शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

Stick to the Screen, now!


https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=s6Zp7kPdVBk

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे |

घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे ||

विंदांच्या या पंक्ति आपल्या समाजाला दिशादर्शक आहेत. बहुतांश क्षेत्रात आज भरभरून देणारे दाते आहेत पण योग्य ते स्वीकारायची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. कोणी खरंच निरपेक्षपणे देऊ शकतं यावर आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे. 

होतकरू भारतीय मुलामुलींना हॉकीचं प्रशिक्षण द्यायचं स्वप्नं घेऊन पार जर्मनीहून आंद्रिया गढ हिम्मतगढला आलीये, २०१३ मध्ये. ती यासाठी वाट्टेल ते करायला  तयार आहे. आजपर्यंत करते आहे. हॉकि स्टीक्स देते आहे, मुलांना पळवते आहे, सिंथेटिक टर्फचे ढीग जमवते आहे, पालकांना पटवते आहे, शाळेला विश्वासात घेते आहे, एवढंच नव्हे तर स्वखर्चाने यूरोप टूरही करवून आणते आहे. ती झेप घेतेय, मुलांनाही उंच नेतेय पण ७ वर्षात जमिनीवर टर्फ अंथरायला तिला जमलेलं नाही... पटतंय का? त्याचीच ही गोष्ट.

या लघुपट निर्मात्याच्या अचूक शब्दात:

ही फिल्म वेड्या, स्वप्नाळू, काहीतरी ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे काम करणाऱ्या आंद्रिया सारख्या निस्पृह लोकांची गोष्ट आहे. या स्वप्नांच्या जगातील प्रवास खूपच अद्भुत असतो आणि ही स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी किंमतही मोजावी लागते.. या सगळ्या नाट्यमय प्रवासाची साधी सोपी गोष्ट म्हणजे स्टिक टू ड्रीम्स ही माझी पहिली फिल्म.

निर्माता चिन्मय अनिरुद्ध भावेने facebook वर लघुपटाची पूर्वपीठिका आणि सारांश दिलेलाआहे.   https://chinmaye.com/2020/10/24/mblogsticktodreams/?fbclid=IwAR3l3AB-jaWZdcTGnuqLSFjMR1iBVM3CsS_c_Hm70vVlY6aZ2oSvMrKDtH0

हा पाऊण तासाचा लघुपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत छान गुंतवून ठेवतो. समाज म्हणून आपण काय आहोत याची झलक या छोट्या मांडणीत कळते. कुठल्याही जागतिक स्पर्धेत जिंकायचं नव्हे फक्त टिकायचं असेल तरीही आपल्याला खडबडून जागं होण्याची गरज आहे. 

क्रीडाक्षेत्राशी संबंधित पूर्ण लांबीचे चित्रपट बनले आहेत. व्यावसायिक फायदा हा महत्वाचा घटक असल्याने अश्या चित्रपटांद्वारे त्यात अभिनीत नायक नायिकेचं larger than life उदात्तीकरण विकलं जातं आणि तेच लक्षात रहातं. मिल्खा, सचिन, धोनी, पंगा अशी लाटच अलीकडे आली. यातून व्यवस्थेवर प्रश्न उभे केले गेले जे रास्तच आहेत. पण या चित्रपटांना पटकथा आहे. चिन्मयचा लघुपट या विषयाला या चाकोरीतून बाहेर काढतो आणि 45 मिनिटं वास्तवात तरंगत ठेवतो. या लघुपटात पात्रं नाहीत तर खरेच नायक-खलनायक आहेत. भारत आणि युरोपमधलं चित्रिकरण आहे. संगीत आहे. नाटय आहे. कथा आहे. अचंबा आहे. परिणामकारकता आहे. चिन्मयने जवळ जवळ एकहाती सगळं निभावलंय आणि ते ही निर्मितीमुल्याशी तडजोड न करता. 

