लेखक: प्रवीण दवणे
प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन
वाचनालय: ग्रंथ तुमच्या दारी योजनेतली बंगळुरूमधली पेटी
प्रवीण दवणेंचं 'एकांताचा डोह' मी वाचलं फेब्रुवारी २०२२ च्या सुरूवातीला. मला ते एवढं भावलं की फेब्रुवारीमधेच योगायोगाने ३ दिवस माझ्या घरात आलेल्या २५ पुस्तकांपैकी दवणेंचं 'प्रश्नपर्व' मी लगेच वाचून काढलं. एकांताचा डोह जेवढा वैयक्तिक अंतर्मुख विषय तेवढाच प्रश्नपर्व हा सामाजिक बाहयाङि विषय. त्या पुस्तकाबद्दल मी नंतर सांगेन. आता त्यांचं हाती आलेलं पुस्तक आहे, 'विरामचिन्हे'.
विरामचिन्हे हा १६ कथांचा संच आहे. या कथा १२०० ते १८०० शब्दांमधे बद्ध आहेत. म्हणजे प्रत्येकी ५ ते ७ पृष्ठ. ही लांबी लघुकथा प्रकाराला साजेशी आणि आजच्या वाचकाला झेपेल, सलग वाचायला जमेल अशी आहे. अगदी मुंबईच्या लोकलमधुन रोज येरझार्या घालतांनाही प्रत्येक फेरीत १-२ कथा वाचून होऊ शकतात... जागा मिळाली आणि जागे राहिलो तर. किंवा... किंवा मुंबईकराला उभ्या-उभ्याही जमेल! मला या कथा आणि पुस्तक एकदम सुटसुटीत वाटलं.
विरामचिन्हे नावाच्या कथेने श्रीगणेशा होतो. साहित्यक्षेत्रातलं पात्र यात असलं तरी प्रत्यक्ष चिन्हांवरची ही कथा नाही. लेखिका म्हणून स्वतःलासुद्धा ओळखत नसतांना प्रेमळ नवर्याच्या उदंड प्रोत्साहनामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेली लेखिका. शिखरावर पोहोचल्यावर नवरा दुर्लक्ष करतोय असं वाटल्यामुळे तिच्या मनातल्या रिक्ततेची आणि प्रश्नचिन्हांची ही कथा! गृहस्थाश्रमात यश, सुख नक्की कशात? कुटुंबवेल का व्यावसायिक यश? आणि चुकलेल्या निर्णयाची जाणीव कधी, काशी होते? ही वाचल्यानंतरची प्रश्नचिन्हं.
सर्पबंध कथेतही नसलेलं बाळ आहे. पण विषय पूर्ण वेगळा. मांडणी वेगळी. साप पाळणं ही म्हण तुम्हाला माहिती आहेच. एक मातृत्वासाठी आसुसलेलं हृदय काय करू शकतं ते वाचाच आणि काय उद्गार निघतो ते सांगा. वाचतांना सरळ साधी वाटणारी कथा मेंदूवर परत शेकली की तिचे वेगळेच पदर सुटतात.
एखाद्या झाडाच्या नशिबात कायम शिशिरच येतो का? आणि सगळ्या झाडांचा वसंत एकदमच येतो का? असे प्रश्न विचारात 'सातवा ऋतु' ही कथा आपल्याला त्या ऋतुकडे घेऊन जाते. या कथेतही तसं एक नसलेलं बाळ आहे. पण त्यापेक्षा ही कथा बाळानंतर झालेल्या लग्नाची आहे आणि तरीही खरा धक्का त्या लग्नानंतरच आहे.
ऑक्टोपस कथेतला तो प्राणी जलचर नाही. तो मानवी समजातलाच आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक आहेत. जगात दोनच प्रकारची माणसं असतात असं म्हंटलं जातं. शोषक आणि शोषित. त्यालाच आपण वापरून घेणारा आणि वापरला जाणारा असंही म्हणू शकतो. हे वर्ग ओळखून आपण कुठे आहोत त्याची जाणीव असावी. ते सत्य मान्य करून वाटचाल केली तर आनंद, नाहीतर दुःख. म्हणून जाणीव झाली आणि ती दुःखप्रद वाटली तर आपला प्रकार बदलून घ्यावा!
