शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

वांझोटी शिफारस

 


"या, या, कविराज" मुख्यमंत्री अर्जुनराव नेहेमीप्रमाणे दोन्ही हात जोडून प्रसन्न हसत उभे राहिले.


दर महिन्याच्या चवथ्या बुधवारी ते कला, क्रीडा आणि साहित्य मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेत असत आणि या क्षेत्रातल्या नावाजलेल्या हस्त्यांना भेटीसाठीही वेळ देत. गणपतरावांनी तरुणपणी लिहिलेले कवितासंग्रह बरेच गाजले होते.

'संघर्षाची घेऊन मशाल अर्जुनाची सेना गर्जली

मशाल ठेऊन सत्ता घ्यावी लोकभावना जागली '

या त्यांच्या काव्याने एका आंदोलकाला राजकारणात आणलं असं बरेच लोक मानत आणि आज तीन दशकांनंतर तेव्हाचा तो मुख्यमंत्री अर्जुनराव आपल्या सरकारी निवासस्थानी  त्यांचं स्वागत करत होते. फुलांचा गुच्छ, शाल वगैरे देवाण घेवाण झाली. आवश्यक तेव्हढा शांत क्षण गेल्यावर गणपतरावांनी त्याच्याजवळची फाइल टेबलावर ठेवत प्रस्तावना सुरू केली,

"आज मी दोन विनंत्या घेऊन आलोय. पहिलं महत्वाचं 'सोलापूर साहित्य समुदाय' तर्फे ...." 

"गर्जा सोलापूर काव्य सम्मेलनाबद्दल मलाही बोलायचं आहेच.." मुख्यमंत्री गालात हसत म्हणाले तसे गपतराव चपापले.

सम्मेलन घाटतय याची वार्ता पोहोचली म्हणजे आमंत्रणाबरोबरच आपण स्थानिक प्रशासनाकडून मैदान वापराची परवानगी मिळवून घ्यायला आलोय हे ही कळलं की काय महोदयांना!

".. तुम्ही आधी सांगा की चार वर्षांपासून तुमची लेखणी बोथट झाली आहे, ती का?" त्यांच्या टेबलपालीकडल्या छोट्या फडताळातून डोकावणार्या 'निसर्गाचा पडघम वाजतो' ह्या कविवर्यांच्या शेवटच्या प्रकाशनाकडे बोट दाखवत माननीय म्हणाले. अर्जुनराव भेटीची पूर्वतयारी जय्यत करत असत म्हणून तो संग्रह सरकारी निवासस्थानी आला होता ह्याचं गणपतरावांना सहज आकलन झालं.

"खरं सांगू का, हल्ली फार सुचत नाही लिहायला. भाराभर कविता तयार आहेत. पण रसिकांच्या आत्तापर्यंतच्या अभिप्रायवरून, संग्रह करायचा तर त्यात एक समान धागा हवा, या मताचा मी झालोय. म्हणून नाही जमलं"

"तुम्ही आत्मपरिक्षण केलंत आणि प्रांजळपणे कबूलही केलंत. तुम्ही आता प्रकाशनाच्या गतिपेक्षा आशयगर्भतेवर लक्ष द्याल याचा मलाही आनंद आहे. बर.. आता ही कसली पत्रं आणली आहात फाइलमध्ये घालून?"

बोलता बोलता आपल्या हाताखालची फाइल अर्जुनरावांनी घेऊन उघडून पानं सुद्धा उलटून पाहिली तरी कधी!...

"अ, अं.. ते, ते ना. हो, ते दुसरं काम. हे सगळे माझे एकनिष्ठ वाचक आहेत. वर्षंनुवर्षांपासून. मला अगदी देव मानलाय ज्यांनी, सरकार दरबारी छोट्या मागण्या केल्यात त्यांनी..."

"बहोत खुब. त्यातही काव्य!..."म्हणत अर्जुनराव परत पहिल्या पानावर आले. 