लघुपट स्वतः कथेच्या निष्कर्शावर भाष्य करत नाही. आहे ती परिस्थिति समोर ठेवून निष्कर्श काढायला प्रेक्षकला वाव देतो. हा या प्रस्तुतीचा माझ्या दृष्टीने सर्वात जमेच्या तीन आयामांपैकी एक आहे. खलतेला मुद्दाम बटबटीत केलेलं नाही. त्यांनाही त्यांची बाजू मांडायची संधि दिलेली आहे. खरं तर लघुपट कोण खल ते ठरवत नाही, तो कदाचित खल नसेलही. पण पडून राहिलेल्या बेशकिमती टर्फला तो किंवा त्याची वृत्ती करणीभूत आहे. दुसरा आयाम अर्थातच कथा. तिसरा आयाम म्हणजे चित्रण. फारच छान. अधिक काही लिहिण्यापेक्षा एवढंच सार्थ ठरेल की लघुपट आपल्याला, आपल्या जागी आणून कोणी दाखवतय असं न वाटता, आपणच तो तिथे तिथे जाऊन पहातोय असं वाटतं!

आपलं क्रीडामंत्रालय निधी देतं पण कार्यान्वयनाची जबाबदारी किंवा माहिती घेत नाही, त्याच्या विनियोगातल्या अडचणी दूर करत नाही. खासदार, जिल्हाधिकारी परवानग्या देतात पण कार्यालयात बसल्या बसल्या. परवानगीचा अर्थ असाही नाही का की तुमच्या उद्दिष्टात काही अडचणी आल्या तर किमान माझ्या अधिकारक्षेत्रात येणार्‍या अडचणी मी दूर करेन? खासदाराने एखाद्या जागेवर एखाद्या योजनेला 'हो' म्हणण्याआधी आमदार, सरपंच, स्थानिक नेते यांना विश्वासात घ्यायला नको का? नीतिगत पंगुपणा (policy paralysis) तून आपण थोडे बाहेर आलो आहोत, आता थोट्या  कार्यान्वयनातून (implementation paralysis) लवकर बाहेर यायला हवं. 

या लघुपटात एक शेतकरी सरपंच आलाय. त्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं वैभव दृग्गोचर आहे. शेतकरी आंदोलनं होतात तेंव्हा माध्यमांमधे गरीब बिचार्‍या शेतकर्‍याचा प्रतिनिधी म्हणून एक धोतर बंडीवाला शेतकरी दोराला लटकलेला दाखवून हळहळ, उन्माद पसरवण्याचा प्रयत्न होतो. त्या जोडीला यातल्या या शेतकर्‍याचं छायाचित्रही ठेवायला हवं. म्हणजे जनतेला पीडित शेतकरी आणि आंदोलक शेतकरी यातला फरक समजता येईल.

स्टिक टू ड्रीम्स म्हणजे ध्येयाला चिकटून रहा. हे चिन्मय आंद्रियाच्या, तिच्या भारतीय मुलांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगतोय. स्टिक टू ड्रीम्स म्हणजे जगज्जेते बनायच्या स्वप्नासाठी आंद्रिय देत असलेली हॉकि स्टिक. स्टिक टू ड्रीम्स मधलं ड्रीम म्हणजे हॉकी बॉल आपल्या खेळाडूंच्या स्टिकला स्टिक होईल, गोल होईपर्यंत ते परमोच्च क्षण. याहीपुढे जाऊन या लघुपटातून अन्यही संदेश आहेत. सबळ स्त्रि  म्हणजे काय? सबळ स्त्री असते आंद्रियासारखी. स्वतःचा व्यवसाय करणारी. स्वप्नं बघणारी. स्वप्नासाठी परक्या देशात जाऊन तिथल्या नव्या पिढीला पंख देणारी, पण आपण जर्मन असणं न विसरणारी. अर्धांग  व्यवस्थेसमोर हार न मानणारी. तिच्या कथा दिशा देतील. अंद्रियाला घडवणारी प्रगती घडते आहे. त्या वाटेवर जातांना त्या प्रगतीला पोषक व्यवस्थाही घडवावी लागेल. (भारतात सबळ स्त्रिया नाहीतच असा अर्थ नाही. लघुपटाच्या अनुषंगाने लिहिलं हे आहे.)

