रविवार, २५ एप्रिल, २०२१

फक्त तुमचंच दूध नासतंय

पिशवीतलं दूध लहान शहरांपर्यंत, गावांपर्यंत पोहोचलं होतं-नव्हतं तेव्हाची ही गोष्ट. काठोकाठ भरलेलं आणि तरीही न सांडणारं दूध म्हणजे जादूटोणा वाटायचा तेव्हा. 


अशाच एका छान छान उबदार शहरातल्या आदर्शनगर मध्ये एक छोटंसं घर होतं. पति-पत्नि दोघांनी सरकारी नोकरी करून पै पै साठवून, कर्ज काढून बांधलेलं. कर्ज असल्यानं कुठल्याही प्रकारे पैसा वाया गेला तर झळ बसायची. अगदी त्या गावातल्या उष्म्यासारखी, दाहक. त्यामुळे कुठलीही खरेदी करताना ती खरंच आवश्यक आहे का हे आधी ठरवून मगच केली जायची. तसंच दिलेल्या पैशाचं पूर्ण मोल मिळालं नाही असं लक्षात आलं तर पत्नि बाई विक्रेत्या'कडे' आणि त्याने नाही ऐकलं तर विक्रेत्या'ची' तक्रार करायच्या आणि फसवणुकीचे पैसे परत मिळवायच्या. त्यामुळे आदर्श नगरात सगळ्या घरांशी सलोख्याचे संबंध असूनही त्यांना तक्रारवाली बाई अशी उपाधि मिळाली होती. त्या बाईंदेखतही तसं म्हंटलं तरी त्या प्रसन्न हसत, त्यामुळे लोकांनी तसं म्हंटल्यामुळे द्वेष, आकस वगैरे निर्माण होत नसे.


आदर्श नगर त्या काळी गावाबाहेर गणलं जायचं. वस्ती तुरळक होती. गवळी, दूधवाले भय्ये सकाळी पाच साडेपाच पासून येत. तक्रारवाल्या बाईंनी हट्टाने मराठी गवळी लावला होता, तो खाडे फार करी. त्याच्याकडल्या दूधावर साय अगदि पातळ जमे. तो पाणी मिसळतो अशी शंका होती. पण नुसत्या शंकेमुळे दूधवाला बदलायचा, त्याच्या पोटावर पाय द्यायचा हे बाईंच्या मानी स्वभावात बसत नव्हतं. एकदा बाईंच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात त्या आणि त्यांची मैत्रीण पावडे यांच्यात या विषयावर चर्चा चालली होती. नेहेमीची बायकांची असते तशी. पण आज त्यांच्या साहेबांचा मूड काही ठीक नव्हता. 


"ओ बाई, हे ऑफिस आहे. तुमचं गोस्सिप बाहेर करा. काम किती पडलंय. मागच्या सोमवारच्या ३ मसुदयात सुधारणा सांगितल्या होत्या, त्या झाल्या असतील टाइप, तर द्या मला, सही करून सभापतींना पाठवून देतो." 


यावर दोन्ही बाया गप्प झाल्या. थोड्या वेळाने वातावरणाचा ताप उतरला असं वाटून वरिष्ठ लिपिक शेख म्हणाले, 

"साब, मॅडम काम बाकी रखती  क्या? सोमवारच्या दुरुस्त्या बाईंनी बुधवारीच केल्या आणि तुम्ही सही करून पाठवल्या पण.. सभापति साब को"    

"बर बर. तू महाबळ बाईंची कड नको घ्यायला. शुक्रवारी किती वेळ बाहेर जातोस त्यावर लक्ष आहे माझं. इकडे तिकडे जास्त नाक खुपसलं तर मेमो काढीन." सगळे गप्प झाले.

संध्याकाळी बाई जायला निघाल्या तशी साहेब थोडे ओशाळून म्हणाले, 

"बाई तुमचं काम अगदी चोख आहे. सकाळी सकाळी घरगुती विषय ऐकला आणि एकदम बोललो. मी मीटिंगला वगैरे गेलो की जमवत जा तुमचं गुर्हाळ." 

