट्य याची यादी, व्याख्या किंवा तत्सम खल केला असेल असं समजून मी हे समोर घेतलं. त्यानंतर श्रीगणेशा करण्याआधी किमान ५ दिवस असं काहीतरी बोजड वाचायसाठीच्या म्हणून मानसिक तयारीत गेले. पण हे पुस्तक त्या वहिवाटेने जात नाही. कोणाची अपेक्षा असं फास्टफूड या पुस्तकातून पुढ्यात येण्याची असेल तर तसं होणार नाही. अगदि रंजकपणे केलेलं विविध यशस्वी उद्योजकांचा उदय, झळाळी आणि काहींचा अस्त तसच मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेली व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कर्तुत्वाला इंधन ठरलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू याचं वर्णन या पुस्तकात आहे.
गेली काही वर्षं रोजगार कमी होण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरतात. यात कोणता पक्ष- हे दुय्यम आहे, पक्षाची सरकारी का विरोधी ही भूमिका, तो पक्ष या मुद्द्याला कसं हाताळणार हे ठरवते. निरपेक्षपणे विचार केला तर लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण हे दोन्हीही तीव्रतेने वृद्धिंगत होताहेत. हयांचं प्रमाण खरं तर व्यस्त हवं. हे दोन्हीही वाढत असतील तेंव्हा व्यवसायाच्या संधि कमी झाल्या तरच गणित सुटेल. तसंच ते सुटतय. यात सरकारचा दोष सकृतदर्शनी नाही. कारण ते लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण यातली वाढ थोपवू शकत नाहीत. रोजगार म्हणजे केवळ नोकरी आणि मजुरी नाही तर व्यवसाय हा सुद्धा रोजगार आहे. व्यवसायाच्या संधि वाढवल्या तरी ते रोजगार मिळवून दिल्यासारखंच आहे. गेल्या ५-६ वर्षात सरकारने हे मान्य करून जनतेला पटवायचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी उद्युक्त करणार्या अनेक योजना, उपयुक्त ठरणार्या सोयी, सुविधा, सवलती याची अक्षरशः रास उभी केली आहे. हे पुस्तक सध्या कर्मचारी असलेल्या किंवा कर्मचारी होणं हेच ध्येय अशी कल्पना उरी बाळगलेल्या पण उद्योजक मालक होण्याची कुवत असलेल्यांना तो विचार करायला प्रेरित करतं.
ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की आपल्यासमोर शाश्वत उद्दीष्ट ठेवलं की उपजत स्वभावगुण त्या दिशेने प्रवण होतात. यामुळे उद्दीष्टसिद्धता तर होतेच पण ती होता होता या उपजत गुणांनाही पैलू पडतात आणि वृद्धी होत जाते. रॉबर्ट ओवेनचा अंतस्थ हेतु कामगारांची पिळवणूक थांबवणं हा होता. मग विक्री कसब, आत्मविश्वास, बेरकीपणा, नीतीमत्ता, विश्लेषणकौशल्य या गुणांनी त्या शिकाऊ कामगारात- आधी व्यवस्थपक, मग उद्योजक अशी स्थित्यंतरं घडवली. तो यशस्वी झाला. हेंरी फोर्डकडून स्वप्न बघणं आणि बघितली म्हणून ती साध्य होणं, अपार संपत्तीचा फक्त सहेतुक वापर, परिपूर्णता येईपर्यंत संयम बाळगणं, कामाचे तास कमी करून वेतनवृद्धी निर्णय (त्या काळी), यामुळे त्याने काय साध्य केलं ते आपण जाणतोच.
