शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

साहित्यपरिचय- वावटळ पेराल तर वादळच उगवेल

Buy Vavtal Peral Tar Vadalach Ugavel by Michael Luders - Vavtal Peral Tar  Vadalach Ugavel Marathi Book Buy online at Akshardhara


पुस्तक: वावटळ पेराल तर वादळच उगवेल (मराठी), आवृत्ती पहिली

अनुवादिका: सौ. वैशाली करमरकर 

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

मूळ पुस्तक: wer den Wind sät (German)


मध्य-पूर्वेमधे (middle-east) गेल्या जमान्यापासून धूर धुमसतोय. विस्तवाशिवाय धूर नाही. हा विस्तव का, कसा आणि कोण फुंकतय हे वाचकांच्या मनावर बिंबवणारं आणि मुस्लिमद्वेशाच्या भळभळत्या वैश्विक जखमेवर खपली धरवणारं पुस्तक म्हणजे 'वावटळ पेराल तर वादळच उगवेल'. मध्य-पूर्व असं लिहूनही मराठी वाचकाला हे पुस्तक आपल्या भारतभूमीच्या खरं तर पश्चिमेला किंवा ईशान्येला असलेल्या अरबी देशांबद्दल आहे यात काडिमात्रंही शंका येत नाही. हे पाश्चिमात्यांच्या उर्वरित मानववंशांवर असलेल्या पगड्याचं एक छोटं उदाहरण आहे. हे लेखिकेने लिबिया प्रकरणाची पूर्वपीठिका सांगतांना विस्तृत केलंय. पुस्तक, मूळ जर्मनचा अनुवाद असल्यानं, या पुस्तकातला 'आपण' म्हणजे जर्मन किंवा पाश्चिमात्य व्यक्तीसमुह आहे. हे लक्षात ठेवून पुस्तक वाचावं.

मूळ पुस्तकाचे लेखक श्री. मिशएल ल्युडर्स यांनी सिरिया मधे २ सत्रं उच्च शिक्षण घेतलंय तसंच पत्रकारिता, इस्लाम आणि राज्यशास्त्र यावरच्या अरेबियन साहित्याचा अभ्यासही केलेला आहे. त्यानंतर त्यांनी माहितीपट निर्माता आणि नभोवाणी नाट्यलेखक म्हणून काम केलं आहे. अरबी देशांमधे माध्यमांचा कुटिल हेतूंसाठी शस्त्रं म्हणून दुरुपयोग समजायला आणि समजवायला यापेक्षा मोठा अधिकार काय तो हवा? 


मजकुराची विभागणी देशवार प्रकरणांमध्ये केलेली आहे. यात इराण, अफगाणिस्तान, सिरिया, आयसिस, लिबिया-ट्यूनेशिया-इजिप्त, इस्राएल ही प्रकरणं येतात. या अरबस्तान आणि त्याच्याशी संलग्न भूभागांमधे मानवजातीचे अंकुर फुटले, त्यातून टोळ्या, मग धर्म-पंथ, एकातून दुसर्‍या आणि त्यातून तिसर्‍या धर्माचं अधिष्ठान झालं. मग पंथ विस्तारले. धर्माधिष्ठीत समाज निर्मिती आणि एकाच धर्मग्रंथाचे भिन्न अर्थ लावलेले असल्याने खास करून इस्लामी पंथ कट्टरतेच्या विविध पायर्‍या चढून लागले. त्यातच या प्रदेशात जो खजिना सापडला त्यावर विशिष्टआंतरराष्ट्रीय चाचांची वासना आली. पूर्वी सीमित असणार्‍या या चाचेगिरीने, ढोबळमानाने सन १९०९ नंतर संघटितआंतरराष्ट्रीय चाचेगिरीचं स्वरूप घेतलं. आणि पूर्ण जनजीवनालाच नव्हे तर भूमातेलाही बेचिराख केलं. ही चाचेगिरी सुनियोजित होती का? कोणकोण चाचे आहेत हे? मोडस ओपेरंडी काय होती? आणि १९०९, १९२४, १९४७ ते १९५३, १९६७, १९७९ ते १९८१, २०११ ते २०१४, २०१७ हे इसवीसन या प्रदेशाचा आणि आपल्या विश्वाचा प्रवास बादलायला का कारणीभूत आहेत? हे जाणून घ्यायया हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. या चाचांचं तिथलं आकर्षण संपून आता अन्य प्रदेशाला सावज बनवणं हे फार दूर नाही. त्यांच्या धूर्त चालींमध्ये आपले शासनकर्ते अडकत नाहीत, यावर अंकुश ठेवणं हे आपल्या सर्व देशवासीयांचं कर्तव्य आहे आणि ते डोळ्यात तेल घालून केलं पाहिजे हे जर समजलं तर हे पुस्तक सार्थकी लागलं. तज्ञ लेखकाच्या धारदार लिखाणाला संलग्न रंगीत छायाचित्रं, नकाशे यांची जोड मिळाल्यानं परिणाम गर्दगडद होतो.