"अर्जुनराव, आणि तो पहिला कागद आमंत्रणाचा आहे.. तुम्ही आषाढीला पंढरपूरला जाणार आहातच, परतीच्या प्रवासात रस्त्यात थांबून उद्घाटन करून आशीर्वाद .. "

"गणपतराव, तुमचं आमंत्रण मी मान्य करणार नाही, असं होईल का? फक्त सध्या करोनाचं सावट असल्यामुळे गर्दी जमा करण्याचा वेडेपणा आम्ही तुम्हाला खचितच करू देणार नाही. तुम्ही सम्मेलन पुढे ढकला, पुढच्या योग्य तारखा मी स्वतः सुचवेन आणि आमचे कार्यकर्ते सगळी व्यवस्था सांभाळतील. नाहीच तर आणि आता तारखा बदलणं शक्य नसेल तर, ऑनलाइन ठेवा. मी पूजा करून मंदिराच्या प्रांगणातूनच आभासी उद्घाटन करेन आणि मग निघेन, हो म्हणजे पांडुरंगाचेही आशिर्वाद मिळतील! फक्त तुमच्या शब्दाखातर हं. तुमच्या संयोजकांशी बोलून माझ्या सचिवांना कोणता पर्याय निवडला ते एका आठवड्यात कळवा."

समोर मुख्यमंत्री आहेत याची खणखणीत जाणीव ज्येष्ठ कवींना झाली. ते खट्टू झाले. घटिका आणि मनातले विचार यांची स्पर्धा लागत होती दोघेही क्रमाक्रमाने निघून जात होते. आपण आत्ता काही युक्तिवाद तर उपयोगही नाही आणि वावगा शब्द निघू शकतो हे समजण्याएव्हडे उन्हाळे त्यांनी पाहिले होते.

"ठीक आहे, मी कळवतो. आभारी आहे. येतो आता." नमस्कार करून गणपतराव उठून मागे वळाले तोच टेबलापलीकडून उठून खांदा धरत नेत्यांनी त्यांना बसतं केलं.

"जिभेवरचा विषय सोडून दिला तरी सूचिवरचे अन्य विषय आहेत की मित्रवर्य. शब्दांनी होऊ शकणारा अवमान टाळलात आणि निघून तुम्हाला दिलेल्या वेळेतली काही मिनिटं बाकी असतांना निघून गेलात तरी, तो ही, पदाचा अवमान होईल. काय, खरंय ना?"

हे वाक्य संपेपर्यंत अर्जुनरावांच्या हातातून पाण्याचा पेला सफाईने गणपतरावांच्या हातात आला होता आणि घोटागणिक कविराज मंत्रीमहोदयांच्या संभाषणचातुर्याला मनोमन दाद होते.

"बोला आता." 

"मी म्हणत होतो की ते माझे निस्सीम चहाते आहेत. तुम्ही आधीच्या भेटीत मला म्हणाला होतात की काही मागून तर बघा.. म्हणून मी त्यांचा तगादा इथपर्यंत आणला. एकाची जमिन स्थानिक गुंडांनी बाळकवली आहे. दुसर्‍या एकाला कसल्या व्यवसायाचा परवाना हवा आहे तर तिसर्‍या एकाचं चार वर्षांपूर्वीचं चुकीचं निलंबन रद्द झालं नाही तर कुटुंबं आर्थिक संकटात होरपळून निघणार आहे. असे आठजण. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे."

"शिफारसी असाव्यात तर अशा आणि अशा समयोचितही. यासाठी सामान्य व्यक्ति आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे जात नाही तोपर्यंत आमचं नेतृत्व फसलं असं आम्ही मानतो. मला तुमचं कौतुक आहे." या शब्दांनी कविवर्यांचं सांत्वन झालं.

मंत्रिमहोदय उठले. काव्यसंग्रहाच्या मागची एक फाइल काढून टेबलावर ठेवली.