अजून काही वर्षं तरी, अशा आंद्रियाच अशा कथांच्या नायिका ठरत रहाणार. जरी यातली मुलं आपल्या देशाची नायक-नायिका होतील तरी 'घेणार्‍याने घेत जावे' हे रूजल्याचं कळेल. अशा आंद्रिया आपल्या देशातून निर्माण होतील आणि एखाद दुसर्या आठवड्यात टर्फ पसरू शकतील, त्या दिवशी हा लघुपटही सार्थक होईल. '.... एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे' च लागतील !!

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

अटलजींच्या दिवाळी काव्याचा स्वैर अनुवाद

 

जब मन में हो मौज बहारों की         जेव्हा मनात मौज बहरते 

चमकाएँ चमक सितारों की,         तारकांनी नभ चमचमते

जब ख़ुशियों के शुभ घेरे हों         जेव्हा सर्वां शुभ सुखावते

तन्हाई  में  भी  मेले  हों,                 एकाकीपण गर्दीस मिळते

आनंद की आभा होती है         आनंदाची आभा विलसते 

*उस रोज़ 'दिवाली' होती है ।* *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

 जब प्रेम के दीपक जलते हों         जेव्हा प्रेमाची ज्योत तेवते 

 सपने जब सच में बदलते हों,         स्वप्नवत् जेव्हा सत्यात येते 

 मन में हो मधुरता भावों की         मनोमानीचे माधुर्य भावते 

 जब लहके फ़सलें चावों की,         जेव्हा भाताचे पीक लहरते 

 उत्साह की आभा होती है         उत्साहाची आभा पसरते 

 *उस रोज़ दिवाली होती है ।*       *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

जब प्रेम से मीत बुलाते हों         जेव्हा मित्रप्रेम साद घातले 

दुश्मन भी गले लगाते हों,         शत्रुशीही गळाभेट होते 

जब कहींं किसी से वैर न हो         जेव्हा कुणाशी वैर न सुचते 

सब अपने हों, कोई ग़ैर न हो,        आणि कोणी परकेही नसते 

अपनत्व की आभा होती है         आपुलकीची प्रभा विलसते 

*उस रोज़ दिवाली होती है ।*         *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*

जब तन-मन-जीवन सज जाएं         जेव्हा तन-मन-जीवन सजते 

सद्-भाव  के बाजे बज जाएं,         सद्भावाची सरगम गुंजते 

महकाए ख़ुशबू ख़ुशियों की         जेव्हा श्वासात सुख दरवळते 

मुस्काएं चंदनिया सुधियों की,         धान्य सुगीचे टपोर चमकते 

तृप्ति  की  आभा होती  है          सूदूर तृप्तिचे तेेज पसरते 

*उस रोज़ 'दिवाली' होती है .*। *तेव्हा तेव्हा दिवाळी असते*


हा स्वैर अनुवाद आहे. यात चुकाही असू शकतात. त्याबद्दल क्षमा मागून मार्गदर्शनाची अभिलाषा ठेवतो.. 


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

मी वाचलेलं पुलकित: गुण गाईन आवडी


पुस्तक:- गुण गाईन आवडी; 
लेखक:- पु. लं. देशपांडे
प्रथम आवृत्ती:- १९७५; 
प्रकाशक:-  मौज प्रकाशन
वाचनालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना

(गायक गातांना कधीतरी डाव्या हाताचा अंगठा आणि दुमडलेल्या तर्जनीच्या चिमटीत कानाची पाळी पकडून चूक झाल्याची खूण करताना त्यांच्या मनात जी भावना उमटत असेल तीच, पु लं च्या लिखाणाबद्दल उजव्या हातानं लिहितांना प्रत्येक वाक्यानंतर उमटली असेल!)

गीतेत अर्जुन विचारतो,
स्त्थिततप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव 
स्थितधिः किं प्रभाषेत, किं आसित् व्रजेत किं (स्थितप्रज्ञ झालेले लोक कसे बोलतात, वागतात, बसतात, उठतात?). पुरुषोत्तम भगवान कृष्ण अर्थातच तात्विक शंकानिरसन करतो. (करतात असं म्हणून आम्ही त्याला परकं का करावं?!). 