अनुवादिका सौ. वैशाली करमरकर या ग्योथं इंस्टीट्यूट या नावाजलेल्या हिंदवि-जर्मन संस्थेत संस्कृतिमिलाप अधिकारी आणि संयोजिका अशा वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या. त्यांचा परकीय भाषा आणि साहित्य याचा दांडगा व्यासंग आहे. जर्मन भाषेवर त्यांची हुकमत आहे, तसंच विविध अनुवाद तंत्रांचाही त्यांनी पद्धहतशीर अभ्यास केलेला आहे. पुस्तक आणि मूळ लेखकाचा परिचय या व्यतिरिक्त त्या मूळ पुस्तकाची प्रस्तावना आणि प्रकाशकांचे आभार ही सादर करतात. इथेच न थांबता प्रत्येक प्रकरणाच्या सुरूवातीला त्या, त्या मसुद्याची पूर्वपीठिका विशद करून, वाचकाचं बोट धरून त्या परिस्थितीत त्याला अलगद नेऊन सोडतात. अनुवाद आणि भाषांतर यातला फरक अशी पुस्तकं वाचली की लक्षात येतो. काही ठिकाणी भारतीय व्यक्ति आंग्लभाषेतून अन्य परकी भाषा शिकते हे जाणवतं, पण विषयावर लक्ष केन्द्रित राहिल्यामुळे ते टोचत नाही.

ज्यू, इस्लाम आणि ख्रिस्ति समाज यांची नाळ काय आणि यांच्यातल्या परस्पर हेव्यादाव्यांचं मूळ कुठे हे या पुस्तकात अधोरेखित होतं. पुस्तकातून अरबी देश, माणसं, भूमी याबद्दलच्या धूसरशा संवेदनांबद्दल स्पष्टता येते. तसंच इस्लामि मानसिकतेच्या जगात एक बुडी मारल्यासारखी होते. इस्लाम आपल्याला वाटतो तेवढा एकसंध नाही आणि ते का हे वाचल्यावर उमगते. दहशतवादविरोधी लढा म्हणजे प्रगत संघटित गुन्हेगारी विरुद्ध प्रगतिशील असंघटित गुन्हेगारी असं स्वरूप येऊ पहातंय वा ते तसंच आहे, या निश्कर्षाप्रत हे पुस्तक आपल्याला पोहोचवते. या, या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.