"गणपतराव तुमच्या आठही चाहत्यांच्या शिफरसींवर मी अधिकार्यांना योग्य ती कार्यवाही करायला सांगतो. मी यात वैयक्तिक लक्ष घालेन. तुम्ही ग्वाही दिलेल्या त्यांच्या सच्चेपणाची कसोटी लागेल आणि त्यात ते उतरले तर मी पांडुरंगासमोर नतमस्तक होण्याच्या आधी त्यांच्या चिंतेची चीता झालेली असेल हा माझा शब्द आहे." अर्जुनराव शब्दाचे पक्के होते. आता गणपतरावांना  हायसं वाटलं.

"काळवेळेचं तुमचं भान खरंच वाखणण्यासारखं आहे यात अवघ्या महाराष्ट्राला शंकाच नाही अर्जुनराव! धन्यवाद."      

"हं!.." असा उसासा टाकून अर्जुनरावांनी चिरपरिचित दीर्घ विराम घेतला. ही वादळाआधीची शांतता ठरली.

"हा विश्वास नक्की आहे तुम्हाला? अगदी पक्का?"

"हो हो, म्हणजे काय. असं का विचारता?"

"मग मला मनावर दगड ठेवून आणखी एक काम केलंच पाहिजे."

"काम? कसलं?"

"ही फाईल तुम्ही घेऊन जा."

गणपतरावांनी उघडून पाहिलं तसा त्यांना धक्का बसला.

"फार उमदा आणि हरहुन्नरी आहे तुमचा श्रीकांत. तुमच्याबद्दल बाप म्हणून त्याला यथोचित आदर आहे. त्याला माझा निरोप सांगा, म्हणावं की, 'तुझ्या, मला ज्ञानपिठ देण्याच्या शिफारसीपेक्षा माझ्या चाहत्यांचं आयुष्य पणाला लागलेल्या कामांचं महत्व जास्त आहे' असं मी मुख्यमंत्रांना सांगितलं आणि तू संकलित केलेली ही फाइल परत मागून आणली... आणि गणपतराव, अहो रसिकपीठाच्या देव्हार्यात स्थान मिळवल्यावर तुम्हाला ज्ञानपीठ न मिळाल्याची सल आहे ह्याचं मला नवल वाटतं. हे म्हणजे देवाने देवत्वाचं प्रमाणपत्र मागण्यासारखं आहे. तसंही ज्ञानपीठसाठी यावेळेला विरोधी पक्षाची शिफारस पुढे पाठवावी लागणार आहे. होs, म्हणजे त्याबदल्यात एशियाडचं संयोजकपद आमच्या कार्यकर्त्याला मिळणार आहे."

कवीमन पार गोंधळून गेलं होतं. 

"...आणि त्याला माझ्या शुभेच्छाही द्या. म्हणावं अर्जुनरावांच्या फार अपेक्षा आहेत तुझ्याकडून."

गणपतराव सावरून तोंड उघडेपर्यंत  मुख्यमंत्र्यांनी घंटी वाजवली.

"काटा थांबत नाहीये गणपतराव. पुढच्या व्यक्तिला ताटकळत उभं राहायला नको. या आपण आता."

मुख्यमंत्री अर्जुनराव नेहेमीप्रमाणे दोन्ही हात जोडून प्रसन्न हसत उभे राहिले. यानंतर समोरची व्यक्ति बोलू शकत नसे. गणपतराव दालनातून बाहेर आले.

 शेवटी दिवट्या चिरंजीवांनी नाक कापलंच. काय गरज होती मला नं सांगता माझी शिफारस करायची? कदाचित त्या बदल्यात अर्जुनरावांनी मागितलेला मोबदला याला देता आला नसावा.. आणि अर्जुनरावांनी तरी ते माझ्याकडे उघड का करावं? सगळे नुसते व्यापारी झालेत, ज्यात त्यात सौदा. मी ज्ञानपिठचा हक्कदार आहेच, कोण नाही म्हणू शकतो, अर्जुनराव? ज्यांना माझ्या काव्याने मुख्यमंत्री बनवलं ते? श्रीकांत खरं तर विरोधी पक्षाचा पाठीराखा. अर्जुनरावांवरच्या प्रेमापोटी मी याला महतप्रयासाने त्यांच्या कंपुत नेला. नाहीतर आपल्या धारदार पत्रकारितेने त्याने असे काही वार केले असते की मुख्यमंत्रीपद तर सोडाच विरोधी पक्षनेता बनायसाठीसुद्धा निवडून येता आलं नसतं. आणि आता हे दोघं माझ्या अपरोक्ष काहीतरी घाटतात आणि मधल्यामधे माझं ज्ञानपीठ दावणीला लागतं? गपपतरावांच्या मनात विचारांचा कल्लोळ उडाला.

