'ए, हे बघ कोणीतरी भेटायला आलंय तुला.'
रूम पार्टनर म्हणाला, तसं,
'कोण आहे?' विचारत,
चहाची तयारी करत असलेला प्रभाकर बाहेरच्या खोलीत आला. पुण्यात दोन खोल्यांचं घर तिघात वाटून रहात असत ते. जॉब नसलेला एकटा हाच. म्हणून तिघा रूममेट्सचा स्वयपाक, केर वारा, कपडे, भांडी या जबाबदार्या घेतलेल्या. बाहेर आलेला गुरव त्याची आधीची कंपनी जयलक्ष्मी फ्लो मीटर्समधला सर्विस एक्झिक्युटिव होता.
'तू पाय धुवून आतच ये. एक कप चहा वाढवतो.'
'चहा कशाला रे, जरा गप्पा मारतो नि जातो की रे बस पकडून इथूनच. ४० मिनिटं आहेत फक्त.'
पाय धुता धुता.चहा कशाला ही फक्त सभ्यता, चहा न पिता कस्टमर सर्विसिंगमधे काम सुचणं अशक्यच.
'बोल आता. असा घाईत कसा इकडे?'
'काय नाय रे. मी तुझी तक्रार केली तिथून तुझे नि बॉस चे खटके सुरू झाले. मग तू रागावून जॉब सोडला. म्हंटलं थोडं प्रायश्चित्त घेऊ.'
'जाऊ दे ना. मी ते विसरलो आहे.' चहा पोहे देत देत प्रभाकर म्हणाला.
विसरायचा प्रयत्न करत असला तरी ते इतका सोपं नव्हतं. त्यामुळे, तू का उपटलास परत माझ्या आयुष्यात असे भाव चेहेर्यावर.
'ते बरिक छान केलस बघ. मला माहिती रे, तू आता कम्प्युटर कोर्सेस करतो, पण जॉब नाही. चणचण आहे म्हणून शेयरिंग मधे राहतो. हो का नाही?'
कर्नाटकात भरपूर कस्टमर साइट्स असल्यानं कानडी हेल. प्रभाकर ने दीर्घं उसासा सोडला आणि जखमेवर मीठ चोळायला आलास असा कटाक्ष टाकला.
'राग सोड रे. कोणी कायमचा शत्रू नाही. हे बघ, हिंदुस्तान मिलानो एफएमसीजीला वेन्डर डेवलपमेंट एक्झिक्युटिव हवाय. सहा महिन्याचं कॉंट्रॅक्ट, ८ हजार महिना' सकाळ वर्तमानपत्रातली १ जुलै २००१ ची जाहिरात दाखवत गुरव.
'अरे पण मी तर क्यु सी मधे काम केलय'
'ते सोड की. त्यांना १ वर्षाचा अनुभव हवा आहे, तुझा ३ वर्षाचा आहे, इंजीनियर म्हणून. हिंदुस्तान मिलानो आपला कस्टमर. माझी ओळख आहे थेट वाइस प्रेसिडेंटशी. कॉंट्रॅक्ट पुढे वाढत रहातं'
प्रभा विचारात पडला.
'विचार कर नि संध्याकाळ पर्यन्त एसएमएस कर. चलो, बेस्ट लक'.
प्रभाकरचं डोकं आऊट झालं होतं. ज्या लोकांनी कारस्थान केल्यानं त्याने जॉब सोडला त्यांचेच पाय धरायचे? तीन दिवसांनी गुरव चा फोन आला. त्याने व्हीपी ला १ आठवडा मुदत वाढवायला सांगितली असा म्हणत होता.
'घेच रे तू जॉब. आता कॉंट्रॅक्ट असलं तरी कंपनी मोठी आहे. काम आवडलं तर कायमही करतात अशा ठिकाणी.' रूम पार्टनर्सनी ही भरीला घातला.
प्रभाकरचा थोडा थोडा खर्च ते उचलत होते. नाही म्हंटलं तरी प्रभाकरला ते नको होतं. तो मुलाखतीला गेला. व्हीपी बासूंनी काही प्रश्न विचारले. स्कॉलरशिप मिळालेली असल्याचा बासूंवर 'बासू'ताच प्रभाव झाला. त्यांनी त्याला पुढील १ तारखेपासून रुजू व्हायला सांगितले.