बाई दोन क्षण थांबून शेख आणि पावडे कडे बघत सूचक हसून दारापर्यन्त गेल्या. मागून साहेबांचा आवाज कानी आला, 

".. आणि एवढीच खात्री असेल पाणी मिसळल्याची तर बदलून टाका दूधवाला किंवा अन्न-औषध प्रशासन, वजन माप खात्याकडे तक्रार करा..."


'आता साहेबांना कोण समजावून सांगणार की परवानाधारक विक्रेत्याची तक्रार केली तर कार्यवाही होते. गवळ्याकडे का परवाना आहे? आणि विनापरवाना विक्रीसाठी अडकवून त्याला आयुष्यातून उठवायचा का?'


पण फक्त ११ वी शिकलेल्या बाई होत्या हुशार. त्यांनी साहेबांच्या बोलण्यातला धागा पकडून वजन-माप कार्यालयाला पत्र लिहिलंच. काय लिहिलं? तर दूधातली भेसळ कशी ओळखावी याचा तपशील मागवला. प्रत: ग्राहक पंचायत, असं लिहायलाही  बाई विसरल्या नाहीत. खात्याने तपशीलवार उत्तर पाठवलं. यात दुधाची तुलनात्मक घनता किंवा दाटपणा तपासण्यासाठी लॅक्टोमिटर आणि तो वापरायची पद्धतही होती. 

मिटरची ४० रुपये ही किम्मत बाईंना जड होती. पण प्रयोगशील स्वभावाच्या जिज्ञासू बाईंनी ती दिली. आठवड्यातून ४ वेळा तरी मिटर दुधात खोल बुडत असे. गवळ्याशी बोललं तर तो उर्मटपणे म्हणाला, "बाई तुम्हाला बाकी दूधवाले आहेत आणि मला बाकी गिर्हाईक."  ठरलं. गवळी काढून दूधवाला भैय्या लावला. गवळी म्हणजे ज्याच्या स्वतःच्या गाई असतात तो आणि दूधवाला म्हणजे जो अनेक गाय वाल्यांकडून दूध गोळा करून विकतो तो. 


हसमुख यादव. नावाप्रमाणे हसमुख. दूध बर्यापैकी दाट होतं. शिवाय त्याचा आदर्श नगर आणि आसपास बर्‍याच घरी रतीब होता. खाडे फारच कमी. गावी गेला की त्याचाच कोणीतरी नातलग का गाववाला बदली म्हणून येई.


७-८ महिने अगदि निःशंक गेले. एक दिवस दूध घेवून तापवतांना ते थडथडून 'लागल्या'वर बाईंनी दिनदर्शीकेची पानं उलटून पाहिली. हो, बाई प्रत्येक अतिरिक्त व्यय तारखेने नोंदवून ठेवत. दूध नासलं की उशिरा येणर्‍या अन्य दूधवाल्याकडून अतिरिक्त पैसे भरून दूध घ्यावं लागे आणि नोंद होई. बाईंना लक्षात आलं गेल्या दोन महिन्यांमधे ५-६ वेळेला दूध नासलं. दुसर्‍याच सकाळी हसमुखला पृच्छा झाली. "ताई, तुमच्या भांड्याला काहीतरी लागलं असेल. साबुन या और कुछ." यावर लगेच तावातावाने बाई काही बोलल्या नाहीत. त्या धिराच्या, धोरणी होत्या. दुसर्‍या दिवसापासून त्यांनी हसमुखलाच रोज आधी पातेलं नजरेने, हाताने तपासून मग दूध ओतायला सांगितलं. तरी २ आठवड्यात परत एकदा दूध नासलंच. आता मात्र बाईंचा आवाज करारी होता. हसमुख उत्तरला. "ताई, सुभह सुभह इतना समझ मे नाही आया रहेगा. काही असल्याबगैर दूध लागेलच कसं ताई?" बाईंना काय बोलावं कळेना. हसमुख म्हणाला, "ये एरिया मे ४० घरांमध्ये माझा रतीब आहे. कोणाचीच तक्रार नाही." त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. 