 यथावकाश सगळी हकीकत श्रीकांतला सांगितल्यावरच त्यांचं मन शांत झालं. तरुण श्रीकांतचं तर रक्तच खवळलं. त्याच्या मंनःचक्षुंसमोर करोनाच्या आधीचा त्या पत्रकारपरिषदेनंतरचा अर्जुनरवानशी झालेल्या भेटीचा प्रसंग उभा राहिला.

"काय म्हणताहेत ज्येष्ठ कवींचे श्रेष्ठ पत्रकार सुपुत्र?" अर्जुनरावांनी नेहेमीप्रमाणे दोन्ही हात जोडून प्रसन्न हसत विचारलं होतं.

"कवींचे सुपुत्र नाहीत, तुमचा पगारी पत्रकार आलाय" दोन्ही हात जोडून खवचट हसत  श्रीकांत म्हणाला होता. वैचारिक मतभेदांमुळे अशा फैरी झडत असत.

"असाल, असाल, पण या कामाचं रुजूपत्र तीर्थरूपांनी दिलं म्हणून गवसलात आम्हाला. काय खरंय ना? तुम्ही वैयक्तिक टीका न करता फक्त मुद्दयाची चीरफाड करता, हे मला विशेष भावतं. पण आमच्या कामात फार साखर घोळून लिहिता तुम्ही.."

"कारलं साखरेत घोळलं नाही तर कडू लागेल तुमच्या जनतेला"

"इथेच आपला अनुभव कमी पडतोय गणपतपुत्र. नेता व्हायची इच्छा असेल तर स्पष्ट सांगा. तसं नसेल तर हे समजून घ्या की जानतेचं हवं नको बघायला आम्ही आहोत. तुम्हाला तुमचं हे शुल्क आमच्याकडली कारलीही गोड असतात असं जनतेला पटवायसाठी नाही, तर  आमच्या पोळ्यामधला शुद्ध मध जनतेत वाटायसाठी आहे." संभाषणात असं सम्मोहन होतं की तेवढ्या कालावधीत अर्जुनरावांकडून धनादेश घेऊन आपण पोचही दिली ते अर्जुनराव बोलायचे थांबल्यावरच श्रीकांतला जाणवलं.


"ठीक आहे साहेब, तुम्हाला हवं तसं होईल. तुम्ही शुल्क बातमी करण्याचं देता. आम्हाला ती आधी शोधावीही लागते. माझंही एक काम आहे आणि ते ही असं की तुम्ही नाही म्हणू शकणार नाही"

"हं" उसासा टाकून अर्जुनरावांनी काही क्षण श्रीकान्तवर नजर खिळवली आणि आणि नजरेनेच बोलायाची खूण केली.

"महोदय" बरोबर आणलेली फाइल मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करत श्रीकांत म्हणाला, "आपले जिवाभावाचे मित्र, माझे तीर्थरूप आणि महाराष्ट्राच्या साहित्यजगाचे आलिकडले जणू मुख्यमंत्रीच अशा, काव्यसम्राट गपपतरावांच्या मनात एक सल आहे. खूप वर्षांपासून." अर्जुनराव एकाग्रतेने ऐकताहेत याची खात्री करून आणि परिणामकारक होईल एवढा विराम घेऊन श्रीकांत पुढे म्हणाला, "त्यांना ज्ञानपीठ मिळालं नाही याची.." 