८ हजार म्हणजे फार नसले तरी रूम मेट्स ची देणी २-३ महिन्यांमधे फिटू शकणार होती. काम मिळणार आणि अनुभव पदरी पडणार अशा सगळ्या आशा प्रभाकरच्या पल्लवित झाल्या. मिलानो हा मोठा ब्रॅंड. भारतातला एफएमसीजीचा सव्वीस टक्के वाटा त्यांच्याकडे होता. पी अँड जी, एचएलएल बरोबरीने ते कायम पहिल्या तीन मधे असायचे. देशभरात १२ ठिकाणी कारखाने, कलकत्त्यात मुख्य कार्यालय, मुंबईत आर्थिक मुख्यालय आणि पुण्यात कॉर्पोरेट ऑफिस. याच ठिकाणी पुरवठादारांची निवड उच्च पातळीवरून होई.
प्रभाकरचं काम सुरू झालं. सुरूवातीचे १-२ आठवडे, अपेक्षेप्रमाणे माणसांची ओळख, कार्यालयाची ओळख, जागा निश्चिति यात गेले. फक्त ८० लोकांचच कार्यालय होतं. बरेच सगळे उच्चपदस्थ अधिकारी. बंगाल्यांची संख्या जास्त. मराठी तसे खालच्या पातळीवर. कॉंट्रॅक्ट वर ३ जण. पहिलं काम मिळालं ते पुरवठादारांची संपर्क माहिती संगणकीकृत करण्याचं. ५ पृष्ठ यादी होती. लगेचच झाली. पण २-३ लोकांनी तपासून काही काही फेरफार सांगितले आणि २ तासांचं काम ३ दिवस चाललं. मग वेगळ्या साहेबाने वेगळी यादी दिली. हे असंच सुरू राहिलं, महिनाभर. बासू साहेब आठवड्यातून एकदा तरी ख्याली घेत.
'कैसा चालो आहे?'
मराठी मिश्रित हिन्दी, ती ही बंगाली हेलामधून. एवढ्या मोठ्या बॉसला आणि उभ्या उभ्या काय सांगणार.
'सर कर रहा हू सर. सब साब लोग कुछ न कुछ काम दे रहे है.'
महिन्याचा धनादेश देतांना मात्र त्यांच्या केबिन मध्ये बोलवून देत असत. प्रभाकरला दिला तेव्हा तिथे गांगुली, बॅनर्जी वगैरे साहेब पण होते. 'परभा...' बासू नेहेमीच अशीच हाक मारत; त्यात दर्प आणि हेटाळणी असे ती प्रभाकरला बिलकुल आवडत नसे.
'कैसा चालो आहे? आपनी काजा पशन्दा कराशेना?'
'हो साहेब. काम तर काम आहे ना'
प्रभाकर ने असा प्रश्न आला तर द्यायचं ठरवलेलं उत्तर काढलं. 'आमाडेरा बंगाली बछ्छे ए प्रकारचे काज कोरोबेना, क्यों गांगुली?' 'गांगुली गालात हसले 'तबे मर्द मराठा शे'.
सगळे बंगाली हसले तर प्रभाकर ही हसला. म्हणजे मराठींकडून आम्ही शेलकि कामं करून घेतो हा अर्थ समजण्याएवढा अनुभव नव्हता त्याला. तीन चार महीने उलटले. साधारण अशीच ऑफिस असिस्टेंट टाइप कामं करावी लागत होती. आता करार नुतनीकरणही जवळ आलेलं. त्यामुळे या वेळी मात्र प्रभाकर ने तोंड उघडलं.
'साहेब आहे ते काम मी छान करतोच आहे, हवं तर बॅनर्जी साहेब, गांगुली साहेबांना विचारा. थोडा इंजीनियरचा अनुभवही मिळाला तर उपकार होतील..'
'परभा, मेरा भालो बच्चा परभा, बस इतना ही' गांगुली कडे वळत बासू म्हणाले, 'कल से इसको तूम ले लो. बच्चा, हम तुम्हारा कॉंट्रॅक्ट नेक्स्ट मोंथ रेन्यू कोरेगा, ओके'.
प्रभाकर खुश झाला.
आता थोडं तरी कॉष्टिंग, पुरवठादारांची तुलना अशी कामं मिळू लागली. आता त्याची बसायची जागा गांगुली साहेबांच्या केबिन जवळ होती.
दुसरा करार कालावधी सुरू झाला होता. गांगुली साहेब मधूनच कधीतरी
'साला ये डिकोस्टा पावे ना' असं म्हणत असत.
एकदा केबिन मध्ये काम प्रस्तुतिसाठी गेलेलं असतांना मनाचा हिय्या करून प्रभाकर ने विचारलंच.