स्वतःसाठी श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसलेल्या दिनचर्येत, मेंदूच्या एका कोपर्‍यात बाई दूध का नासतंय याचा विचार करत होत्याच. एक दिवस ऑफिससाठी बस थांब्यावर जात असतांना स्टेटबँक कॉलनी मधल्या पटेलबाई नेहेमीप्रमाणे रस्त्यातल्या सामायिक चौकात वाट पहात उभ्या नव्हत्या. २ मिनिट वाट पाहून तक्रारवाल्या बाई पुढे चालू लागल्या, नाहीतर बस चुकली असती. १००-१५० पावलं  पुढे गेल्या तोच पटेल बाई थोड्या पळतच मागून आल्या. मग झप-झप चालत दोघींनी बस पकडली. "आज सकाळी दूधच फाटलं. मग नवं दूध, नवर्‍याचा संताप.... सगळ्यात वेळ गेला. तुला वाट पहायला लागली आणि घालमेल झाली असेल उगाच"


नंतर एका दिवशी विषय निघल्यावर तक्रारवाल्या बाईंनी सहज म्हणून विचारलं, 

"कोणत्या दूधवाल्या कडून घेतेस दूध?" 

"लल्लन म्हणून आहे, बिहारी" 

हा तर हसमुखचा पुतण्या, कधी कधी बदली म्हणून दूध घालायला येणारा.. पटेल बाई पुढे म्हणाल्या, 

"भांड्याला राख रहाते, मग फाटतं दूध. सखू नीट घासत नाही ना.." 

"माफ कर, पण खरच का राखेने फाटतं दूध? तू स्वतः पाहिलीस का राख राहिलेली त्या भांड्याला?" 

"नाही.. नाही पण.. पण लल्लन म्हणाला म्हणजे असेलच तसं. तो म्हणाला फक्त तुमच्याकडलंच नासलं.."


तक्रारवाल्या बाईच्या डोक्यातून हे काही जाई ना. दोघे दूधवाले एकमेकांशी संबंधित, दोघांकडलं दूध नासतंय आणि दोघे सांगतात भांड्याला साबण किंवा राख राहिली असेल किंवा आदल्या दिवशीच्या विराजणाचं पातेलं असेल. खूप विचार करून बाई चमकल्या! 'फक्त तुमच्याकडलं नासलं!' हेच वाक्य महत्वाचं. यामुळे आपण भ्रमित होतोय का?


आता बाईंना स्वस्थ बसवेना. पुढे अगदी योजनाबद्धपणे रोज गोड गोड बोलून, 'आता कोणाकडे देणार दूध', 'आधी कोणाकडे दिलं' वगैरे रोज एखादा चौकशीपर प्रश्न विचारून बाईंनी हसमुखच्या आणि लल्लनच्या काही गिर्हाईकांची नावं काढून घेतली. नोंदी झाल्या. आसपासचेच लोक असल्याने आणि वस्ती तुरळक असल्याने तशी नावाने माहितीतलीच लोकं होती. शिवाय बाईच्या अंगणात होळीसाठी एक मैल असणार्‍या पार इच्छादेवी पर्यन्तचा अख्खा शेजार जमा होई त्यामुळे तुटपुंज्या का होई ना, ओळखी होत्या.


मग तो दिवस उगवला. लॅक्टोमिटरने आलेल्या दुधाची घनता खर्‍या दुधाची असावी त्यापेक्षा जास्त दाखवली आणि ते दूध नासलं. बाईंची खात्री झाली की भेसळ होती. योगायोगाने तो रविवार होता. बाईंच्या बागेत शेवग्याच्या झाडांना चांगल्या ८०- ९० शेंगा लोंबत होत्या. बाईंच्या मुलांना कामगिरी आली. मोठ्या झालेल्या शेंगा बांबुला लावलेल्या आकोड्याने पाडून त्याचे ५-७ शेंगांचे गठ्ठे करण्यात आले. हे आता शेजारी पाजारी भेट द्यायचे होते. त्या त्या घरच्या रहिवाश्याच्या नावाच्या चिठ्ठ्या गठ्ठा बांधलेल्या रबरबॅंड मधे सरकवलेल्या होत्या. त्यात काही तारांकित होत्या. त्या घरी शेंगा देतांना एक प्रश्न विचारायचा होता. 