"पुरे पुरे श्रीकांतराव. हा हा हा. अहो तुमच्यासारख्या व्यवहारी माणसाचं काम परतवलं तर काय परिणाम होतील हे समजण्याइतपत आम्ही धूर्त आहोत . ठेवा फाइल." परत नजरानजर झाली आणि अर्जुनरावांनी प्रसन्न हसत दोन्ही हात जोडले होते.

आठवून श्रीकांत चांगलाच चरफडला. 'काम करेन असा शब्द घ्यायला विसरलो आपण. व्यवहारी माणसाचं काम केलं नाही तर काय होतं ते दाखवतोच आता! ६ महीने उरले आहेत निवडणुकींना. तेवढे पुरेसे आहेत अर्जुनरावला अस्मान दाखवायला' दोन तीन आठवड्यात त्याचा, स्थानिक नगरपालिका राजकारण जाणून घेण्यासाठी, राज्यव्यापी दौरा होता. ही आयती नामी संधि होती. तो आता झटून तयारीला लागला. गणपतरावांना त्याने त्याचा मनसुबा सांगितला. त्यांनी थेट अनुमोदन टाळलं पण यावेळी त्यांनी अर्जुनरावांची बाजू घेऊन त्याला अडवलंही नाही.

 पुढच्याच शुक्रवारी धुळ्यातल्या कोव्हिडबाबत प्रशासकीय अनागोंदीचा पर्दाफाश झाला. मग नाशिक. त्यानंतरच्या शुक्रवारी जळगावमधलं मृतांच्या आकड्यातल्या तफावतीचं प्रकरण आलं. मग नागपूरमधलं बनावट डॉक्टर प्रकरण. गडचिरोली, चंद्रपुर मधली प्रशासनाची अनुपस्थिती. एकामागून एक प्रकरणं बाहेर येऊ लागली.  इतर पत्रकार, बातमीदार श्रीकांतच्या पाठोपाठ त्या ठिकाणी पोहोचत आणि माध्यमांमधून असंतोषाचा एकच भडका उडत होता. श्रीकांतला क्षणभरही वेळ नव्हता. आपण दिलेली बातमी किंवा तपशील संपादकांनी छापला की नाही याची शहानिशाही तो करत नव्हता.

 खांदेश आणि विदर्भ तीन आठवड्यात पिंजून काढून श्रीकांत आता थेट कोकण गाठणार होता. इकडे त्याच्या घरी म्हणजेसोलापूरला गणपतरावांकडे, एक दिवस एका नवविवाहित जोडप्याला घेऊन प्रकाश आला. जवळचे नातलग, ठराविक साहित्यिक आणि राजकरणी याव्यतिरिक्त कोणाला गणपतरावअसं आयत्या वेळी भेटत नसत. पण प्रकाशसारख्या निस्सीम चहात्यांची बात वेगळी. ते भक्त आणि भगवंताचं नातं होतं. 'इथे नसतात तर इथून जिथे तुम्ही आहात असं कळेल तिकडे वाट मोडली असती' असं प्रकाश कायम म्हणत असे. आत्ता समक्ष भेट झाल्या झाल्या त्याने त्या जोडप्याला गणपतरावांच्या पायावर घातलं आणि मग तो स्वतःही नतमस्तक झाला. त्या नवपरिणीतांचे मनोबंध सोशल मीडिया वरुन जुळले आणि घरच्यांच्या होकाराने लग्नगाठ बांधली गेली. पण तो नवविवाहित नवरामुलगा परभणीचा होता आणि नववधू महाडची. दोघेही सरकारी नोकर. म्हणून वराचा जिगरी यार प्रकाशने त्यांची कैफियत गणपतरावांपुढे मांडली. 'तुला भूखंड हवा असेल तरी सांग, तुझ्यासारख्या दर्दी चहात्याला एका फोनवर मिळवून देईन' असं गणपतराव प्रकाशाला अनेकदा गमतीत म्हणाले होते. त्या भक्ताने मित्राच्या वधूची बदली परभणीला करायचं साकडं गणपतरावांकरवी थेट मुख्यमंत्र्यांना घातलं आणि स्वतःच्या भक्तिचं फळ मित्राला मिळवून दिलं होतं. त्या जोडप्याने कुठून कुठून गोळा करून गणपतराव आणि त्यांच्या सौभाग्यवतींची त्यांच्या लग्नाच्या आधीपासून ते अगदी अलीकडेपर्यंतची छायाचित्रं कोलाज बनवून त्यांना भेट दिली. एकंदर भेट अतिशय हृदयस्पर्शी झाली. गणपतरावांनी केलेल्या अन्य शिफारसीही मार्गस्थ झाल्याचं ते ते लाभार्थी त्यांना कळवत होते. कविवर्य भावविभोर झाले. त्यांनी अर्जुनरावांचे मनोमन आणि ईमेल करून आभार मानले.