'सर, ते डिकोस्टा कोण सांगाल का?'
'ऑ... हं. बहार बैठ के हमरो बातोको सुनता तुम, हं. कोई बात नहि, कोई बात नहि. आज हमरा मूड अछ्छा है. धुंडेगा टुम उसको? ठीक ठीक. गोवा के प्लांट मे था डिकोस्टा. होमरा जिगरी यार.आब हम प्लांट मे फोन करेगा तो कोई आदमी उठाएगा आणि मेरा नाम गांगुली सून को फोन पोटक देगा. मोबाइल भी लागे नहि. तूम धुंडेगा तो 3 साल का कॉंट्रॅक्ट करेगा हम तुमसे.'
कॉंट्रॅक्टसाठी नाही पण शोधायच्या आनंदासाठी प्रभाकरने ते काम स्वीकारलं. गंगूलींनी आता त्याला केबिन मधेच जागा दिली. गांगुली असं नाव ऐकून कोणीतरी फोन ठेवतं म्हणजे नाव, ओळख न सांगता खाजगी फोन आहे असं दाखवत प्रयत्न करायला हवा. त्याने ऑफिस कोन्त्याक्त लिस्ट मधून प्लान्ट मध्ये टेबल वर फोन केला.
'डिकोस्टा अंकल से बात करना है'
'कौन?'
'उनके दोस्त का बेटा. इम्पॉर्टंट काम है'
'डिकोस्टा ऑफिस मे नही. १ हफ्ते बाद कॉल करो.'
बरोबर १ आठवड्याने प्रभाकरने कॉल केला. परत तेच उत्तर. ३ र्या वेळेला ही तेच उत्तर म्हंटल्यावर प्रभाकरने चिडीचा सूर घेतला.
'यू से सेम थिंग एव्री टाइम.'
'ठीक है, २ दिन बाद करो' असं करत आणखी २ आठवडे गेले. आता प्रभाकरने रीसेप्शनिस्टल फोन लावला. तिला हे असं होतय हे सांगितलं. तिने काहीच उत्तर न देता फोन आपटला. प्रभाकर ही ऐकणारयातला नव्हता. 'शक्ति, युक्ति, बुद्धि ने अखंड यज्ञ चालवू' या पठडीतला होता तो. त्याने तिला रोज फोन लावला सुरुवात केली. शेवटी एक दिवस ती द्रवली.
'इये अप्प्रेशियेट यॉर एफर्ट्स. पण डिकोस्टा साहेबांची आणि त्यांच्या असिस्टंटची चौकशी चालू होती. आता ते सक्तीच्या रजेवर आहेत. मी मोबाइल नंबर देते, पण लोक म्हणतात की तो लागत नाही.;
ती मराठी असल्याचं त्याला उगीचच बरं वाटलं तिने सट्ट्कन सांगितलेला क्रमांक त्याच्या तल्लख बुद्धीत साठवलेला, तो त्याने कागदावर टिपला. पण काही उपयोग झाला नाही. तो क्रमांक बंदच लागत होता. आता काय करावं या विवंचनेत तो होता. गांगुली साहेब अधून मधून कुत्सित पणे बोलत,
'अरे तूम मर्द मराठा क्या ढुंडेगा ओमरे दोस्त को'.
काही दिवसांनी प्रभाकरच्या मनात एकदम कल्पना चमकली. त्याने परत रीसेप्शनिस्ट ला कॉल लावला. तिला त्याचा नंबर सवयीचा होता. एक दोन दा तिने उचलला नाही. पण मग एकदा उचलला. 'आता काय तुझं, मराठी माणूस?' 'मॅडम, तुम्ही मागच्या वेळी डिकोस्टाचे अस्सिस्टंटही बडतर्फ झाले म्हणालात..'
'हो म्हणाले, तर मग?'
'त्यांचा काही संपर्क क्रमांक देता येईल का?'
'हह'
आसा उसासा टाकत तिने एक मोबाईल क्रमांक दिला.
'मॅडम, प्यार हो रहा किसी से?'