इस्राएलवर लेखकाचा विशेष रोष जाणवतो. अरबी देशांवर पाश्चिमात्य देशांना हवी तशी लोकशाही न लादता स्थानिकांची परंपरागत सत्ताव्यवस्था टिकू द्यावी असं ठामपणे सुचवणारा लेखक इस्राइल मधे सुस्थापित असलेल्या लोकशाहीला मात्र जाज्वल्य राष्ट्रवादावर बेतलेली एककल्लि दडपशाही म्हणून नापास करतो. म्हणजे लोकशाही असली तर तीही आम्हाला हवी तशी नाही, हा परत तोच पाश्चिमात्य दृष्टिकोन ठरत नाही का? इस्राएल या प्रकरणात थोड्या ढिसाळ संदर्भहाताळणीमुळे लेखकातल्या तज्ञाचा लेखक या जर्मन व्यक्तीशी अंतर्गत वैचारिक कलह जाणवतो. ह्याच विषयांवर त्यांची अन्य पुस्तकंही आहेत. या पुस्तकातल्या विषयाचा आवाका बघता विषय बराच आवरता घेतलाय असं वाटतं, कदाचित हे लेखाकाचं यश म्हणावं लागेल! सर्व वसाहतवादी देशांना लेखक 'आडे हातो' घेत असला तरीही शेवटी युरोपियन देशांना फक्त वागणूक सुधारायची समज मिळते आणि अमेरिकन नेत्यांवर मात्र थेट खटला भरायची मागणी होते. आख्ख्या पुस्तकात जपानचा उल्लेख एकदाच येतो, पण तो अशा ठिकाणी येतो की या सर्व कृष्णकृत्यांमधे जपान पण भागीदार असल्याचा निष्कर्ष आपसूक निघतो, ज्याचा कुठलाही पुरावा पुस्तकात किंवा इतरत्रही नाही. आयसिसला स्वतंत्र प्रकरण बहाल केलंय. विस्ताराने लिहायसाठी हे संयुक्तिक असलं तरी अन्य प्रकरणं विविध राष्ट्रांना वाहिलेली असल्याने, आयसिसला लेखकाने देश म्हणून मान्यता देऊ केल्यासारखं वाटतं. तसं ते नाही असा उल्लेख कुठेतरी असणं आवश्यक आहे. सामान्य वाचकाला या त्रुटि वाटत असल्या तरी त्या अनुषंगाने लेखकाशी संवाद साधल्यास, या विषयावरचा त्यांचा अधिकार आणि चक्षूर्वैईहि सत्यम अनुभव पाहता, याची ठोस आणि पटतील अशी स्पष्टिकरणं मिळतील अशी माला खात्री आहे.

पुस्तकाचं मूखपृष्ठ, आकार, रचना, मांडणी छान आहे. डझनावारी आणि सर्वत्र असलेले मुद्रणदोष सुधारून ताजी आवृत्ती काढणं नितांत आवश्यक आहे. मूळ लिखाण आणि अनुवाद हे परस्पर अनुरूप आहेत. राजहंस सारख्या निष्णात, नावाजलेल्या प्रकाशकांनी मुद्रणही त्या पातळीचं झालंय याची खात्री करायला हवी. आपल्या लेखिकेचीही ओळख करून द्यायला हवी. राजहंसची सेवा तत्पर आहे. अतिशय माफक दरात दर्जेदार साहित्य बेंगळुरूला त्वरित घरपोच उपलब्ध करून त्यांनी सुखद धक्का दिला. जर्मन येणार्‍यांनी या मराठी अनुवादाच्या जोडीला मूळ पुस्तक ही घेतलं तर अधिक सार्थक. त्याची श्राव्य-आवृत्तिही आमेझोन वर माफक किमतीत उपलब्ध आहे. 

आता जागतिक राजकारण कूस बदलतंय. भारत-पाकिस्तान-आखाति देश-इस्राएल ह्यांच्यातल्या संबंधांनी शीर्षासन करू घातलंय. खुद्द आपल्या देशात एकसंध समाजमनाची कमतरता जाणवू लागलीआहे.  तथाकथित बुद्धिजीवींचे कोंब ठिकठिकाणी उगवत आहेत किंवा आयात होत आहेत. अशा वेळी गेल्या ५०-१०० वर्षात कुठे, काय आणि कसं पेरलं जातंय आणि त्यातून कशा विषवल्ली फोफावल्या याचे संदर्भ चटकन सापडायला हे पुस्तक हाताशी हवंच!

WhatsApp order - 9422252208

pankajkshem@gmail.com

ऑनलाईन खरेदीसाठी पुढील दुवा (लिंक) वापरा

http://bit.ly/3c8VnOz


आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...