पुस्तक: कुण्या एकाची धरणगाथा
लेखक: अभिमन्यू सूर्यवंशी
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
प्रथमावृत्ती: २०१२
ग्रंथालय: कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना. बंगळुरु पेटी क्रमांक २९
चळवळ, क्रांति, लढा याबाबत एका जागी बसून लिहिणं हा कितीही विरोधाभास असला तरी लेखणीची पालखी बैठक मारूनच चालवावी लागते!
'कुण्या एकाची धरणगाथा' हे नावच कथानायकाच्या सामान्यतेकडे निर्देश करतं. पण गोपाळ मोरे या त्या एका सामान्य शेतकर्याने जे केलं त्यातून आपल्यातल्या प्रत्येकातल्या एकाने बोध घ्यायला हवा. प्रेरणा घ्यायला हवी. पुस्तक वाचून झाल्यावर मला हे नाव समर्पक वाटलं.
आपल्या परिघात एखादी व्यक्ति अशी असते जिला आपण चिकट म्हणतो. काही म्हणजे काहीही झालं तरी हे लोक आपला मुद्दा सोडत नाहीत. गोपाळ मोरेंची कथा तुम्ही वाचली की मुद्दा धरून ठेवणं म्हणजे काय ते स्वछ कळेल. पण तो मुद्दा मात्र तसा हवा, त्यावर विश्वास ठाम हवा. सनदशील मार्गाने वाट्टेल ते करायची तयारी हवी. सहादू नानाजी हे गोपाळ मोरेंचे हितचिंतक त्यांच्याबद्दल म्हणतात,
"मन निर्मळ शे, हेतु प्रामाणिक शे, फक्त लोकसण भलं कराले निघणा, त्याची प्रार्थना तर परमेश्वरालेभी ऐकनी पडे." (पृष्ठ ५६).
हेच रामदासस्वामींच्या भाषेत, 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे| परंतु तेथे भगवंताचे| अधिष्ठान पाहिजे||'
एक माणूस एक धरण व्हावं या ध्यासाने वीस वर्षं एकाकी लढत राहतो आणि धरण मंजूर झाल्यावरही कित्येक वर्षं त्यावर देखरेख, त्यात जमीन गेलेल्यांना जमिनी, काम मिळवून देणं हे करत राहतो. या काळात ३ पंतप्रधान होऊन गेले. २०-२५ वर्ष हा फक्त भोज्ज्याला शिवल्यासारखा घरी येई आणि परत खेडोपाडी, सरकारदफ्तरी निघून जाई. खरोखर, ज्यांना आयुष्यात काही केलं असं समाधान मिळवायचं असेल त्यांनी हे आणि अशी पुस्तकं वाचून त्यातून शिकावं. सामाजिक लढ्यात लढणारी व्यक्ति एकाकी असते म्हणजे ती एकटी असते एवढा सीमित अर्थ नाही; तर बाकी जवळपास सगळे तिच्या उद्दिष्टांच्या विरोधात असतात. फार ताणून धरलं तर हे सगळे विरोधक सामुहिकपणे विरोध करतात. त्यात शासकीय प्रशासकीय लोक असतील तर ते त्यांचा विरोध कोणत्याही थराला नेऊ शकतात. दुर्लक्ष करणे, खच्चीकरण करणे, परावृत्त करणे, धमकावणे, बदनामी, समाजमन कलुषित करणे, हितचिंतक फोडणे, शारीरिक इजा, अन्य कशात तरी गुंतवणे, तुरुंगात पाठवणे या सगळ्याला लढवय्याने तयार राहायला हवं.
मुळात हे फक्त ११५ पृष्ठांचं पुस्तक अतिशय गुंतवून ठेवणारं, चित्तथरारक आहे. त्यामुळे यातल्या मसुदयाबद्दल अधिक लिहिण्याचा मोह मी टाळतो. गोपाळ मोरेंची कथा मला अधिक जवळून आणि लवकर समजली असं मला वाटतं; कारण तुलनेने छोट्या असेल, पण अशा अनेक सामाजिक उद्दिष्टांसाठी माझ्या आईने ६ ते ८ वर्षं छोटेछोटे लढे दिले. मी त्या लढयांचा केवळ साक्षीदार नाही तर सरकारी कचेर्यांमद्धे तिने केलेल्या अर्जांवर ५० ते २०० नागरिकांच्या स्वाक्षर्या घेण्याचं काम मी प्राथमिक शाळेत असतांनापासून करत होतो. त्यामुळे ७००० सह्या घेत केलेले ५००० अर्ज हे काय आव्हान आहे ते मला चांगलच कळतं. यात गोपाळ मोरेंच्या तोंडची काही वाक्यं लढवय्या माणसाची वैचारिक बैठक दर्शवतात, जी आम्ही १९९०च्या दशकात आमच्या आईच्या तोंडूनही ऐकली आहेत. उदाहरणार्थ, मोरे म्हणतात,
"कुटुंब कबिल्याचं काय घेऊन बसलात. चिमण्या-कावळेही संसार करतात." माझी आई सांगायची,
"पशू-पक्षीही संसार करतात, मानवजन्म मिळालाय तर काहीतरी वेगळं, उदात्त करून दाखवता आलं पाहिजे."
सुशिक्षित असोत वा अर्धशिक्षित, पुरुष असो वा स्त्री! विषय धरण बांधण्यासारखा अवाढव्य असो वा रस्तेदुरुस्तीचा वा चुकीच्या वीजदेयकाचा! किती साम्य असतं लढवय्या लोकांच्या विचारांमध्ये!
गांधीजींच्या विचाराने लढतच राहणार असं गोपाळ मोरे निक्षून सांगत असतांना त्यांचे सहकारी त्यांना समजावत, 'गांधीविचार चांगलेच आहेत. पण कामं होताहेत का त्याने?' हे १९५६ मधले संवाद आहेत. याचं मला नवल वाटलं.
लेखक अभिमन्यु सूर्यवंशी यांनी ओघवतं लिहिलं आहे. गोष्टीत लेखक नं जाणवणं हे भल्याभल्यांना जमत नाही ते त्यांनी करून दाखवलं आहे. या निवृत्त पोलिस अधिकार्याने हा विषय आणून फार मोलाची कामगिरी केली आहे. पंढरपूरच्या द. ता. भोसले यांनी खूप पोटतिडकीने आणि सविस्तर प्रस्तावना दिली आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रस्तावना अतिशय सरस आहे आणि याआधी अशी सविस्तर आणि सरस प्रस्तावना मी वी. स. खांडेकर यांची वाचली आहे. प्रस्तावनेत विषय, लेखक, लेखनशैली, कथानायक, कथेचं साहित्यिक मूल्य, कथेचा गाभा, ही कादंबरी आहे का चरित्रं आहे, गांधीविचार, देश, समाज हे सगळे मुद्दे सांगोपांग आले आहेत. प्रस्तावना जहाल आहे तर कथालेखन त्यामानाने सौम्य आहे. त्यामुळे प्रस्तावनेची मूळ पुस्तकावर थोडी कुरघोडी होते. वाद्यवृंद कितीही तरबेज असला तरी गाण्याच्या मैफिलीत साथ-संगतीच्या मर्यादेतच वाजवावं लागतं हा विचार पटकन डोक्यात येऊन जातो.
हे पुस्तक प्रत्येकाने जरूर जरूर वाचा. तरुणांना, मुलांना वाचायला द्या.