तिच्या शेजारच्या असिस्टेंट रिसेपाशनिस्ट मॅडमचा आवाज फोन ठेवता ठेवता त्याच्या कानात शिरला. प्रभाकरने लगोलग डिकोस्टाच्या असिस्टंट पेद्रोंना संपर्क केला. ओळखीचा क्रमांक नसल्यानं असावं बहुदा पेद्रो काही कॉल उचलेनात. प्रभाकर प्रयत्ने वाळूचे कण रगडणारच. त्याने एसएमएस केला. ;डिकोस्टा अंकलच्या मित्राचा मुलगा बोलतो आहे,महत्वाचं बोलायचय', अशा अर्थाचा आंग्ल मधून. पेद्रोने अनपेक्षितपणे ओके असं उत्तर पाठवलं. पण उद्दिष्टाने परत खो दिला. अफरातफरीच्या कारणावरून बडतर्फ झालेले डिकोस्टा आता कंडोलिम सोडून वाल्पोईला निघून गेले होते. पेद्रोंनी डिकोस्टांचा वाल्पोईचा फोन क्रमांक सांभाळून ठेवला नव्हता किंवा मोबाईलही नव्हता. पण प्रभाकरला नवीन धागे मिळाले होते. डिकोस्तांचं ठिकाण.
डिरेक्टरी मधून लॅंडलाइन संपर्क क्रमांक मिळू शकतो, नाही का?!
प्रभाकरला परत 'प्यारि' रिसेपशनिस्ट आठवली. तिला फोन करून त्याने 'उत्तर गोवा' जिल्ह्याचे 'यल्लो पेजेस' नेहेमीच्या टपालात घालून पाठवा म्हणून विनंती केली. तिनेही लगेच मान्य केलं. प्रभाकरला हायसं वाटलय अशी स्वतःलाच जाणीव व्हायच्या आत गांगुली कानावर रीसीवर ठेवून चढया आवाजात बोलले
'गांगुली हिअर. नो सेंडिंग ऑफ येल्लो पेजेस एक्सेत्रा. यू अंडरस्टँड?'
'येस सर'
'इस बच्चे का सब मेरे ओनोमोती से होगा'
'राइट सर'
गांगुलींनी रिसीवर आपटला आणि एक विशिष्ट कटाक्ष प्रभाकर च्या दिशेने फेकला. कार्यालयातल्या सर्व कनिष्ठ लोकांना या कटाक्षाचा अर्थ गांगुली रागावले आहेत आणि जाच्यावरुन तो कटाक्ष tangent करून ओघळवत आणला आहे त्याने त्वरीत त्यांच्या समोर हजर होऊन शांत उभं राहायचं आहे असा असतो हे माहिती होतं. प्रभाकर काही क्षण उठला नाही तर तो तुलनेने नवखा असल्याने गंगूलींच्या गोड असिस्टेंट ने नेत्रपल्लवी ने त्याला जागा दाखवली. प्रभाकरला तेवढं पुरे होतं. तो समोर येऊन उभा राहिला आणि तोंड उघडणार तेवढ्यात परत 'श्शु' ची खूण झाली.
थोडा अस्वस्थ होईपर्यंत एवढा वेळ गेला. गांगुली मधेच कटाक्ष टाकत होते तर पुढच्या क्षणी आपलं लक्षं नाही असं दर्शवत होते. असं २-3दा झाल्यावर नेहेमीच्या योग्य क्षणी त्या गोड मुलीने पाण्याचा पेला गंगूलिंसमोर समोर सरकवला. पाणी पिऊन गांगुली एकदम निवळले.
'बेटा, कॉर्पोरेट इज ए टीम वर्क. सब कुछ अकेला नही कोरो. बात कोरो. एक्स्पेरीन्सेड आदमी को बोताओ, पुछो. फिर कोरो.'
परत फोन कानाला लावून मुख्य कारकुनाकडून त्यांनी नॉर्थ गोवा चे येल्लो पेजेस तत्काळ प्रभाकर च्या टेबलवर ठेवायची आज्ञा केली. प्रभाकर चकित झाला. 'अवर इज इंडिया रिजन वेन्डर रिलेशन हेड ऑफिस. वी कीप येल्लो पेजेस ऑफ ऑल मिलानो लोकेशन्स अँड वेन्डर लोकेशन्स! अवर गोवा फ्याक्टोरी इज इन नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्त. समझा?' हे पूर्ण व्हायच्या आत ते पुस्तक त्याच्या टेबल वर आलं सुद्धा. 'अब जाओ और धुंडो. बेस्ट लक.'
प्रभाकरने वाल्पोईची यादी उघडली तर तिथे ३-४ पानं भरून डिकोस्टा. प्रभाकरने\ एक एक करून सगळे क्रमांक लावायचे ठरवले.
'मे आय टॉक टु डिकोस्टा अंकल फ्रॉम मिलानो?' असं तो प्रत्येकाला विचारे. आणि .. अंततो गत्वा.... यश!