याच प्रश्नाची सोदाहरण उकल पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, आपल्याला विचारायचीही तोशिष न देता, ज्या पुस्तकात सविस्तर विशद करतात ते 'गुण गाईन आवडी'. कोणत्याही क्षेत्रात कतृत्वाची उच्च पातळी गाठायसाठी अंशतः तरी स्थितप्रज्ञता बाणवलेली असावी लागते. हे सगळे, असे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातले काही स्थितप्रज्ञ!

पुस्तक वाचायला किती वेळ लागावा हे लिखाणाच्या दीर्घतेवर, त्या दीर्घतेतल्या अक्षरांच्या आकारामानावर वगैरे अवलंबूनअसतं तेवढंच त्या लिखाणात किती ज्ञान भरलंय यावरूनही ते ठरतं. याची पुरेपूर जाणीव करून देणारं पु लं चं 1975 ला प्रथम प्रकाशित झालेलं हे पुस्तक.

व्यक्ती आणि वल्ली द्वारे पुलंनी काही सामान्य व्यक्तींच्या असामान्य छटांना, लकबींचा असामान्य प्रसिद्धी मिळवून दिली, आपल्याला परिचय करून दिला.  वास्तविक आणि काल्पनिक व्यक्तींचा तो कल्पनाविस्तार. तर गुण गाईन आवडी हे मुळातच प्रसिद्ध असलेल्या असामान्य व्यक्ती पुलंच्या मनःचक्षूंना कशा दिसल्या त्याचं सामान्यांसाठी वर्णन आहे. अमुक एका व्यक्तीचा जन्म या तारखेला झाला आणि त्या तारखेला मृत्यू होईपर्यंत ती जगली कशी अशा पद्धतीचं हे वर्णन नाही. तर रसिक, श्रोते, वाचक, अनुयायी यांच्यापेक्षा जरा आणखी जवळच्या परिघातून केलेलं त्यांचं वर्णन आहे. नाॅनस्ट्राईकर असलेला सचीन अझहर, कांबळी, सौरभ, राहूल आदिंचं कसं वर्णन करील तसं.

केशवराव दातेंबद्दल पुलंची लेखणी अशी काय चाललीये की या क्षेत्रात स्थित नसते तर पुलं उत्तम गणितप्रज्ञ झाले असते हे नक्की. दोन तीन ओळींचा प्रश्न सोडवायला निष्णात गणिती जसा याला क्ष, त्याला य मानू म्हणून सुरू करतो आणि मग त्या अज्ञात बीजांशी एक दोन पानं झगडून, बीजांना विषयात गुंतवून, त्यांना गुंगारा देऊन मग मूळ प्रश्नात वापरलेल्या शब्दात उत्तर काढतो- त्याप्रमाणे नाटक, नट, नटमंडळ्या वगैरेंच्या मूलभूत तत्वांपासून वगैरे सुरुवात करून परिच्छेदाच्या शेवटी पुलं ध्रुव पदावर यावं तसं केशवरावांकडे येतात. कधी कधी अशी शंका येते की 'गुण गाईन आवडी' यातला गुण या शब्दाचा अर्थ स्वभाववैशिष्ट्य, पैलू किंवा छटा असा विशाल असावा. यातलं 'ऐकण्याचा अभिनय' हे वर्णन खरोखरच नटांच्या क्रमिक अभ्यासक्रमात असावं असं आहे.

संगीत क्षेत्राशी आलेला संपर्क रघुनाथ कृष्ण फडके या शिल्पकाराला पु लं च्या परिघात पितामहाची जागा पटकावून देतो आणि त्यातही पुलंना त्यांनी स्वतः न भेटलेले असल्याची रुखरुख आहे अशा भास्करबुवांचा संग फडकेंना लाभलेला असल्यानं. फडकेंचं बहुआयामि व्यक्तिमत्व पुलं उलगडून दाखवतात. त्यात इंग्रजी अधिकारी माणसांचे किती पारखी होते आणि भारतियांच्या स्वतःच्या उन्नतीसाठी stick to your guns सांगायला कमी करायचे नाहीत, ते वाचायलाच हवं.