'पत्र' कथा वाचून अनेकांना अशी पत्रं आपल्यालाही यावीत असं वाटेल. कोण शेजारिण हे करू शकेल त्या कल्पनांचे इमलेही चढू शकतील. वाचावी आणि कल्पनाविलासात रमावं अशी ही कथा.
अत्तर ही कथाही अशीच. 'तुमच्या सगळ्या कथा मी वाचते.' असं म्हणणारी एक सुंदर चहाती! हेच मुळात स्वप्नवत. पण यावरून दवणेंच्या कथेच्या शेवटाचा अंदाज करू नका.
'पत्रिका' ही कथा मात्र पठडीतली. आत्ता वाचक असणार्या पिढीला या कथेत काहीही नावीन्य वाटणार नाही. मात्र आधीच्या कथांमध्ये दवणेंनी उभी केलेली विरामचिन्हं आपल्याला ही कथा शेवटपर्यंत वाचायला लावतात. आणि तरीही अपेक्षाभंगाचं चिन्ह उमटतं.
दोन व्यक्तींचं सामाजिक, व्यावसायिक नातं काहीही असो, समाज त्यांच्याकडे स्त्री-पुरुष म्हणून पहाणं सोडत नाही.. का त्यांच्याही मनात खोल कुठेतरी त्या सामाजिक नात्यातल्या भावनेपलीकडे प्रेमाचं, मालकीचं नातंही तयार होतं? तुम्ही कुठलं विरामचिन्ह वापरणार या प्रश्नावर? उत्तरादाखल प्रश्नचिन्हच का उत्तर.. का, 'यात काय विशेष'.. का, 'हं विचार करायला लावणारा प्रश्न आहे'.. का, 'खराय तुमचं म्हणणार'.. 'झोका' कथा वाचून मग सांगा.
गरोदर बाईच्या मनात अशुभ कल्पनांचं काहूर माजलं तर गर्भावर त्याचा परिणाम होतो? का, निष्पाप मुक्या जीवाशी अमानवी वागलं तर देव शिक्षा देतो? विचारा किंवा ठरवा 'अनुबंध' ही कथा वाचून.
सकारात्मकता म्हणजे काय ते कळून घ्यायचं असेल तर 'समजूत' कथा वाचावी. मानवी मन किती मोठं असू शकतं आणि आपण कसले समजूतींचे जोखड घेऊन जगत रहातो.
'शिरगोपीकर' कथा वाचून तर लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी चाळवल्या. शाळेला जाता-येतांना जळगावला.. नाहीतर.. कोथरूड-पिंपरी अप-डाउन करतांना.. नसेलच तर मग कुठे? कुठेतरी हे शिरगोपिकर माझ्याही आजूबाजूला होते पण मला समजलेच नाहीत असं आता त्यांची ही कथा वाचून मला राहून राहून वाटतंय.
'रातराणी' ही कथा 'झोका' च्या विरुद्ध म्हंटली तरी चालेल. स्त्री-पुरुष म्हणून जवळ आलेल्या दोन्हीही व्यक्ति केवळ त्या शारीरिक नात्यासाठीच आसुसलेल्या असतात का अन्य काही अपेक्षा, तहान असते ज्याच्या जोडीने शारीरिक भूकही भागवली जात असते? आणि शारीरिक सुखासाठीच जोडीदाराला आपण हवे आहोत असं गृहीत धरलं आणि नंतर कधीतरी सत्य समजलं तर? 'रातराणी' वाचा तुम्हाला काय वाटतं मला सांगा.
एखादं माणूस किंवा घर आपलं नाही आणि जे आपलं नाही ते आवडत असलं तरी सोडावं लागणार आहे याची जाणीव मुलांना नक्की कोणत्या वयात होत असावी? का त्यांना अशी जाणीव कशी असणार या अजाणतेपणात मोठे असतात? पाण्यात भलेही अन्य कशातून मिळणारी सत्व वगैरे नसतील पण तहानलेल्याला पाणीच लागतं. तसंच स्पर्शाला आसुसलेल्याला एका मिठीत सगळं मिळतं. रूप, बुद्धी, रीतिरिवाज गेले तेल लावत. कसे ते वाचा 'अनाथ स्पर्श' मध्ये. पण यातलं शेवटचं वाक्य आजच्या पोक्त पिढीच्या मनात गोळा आणेल हे नक्की.