तडक नंबर गांगुलींकडे, गांगूलींनी पटापट फोन लावला. ख्याली घेतली. १ आठवडा सुट्टी टाकून डिकोस्टाला भेटून 'मोंथ-एंड' च्या आत परतले.
शेवटच्या आठवड्यात बासुन्च्या केबिनमधे पगार होत, तेव्हा गांगुली डीसीएफओ असल्यानं तिथे बसत. प्रभाकर धनादेश घ्यायला आल्यावर गांगुलींनी बासुंकडे त्याची शिफारस केली. खूप हुशार मुलगा आहे, याला पे-रोल वर घ्या असं सांगितला. बासुंनी थोडा विचार केल्यासारखा केला.
'अभि तो परभाकर ने तुम्हारा काम किया. मेरा भी एक काम करेगा तो दे देङे पे-रोल. आज से परभाकर बॅनर्जी के साथ काम करेगा.'
हे ऐकून गांगुली अस्वस्थ झालेले प्रभाकरला स्पष्ट जाणवलं. पण बासुंसमोर कोणी बोलत नसे. गांगुलीचं केबिन सोडतांना त्यांनी याला समोर बसवून घेतला. मित्रासारर्ख्या गप्पा मारल्या. आपलं करिएर कसं उभं राहिलं वगैरे सांगितलं. मग म्हणाले, 'बेटा, तुम ईधार कोईसे आया?' प्रभाकरने काय ते खरं सांगितलं.
'बेटा, बॉस के साथ झोगडा हो के तुमने जॉब छोडा, वोहि बॉस का खास आदमि तुमको ईधार का रास्ता दिखाया. सोचो बेटा, सोचो. और ये भी याद राखो के जोंगाल मे सिद्धा पेड पेहेले कटता. तुम्हारा ब्रेन हई ना ये खुद के लिये पेहले इस्तेमाल करो. बॅनर्जि का काम करो, आख और कान खुल्ला रोख के. आय विल नोट इंटरप्ट बट फॉलो माय इन्स्त्रक्शोंस ईफ आय कॉल यू. गीता मे भगवान अर्जून को बोले वही मै तुमको बोलता 'तेषामहम् समुद्धर्त्ता, मय्यावेशितचेतसाम्. क्यो समझा कुछ? आमि तुमारे भालो, योर टॅलेंट हॅज चेंज्ड योर डेस्टिनि, बेटा. जाओ.'
एकीकडे गांगुली सावध रहायला सांगत होते,तर दुसरीकदे नशीब उघडलय असं म्हणत होते. प्रभाकर पूर्ण गोंधळला होता.
बासुंनी उधृत केलेली खास कामगिरी आता बॅनर्जी साद्यंत सांगू लागले. मिलानो डिटर्जंटच्या कंडोलिमच्या फॅक्टरीत काही वर्षांपूर्वी विस्तार प्रकल्प आखला होता. तेव्हा चुकीने बरंच सामान डबल मागवलं गेलं. तो प्रकल्प नंतर रखडत गेला आणि मग बंद पडला. मध्यंतरीच्या काळात हे सगळं सामान फॅक्टरीच्या आजूबाजूच्या गोदामांमध्ये पडून राहिलं आणि सडून गेलं. आता त्या सामानाच्या पुरवठादार कंपन्या ते सामान परत घ्यायला तयार नव्हत्या. त्यातली १ कंपनी होती जयलक्षी फ्लो मीटर्स. बॅनर्जी म्हणाले की आता ती कंपनी निम्मी निम्मी सेटलमेंट करायला तयार झाली आहे. पुरवलेले व अजूनही वापरण्याजोगे असलेली मीटर्स म्हणजे प्रवाह मापक जर मिलानो ने जयलक्ष्मिला परत केले तर ते तपासून खात्री करून मिलानोच्या तामिळनाडू मधल्या प्रकल्पाला नव्याने विकायचे आणि जे मापक बाद झालेत त्याची झळ मिलानो आणि जयलक्ष्मिने निम्मी निम्मी वाटून घ्यायची असा करार झाला आहे. यात मेख ही आहे की सगळ्या पुरवठादारांचं सामान गोदामांमध्ये एकत्र सडतय. त्यातलं जयलक्ष्मिचं वेगळं करून त्यातलं परत उपयोगी आणि निरुपयोगी असं वेगवेगळं करायचंय. प्रभाकरने जयलक्ष्मिमधे क्यू सी चं काम केलेलं असल्याने तो यासाठी योग्य माणूस आहे, हे सांगायची गरज नव्हती. कंडोलिमला त्याला साळगावकर नावाचा सहकारी मिळणार होता. तो ही आधी जयलक्ष्मी मधे होता आणि आता मिलानोच्या कंडोलिम फॅक्टरी मधे कामाला होता.