आपण हे पुस्तक वाचतो तसंच भास्करबुवा पुलंना वाचनातून आणि चर्चांमधून जाणवले. गोपाळ गायन समाजाच्या गोविंदराव देसायांचे उद्गार पुलं उद्ध्रुत करतात, 'बुवांचे गायन ऐकून घमेंड, दुष्टपणा, हेवा, ईर्षा, निंदा इत्यादि विकार नाहिसे होतात.' अर्जुनाला दिलेल्या उत्तरात श्रीकृष्ण याच स्थितीला 'स्थितप्रज्ञस् तदोच्यते' असं म्हणतो. म्हणजे, भास्करबुवांच्या श्रवणाने श्रोता काही काळ अशा स्थितप्रज्ञतेला पावत असेल तर ती प्रस्तुति केवळ दैवी, दिव्य असणार! ही कल्पना आपलं संजयासारखं अद्भुत रोमहर्षण करून जाते. 

वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व ही पुलंच्या खास लोभातली माणसं. त्यांच्याबद्दल पुलं भरभरून लिहितात. मी पुण्यात दशकापेक्षा जास्त राहिलो, वावरलो पण ते अभियंता म्हणून. बाकी मी कानसेनही नाही. अशा पद्धतीचं साहित्यही मी आधी वाचलेलं नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर पुणं ही सांस्कृतिक दृष्ट्या काय भारलेली जागा आहे ते लक्षात येतं. या पुस्तकात उल्लेख असलेलं एकएक ठिकाण तसंच उल्लेख असलेली माणसं जिथे वावरली आहेत ती अन्य ठिकाणं, ही पाॅवर हाऊसेस् आहेत. देवाने अशी काही सोय ठेवली असती किंवा यापुढे विज्ञानाने तशी ती निर्माण केली, की, अशा ठिकाणी गेल्यावर, किंवा बाजूने गेलं तरी,  तिथे वावरलेल्या या महानायकांच्या सामर्थ्यातून साधनेतून थोडं तेज आमच्यात उतरेल, तर आम्ही आतापर्यंत ॲव्हेंजर, मार्व्हल्सपेक्षा कितीतरी पट सामर्थ्यवान झालो असतो. असं वाटणं ही त्यांची आणि पुलंच्या लेखणीची ताकद आहे. वसंतराव, कुमार, मल्लिकार्जुन मंसूर आणि लतादिदिंबद्दल लिहितांना गाण्याची तांत्रिक बाजू हातचं न राखता पुलं सामोरी ठेवतात. गाण्याची जाण नसण्यार्यांच्यातही ते वर्णन गाणं उतरवून जातं आणि उगाचच, आता आपल्यालाही संगीत उलगडलंय असं माझ्यासारख्याला वाटू लागतं. फक्त त्या खुशीत सूर लावेपर्यंत किंवा ठेका धरेपर्यंत! 

मध्यम, धैवत, ताना, मुरक्या, लयकारी वगैरे बद्दल पु लं जे लिहितात त्यावरून हल्लिच्या 'जजेस' नामे लोक्सनी गायन स्पर्धांच्या नावाखाली काय थोतांड माजवलंय ते प्रकर्षाने जाणवतं. लतादिदिंबद्दलचं पुलकित वाचून वाटतं की पुलं या पुस्तकाचे पुढचे खंड काढून अन्य मंगेशकर आणि या पुस्तकात ओझरते वा संक्षिप्त उल्लेख असलेल्या अत्रे, पंडित भीमसेन जोशी आदि विभूतींबद्दल लिहितंच राहिले असते आणि आपण वाचतच राहिलो असतो तर.....