'राधाने माला जपी' ही कथा ढोबळमानाने 'सातवा ऋतू' च्या उलट म्हणता येईल. मूल होण्यासाठी आसुसलेली स्त्री आणि कोरडाठक्क पुरुषी अहंकार. ना नवं मूल जन्माला घालता येत, ना आहे ती अर्धांगींनी सांभाळता येत. शेवटपर्यंत परिणाम गडद करत जाणारी कथा. हृदयद्रावक.
आताशा काळ बदलला आहे. आता काडीमोड वगैरेही मागे पडून 'लिव-ईन' चे दिवस आहेत. पण पूर्वी ७ जन्माच्या जोडीदाराशी लग्न व्हायचं आणि मग शेंडी तुटो की पारंबी, तो जोखड खांद्यावर घेऊनच जगावं लागायचं. त्या जोखडाचे श्वास संपले की जोडीदाराला मोकळा श्वास घेता येणार! म्हणजे एकाचा श्वास मोकळा आणि दुसर्याचा मोकळा श्वास. अस्वस्थ करणारी कथा, 'एक श्वास, पूर्ण मोकळा'.
शाळेत असतांना आपण कायम पहिल्या तीन क्रमांकात येणारी मुलं पहातो. सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यातले हुकुमाचे एक्के सर्वत्र असतात. त्यांचं खाजगी आयुष्य? ते कसं असतं किंवा ते उंच भरारी घेणार हे आपलं गृहितक खरं ठरतं का? वाचा 'परितोषिक' या कथेत.
मुंबई शहर माहिती करून घ्यायचं तर मुंबईत राहिलेल्या माणसाच्या कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घ्यावा. विषय काहीही असो. त्यात मुंबई तुडुंब असेल. या सर्व कथांमध्ये मुंबईची लोकल, चाळ, बार, गिरणी, गर्दी, एकाकीपणा, धावपळ, वेदना, संवेदना, दृष्टीआडची सृष्टी, वागण्यातला तुटकपणा सगळं आहे. साहित्य-कला क्षेत्रही आहे. तरीही प्रत्येक कथा वेगळी आहे.
जोडीदाराच्या विरहात पण आपत्याबरोबर रहाणार्या स्त्रीचं शेजर्यावर जडलेलं प्रेम, पत्रिका पाहून लग्न केल्यावरचा न जमलेला संसार, जोडीदाराच्या वचकाखाली अनेक वर्ष सोसलेला संसार, चाहत्याचं साहित्यिकावरचं नितळ प्रेम, तशाच चहात्याचं संपूर्ण समर्पित प्रेम, कधीच न झालेलं मूल, होऊ नं दिलेलं मूल, खूप उशिरा झालेलं मूल, वेळेवर झालेली मुलं असतांना जोडीदार गेल्यावर दुसरं लग्नं करून आजोबाच्या वयात आणखी एक मूल, स्वतःचं मूल होईपर्यंत सांभाळलेलं वेगळंच पिल्लू, गर्भपात करावं लागलेलं मूल, अनाथ मूल, अनाथ ज्येष्ठ आणि आपल्यातल्या तृटीमुळे मूल होऊ शकत नाही हे कळल्यावर परक्याचं मूल सांभाळून त्या मुलाला-त्याच्या बापाला-आपल्या बायकोला सगळी सुखं मिळवून देत स्वतःही आनंदाने जगणारा सकारात्मक माणूस, संसार सफल झाल्यावर इतरांना आनंदी करत रोज प्रवास करणारा आणखी एक सकारात्मक माणूस.... अशी सगळी पात्रं, कल्पना यात मांडलेल्या आहेत. त्यांना वाचून आनंद, कीव, मत्सर, आश्चर्य, दुःख, हेवा, तिरस्कार, गांभीर्य, धक्का, आदर ह्या भावनांची विरामचिन्हं वाचकाने भरायची आणि आपणच समृद्ध व्हायचं.