IBM चा संस्थापक वॉटसन हा पूर्वी त्याच्या नियोक्त्यासाठी पैशाच्या व्यवहारांची देखभाल करे आणि त्यातूनच मग आक्रमक माहिती तंत्र वापरुन त्याने IBM ची आधारशीला ठेवली. विक्रेत्याला (salesman) महत्व, मूल्यांवर श्रद्धा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत आदरभावाचं इतरांनी केलेलं संगोपन यामुळे ही आधारशीला भक्कम ठरली. केवळ रणनीतीत फेरफार करून आधी आपटलेली तीच वस्तु त्याच माणसांकरवी लोकप्रिय करता येते हे 'ली आयकोका' ने दाखवलं. फोर्डने कर्मचारी हाताळण्यात केलेल्या चुका आणि त्यामुळे त्याला मोजावी लागलेली किंमत. लोकांच्या गुणांचं त्यांच्या देशबांधवांनाच (किंवा उद्योगाला) सोयर नसेल तर अन्य देश (स्पर्धक उद्योग) त्या लोकांचा वापर करून मूळच्या त्यांच्या देशावर मात होऊ शकते हे डेमिंग आणि ज्यूरनचं उदाहरण दाखवून देतं. उत्पादन मानक ठरवणं आणि कसोशीने पाळणं, सुटसुटीतपणा ही तत्व वापरुन मॅकदोनल्ड्सचं साम्राज्य उभं आहे. तसंच ग्राहकाला आवडणारी एखादी धंदेवाईक खुबी आपल्या उत्पादनात असेल तर ती गुपित म्हणून जतन केली की स्पर्धेत तग लागतो, ह्याचं मॅकदोनल्ड्स हे मासलेवाईक किंवा मसालेवाईक उदाहरण. याहीपुढे कोक, नाइके, फेडेक्स, इंटेल, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम, डाऊ, एस अँड पि, ओर्याकल, ई-बे, अमेझोन, पेपाल, नोकिया या सगळ्यांचं आणि आणखीही उद्योगांचं वर्णन या पुस्तकात आहे. ते बोजड नाही, रंजक आहे.
दोनशेच्या आसपास परदेश वार्या केलेल्या, काही उद्योगांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहिलेल्या वरिष्ठ लेखकाचं वाचन विस्तृत आहे हे संदर्भ यादी स्पष्ट करते. हजारो माणसं आणि हजारो कोटी रुपये हाताळणारा हा एक माणूस उरलेल्या वेळातही व्यवस्थापनाची किंवा त्या दृष्टिकोनातून एवढी पुस्तकं वाचतो. हा ध्यास शिकण्यासारखा आहे.
येन केन प्रकारेण पैसा मिळवायचा एवढंच उद्दिष्ट असलेले या पुस्तकातले २-३ महानयक सोडले तर इतर सर्व उद्योजकांचं आपल्या उत्पादनावर किंवा कर्मचार्यांवर किंवा समाजावर प्रेम होतं. ते भावनिक रित्या यातल्या कशाशी तरी तरी संलग्न होते. असा एक निष्कर्ष (ऑन ए lighter नोट) काढायलही वाव आहे की आताचं जे जीवघेण्या स्पर्धेचं स्वरूप आपण अनुभवतो तिथपर्यंत हे लोक आपल्याला कदाचित इतक्या लवकर घेऊन आले नसतेही. पण ... पण ही विचारवंत, विश्लेषक, सल्लागार यांची जी त्रयस्थ जमात आहे ती या बेफामपणाला कारणीभूत आहे. कारण या तटस्थ भूमिकेतून त्यांनी उद्योगातल्या माणुसकीला, मूल्यांना तिलांजली दिली. वस्तुनिष्ठ, भांडवलवादी विचार आणि निश्कर्ष समोर आणले. भ्रमित होऊन कर्तुत्ववान उद्योजक आणि त्याचे व्यवस्थापक त्यामागे धावू लागले आणि ही मग शर्यत झाली. आजची परिस्थिति हे त्याचं फलित.
नफेखोरीवर आधारलेल्या समाजाला व्यवस्थापनाची तत्व काय कामाची? शेवटी हे सगळं कशासाठी? हे प्रश्न आपल्याला पडावेत असं लेखकला वाटतं, यातून मला हे जाणवलं की व्यवस्थापन विश्वात संवेदनशील, संतुलित व्यक्तिमत्व हे मूळ तत्व असायला हवं. यात तडजोड नको. व्यक्ति, समाजघटक म्हणूनही हे प्रश्न पडायलाच हवेत.