स्त्री पार्टी करणार्या बापु मानेंनंतर लगेच लतादिदिंबद्दल लेख आहे. दीदिंबद्दलच्या लेखात पंडित दीनानाथांचा उल्लेख अपरिहार्य आहे. पंडितजींच्याही गायकीबद्दल गौरवोद्गार आहेतच. पंडित दीनानाथांनी अनेक स्त्री भूमिका केल्या. पुलं बालगंधर्व, मास्टर नरेश आणि बापू मानेंना सर्वोत्तम स्त्री पार्टी अशी प्रशस्ति देतात तेव्हा वाचकाला दीनानाथांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही आणि स्त्री पार्टी म्हणून त्यांचा उल्लेख सुद्धा पु लं नी का टाळला असावा असा प्रश्न मनात येतो. 'मोरूची मावशी' मधे एकदा स्त्री पात्रे स्त्रीयाच करत होत्या तरी नाटक थंडगार गोळा होऊन पडले होते हे वाचून बापू मानेंच्या अभिनयाची उंची जाणवते. नाटककार राम गणेश गडकरी, कवि बा. भ. बोरकर आणि संगीतकार वसंत पवार यांचेही आवडीने गूण गाऊन पुलं या पुस्तकाच्या सांस्कृतिक स्वरुपाला साकल्य प्रदान करतात. तसंच या स्थितप्रज्ञतेची संगत करणारी नको त्या व्यसनांची बाजूही सामोरी येते. ब्रह्मदेशात जन्मलेल्या, माहेरच्या करमरकर, त्याकाळच्या उच्चशिक्षित आणि आधुनिक इरावती कर्वें पुलंच्या महाविद्यालयीन वयात लेखिका म्हणून संपर्कात आल्या आणि पुलंना भुरळ पाडत राहिल्या. एरवी आपल्या साहित्यातून, कौतुकाने स्वतःचं घर पाहुण्यांना दाखवणार्या सामान्य माणसाची पुलं यथेच्छ टिंगल करतात. त्यामानाने इरावती बाईंनी त्यांचं नवं घर पुलंना दाखवलं त्याचं खर्या कौतुकाने केलेलं रसभरित वर्णन इथे वाचायला मिळतं. 

असा मी असामी मधे असलेली 'तुमच्या त्या लेंग्याचा आणि पंचांचा साहेबाच्या पॅटीवर काही परिणाम होणार नाही' किंवा 'कसला रे हिंदू बांधव, भोंदू भांधव सगळे' ही वाक्यं पात्रांच्या तोंडी 'खसखशित' विनोद म्हणून घातलेली असली तरी पुलं या प्रत्यक्ष व्यक्तीचा राजकीय कलही ती दर्शवून जातात. समाजवादी राम मनोहर लोहिया यांचा समावेश या पुस्तकात व्हावा हे काही नवल नाही. त्या काळची राजकीय मंडळी कशी होती हे आजच्या पिढीला सांगायला लोहिया, जय प्रकाश नारायण यासारखी उदाहरणं मिळणार नाहीत. गोवा मुक्ति संग्रामातलं लोहियांचं योगदान पु लं इथे मांडतात. लोहिया म्हणाले होते, "भिकेच्या झोळीत अन्नधान्य घालणार्या परदेशी सैयांपुढे नटण्यासाठी ही नगरी (दिल्लीची सत्ता) स्वतःकरता पाण्यासारखा पैसा उधळते. पण जिथे लक्षावधी भारतीय नागरिक जमतात अशा तीर्थक्षेत्रात ना संडासाच्या सोयी, ना सुंदर सडका" याचा अर्थ असा निघतो की तीर्थक्षेत्रांच्या अनुषंगाने संवर्धन हा (फक्त) तथाकथित उजव्या विचारसरणीचा कार्यक्रम नसून समाजवादाचीही तीच विचारसरणी आहे. ती फक्त हिंदूंची ईच्छा नसून भारतीय नागरिकांसाठी करायचं आहे. मग 2014 च्या लोकसभेत मोदी मुलायम सिंगांना उद्देशून वारंवार 'आपली नाळ एकच आहे, ती म्हणजे लोहिया. त्यांच्या प्रेरणेनेच मी ही कामं करतोय' असं का म्हणत होते, त्यातली (काही) कामं कुठली आणि मुलायमसिंगांच्या उत्तर प्रदेशात भाजपाला 'न भूतो' असं यश  या आळवणीनंतर का मिळतं याचा संदर्भ लागतो.