या घरांमधे शेंगा देतांना विचारायचं होतं, "आईने विचारलंय, तुम्ही दूध कोणाकडून घेता?" अपेक्षित उत्तर आलं की विचारायचं, "आज दूध नासलं होतं का?" नंतर का विचारलं ते सांगायचं आणि तिथून सटकायचं. 

बाईंचा हा प्रयोग फारच यशस्वी झाला. हसमुखच्या ९ मधल्या ७ गिर्हाईकांकडलं दूध नासलं होतं. एका घरचे गावाहून उशिरा आले होते म्हणून दूध घेतलं नव्हतं. तर आणखी एका बाईने, 'तुम्हाला कशाला हव्या चांभार चौकशा' असा पवित्रा घेतला. म्हणजे जवळपास सगळ्यांकडलं दूध नासलं होतं!


आता रोज जाता येता एका दिवशी एक याप्रमाणे या सगळ्या शेजाऱ्यांना, दुधाबाबत काय होतंय आणि पुढे काय करायचं ते सांगितलं. सहकार्य कराल तर आपण ह्यातून एकत्र मार्ग काढू असं ठरलं. 


पुढच्या वेळी दूध नासलं तेव्हा योजना अमलात आली. ठरलेल्या क्रमाने तक्रारवाल्या बाईंच्या मुलाने वाणी काकूंकडे, त्यांच्या मुलाने भोरटक्के आजींकडे, त्यांनी वाढेंकडे, त्यांच्या मुलीने चौधरींकडे 'आज आमच्याकडे दूध नासलं' ही बातमी पोहोचवली. दुसर्या दिवशी प्रत्येक घरातून दूधवाल्याला विनामूल्य बदली दूध मागण्यात आलं. त्याने '५० मे सिर्फ आपका प्रॉब्लम है' असं सांगितल्यावर प्रत्येक घरातून त्याला इतर एका घरातही दूध नासल्याचं माहिती असल्याचं सांगण्यात आलं. 


दूधवाल्याने ओळखायचं ते ओळखलं. हे संघटन तक्रारवाल्या बाईच उभारू शकतात हे त्याने सहजच ओळखलं. मग त्याने, 

"अगले माह से और कोई दूधवाला देख लेना, मुझसे नही होगा. आपको दूध डालने से मेरा बहुत नुकसान हो रहा है." 

असा सूर काढला. बाई काही बोलल्या नाहीत. आता त्यांच्या 8-10 शेजारणी, बाई म्हणतील ते करायला तयार होत्या. हसमुखला पुढच्या आठवड्यात सगळ्यांकडून उलटी धमकी गेली, 

'आम्ही पुढच्या महिन्यापासून वेगळा रतीब लावणार आहे.' 

एवढं गिर्हाईक एकदम हातचं जाणं हसमुखला परवडणार नव्हतं. 

तो एका रविवारी दुपारी तक्रारवाल्या बाईंकडे आला. गयावया करू लागला. एका डेअरी कडून कधी कधी मोठी ठोक मागणी येते त्यामुळे याच्याकडलं दूध पुरत नाही. मग तो किरकोळ गिर्हाइकांच्या दुधात काहीतरी गोलमाल करत असे, हे त्याने मान्य केलं. कारणं सांगू लागला. गरिबी, मोठं कुटुंब, गावाकडे कर्ज, तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे. बाई तशा कनवाळू होत्या. दूधवाल्याचं नुकसान, बदला वगैरे हे आपलं उद्दिष्ट नाही हे त्यांना माहिती होतं. 


त्याच ८-१० घरांची मदत घेऊन बाईंनी हसमुखच्या मुलांची पुस्तकं आणि गणवेश याची सोय लावली. म्हणजे यांच्यातल्या 3 घरांमधली एक इयत्ता पुढे असलेली मुलं आदल्या इयत्तेची पुस्तकं आणि अंगाला न होणारे गणवेश हसमुखच्या मुलांना देणार होते. तसंच त्यांना शाळेला जायला बिनाभाडे तत्वावर आणि परतबोलीवर सायकलीही उपलब्ध करून देण्यात आल्या. हसमुखला बाईंचे आभार कसे मानावे ते कळेना.