समाजातलं एक उदाहरण देतो. कदाचित थोडं विषयांतर वाटेल. १९९० च्या आसपास एका वर्षी आमच्या गल्लीमध्ये बहुतेक घरांच्या पुढच्या अंगणात पावसाचं पाणी खूप तुंबलं. आदल्या वर्षीही थोडं पाणी आलं होतं पण फार साठलं नव्हतं. आदल्या वर्षाच्याआधी कधीही असं झालं नव्हतं. एका ओळखीच्या बांधकाम व्यवसायिकाने आईला सांगितलं की रस्त्याची पातळी चढी असल्याने आणि रस्त्याकडेने निचरा वाहिन्या बांधल्या नसल्याने अंगणात पानी साठतंय. पण या दोन्हीही गोष्टी तर कायम तशाच होत्या, मग आत्ताच तुंबई का? हा प्रश्न आईला नंतर पडला. काही महिन्यांनी रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळे रस्ता परत बांधायला घेतला होता. तेव्हा आईला लक्षात आलं की आता आहे त्या रस्त्यावर आणखी एक स्तर चढतोय. म्हणजे रस्त्याची ऊंची आणखी वाढणार, मग अंगणात आणखी पाणी साठणार की काय? आईने त्या व्यवसायिकाला बोलावून परिस्थिति दाखवली. त्याने, त्याचं नाव बाहेर कुठे न येऊ देण्याच्या अटीवर सांगितलं की, आईचा निश्कर्ष योग्य आहे. तसंच हे ही सांगितलं की रस्ता दुरुस्ति करतांना गरज असल्यास आधी तो खोदावा लागतो, त्याचे विविध स्तर अंथरून मग वरचा डांबराचा स्तर टाकायचा असतो. पण डांबरट कंत्राटदार खोदाई आणि खालच्या स्तरांचे पैसे खिशात टाकतात. तसंच रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूला उतार (आता मला कळलं की त्याला रोड कॅम्बर म्हणतात) द्यायचा असतो, तो ही देत नाहीत. त्यामुळे दर वर्षी खड्डे पडून दर वर्षी कंत्राट मिळतं. हे ऐकून आईने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे, जिल्हा परिषद, नगरपालिकेत कामातल्या त्रुटींची तक्रार केली. नागरिकांनी काम थांबवावं अशी भूमिका घेतली. स्थानिक नगरसेवक भेटायला आला. मॅडम, रोड वगैरे सोयी करून मी 'मोहल्ल्या'ची प्रगति करतो तर तुम्ही त्यात खोडा घालता अशी अरेरावी करू लागला. त्यावर विषण्णपणे आई म्हणाली 'हो, प्रगति, पण खड्ड्यांच्या दिशेने...". लिखित स्वरुपात तिने दिलेली कारणं तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने आणि गल्लीतले लोक एकोप्याने या प्रसंगाला सामोरे गेल्याने आधी निचरा नलिका बांधून मग योग्य त्या प्रकारे रस्ता बांधला गेला. आणि हे सगळं कशासाठी? हा प्रश्न नागरिकांसाठी सुटला.
व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या किंवा ते क्षेत्र निवडायला बाशिंग बांधलेल्या अथवा त्याबद्दल जिज्ञासा असलेल्या वाचकाला हवंय ते या पुस्तकात आहे. त्याहीपुढे जाऊन, लिहीणार्याची मूल्यही घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं!
५ टिप्पण्या:
अतिशय समर्पक शब्दात उत्तम परिचय
बोर्डरूम वाचण्याची उत्सुकता वाढली
वा सुंदर परीक्षण
बोर्ड रूम आतापर्यंत कितीतरी वेळा वाचायचा प्रयत्न केला पण पूर्ण झाले नाही
आता नक्की पूर्ण करेल
खूप छान
वा!सुंदर परिक्षिण
छान माहिती !!
टिप्पणी पोस्ट करा