शनिवारी पुण्याहून निघून प्रभाकर कंडोलिमला रविवारी पोहोचला. कंपनीच्या अतिथीगृहात त्याची सोय करण्यात आली होती. अशा पद्धतीचं पहिलंच काम आणि हॉटेलसारखी व्यवस्था वगैरे प्रथमतःच होत असल्याने प्रभाकर सुखावला.
सकाळी ७ ला रीसेप्शनकडे नोंदणी करायची असल्याने तो ५ वाजताच उठला आणि ६.१५ पर्यन्त सगळं आटपून नाश्ता घेणार इतक्यात त्याला फोन आला.
'प्रभाकर, गांगुली हिअर. तुम गोडाऊन जाने के लिये कार मांगो. उधार फोर्म होगा. भर के दे दो. कार नही मिलेगा. तुम रेजेक्टेड कर के स्टॅम्प डालके ले लो. कुछ भी हो जावे तो भी ट्रक मे नही बैठना. गुड डे.'
प्रभाकरला काही बोलायची संधि न मिळता फोन शांत झाला. प्रभाकरला खरं तर ट्रक मधे बसायला मिळणार हे पण थ्रिल होतं. पण त्याने गांगुली साहेबांचं ऐकायचं ठरवलं आणि रीसेप्शन सुरू झाल्या झाल्या तिथे बॅनर्जी साहेबांचं अधिकार पत्र दाखवून नाव नोंदणी केली व कारची मागणी केली. अपेक्षेप्रमाणे रिसेप्शनिस्ट नाही म्हणाली. प्रभाकरने तिला दम भरला की १५ मिंनितांमद्धे गाडी मिळाली नाही तर तो बॅनर्जी साहेबांकडे तक्रार करेल आणि तो तिथेच ठाण मांडून बसला. रिसेप्शनिस्ट तर त्याच्याकडे लक्षही देत नव्हती. थोड्या वेळाने उगीचच आपण फोनवर बोलतोय असा त्याने आव आणला. आश्चर्य म्हणजे त्याचं ते बोलण्याचं नाटक संपल्यावर लगेचच रिसेप्शनिस्टने त्याला बोलावलं. विस्फारल्या नजरेने प्रभाकर तिच्याकडे गेला.
'तुझा आवाज ओळखीचा वाटतो. डिकोस्टाचा संपर्क क्रमांक मागण्यासाठी सारखे कॉल करणारा तूच का तो?'
'हो मॅडम मीच करत होतो फोन.'
'वेल डन.' ती खरोखरच प्रेमात होती की काय त्याच्या आवाजाच्या?
'ठीक आहे, मी तुला गाडी देते. पण त्याची पावती तुझ्या ऑफिसला पाठवली जाईल.'
प्रत्यक्ष वित्तीय अधिकार्यानेच गाडी घ्यायला सांगितली असल्याने आणि बिल तेच सम्मत करणार असल्याने प्रभाकरने लगेच मान्य केलं आणि सलगावकर आला की त्याला गोदामकडे पाठवायला सांगायलाही तो विसरला नाही. गोदाम १२ मैलांवर निर्जन जागी होतं. थोडी भीतीदायक जागा होती सहसा कोणाला लक्षात येणार नाही अशी. रान वाढलेलं,आजूबाजूला श्वापदं होती. त्याने एक एक खोली उघडली आणि ट्रक्सची वाट पहात बसला. एवढ्यात परत फोन आला.
'तुमको गाडी मिला, मुझे खबर मिल गया. आब सुनो. दोपहर तक काम करो. फिर वो साळगावकर को कोई ऐसा मार्क दिखा दो जिससे वो तुम्हारे मीटर्स पोहेचान सके. फिर लंच के टाइम गोडौन को ताला लगा के तुम दोनो कंपनी मे लंच करो. ट्रक ड्राईवर और बाकी लोगो को साथ मे नाही लो. लंच के बाद गोडावून की चावी अपने नाम से उसको साळगावकर के नाम पर कर दो और कोई वजह बना के तुम गोडौन वापस मत जाओ. कम टू पुणे इमिडियटली. बॅनर्जी पुछेगा तो बोल दो के गांगुली ने वापस बुलाया. बेस्ट लक'
परत एकदा बोलायची संधीच मिळाली नाही. दुपारपर्यंत भरपूर मेहेनत करून त्याने आधी एकावर एक पडलेलं सामान पसरलं आणि जयलक्ष्मीचं सामान वेगळं काढायला सुरुवात केली. मजूर, ट्रकचालक यांनाही कसं ओळखायचं ते समजावून सांगितलं.