पुढे बाईंना एखाद्या किराणावाल्याने किंवा अन्य दुकानदाराने, 'ताई, इतक्या गिर्हाईकांमधून तुमच्याच पोहयात  पोरकिडे निघाले' असं काही सांगितलं किंवा अगदि विद्युत मंडळानेही 'चुकीच्या मिटर रीडिंगची तक्रार फक्त तुमचीच आहे' असं काही सांगितलं की बाई ऐटीने म्हणत "ही मिल्कमन स्ट्रॅटेजी मला चांगलीच माहिती आहे. विचारू का इतर गिर्हाइकांना?" समोरच्या व्यक्तिने मान तुकवून, आणखी काही शहानिशा अथवा वाद न होता, फक्त या प्रश्नावरच, बाईंना अपेक्षित परिणाम घडल्याचेही प्रसंगही आले....


मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

साहित्य परिचय- बोर्डरूम

 पुस्तक: बोर्डरूम, व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर     

लेखक: अच्युत गोडबोले, अतुल कहाते

प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

मुद्रक: रोहन एंटरप्राईसेस

आवृत्त्या, पहिली: २००२, अकरावी: २०१०, अठरावी: २०१६ 


व्यवस्थापकीय तत्वांची सुरुवात या पुस्तकाय अभावितपणे होते ती पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत लेखकद्वयितले ज्येष्ठ लेखक स्वतः दुर्दम्य आशावाद बाळगून आहेत असं लिहितात, तिथूनच. तो कशाबद्दल आणि त्याची पृष्ठभूमी हा विषय वेगळा आणि त्याची मला पुरेशी कल्पनाही नसावी. तथापि,  बोर्डरूममध्ये आसनस्थ व्हायसाठी किंवा झाल्यावर व्यवस्थापकांकडे काय काय असावं लागतं, काय काय करावं लागतं, त्यांनी विचार कसे सर्वांगीण करावेत, उद्योग घड्याळाच्या काट्यावर सुरळीत चालायचा तर व्यवस्थापकाच्या वैयक्तिक दिवसाचा काटा कसा फिरतो, कार्यवाटप करतांना काय काळजी घ्यावी, कुठली नीती वापरावी हे सगळं आत्मसात करायसाठी या पुस्तकाचं प्रास्ताविक, (तेव्हाच्या-) उद्याचं आर्थिक जग आणि बेचैन करणारे प्रश्न ही प्रकरणं वाचावीत. माझ्या दृष्टीने नवख्या किंवा मध्यम पातळीवर असलेल्या व्यक्तिला हे प्रास्ताविक, प्रकरणं समजली तरी सर्वोच्च व्यवस्थापन कक्षापर्यन्तचा मार्ग समजेल आणि योग्य वेळी आठवत राहिली तर तो मार्ग सुकरही होईल. कारण हा माणूस नोकरशाहितून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारची म्हणजे 'मेरावाला टाइप' च्या माणसांची या पुस्तकात तुरळकच वर्णनं आहेत. व्यवस्थापनासंदर्भात असलेल्या पुस्तकातून वाचकाला जे अपेक्षित आहे ते प्रास्ताविकातून छानच मिळतंआणि लेखकांना जे द्यायचंय तो पुस्तकाचा मुख्य मसुदा आहे.

 

मी माझ्या आयुष्याची जवळजवळ निम्मी वर्षं अभियंता म्हणून कार्यरत आहे. व्यवस्थापन हा विषय जवळचा, अनुभवातला आहे. तरीही अच्युत गोडबोले आणि अतुल कहातें सारख्या दिग्गजांच्या पुस्तकावर मी या भूमिकेतून काही लिहावं एवढी माझी व्यावसायिक कुवत आणि आवाका नाही. त्यांनी या लिखाणातून जे संदेश पोहोचवले आहेत त्यांचं आकलन किंवा ग्रहण करून त्याप्रमाणे कार्यान्वय अपेक्षित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या पुस्तकातल्या काही नायकांनी यशस्वीपणे वपरलंय असं  एक व्यवस्थापकीय तत्व म्हणजे 'ग्राहक केंद्रस्थानी असतो'. लेखक-वाचक या नात्यात मी ग्राहक म्हणून केंद्रस्थानी येतो आणि त्या भूमिकेतून पुस्तकाबद्दल व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य उपभोगतो.