 एका सकाळी दैनिक वर्तमानपत्र वाचतांना मुख्य पानावरच्या दोन परस्परविरोधी बातम्यांनी त्यांचं लक्ष वेधलं. श्रीकांतची 'सांगलीमध्ये शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था' ही बातमी प्रमुख होती. त्याखाली सातार्‍यात ५ दिवसांमध्ये अस्थायी जंबो कोव्हिड रुग्णालय उभरल्याची बातमी होती. एका आठवड्यापूर्वीच श्रीकांतने या परिसराच्या वैद्यकीय समस्येबद्दल बातमी दिली होती. आणि इतक्या गतीने त्या समस्येचं निराकरण झालं होतं. सांगलीची बातमी आल्यापासून २ दिवसांनधे एका वृत्तवाहिनीवर त्याचं खंडन आलं. श्रीकांतने जिथली छायाचित्रं काढली तिथे नुतांनीकरणाचं काम चालू होतं. रुग्णांची व्यवस्था अन्यत्र केलेली होती. कोव्हिड संचारबंदीमुळे स्थानिक पत्रकार, नोकरशहांशी होऊ शकत नसलेला संपर्क आणि अर्जुनरावांना अस्मान दाखवायची घाई यामुळे पूर्ण शहानिशा न करताच श्रीकांतकडून काही बातम्या येत होत्या. आणि संपादकही हपापल्यासारखे छापत चालले होते. श्रीकांत दौर्यावर गेल्यपासूनची सगळी वर्तमानपत्र गणपतरावांनी चाळली. श्रीकांतने आणि त्याच्या कंपुतल्या लोकांनी प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक शासकीय-प्रशासकीय तृटीवर एका आठवड्याच्या आत एकतर कार्यवाही किंवा खंडन अथवा जनतेला मदतीचं आवाहन यातलं काहीतरी सरकारकडून झालंच होतं. अलीकडे तर यांच्या बातमीत त्रुटि असेल तर जनताच सोशल मेडियावर त्वरित त्या बातमीचं खंडन करू लागली होती!

 हा हा म्हणता निवडणुका लागल्या. श्रीकांत आणि चमूने जिवाचं रान केलं. तरीही अर्जुनरावांच्या नेतृत्वात त्यांचा पक्ष आधीपेक्षा जास्त जागा जिंकून सत्तेत आला. श्रीकांतसह सगळ्यांनाच धक्का देत अर्जुनरावांनी आपल्या तरुण सहकार्याला मुख्यमंत्री म्हणून नेमलं. त्यांच्या पक्षाने त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि विविध केंद्र सरकारी समित्यांमध्ये त्यांना जबाबदर्या दिल्या.

