लेखक: शंकर पाटील
(जीवनकाल १९२६ ते १९९४)
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
प्रथम आवृत्ति:
५ सप्टेंबर १९९८, सध्याचं ८ वं मुद्रण २०१४
मी वाचलेलं हे शंकर पाटील यांचं पहिलंच पुस्तक. मुखपृष्ठावरूनआणि नावावरून कथासंग्रहाबद्दल अंदाज बांधायएवढा तय्यार वाचक मी नाही. ते बरं आहे असं पुस्तक वाचून झाल्यावर वाटलं!
मेहता पब्लिशिंग नेहमीप्रमाणे सुरुवातीलाच आपल्या लेखकाची छायाचित्रासकट ओळख करून देतात. आतली प्रत्येक लघुकथा या ओळखीला जागते. अस्सल गावराण सभोवताल आणि त्याचं तशाच भाषेत वर्णन. हातचं राखून असं काही नाही. मुद्दाम काही वाढवलय असंही नाही. व पु काळेंसारख्या लेखकांच्याकथांमध्ये येतात तशी खास दुहेरी उद्गारवाचकचिन्हांमध्ये लेखकाच्या नावे प्रसिद्धी पावतील अशी वाक्यही नाहीत. पण कथांमध्ये आशय आहे.
बाज गावराण असला तरी प्रत्येक लघुकथेचा विषय वेगळा आहे, म्होरक्या वेगळा आहे.
बापाचा मोठा लेक शहरात आजारी पडल्यावर त्याच्यासाठी पैसे जमवतांना त्या खेडूत म्हातार्याची होणारी वैचारिक घालमेल, त्याच्या तत्वांनी त्याच्यातल्या गरजूवर केलेली मात आणि त्यामुळे जवळ जवळ सुटलेली समस्याही कशी अधांतरी रहाते याचं वर्णन 'भावकी' कथेत येतं.
'कणा' कथेत सहजीवनातल्या सकारात्मक वास्तवाचं दर्शन होतं. एक जण मोडला तर दुसरा जोम धरतो आणि दुसरा वाकला तर पहिला ताठ होतो. महाभारतात वगैरे जसे अधिरथी महारथी एकमेकांच्या प्राणाचं रक्षण करायला सरसावतात तसाच हा संसार-संग्राम आहे. तो निभावला की सहजीवन चालू रहातं. यात पैसाअडका, संपत्ति वगैरे तोंडी लावण्यापुरतंच असतं, एकमेकाला जगवण्याची जिद्द महत्वाची.
'खरं की खोटं' मधे एकाच कुटुंबातली प्रेम आणि विश्वास असलेली माणसं तेवढी एकमेकांना आपलीशी वाटतात आणि ती एकमेकांचं नक्की ऐकतात, हे आजोबा-नातवाच्या नात्यातून चितारलय. हे वर्णन मन हळवं करून जातं.
'एक मंगलकार्य', 'दरवेशी आणि अस्वलं' आणि 'खासदारांची जनसेवा' या कथांमधून समाजात अगदी सर्व स्तरात बोकाळलेला भ्रष्टाचार, सरकारी कर्मचार्यांचा नेते, अधिकारी यांच्या खाजगी कामासाठी वापर, तो नाही होऊ दिला तर होणारे परिणाम, परितोषिक वितरणात कशी वर्णी लागते, नेते मंडळींच्या कोट्यातून नोकरी मिळणं म्हणजे काय, इत्यादि अगदि लख्खपणे मांडलं आहे. या लिखाणाचं वैशिष्ठ्य हे की यात हे फक्त थेट मांडलय, त्यावर काहीही त्रागा किंवा संताप व्यक्त केलेला नाही. तसाच तो वाचकाच्या मनातही निर्माण होत नाही. पण आहे हे योग्य नाही हे नक्की कळतं.
'मास्तर मास्तर तिरकामठा' आणि 'इथे कायदा झक मारतो' या कथांमध्ये गावाकडे एखाद्या आडदांड व्यक्तिला डिवचला की काय परिणाम होतात आणि यातून मग डिवचणारा कोणीही प्रतिष्ठित असेल जसं मास्तर, सरपंच, तलाठी अगदी जिल्हाधिकारी असला, तरी त्यालाही सुतासारखा सरळ आणण्याची पात्रता अशा आडदांडामध्ये असते. याचं वर्णन केलय.
'काखेत कळसा' मधे चारचाकी गाडीतून सम्मेलनाला परगावी निघालेले ४ वकील, खेडूतांच्या स्वभावाचे त्यांचे चर्वितचर्वण चाललेले अनुभव आणि तेव्हढ्यात २ खेडूतांनी त्यांची एकत्र असतांना केलेली छोटीशी दिशाभूल याचं रंगतदार वर्णन आहे.
'जुगलबंदी' कथा एक लंपट व्यक्तिमत्व रेखाटते. वाचक जर खेड्यात किंवा लहानश्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलेला असेल तर त्याला अशा व्यक्ति आणि कथा यांचं नाविन्य नक्कीच वाटणार नाही. तथापि अशा विविध अंगि, वेगवेगळे विषय, नाति, आशय, आवाका असणार्या या गावरान मेव्याचं बारसं आणि मुखपृष्ठ त्यातल्या एकमेव लंपट कथेवरून केलंय, हा वाचकसमाजाच्या आवडी-निवडीचा आरसा समजायचा का?