पुढे सगळं गांगुलींच्या बरहुकूम झालं. साळगावकरला शंका येईल आणि तो किल्ली नावावर करायला नाही म्हणेल असं त्याला वाटलं होतं. पण झालंउलटच. आपण कंपनीला कुठल्यातरी मोठ्या संकटातून वाचवतोय आणि आता तर पूर्ण श्रेय आपल्यालाच मिळणार असा त्याचा सूर दिसला. की रजिस्ट्रार ला त्याने मोठ्या ऐटीत सकाळपासूनच माझ्या नावावर करा असं सुचवलं. प्रभाकरला यावर विचार करायला बिलकूल वेळ नव्हता. गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे तो जीवाचा आटापिटा करून दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या आत गोवा हद्दीच्या बाहेर होता आणि बॅनर्जी साहेबांचा फोन आला.
'किधार हो परभाकर?'
'बस मे हू सर.'
'बस किधार है?'
आजूबाजूला पाहून दिसेल ते नाव सांगितलं त्याने.
'गोवा को क्रोस कर दिया. ठीक है, किधार जोएगा, इधोर आयेगा तो देखता तुमको.'
गोवा क्रॉस करण्याचा काय संबंध हे त्याला समजत नव्हतं. पोहोचल्या पोहोचल्या रूमवर न जाता प्रभाकर ऑफिसला गेला. संस्कार, दुसरं काय. तर त्याला आधी बाहेरच अडवला. बासु साहेब सुट्टीवर होते ते अर्जंट येणार तोपर्यंत थांबवला होता. बासु साहेब येण्याचा आणि मला आत येऊ देण्याचा काय संबंध हे पुढचं कोडं आलं.
बासु आले तेच जळजळीत कटाक्ष टाकत. थोड्या वेळाने प्रभाकर केबिनमधे गेला तर उच्चपदस्थ मंडळ आधीच तिथे होतं. त्यांची तिथे आधी बंगाली मधून बरीच चर्चा, चर्चा कसली भांडणच झाली. एकंदर सूर असा होता की बॅनर्जी साहेबांनी जयलक्ष्मिबरोबर एवढा मोठा व्यवहार ठरवून दिला आणि प्रभाकरमुळे त्यावर पाणी पडलं. प्रभाकर कामचुकारपणा करून तिथून निघून आला. गांगुलींनी त्याला यायला सांगितलं म्हणून सगळे त्यांना रागवत होते. तर गांगुली म्हणत होते की काम तर झालं आहे मग व्यवहार फिसकटला कसा? प्रभाकरला परत बोलावण्याचं कारण जे गांगुलींनी सांगितलं ते ऐकून प्रभाकरला धक्का बसला. नियमाविरुद्ध कार मागितल्यामुळे त्याला परत बोलावलं असं सांगितलं त्यांनी चक्क. यावर अधिक चर्चा प्रभाकर समोर नको असं म्हणत बासुंनी पुढील कार्यक्रम आणि तारीख ठरवली आणि गंगूलींना प्रभाकरवर पुढची कार्यवाही करायला सांगितली.
गांगुलींनी प्रभाकरला केबिनमधे बोलावून घेतला. तिथे बॅनर्जीही आले. नियमविरुद्ध वागल्यामुळे करार रद्द करण्यात आल्याचं प्रभाकरला सांगण्यात आलं. तो नवागत असल्यानं त्याला उरलेल्या ५ पैकी १ महिन्याचे अतिरिक्त करारशूल्क देऊन त्याची पाठवणी करण्यात आली. ते रेलीविंग लेटर नंतर कुरीयर करणार होते.
प्रभाकरला आणखी आणखी धक्के बसत होते.
तो तडक रूमवर आला. रूमवर येतो तोच त्याला चरक आयुर्वेदीय कंपनि कडून मुलाखतीसाठी फोन आला. उद्याच जायचं होतं. एका डोळ्यात आसू तर दुसर्यात हसू घेऊन तो सगळं विसरून मुलाखतीच्या तयारीला लागला. ३-४ वेगवेगळ्या लोकांनी मुलाखती घेतल्या. शेवटी सीईओ पराशार आले.