खरं सांगायचं तर ह्या पुस्तकात व्यवस्थापकीय तत्व किंवा वैशिष्ट्य याची यादी, व्याख्या किंवा तत्सम खल केला असेल असं समजून मी हे समोर घेतलं. त्यानंतर श्रीगणेशा करण्याआधी किमान ५ दिवस असं काहीतरी बोजड वाचायसाठीच्या म्हणून मानसिक तयारीत गेले. पण हे पुस्तक त्या वहिवाटेने जात नाही. कोणाची अपेक्षा असं फास्टफूड या पुस्तकातून पुढ्यात येण्याची असेल तर तसं होणार नाही. अगदि रंजकपणे केलेलं विविध यशस्वी उद्योजकांचा उदय, झळाळी आणि काहींचा अस्त तसच मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेली व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कर्तुत्वाला इंधन ठरलेले त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू याचं वर्णन या पुस्तकात आहे. 


गेली काही वर्षं रोजगार कमी होण्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरतात. यात कोणता पक्ष- हे दुय्यम आहे, पक्षाची सरकारी का विरोधी ही भूमिका, तो पक्ष या मुद्द्याला कसं हाताळणार हे ठरवते. निरपेक्षपणे विचार केला तर लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण हे दोन्हीही तीव्रतेने वृद्धिंगत होताहेत. हयांचं प्रमाण खरं तर व्यस्त हवं. हे दोन्हीही वाढत असतील तेंव्हा व्यवसायाच्या संधि कमी झाल्या तरच गणित सुटेल. तसंच ते सुटतय. यात सरकारचा दोष सकृतदर्शनी नाही. कारण ते लोकसंख्या आणि यांत्रिकीकरण यातली वाढ थोपवू शकत नाहीत. रोजगार म्हणजे केवळ नोकरी आणि मजुरी नाही तर व्यवसाय हा सुद्धा रोजगार आहे. व्यवसायाच्या संधि वाढवल्या तरी ते रोजगार मिळवून दिल्यासारखंच आहे. गेल्या ५-६ वर्षात सरकारने हे मान्य करून जनतेला पटवायचा प्रयत्न केला आहे आणि यासाठी उद्युक्त करणार्‍या अनेक योजना, उपयुक्त ठरणार्‍या सोयी, सुविधा, सवलती याची अक्षरशः रास उभी केली आहे. हे पुस्तक सध्या कर्मचारी असलेल्या किंवा कर्मचारी होणं हेच ध्येय अशी कल्पना उरी बाळगलेल्या पण उद्योजक मालक होण्याची कुवत असलेल्यांना तो विचार करायला प्रेरित करतं.


ढोबळ मानाने आपण असं म्हणू शकतो की आपल्यासमोर शाश्वत उद्दीष्ट ठेवलं की उपजत स्वभावगुण त्या दिशेने प्रवण होतात. यामुळे उद्दीष्टसिद्धता तर होतेच पण ती होता होता या उपजत गुणांनाही पैलू पडतात आणि वृद्धी होत जाते. रॉबर्ट ओवेनचा अंतस्थ हेतु कामगारांची पिळवणूक थांबवणं हा होता. मग विक्री कसब, आत्मविश्वास, बेरकीपणा, नीतीमत्ता, विश्लेषणकौशल्य या गुणांनी त्या शिकाऊ कामगारात- आधी व्यवस्थपक, मग उद्योजक अशी स्थित्यंतरं घडवली. तो यशस्वी झाला. हेंरी फोर्डकडून स्वप्न बघणं आणि बघितली म्हणून ती साध्य होणं, अपार संपत्तीचा फक्त सहेतुक वापर, परिपूर्णता येईपर्यंत संयम बाळगणं, कामाचे तास कमी करून वेतनवृद्धी निर्णय (त्या काळी), यामुळे त्याने काय साध्य केलं ते आपण जाणतोच. 