पुलंनी निवडलेले बहुतेक गायक हे कुठल्याही घराण्याशी स्वतःला बांधून न घेतलेले आहेत. पुलंना एकंदरीतच चाकोरी किंवा धोपटमार्ग सोडलेली, बिकट वाटेवर गेलेली, काहीशी बंडखोर किंवा काहीतरी असामान्यतेचा कढ आलेली पण स्थितप्रज्ञ अशी माणसं भुरळ घालतात. बाबा आमटे आणि सेनापती बापट हे असेच स्थितप्रज्ञ. 'वेरूळची भग्न शिल्प पहातांना फुटलेली नाकं आणि तोडलेले हात मनानं भरून काढता ना? मग या जिवंत भग्नावशेषांमधलं मूळचं शिल्प तुम्हाला दिसत नाही?' हे बाबांचं कुष्ठरोग्यांबद्दलचं वाक्य आपल्या चंगळवादि मनात खोलवर वार करतं. गिरणी आंदोलनात प्राणत्यागाच्या घोषित वेळेला 'अजून चार पाच तास वेळ आहे तोवर जरा लवंडतो' हे सेनापती बापट यांचं वाक्य सैनिकाच्या स्थित आवश्यक प्रज्ञेचं दर्शन घडवतं.

या पुस्तकातल्या नायकांचे पाय जमिनीवर होते हे पुलं कटाक्षाने नमूद करतात. भास्करबुवा बखले म्हणत, 'मी गायलो नाही, तुम्ही गाववून घेतलंत', नानासाहेब फाटक म्हणायचे 'गणपतरावांच्या आवाजापुढं आमचा गळा दुबळा म्हणावा लागेल', मॅट्रीकला पहिला आला म्हणून कुणा कुमार देशमुखांना राम गणेश गडकरींनी स्वतःकडे कमालीचे गौणत्व घेऊन लिहिलेले पत्र, वृद्धत्वात लहान मुलांमध्ये खेळून रडीच्या डावावरून नाटकी भांडणारे सेनापती बापट, वगैरे. याच क्रमात पुलंचं स्वतःचं एक टिपणं येतं, ''मध्यंतरी काही लोकांनी गाण्याला देशभक्तीला जुंपले होते, हल्ली बिचारे टूथपेष्ट आणि डोकेधुखीच्या गोळ्या विकायला बाजारात येतात' ही कोटी पुलंनी कोणावर केली असावी हे शोधायची मज पामराला गरज वाटत नाही. पण यामुळे पुलं स्वतः अन्य कलाकारांच्याच नाही तर कलेच्याही पुढे गेलेले होते आणि त्याची त्यांना अंतरिक जाणीव होती असं वाटून जातं.

बाबा आमटे अति सधन पृष्ठभूमि सोडून कुष्ठरोग्यांबरोबर हालअपेष्टा सहन करत जगले. हे सांगता सांगता पुलं प्रेक्षक, श्रोते, वाचक चाहते हे मात्र कसे बदलत गेले आहेत, त्यांची अभिरुची हीन होत चालली आहे हे ही सांगत रहातात. 'असली (बाबा आमटेंसारखी वडिलोपार्जित सधनता असलेली) माणसे पोलिसात किंवा फाॅरेष्टात जातात, पैसे खातात, आणि रिटायर होतांना शहराबाहेर मोठा बंगला बांधतात' असं सार्वत्रिक विधान, 'बेगड आणि सोने यात फरक करायला सामान्य वाचकाला तरी कुठे सवड आहे' अशा टिपण्या पुलं करतात, ते बहुधा आपण सामान्य लोक सामान्य का राहिलो ह्याचं नकळत उगाळलेलं अंजन समजून आपण स्व ची दृष्टी सुधारायला हवी. आणि यामुळेच केशवराव दाते कधी 'आमच्या वेळचे ते राहिले नाही' असं चुकूनही म्हणत नसत याची महती अधिक ठळक गोंदवून रहाते.

हे पुस्तक मी 'ग्रंथ तुमच्या दारी' या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' च्या योजनेअंतर्गत वाचलं. एकदा वाचल्यावर, भविष्यात मी स्वतः  लेखन करतांना, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातले यातले संदर्भ आठवत रहातील आणि नीट नाही आठवले तर रुखरुख लागेल. म्हणून हे विकतच घ्यायला हवं.


आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...