'यू आर रीयालि शार्प. यॉर जॉब वास शुअर बट वुई ऑल्सो एक्सामाइंड यू फॉर हायर पोस्ट. यू नीड सम ट्रेनिंग अँड वुई बिलिव दॅट वुई हाव ए वेरी ब्राईट सिनिएर एक्सेकुटीव राइट हिअर. यू विल जॉइन अस ऑन फर्स्ट इन इंदोर. गुड लक'.
प्रभाकर आता एकदम चक्रावून गेला होता. काय गोंधळ चाललाय ते त्याला काही कळत नव्हतं. जाता जाता चरक आयुर्वेदीयच्या रिसेप्शनिस्टने त्याला १ लिफाफा दिला. त्यावर 'ओपेन ऑन फर्स्ट' असं लिहिलेलं होतं.
प्रभाकर ने घरी येऊन गांगुली साहेबांना मोबाइल करायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ऑफिस क्रमांकावर त्यांना गाठायचं धारिष्ट्य त्याच्यात नव्हतं. १ तारीख जवळच होती, म्हणून तो तयारीमधे गुंतून गेला. २९ तारखेला तो निघणार होता त्या सकाळी त्याच्या रूममेटने त्याला महाराष्ट्र टाइम्स मधली बातमी दाखवली --
'कंडोलिमच्या वेशीवर असलेल्या मिलानोच्या गोदामातून जयलक्ष्मि फ्लो मीटर्सचा लाखोंचा माल पळवतांना तरुणाला रंगेहात अटक. याआधीच किमान १.५ कोटींचा माल पळवला असण्याची शक्यता'. खाली ट्रक मधे बसलेल्या साळगावकरचं छायाचित्र होतं.
प्रभाकरचा उल्लेख मात्र कुठेही नव्हता. आता मात्र प्रभाकरला सगळा गुंता उलगडला. जयलक्ष्मिच्या दोन जुन्या, मॅनेजमेंटशी भांडलेल्या कर्मचार्यांना दरोडेखोर ठरवून व जुना माल चोरीला गेला असं दाखवून नवे करार करायचे असा मामला होता तर एकूण. 'तू याच कंपनिमधे गेलेलास ना?'
'हो रे. पण मी होतो तिथे तरी मला असं काही होतय असं लक्षात आलं नाही. खरच दृष्टीआड सृष्टि.'
प्रभकरने काही थांग लागू दिला नाही. अन्य लोकांना काही सांगून त्याचा काही उपयोग तर नव्हताच.
१ तारखेला नोकरीवर रुजू होऊन अपॉईंटमेंट लेटर हातात आल्यावर मात्र चरक कंपनिच्या अतिथि निवासात दुपारच्या भोजनाच्या वेळी, मनाचा हिय्या करत त्याने गंगूलींच्या टेबलावरचा क्रमांक लावला. पण तो रिसेप्शोंनिस्ट कडे गेला. तिने सांगितलं की गांगुली निवृत्त झालेत, कालच शेवटचा दिवस होता व ते थेट त्यांच्या मूळ गावी, मिदनापूरला जाणार होते आणि काहीही संपर्क सोडलेला नाही.
यामुळे आलेली हताशा लपवत प्रभाकर भोजनालयात गेला. चरकचे सीईओ १ तारखेला ज्या कार्यालयात किंवा कारखान्यात असतील तिथे ते १ तारखेला नवीन कर्मचार्यांबरोबर लंच घेत. आज योगायोगाने ते इथे होते. त्यांच्यासमोर आनंदी दिसणं आवश्यक होतं. जेवता जेवता सीईओ प्रत्येकाशी बोलत होते. प्रभाकरला ते म्हणाले 'माय फ्रेंड गांगुली मस्ट नॉट हाव रेफर्ड यू विदाउट मेरीट. इट्स ऑन यू टू प्रूव हिम करेक्ट.' आणखी एक सुखद धक्का!
नव्या नवलाईचा पहिला दिवस आटपून प्रभाकर संध्याकाळी चरक कंपनीच्या अतिथीगृहात परतला. त्याला इंदोरमध्ये हवा तसा रहिवास मिळेपर्यंत १ महिना इथे रहाता येणार होतं. येऊन त्याने सामान लावायला घेतलं. त्यात त्याला तो १ तारखेला उघडायचा लिफाफा मिळाला. आत एक चिठ्ठी होती.
'आमि तुमारे भालो बेटा. योर टॅलेंट हॅज चेंज्ड योर डेस्टिनि' असं लिहिलेली आणि खाली गांगूली साहेबांची लफ्फेदार सही होती!