IBM चा संस्थापक वॉटसन हा पूर्वी त्याच्या नियोक्त्यासाठी पैशाच्या व्यवहारांची देखभाल करे आणि त्यातूनच मग आक्रमक माहिती तंत्र वापरुन त्याने IBM ची आधारशीला ठेवली. विक्रेत्याला (salesman) महत्व, मूल्यांवर श्रद्धा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत आदरभावाचं इतरांनी केलेलं संगोपन यामुळे ही आधारशीला भक्कम ठरली. केवळ रणनीतीत फेरफार करून आधी आपटलेली तीच वस्तु त्याच माणसांकरवी लोकप्रिय करता येते हे 'ली आयकोका' ने दाखवलं. फोर्डने कर्मचारी हाताळण्यात केलेल्या चुका आणि त्यामुळे त्याला मोजावी लागलेली किंमत. लोकांच्या गुणांचं त्यांच्या देशबांधवांनाच (किंवा उद्योगाला) सोयर नसेल तर अन्य देश (स्पर्धक उद्योग) त्या लोकांचा वापर करून मूळच्या त्यांच्या देशावर मात होऊ शकते हे डेमिंग आणि ज्यूरनचं उदाहरण दाखवून देतं. उत्पादन मानक ठरवणं आणि कसोशीने पाळणं, सुटसुटीतपणा ही तत्व वापरुन मॅकदोनल्ड्सचं साम्राज्य उभं आहे. तसंच ग्राहकाला आवडणारी एखादी धंदेवाईक खुबी आपल्या उत्पादनात असेल तर ती गुपित म्हणून जतन केली की स्पर्धेत तग लागतो, ह्याचं मॅकदोनल्ड्स हे मासलेवाईक किंवा मसालेवाईक उदाहरण. याहीपुढे कोक, नाइके, फेडेक्स, इंटेल, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, आयबीएम, डाऊ, एस अँड पि, ओर्‍याकल, ई-बे, अमेझोन, पेपाल, नोकिया या सगळ्यांचं आणि आणखीही उद्योगांचं वर्णन या पुस्तकात आहे. ते बोजड नाही, रंजक आहे.


दोनशेच्या आसपास परदेश वार्‍या केलेल्या, काही उद्योगांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राहिलेल्या वरिष्ठ लेखकाचं वाचन विस्तृत आहे हे संदर्भ यादी स्पष्ट करते. हजारो माणसं आणि हजारो कोटी रुपये हाताळणारा हा एक माणूस उरलेल्या वेळातही व्यवस्थापनाची किंवा त्या दृष्टिकोनातून एवढी पुस्तकं वाचतो. हा ध्यास शिकण्यासारखा आहे.


येन केन प्रकारेण पैसा मिळवायचा एवढंच उद्दिष्ट असलेले या पुस्तकातले २-३ महानयक सोडले तर इतर सर्व उद्योजकांचं आपल्या उत्पादनावर किंवा कर्मचार्‍यांवर किंवा समाजावर प्रेम होतं. ते भावनिक रित्या यातल्या कशाशी तरी तरी संलग्न होते. असा एक निष्कर्ष (ऑन ए lighter नोट) काढायलही वाव आहे की आताचं जे जीवघेण्या स्पर्धेचं स्वरूप आपण अनुभवतो तिथपर्यंत हे लोक आपल्याला कदाचित इतक्या लवकर घेऊन आले नसतेही. पण ... पण  ही विचारवंत, विश्लेषक, सल्लागार यांची जी त्रयस्थ जमात आहे ती या बेफामपणाला कारणीभूत आहे. कारण या तटस्थ भूमिकेतून त्यांनी उद्योगातल्या माणुसकीला, मूल्यांना तिलांजली दिली. वस्तुनिष्ठ, भांडवलवादी विचार आणि निश्कर्ष समोर आणले. भ्रमित होऊन कर्तुत्ववान उद्योजक आणि त्याचे व्यवस्थापक त्यामागे धावू लागले आणि ही मग शर्यत झाली. आजची परिस्थिति हे त्याचं फलित. 