 इकडे श्रीकांतचा निश्चय अधिक दृढ झाला. त्यानेही आपलं कार्यक्षेत्र विस्तारून मोहीम अखिल भारतीय केली. आता कोव्हिड हा भूतकाळ झाला होता. कालानुरूप नव्या आणि आधीच्या समस्या श्रीकांतसाठी उपलब्ध होत्याच. दरम्यानच्या काळात त्याने एकदा शिताफीने पुरातून ५०-६० गुरढोरांचे प्राण वाचवले तर एकदा अपघातात जबर जखमी झालेल्या ४-६ लोकांना झटपट वैद्यकीय मदत मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचवले. अशीच २-३ वर्ष निघून गेली. अर्जुनरावांचा तळ दिल्लीत असल्याने गणपतरावांची त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट आता होत नव्हती. ..आणि २०२५ च्या जानेवारीमध्ये  गणपतरावांना एक सुखद धक्का बसला. श्रीकांतला कोव्हिड आणि त्यानंतर जीव धोक्यात घालून पत्रकरीतेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्यासाठी चक्क पद्मपुरस्कार देण्यात आला होता!

 गणपतराव आणि श्रीकांत त्यांच्या घरात लावलेल्या, दोन्ही हात जोडून प्रसन्न चेहेर्‍याने उभ्या असलेल्या अर्जुनरावांच्या तस्वीरीकडे पहात होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर प्रसंगांची आणि अर्जुनरावांच्या वक्तव्यांची मालिका उभी राहिली. श्रीकांतकडून खर्या बातम्या करण्याचं वचन त्यांनी त्याच्याशी झालेल्या भेटीत घेतलं तसंच व्यक्तीगत टीका न करणं हा गुण असल्याचं सांगून तो त्या मार्गाला लागू नये अशी तजवीज केली. श्रीकांतचा ज्ञानपिठाचा प्रस्ताव तोंडावर परतवून लावता आला असता, पण त्याची पुरेशी धग त्याला लागली नसती. फार तर त्याने व्यवहार नाकारला असता. त्याने दिलेला प्रस्ताव गणपतरावांकडे उघड करून परत केल्यामुळे त्याच्या मनात वणवा पेटला. बातमी शोधायची श्रीकांतची आस त्याच्या बोलण्यातून त्यांनी हेरली. कोव्हिडमुळे शासन-प्रशासन तोकडं पडू लागलं तेव्हा ठिकठिकाणी काय चालू आहे तेस्वतःपर्यन्त पोहोचवायला जिगरबाज माणसं हवी होती. तेव्हा त्यांनी श्रीकांतचा उपयोग करून घेतला. मग त्याने तो वसा घेतल्यावर त्याच्या कंपूच्या बातम्यांचा वापर करून होईल तेव्हढी परिस्थिति आटोक्यात आणली. अर्थातच व्यवहाराला पक्क्या अर्जुनरावांनी पद्मपुरस्कार देऊन मोल चुकतं केलं.

 गणपतरावांना फाइल परत करण्याआधी त्यांच्याकडून आताशा साहित्यनिर्मिती होत नाहीये हे त्यांनी त्यांना स्पष्टपणे लक्षात आणून दिलं होतं. त्या वर्षी केंद्रीय पुरस्कार बहुतांश ईशान्य भारतीयांच्या झोळीत गेले होते. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्या वेळेसच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी, तो सरकारच्या 'लुक ईस्ट'  धोरणाचा भाग असल्याचं सांगितलं होतं. केंद्रातही अर्जुनरावांचा पक्षच सत्तेत होता असल्याने महाराष्ट्रातून गेलेली शिफारस वांझोटी ठरणार हे मुख्यमंत्र्यांना आधीच माहिती होतं. म्हणून त्यांनी विरोधी पक्षाची शिफारस स्वीकारून बदल्यात एशियाडचं संयोजकपद आपल्या लायक कार्यकर्त्याला मिळवून दिलं.

 शिवाय गपपत्रवांच्या चाहत्यांच्या रास्त शिफारसी स्वीकारून चाहत्यांना कविराजांच्या ऋणात आणलं आणि रसिकपिठाच्या देव्हार्‍यातलं त्यांचं स्थान अधिक भक्कम केलं. स्वतःला चिरंजीवांच्या शिफारसीने ज्ञानपीठ मिळण्यापेक्षा चिरंजीवांना कोणाही आप्तस्वकीयांच्या शिफारसीविना पद्मपुरस्कार मिळाल्यामुळे गणपतराव अधिक भरून पावले.

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...