नफेखोरीवर आधारलेल्या समाजाला व्यवस्थापनाची तत्व काय कामाची? शेवटी हे सगळं कशासाठी? हे प्रश्न आपल्याला पडावेत असं लेखकला वाटतं, यातून मला हे जाणवलं की व्यवस्थापन विश्वात संवेदनशील, संतुलित व्यक्तिमत्व हे मूळ तत्व असायला हवं. यात तडजोड नको. व्यक्ति, समाजघटक म्हणूनही हे प्रश्न पडायलाच हवेत.


समाजातलं एक उदाहरण देतो. कदाचित थोडं विषयांतर वाटेल. १९९० च्या आसपास एका वर्षी आमच्या गल्लीमध्ये बहुतेक घरांच्या पुढच्या अंगणात पावसाचं पाणी खूप तुंबलं. आदल्या वर्षीही थोडं पाणी आलं होतं पण फार साठलं नव्हतं. आदल्या वर्षाच्याआधी कधीही असं झालं नव्हतं. एका ओळखीच्या बांधकाम व्यवसायिकाने आईला सांगितलं की रस्त्याची पातळी चढी असल्याने आणि रस्त्याकडेने निचरा वाहिन्या बांधल्या नसल्याने अंगणात पानी साठतंय. पण या दोन्हीही गोष्टी तर कायम तशाच होत्या, मग आत्ताच तुंबई का? हा प्रश्न आईला नंतर पडला. काही महिन्यांनी रस्त्यावर खूप खड्डे झाल्यामुळे रस्ता परत बांधायला घेतला होता. तेव्हा आईला लक्षात आलं की आता आहे त्या रस्त्यावर आणखी एक स्तर चढतोय. म्हणजे रस्त्याची ऊंची आणखी वाढणार, मग अंगणात आणखी पाणी साठणार की काय? आईने त्या व्यवसायिकाला बोलावून परिस्थिति दाखवली. त्याने, त्याचं नाव बाहेर कुठे न येऊ देण्याच्या अटीवर सांगितलं की, आईचा निश्कर्ष योग्य आहे. तसंच हे ही सांगितलं की रस्ता दुरुस्ति करतांना गरज असल्यास आधी तो खोदावा लागतो, त्याचे विविध स्तर अंथरून मग वरचा डांबराचा स्तर टाकायचा असतो. पण डांबरट कंत्राटदार खोदाई आणि खालच्या स्तरांचे पैसे खिशात टाकतात. तसंच रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडू नयेत म्हणून दोन्ही बाजूला उतार (आता मला कळलं की त्याला रोड कॅम्बर म्हणतात)  द्यायचा असतो, तो ही देत नाहीत. त्यामुळे दर वर्षी खड्डे पडून दर वर्षी कंत्राट मिळतं. हे ऐकून आईने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे, जिल्हा परिषद, नगरपालिकेत कामातल्या त्रुटींची तक्रार केली. नागरिकांनी काम थांबवावं अशी भूमिका घेतली. स्थानिक नगरसेवक भेटायला आला. मॅडम, रोड वगैरे सोयी करून मी 'मोहल्ल्या'ची प्रगति करतो तर तुम्ही त्यात खोडा घालता अशी अरेरावी करू लागला. त्यावर विषण्णपणे आई म्हणाली 'हो, प्रगति, पण खड्ड्यांच्या दिशेने...". लिखित स्वरुपात तिने दिलेली कारणं तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याने आणि गल्लीतले लोक एकोप्याने या प्रसंगाला सामोरे गेल्याने आधी निचरा नलिका बांधून मग योग्य त्या प्रकारे रस्ता बांधला गेला. आणि हे सगळं कशासाठी? हा प्रश्न नागरिकांसाठी सुटला.

  

व्यवस्थापन क्षेत्रात असलेल्या किंवा ते क्षेत्र निवडायला बाशिंग बांधलेल्या अथवा त्याबद्दल जिज्ञासा असलेल्या वाचकाला हवंय ते या पुस्तकात आहे. त्याहीपुढे जाऊन, लिहीणार्‍याची मूल्यही घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावं!

आता कोणाचा करू धावा

        सकाळी दामूअण्णा आणि शकूभाभी गाडी काढून निघून गेलेत. असे गेले की ते ३-४ सूर्यचंद्र जाईपर्यंत तरी येत नाहीत. आता दोन्ही वेळचं जेवण नेप...